विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती”!

अवघं चराचर ‘अस्तित्व’ हेच, ‘ईश्वरतत्त्व’ मानणारी… सगळं जगच आपल्या प्रेमळ कवेत सामावून घेणारी विश्वगामी, विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती”!

…. शिवबा-संतांच्या महाराष्ट्रात एक असा महान संत होऊन गेला, ज्यानं मराठी-संस्कृतीचं हे लेणं, खालील शब्दात अतिशय प्रत्ययकारीरित्या अधोरेखित केलयं….

संत सावता माळीं चे हे उच्चारण, जणू संत ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदाना’सारखाच एक ‘अमृतानुभव’ होय !!!!

“कांदा, मुळा, भाजी

अवघी विठाई माझी…

लसूण, मिरची, कोथिंबिरी

अवघा झाला माझा हरी!!!

….. राजन राजे Rajan Raje(अध्यक्षः धर्मराज्य पक्ष)

“रामशास्त्री प्रभुणे आणि जे. चेलमेश्वर… एका खणखणीत नाण्याच्या दोन बाजू !!!”

नुकतेच २२ जून-२०१८ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वश्री जे. चेलमेश्वर हे सात वर्षांच्या सेवेपश्चात, एका वादळी पार्श्वभूमीवर निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालय नांवाच्या संस्थेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारी आणि न्यायमूर्ती नेमणुकीच्या पद्धतीतलं दोष दिग्दर्शन करणारी, अशी ती वादळी पार्श्वभूमी होती…

“हिटलरसुद्धा सत्तेत कायम रहाणार नव्हता व सर्वोच्च न्यायालयातील उद्वेगजनक सद्दस्थितीही (ज्यात, न्यायदानातल्या मूलभूत पवित्र मूल्यांचा र्‍हास होत होता) कायम रहाणारी नाही”, असा भारतीय न्यायदानाच्या इतिहासात प्रथमच राणाभीमदेवी थाटात पवित्रा घेत सर्वोच्च न्यायमूर्ती श्री. दीपक मिश्रा यांच्या गैरकारभाराविरुद्ध सहकारी न्यायमूर्तींसह बेधडक जाहीर ‘पत्रकार परिषद’ घेण्याचा बाणेदारपणा न्यायमूर्ती जे. चेलमेश्वरांनी दाखवला. त्यामुळेच, भारतीय जनतेला सुस्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयात “ऑल् इज् नाॅट् वेल्” याचा उघड साक्षात्कार झाला, जे होणं ही ‘काळाची गरज’ बनली होती!

याच न्यायमूर्ती जे. चेलमेश्वरांनी केंद्र सरकारच्या, उत्तराखंडात रावत सरकार बडतर्फ करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाविरुद्ध निकाल देणार्‍या, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून, गुणवत्तेनुसार सुयोग्य पण, सेवाज्येष्ठतेबाबत वादग्रस्त, अशी जोरदार शिफारस ‘काॅलेजियम’मधून करण्याची हिंमत दाखवली होती.

भारतीय लोकशाहीला तारणारा, असा सर्वात महत्त्वाचा निर्णय जे. चेलमेश्वर व एस्. नझीर या खंडपीठाने, निवडणूक प्रक्रिया सुधारण्याबाबत व अधिक पारदर्शक करण्याबाबत १६ फेब्रुवारी-२०१८ रोजी दिला.

त्यामुळे, खालील क्रांतिकारक गोष्टी घडल्या….

१) निवडणूकीसंबंधी नियमावली (१९६१) च्या नमुना क्र.२६ मध्ये सुधारणा,

२) सदरहू नमुना अर्जात अपुरा वा चुकीचा तपशील देणार्‍या उमेदवाराचा निवडणूक अर्ज रद्द ठरविण्याचा अधिकार,

३) लोकसभा वा राज्यविधिमंडळात निवडून जाणाऱ्या खासदार-आमदारांच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा उत्पन्न जास्त आढळल्यास लोकप्रतिनिधी म्हणून निवड रद्द करणे… त्यासंदर्भात, चौकशी करणारी स्थायीसमितीची निर्मिती आणि लोकप्रतिनिधींवरील भ्रष्टाचाराच्या खटल्यांचा तातडीने निपटारा,

४) त्यादृष्टीनं, उमेदवार वा उमेदवाराची पती/पत्नी वा त्यावर अवलंबून असलेले जवळचे नातलग यांनी मिळविलेल्या सरकारी कामांच्या कंत्राटांचा संपूर्ण तपशील उघड करणे

“मी भारतीय जनतेला, भारतीय राज्यघटनेला आणि मी सर्वोच्च न्यायालयाचं न्यायमूर्तीपद स्विकारताना घेतलेल्या शपथेला बांधिल आहे… कुठल्याही केंद्रिय सत्तेला नव्हे”, असं ठणकावून सांगणारा, हा दुर्मिळ अशा “रामशास्त्री बाण्या”चा न्यायाधीश होता. केवळ, राजकारणीच नव्हे; तर, अनेक निवृत्त न्यायमूर्तीही दिल्लीतील सरकारी आलिशान बंगले वर्षानुवर्षे बळकावून बसण्याची परंपरा असताना, ती याच रामशास्त्री बाण्याने कठोरपणे मोडून काढणार्‍या या न्यायमूर्तीने, निवृत्तीच्याच दिवशी सरकारी बंगला सोडून एक नवा आदर्श निर्माण केलाय! 

निवृत्तीपश्चात बड्या पगाराच्या वा मोठ्या लाभसुविधा असलेल्या कुठल्याही सरकारी वा खाजगी नेमणुकीलाही सुस्पष्टपणे नकार देणाऱ्या, या ‘रामशास्त्री’ला ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने त्रिवार सलाम !!!

संदर्भ, रामशास्त्री प्रभुणे, या पेशव्यांच्या दरबारातील ‘नररत्ना’वर येऊन ठेपल्यामुळे… या निमित्ताने या महान व्यक्तिमत्वाचा थोडक्यात पण, अत्यंत महत्त्वाचा परिचय महाराष्ट्राला होणं, नितांत गरजेचं आहे, असं आम्हाला वाटतं! 
‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन सातत्याने आम्ही, “एकवेळ पोटाला भाकरी मिळाली नाही तरी, चालेल; पण, न्याय हा प्रत्येकाला मिळालाच पाहिजे”, असं प्रतिपादन करत असतो…. त्याचं मूळ कारणचं हे की, ‘न्यायदान’, हे इतकं परमपवित्र कार्य होय की, ते ‘सत्ता’ वा ‘मत्ता’ यामुळे यःकिंचितही झाकोळून जाताच कामा नये; मग, ‘न्यायदान’ हे सत्तेपुढे वा पैशापुढे लाचार होण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो? आपल्या देशात अभावानेच खन्ना, चंद्रचूड, चेलमेश्वर यासारखे ‘रामशास्त्री बाण्या’चे न्यायमूर्ती होतात, म्हणूनच देशाच्या लोकशाहीची ही आजची अराजकसदृश्य भयानक स्थिती आहे! 
राज्यघटनेनं लोकशाहीचा स्वतंत्र व स्वायत्त स्तंभ म्हणून जरी ‘न्यायसंस्थे’ची उभारणी केलेली असली; तरी, ती संस्था राबवणारे हातच व्यवस्थेचे ‘गुलाम’ होऊ लागले की, जनतेचा शेवटचा ‘आशेचा किरण’ही विझून जातो आणि देशात अन्याय-अत्याचार-विषमता-गुन्हेगारीचा कहर माजतो, जे आपल्या देशात स्वातंत्र्यापश्चात टप्प्याटप्प्याने घडत आलेलं दिसतय!

म्हणूनच, जे. चेलमेश्वरांच्या निवृत्तीप्रसंगी रामशास्त्री प्रभुणेंचं स्मरणं यथोचितच नव्हे; तर, अत्यावश्यक ठरतं. ज्यांच्या निःपक्षपाती, कठोर न्यायदान पद्धतीमुळे व ज्यांच्या आदर्शवत स्वाभिमानी, नीतिमान आचरणामुळे मराठी भाषेला “रामशास्त्री बाणा”, हा नवा सघन वाकप्रचार मिळाला… मराठी-संस्कृती अधिक संपन्न झाली, तो हा रामशास्त्री प्रभुणे कोण आणि त्याची स्वभाववैशिष्ट्ये कोणती… ती आपण जाणून घेणं, निश्चितच सार्वजनिक हिताचं ठरेल. 
‘बाळंभट्टी’ ही, ‘मिताक्षरा’ या ग्रंथावरील ज्यांची टीका, ब्रिटीश न्यायालयात प्रमाणभूत मानली जात होती, अशा बाळंभट्ट पायगुडे नांवाच्या काशीस्थित विद्वान गुरुकडे खडतर शिक्षण पार पाडून, ‘राम’ नांवाचा एकेकाळचा अशिक्षित घरगडी, जिद्दीने ‘रामशास्त्री’ बनला!!! स्वाभाविकच उत्तर पेशवाईतलं ‘न्यायमूर्तीपद’ त्यांच्याकडे चालून आलं, जे त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही, न डगमगता केवळ हिरण्यगर्भासारख्या तेजस्वी सत्यप्रज्ञेवर निभावलं. त्यांच्या वैयक्तिक कारकीर्दीची थोडक्यात झलक खालीलप्रमाणे……

१) घाशीराम कोतवालसारखी तत्कालीन भ्रष्टाचाराची प्रकरणे पेशवेकाळातही गाजत असल्याने पेशवेकाळही भ्रष्टाचारात मागे नव्हता. पण, अत्यंत तत्त्वनिष्ठ, न्यायनिष्ठूर, निस्पृह असलेले रामशास्त्री… पोशिंद्या पेशव्यांपुढे कधिही, कुठल्याही प्रसंगी झुकले नाहीत.

२) एकदा सलग तीन दिवस माधवराव पेशव्यांना, महत्त्वाच्या कामानिमित्त भेटण्याचा रामशास्त्र्यांचा प्रयत्न, केवळ माधवराव पेशवे पुजापाठात गुंतलेले असल्याने विफल ठरला. त्यामुळे, सात्विक संतापाने रामशास्त्रींनी पेशव्यांना खडे बोल सुनावले की, “राज्यकर्त्यांचे खरे देव देव्हाऱ्यात नसतात; तर, ते प्रजेमध्ये असतात…. पूजापाठातच जर वेळ घालवायचा असेल तर, आपण दोघेही काशीला जाऊ, तिथला ‘गंगाघाट’ हे पूजेसाठी उत्तम स्थान आहे!” त्यानंतर, लहान वयाच्या माधवराव पेशव्यांमध्ये फार मोठा स्वभाव बदल घडून आला व ते कसोशीने राज्यकारभार चालवू लागले (नाहीतर, सध्याचे सर्वपक्षीय राजकारणी आणि राज्यकर्ते पहा… ते स्वतःही सार्वजनिकरित्या असल्या पूजापाठ-कर्मकांडात व्यग्र असतातच, शिवाय भोळ्याभाबड्या सामान्य जनतेलाही फाजील धार्मिक उन्मादाची केवळ अफूचीच मात्रा नव्हे, तर ‘अॅनेस्थेशिया’ देत असतात… उदा. सावर्जनिक गणेशोत्सव-सत्यनारायण पूजा, हळदीकुंकू, दहीहंड्या इ. व विविध सद्गुरुंच्या बुवाबाजीत, आपल्या राजकीय-स्वार्थासाठी सामान्य जनतेला अडकवून ठेवत असतात)

३) माधवराव पेशव्यांची पत्नी रमाबाईंनी चैत्र गौरीच्या हळदीकुंकू समारंभप्रसंगी ‘लंकेची पार्वती’ असणाऱ्या रामशास्त्रीबुवांच्या पत्नीला, काशीबाईंना, समारंभानिमित्त घालायला दिलेले आपले काही दागिने मोठ्या मनाने दान केले. दारात आलेल्या आपल्या सालंकृत पत्नीला पहाताच रामशास्त्रींचा संताप अनावर झाला…. तरीही ते संयम राखत पत्नीला एवढेचं म्हणाले, “बाईसाहेब, आपण कुणी पेशव्यांच्या ‘मानकरीण’ आहात वाटतं. आपण रस्ता चुकलात, हा गरीब रामशास्त्र्यांचा वाडा आहे. पेशव्यांचा शनिवार वाडा पलिकडे आहे.” 

काशीबाई काय समजायचं ते समजल्या व शनिवार वाड्यात जाऊन रमाबाईंना दागिने परत करुन आल्या, हे काही सांगायला नकोच.

४) पेशवे नारायणरावांच्या खुनात राघोबाबादादाच दोषी आहेत, हे निर्विवाद सिद्ध झाल्यानंतर राघोबादादांना, “देहान्त प्रायश्चित्त, हीच एकमेव शिक्षा”, असं न्यायमूर्ती या नात्याने रामशास्त्रींनी गर्जून सांगितलं. पण, पेशवेपद त्यजून न्यायासनाची ही शिक्षा मानण्यास राघोबादादा तयार होईनात. तेव्हा संतप्त रामशास्त्र्यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा फेकून शनिवार वाडा सोडला. “या पाप्यांच्या राज्यात मला पाणीसुद्धा प्यावयाचं नाही”, असं म्हणतं ते जे निघाले, ते तडक वाईला मुगावी पोहोचले.

५) पेशवाईतील बारभाईच्या कारस्थानानंतर नाना फडणवीसांनी (नाहीतर, मोदी-शहा द्वयीची मर्जी राखण्यासाठी न्यायसंस्थेवर व प्रशासनावर अवांछनीय दबाव आणणारे आताचे ‘फडणवीस’ बघा!) मिनतवाऱ्या करुन परत त्यांना न्यायाधीशपदी आणलं. मात्र, सततचा आत्यंतिक मनस्ताप व दगदग यामुळे रामशास्त्र्यांची तब्येत ढासळू लागली. मृत्यूपूर्वी (२५ ऑक्टोबर-१७८९) नाना फडणवीसांनी रामशास्त्रीबुवांच्या मुलाची कोणत्या पदावर नियुक्ती करावी, असं शेवटचे श्वास मोजणाऱ्या या निस्पृह न्यायशास्त्रींना विचारताच, हा महापुरुष उद्गारला, “कोणतीही योग्यता नसलेल्या माझ्या मुलाला पेशव्यांची धोतरे धुण्याचं काम द्यावं… त्याची योग्यता तेवढीच आहे!”

नाहीतर, आपल्या बिनलायकीच्या, गुणवत्ताशून्य पुत्रपौत्रांना, लेकीसुना-जावयांना, नातलगांना…. राजकारणात, शिक्षणक्षेत्रात, उद्योग-व्यवसायात ‘येनकेनप्रकारेण’ जबरदस्तीने पुढे आणणारे आजचे ‘महाभाग’ कुठे??? 

रामशास्त्री प्रभुणेंच्या पायधुळीचीही लायकी नसलेले कःपुरुष, आज सर्वच क्षेत्रात सत्ता आणि मक्तेदारी गाजवताना दिसतायतं…. हे आजच्या सडलेल्या, किडलेल्या अमानुष व्यवस्थेचं (ज्याला, आम्ही सातत्याने ‘रक्तपिपासू-शोषक व्यवस्था’ किंवा ‘व्हँपायर-स्टेटसिस्टीम’ म्हणतं असतो) मूळ कारणांपैकी एक होय!!!

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. चेलमेश्वरांच्या निवृत्तीनं इतिहासाची काही पानं फडफडत मागे वळली, ती थेट उत्तर पेशवाईत रामशास्त्र्यांच्या वाड्यापर्यंत जाऊन पोहोचली…. इंग्रज इतिहासकार ग्रँड डफ म्हणून गेला, “रामशास्त्री, हा अत्यंत तेजस्वी, विद्वान ब्राह्मण होता. असा न्यायशास्त्री पुन्हा होणे नाही!!!”

अशा, रामशास्त्रींचं उत्तर पेशवाईतलं कठोर न्यायदान कुठे आणि आताचं उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती के. एम. जोसेफांना सर्वोच्च न्यायालयात काॅलेजियमची दुहेरी शिफारस असतानाही तांत्रिक मुद्द्यावर नकार देत, ‘पक्षपात’ करणारं मोदी-शहा सरकारचं ‘न्यायदान’ कुठे….

“कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी”!!!

…..राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)

प्रश्न: ‘प्लास्टिक बंदी’च्या मोठ्या दंडाबाबत आपल्या ‘धर्मराज्य पक्षा’चं मत काय आहे???

माझं उत्तर: दुर्दैवाने असं काही केलं नाही तर, स्वांतसुखाय मध्यमवर्ग व एकूणच जनता कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेत नाही, हा सार्वत्रिक अनुभव आहे… दंड त्रासदायक आहे खरा, पण भविष्याच्या दृष्टीकोनातून ही प्लास्टिकबंदी व त्याकारणे केला जाणारा दंड, “इष्टापत्ती” ठरावी.

अशाप्रकारचे मोठे आर्थिक दंड नागरीसुविधा योग्यप्रकारे न पुरविणारा व अनधिकृत बांधकामांना आशिर्वाद देणारा महापालिका अधिकारीवर्ग, संबंधित राजकारणीवर्ग (नगरसेवक व राजकीयपक्ष पदाधिकारी) यांनादेखील व्हावेत… ही आम जनतेतून या निमित्ताने पुढे आलेली मागणी, अगदी योग्य आहे!

मात्र, बऱ्याच जणांना कल्पनादेखील नाही की, निसर्ग-पर्यावरणविषयक समस्यांनी एवढं गंभीर स्वरुप धारण केलयं की, पुढील पिढ्यांचं व सगळ्या सजीवसृष्टीचं अस्तित्व, संभाव्य सर्वनाश टाळून, टिकवून धरायचं असेल तर, “प्लास्टिक, रंग व रंगद्रव्ये (कपडे, इमारती, वस्तू इ. साठी वापरले जाणारे शोभिवंत कृत्रिम रंग… फक्त काही निवडक अपवाद वगळता उदा. जहाजांच्या बाहेरील भागाला खाऱ्या पाण्यात झपाट्याने गंजून जाऊ नये म्हणून वापरले जाणारे ‘गंजप्रतिबंधक’ रंग) आणि आंघोळीचे साबण- कपडे धुण्याचे डिटर्जंट्स् यांच्या उत्पादन-वापरावरही तातडीने संपूर्ण बंदी आणणं निकडीचं बनलेलं आहे!

त्यातून, जमीन, पाणी व हवा यांचं प्रदूषण तर कमी होईलच; शिवाय, शहरातल्या उंच इमारतींतलं बहुतांश सांडपाणी (मलःनिस्सार वगळता… त्यावरही सोपी प्रक्रिया करुन त्याचं सर्वोत्तम दर्जाच्या ‘सोनखता’त करता येईलच) फारसा वीजेचा वापर न करता थेट गुरुत्वीयबलाच्या आधारे शेतीसाठी वापरता येऊ शकेल… तेवढी खेड्यापाड्यातील अधिकाधिक जमीन अत्यल्प खर्चात लागवडीखाली येऊ शकेल.

आपली एकूणच मध्यमवर्गीय जीवनशैलीचं कमालीची कार्बन व प्रदूषणकेंद्री झालेली आहे… त्यामुळे, आपण या पृथ्वीमातेवरील संसाधनांचा वेडावाकडा, अनिर्बंध व विकृत उपभोग घेऊन आगामी पिढ्यांना (म्हणजेच, आपल्या नातंवंड, पंतवंड वगैरे पुढील पिढ्यांना) जणू उद्याचा उगवता सूर्यच नाकारत आहोत… त्यांच्या पुढ्यात आपल्या चंगळवादी जीवनशैली व आततायी उपभोगीवृत्तीमुळे अंधाराचं ताट वाढून ठेवत आहोत, याचं आपणा सर्वांना ना ज्ञान, ना जाणिव, हे केवढं भयानक आहे!!!

सुरुवातीला, हा जीनवशैलीतला मोठा बदल खूपच त्रासदायक वाटू शकतो… पण, आपसूक शाश्वत व निसर्ग-पर्यावरणस्नेही पर्याय पुढे येतीलच (उदा. ऊन्हात अवघे काही तास तापलेली स्वच्छ वस्त्रगाळ माती, साबणापेक्षाही कितीतरी अधिक आपलं शरीर स्वच्छ करुन त्त्वचा चमकदार आरोग्यदायी बनवते… कपड्यांसाठी रिठे वगैरेंसारखे पारंपारिक पर्याय आहेतच). सरतेशेवटी, “गरज, ही शोधांची जननी असतेच” आणि शिवाय आपल्याला “शाश्वत जीवन हवं की, अल्पजिवी जीवनशैली व अर्थव्यवस्था हवी”, याचा निर्णय नजिकच्या भविष्यात घ्यावाच लागणार आहे… त्यालाच अनुसरुन वरील भाष्य आहे, हे कृपया समजून घेणे!

…. राजन राजे (अध्यक्षः धर्मराज्य पक्ष… भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी हरित पक्ष)

आजची ‘भिती’ उद्याचं ‘भविष्य’ ठरेल…

“जर, इंग्लंड नांवाचं छोट्याश्या बेटासारखं एकच राष्ट्र, आपल्या अनैसर्गिक-अशाश्वत स्वरुपाच्या औद्योगिक उत्पादनांमुळे आणि त्यांचा बेगुमान वापर करण्याच्या बेबंद जीवनशैलीमुळे…. मानवी-शोषणासह निसर्ग-पर्यावरणविषयक एवढ्या मोठ्या  समस्या जगापुढे निर्माण करु शकत असेल…. तर, भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या खंडप्राय देशाने, तोच विनाशकारी ‘पाश्चात्य विकासाचा मार्ग’ निवडला तर काय अनर्थ ओढवेल, याची कल्पनाच केलेली बरी. इंग्लंड-युरोपच्या आर्थिक साम्राज्यवादाने आज, जगातल्या मानवीसमूहांना अनिर्बंध शोषणाद्वारे गुलामीच्या शृंखलांनी जखडून ठेवलेलं असताना, नजिकच्या भविष्यात भारतासह, जगातल्या ३०० कोटी लोकसंख्येनं जर हा निसर्ग-पर्यावरणाला अंति घातक असा ‘पाश्चात्य मार्ग’ निवडला तर, हे जग गवतातल्या हरणटोळांसारखे उघडनागडं त्वचाहिन निसत्व बनेल”, १९२८ साली काढलेले हे आपल्या महात्म्याचे महान उद्गार आहेत!

स्वातंत्र्यापश्चात लोकसंख्येची घनदाट लोकसंख्येच्या भारताने जगभरात साम्राज्यवादाचं जाळं पसरलेल्या इंग्लंडपेक्षा वेगळी पाऊलवाट चोखाळली पाहिजे, हे म. गांधींनी अचूक जाणलं होतं. ब्रिटीश ‘विकासप्रारुप’ इतर जगभर पसरलेल्या आपल्या वसाहतींच्या अनिर्बंध शोषणाने चालू रहाणं (जरी, अंति जगाच्याही दृष्टीने ते घातकी असलं तरी) शक्य होतं…. तशी अनुकूल परिस्थिती भारताला उपलब्ध नव्हती. त्यामुळेच, विकासाच्या महामार्गावरचं प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक टाकणं गरजेचं असतानाच आपण पाश्चात्य विचारधारा अवलंबून, या देशाच्या समृद्ध निसर्ग-पर्यावरणाचा अतोनात विध्वंस आणि सामान्य माणसांच्या सन्मान व सुरक्षेचा सत्यानाशच जणू हाती घेतला.

जनसंख्या आणि जीवनशैली या दोन्ही बाबींच्या बेगुमान व अनियंत्रित वाढीनं राष्ट्राच्या निसर्गाचा आणि पर्यावरणाचा घास घेतला गेला…. जल, जंगल आणि जमीन, यावर विनाशकारी आक्रमण त्यामुळेच तर होऊ लागलं! तरी आजही, जनसंख्या आणि जीवनशैली कठोरपणे रोखणं, हा आपल्या राजकीय पटलावरचा साधा विषयसुद्धा बनू नये, हे या देशाचं केवळ आजचं दुर्दैव नव्हे; तर, नजिकच्या काळातले ते दुर्दैवाचे प्रलंयकारी दशावतार आपल्याच डोळ्यासमोर घडताना दिसतील.

जैवसमृद्धीची असंख्य शिवारं असलेल्या आपल्या भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशांनी तर, निसर्ग-पर्यावरणासंदर्भात विकासाच्या नांवाखाली केलेली क्षुल्लक चूक देखील अक्षम्य ठरु शकते… अशी संवेदनशील स्थिती असताना; जेव्हा, “मोठमोठी अवाढव्य धरणं बांधणे”, हाच आधुनिक विकासाचा मूलमंत्र, असा मोठा गैरसमज पाश्चात्य विचारधारेनं प्रेरित नेहरु, आंबेडकर, पटेल, पंत, प्रसाद वगैरे मंडळींचा त्याकाळी होता. तेव्हा हाच ‘महात्मा’ दूरदृष्टीने, आपल्या जे.सी.कुमारप्पा, राधाकमल मुखर्जींसारख्या निसर्ग-पर्यावरणवादी सहकाऱ्यांसह, कंठशोष करुन त्याला कडाडून विरोध दर्शवत होता आणि तो किती योग्य होता, हे आत्ता आत्ता कुठे हळूहळू आपल्याला उमगू लागलयं. पं. नेहरु तर तेव्हा, “मोठी अवाढव्य धरणं, ही आधुनिक भारताची मंदिरे होतं”, असं उच्चरवाने गर्जू लागले होते.

शहर मोडून खेड्यांकडे कूच करा, हा म. गांधींचा ‘अंतिम-सत्यवादी’ संदेश, पाश्चात्य विकास-संकल्पनांच्या नादी लागून आपल्या राष्ट्रीय धोरणकर्त्यांनी साफ धुडकावला. त्याची कटू आणि विध्वंसक फळं आज आपण चाखतो आहोत आणि अजूनही आपल्याला पुढे जाऊन ती चाखायचीच आहेत…. आणि, तो उत्पात पहाण्यासाठी कदाचित आपली नातवंड-पंतवंड अस्तित्वातसुद्धा शिल्लक रहाणार नाहीत, हे सध्या घोंघावणाऱ्या नैसर्गिक महासंकटांमुळे (जागतिक तापमानवाढ, अनाकलनीय व अपरिवर्तनीय पर्यावरणीय बदल, भूकंप, महाभयंकर वादळे, अतिवृष्टी-पूर, दुष्काळ, ज्वालामुखींचे भीषण उद्रेक, गोड्या पाण्याची टंचाई, प्रदूषण, नापिकी इ. इ.) पुरेसं स्पष्ट होऊ लागलयं. तरीही, आपला ‘एक टक्का’ शासकवर्ग तथाकथित विकासाचा गजर करीत डोळ्यावर कातडं ओढून बसलेला दिसतोय. पण, हे ‘हस्तीदंती मनोऱ्या’तील नाटक कुठपर्यंत चालू ठेवणं परवडू शकेल, याचा आता सुजाण जनतेनं अत्यंत तातडीने व गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे!

विकास नांवाचा अनर्थकारी विकार जडलेल्या मूढांना, हे प्रतिपादन त्याज्य वाटणं स्वाभाविक आहे; पण, त्याने नजिकच्या भविष्यात होऊ घातलेला मानवासह सजीवसृष्टीचा संहार थांबणं केवळ अशक्य आहे! उणीपुरी काही दशकं मानवजातीच्या हातात आहेत…. तेवढ्यात काही पावलं धोरणकर्त्यांनी भारतासह जागतिक पातळीवर उचलली नाहीत, तर आजची ‘भिती’ उद्याचं ‘भविष्य’ ठरेल… तेव्हा कुठलाही उपाय मानवजातीच्या हाती शिल्लक राहीलेला नसेल, हा या आजच्या पर्यावरणदिनाचा भयकारी संदेश आहे!!!

 राजन राजे(अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष, भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी पक्ष)

तुम्हाला भाजपाऐवजी काँग्रेस सत्तेत हवीय का….

{माझ्या एका हितचिंतकानं, तुम्ही कर्नाटक राज्यातल्या सध्याच्या गलिच्छ राजकारणावर जो विनोद पाठवला आहे, त्यातून तुम्हाला भाजपाऐवजी काँग्रेस सत्तेत हवीय का…. असा प्रश्न विचारला. त्याचं तत्काळ उत्तर मी खालीलप्रमाणे दिलयं!}

अजिबात नाही….. काँग्रेसवर तर आम्ही केव्हाच फूली मारलीयं. एकवेळ भाजपा चालवून घ्यायची वेळ तुलनेनं परवडली(कारण, ते मैदानातला विषारी ‘साप’ आहेत) पण, काँग्रेस-राष्ट्रवादी नकोत; कारण, ते गवतातला ‘नाग’ आहेत!
मैदानातला साप-नाग सरळ दिसतो तरी… 
वेळ आली तर त्याचा बंदोबस्त करता येतो सहज, पण गवतातला जास्त धोकादायक, दृष्टीस पडत नसल्याने… अगोदरच, “मराठी माणसांच्या नांवाने राजकारण करणाऱ्या ‘चुलतबंधू’ सापनाथ-नागनाथांची पिल्लावळ महाराष्ट्रात उदंड झालीय, त्यात आता यांची वळवळ नव्याने वाढलीयं!!!

त्यामुळेच, आम्ही ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन जातधर्मनिरपेक्ष राजकारणासाठी, निसर्ग-पर्यावरणासाठी, भ्रष्टाचार-निर्मूलनासाठी, कामगार-शेतकऱ्यांसाठी, स्वायत्त-महाराष्ट्रासाठी स्वतंत्रपणे लढतच रहाणारच!!!”

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

लहान असो वा मोठी, प्रत्येक जातधर्मीय दंगल, आपल्या अंत:करणाची चिरफाड करुन जाते… हे कुठेतरी, कधितरी कायमचं नियंत्रणात यायलाच हवं!!!

शिवछत्रपतींच्या जाज्वल्य राजनीतिनुसार, कोण कुठल्या जातधर्माचा आहे, याकडे कवडीमात्र लक्ष न देता…. जातीय-धार्मिक दंगलीत दिसतील तेवढ्या शस्त्रसज्ज दंगलखोरांना बेधडक गोळ्या घाला…. पण, एकाही निष्पाप नागरिकाचा बळी जाऊ देऊ नका!

पोलीस वा लष्करी गोळीबारात ठार होणाऱ्या अशा दंगेखोरांची संख्या, आपल्यासाठी, केवळ एक ‘गणितीसंख्या’ बनू द्या… यापेक्षा, अधिक त्याचं ‘मूल्य’ असताच कामा नये!

मात्र, लष्कर-पोलीसदलातील अधिकारीवर्ग हा, शिवछत्रपतींच्याच राजनीतिनुसार सुसंस्कारी, भ्रष्टतामुक्त व ‘जातधर्मनिरपेक्ष’ घडवण्यासाठी… या देशात फोफावलेला भ्रष्टाचार व जातधर्माचं राजकारण धर्मराज्य च्या वज्रमुठीनं संपुष्टात आणा !!!

त्याकामी, ‘धर्मराज्य पक्षा’ची त्रिसूत्री व्यवहारात सक्षमपणे आणि कठोरपणे उतरवा…. Zero Tolerance towards Corruption & Exploitation of Man and Nature !!!

जय महाराष्ट्र | जय हिंद ||

….. राजन राजे (Rajan Raje) ( अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)

दिल्लीतील ऐतिहासिक ‘लाल किल्ला’, एका उद्योगपतीला भाजपा-शिवसेना सरकारने ‘दत्तक’ दिल्यानंतर, गांधी घराण्याच्या काँग्रेसला जणू एकच कंठ फुटला…. आणि, १९९०-९१ सालीच ‘खाउजा’ धोरणाअंतर्गत, ज्या काँग्रेसी सरकारने देश विकायला सुरुवात केली, तोच काँग्रेस पक्ष आज या ‘खाजगीकरणा’विरुद्ध ‘१० जनपथ’च्या छपरावर चढून आक्रोश करतोय…..

काळ ‘सूड’ उगवतो, तो असा…. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी जागतिक व्यापार संघटनेच्या दबावाखाली, याच काँग्रेसने देश वाचवण्याची आवई उठवत, अवघा देश टप्प्याटप्प्याने विकायला काढला. या खाजगीकरणाला पूरक धोरण म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या हितसंबंधी न्यायमूर्तींकडून (याच काळात, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या गणगोतांकडे अफाट माया जमल्याच्या घटना उघडकीला आल्या आणि तत्परतेनं दाबल्याही गेल्या) “कल्याणी व सिपला” हे, कामगार-चळवळीचे कंबरडेच मोडणारे लागोपाठ दोन न्यायालयीन निर्णय, काँग्रेसी सरकारकडून मिळवले गेले आणि ‘कंत्राटी कामगार/कर्मचारी पद्धत’ (Contract Labour System) नांवाची “गुलामगिरी व नव-अस्पृश्यता”, या देशात विषवल्लीसारखी बेफाम फोफावायला लागली!

त्याचीच परिणती पुढे जनसामान्यांच्या (अर्थात, कामगारांच्या) अखंड गुलामगिरीत होणार होती, हे उघड गुपित होतं. ‘लाल किल्ला’ गहाण ठेवण्यासारख्या ‘किरकोळ’ घटना, म्हणजे या मातीत १९९०-९१ सालीच रुजवल्या गेलेल्या विषवृक्षाचीच कटू फळं होतं… हे आजच्या राहुल गांधींच्या काँग्रेसला कोणीतरी समजावून सांगण्याची खरोखरीच गरज आहे की, त्या काँग्रेसनं आपल्या डोळ्यावर राजकीय सोयीचं कातडं ओढून घेतलयं? हाती राजकीय ताकद असूनही कम्युनिस्ट काय, नी तथाकथित समाजवादी काय, नी मागासवर्गीय नेते काय… सगळेच त्याकाळी (आणि, आजही) मूग गिळून गप्प बसले!

अनीतित बुडालेल्या आणि महापुरुषांचे कौतुकसोहळे, जयंत्यामयंत्या यातच अडकलेल्या तथाकथित चळवळीतल्या शिलेदारांना, या ‘कंत्राटी’ गुलामगिरी व नव-अस्पृश्यतेशी काही देणंघेणं असण्याचं कारण उरलं नव्हतं… उलटपक्षी, अनेक अशा चळवळीतल्या सर्वपक्षीय राजकीय धटिंगणांनी, या वाहत्या ‘कंत्राटी गंगे’त आपले हात यथेच्छ धुवून घेतले आणि आजही घेताहेत.

“भारतात कुठेही नोकरी, व्यवसाय, निवारा, शेती, धंदा-उद्योग करण्याच्या”, राज्यघटनेनं दिलेल्या अनियंत्रित व अनिर्बंध स्वातंत्र्यानं…. स्वातंत्र्यापश्चात, महाराष्ट्रातच परप्रांतीयांचं बेफाम आक्रमण होणार, हे सांगायला कुठल्या कुडमुड्या ज्योतिषाची कधिही आवश्यकता नव्हती! स्वातंत्र्यपूर्व काळातच, सुसंस्कृत व त्याकाळी तुलनेनं अधिक नीतिमान असणाऱ्या मराठ्यांच्या (मराठी भाषिक म्हणून ही शब्दयोजना आहे, जातिवाचक बिलकूल नव्हे) महाराष्ट्रात, हे परप्रांतीय ‘आक्रमण’ सुरु झालेलच होतं. इंग्रजांचा ‘हात’ धरुन गुजराथी-मारवाड्यांनी इथे आपला व्यापारउदीम वाढवायला तेव्हाच सुरुवात केली होती. इंग्रजांना कायम मराठी तलवारीचा, बंदुकीचा धाक वाटायचा…. तेव्हा, निदान मराठ्यांच्या दुसऱ्या हाती ‘तराजू’ची ताकद तरी राहू नये; या कुटील हेतूने इंग्रजांनी गुजराथी-मारवाड्यांना येनकेनप्रकारे महाराष्ट्रात हातपाय पसरवायला जाणिवपूर्वक मदत केली.

लढाया-युद्धांनी फारसं काही साध्य होतं नाही, उलट भीषण रक्तपात घडतो व साधनसामुग्रीचा प्रचंड नाश होतो… म्हणून, दुसऱ्या महायुद्धानंतर, ब्रिटीश-अमेरिकन आक्रमकांनी जशी आपली युद्धनीति बदलली व ‘व्यापारी-वसाहतवाद’ हा, जगभर वर्चस्व गाजवण्याचा नवा प्रभावी मार्ग निवडला; तसाच, अभिनव मार्ग या महाराष्ट्रात ‘आक्रमण’ करण्यासाठी… राज्यघटनेचा आधार घेऊन व बदमाष मराठी राजकारण्यांचा हात धरुन, परप्रांतीय उद्योगपती-व्यापारी व परप्रांतीय कामगारांनी निवडला!

जैन-गुज्जू-मारवाडी उद्योगपती-व्यापारी व परप्रांतीय मजूर, यांच्या ‘अडकित्या’त सामान्य मराठी माणूस सापडला. पण, या आपल्या चारही बाजुंनी झालेल्या जगण्याच्या कोंडीचं ‘भान’ येऊ नये म्हणून, त्याला कधि सण-उत्सव-खेळ या ‘अफूच्या ग्लानी’त तर, कधि ‘बुवाबाजी’च्या ‘अॅनेस्थेशिया’वर सर्रास ठेवू जाऊ लागलं.

जगभर, या जगड्व्याळ भांडवलदारीच्या प्रसाराला मोठा हातभार लावलेल्या ‘जागतिकीकरणा’विरुद्ध ‘स्थानिकीकरणा’ला वेग आलेला असताना (उदा. ब्रेक्झिट वगैरे), आमच्या मराठी घड्याळांच्या काट्यांचा प्रवास आजही उलट दिशेने चालूच आहे. ना आम्हाला जागतिकीकरणाची खंत, ना खाजगीकरणाची! आला दिवस ढकलायचा…. “आहार, निद्रा, भय आणि मैथुन”, असा प्राणी-पक्षी-किटकांसारखा नित्यक्रम कसाबसा चालवत, जोपर्यंत कुणी जबरदस्तीने हाकलत नाही तोवर, कुढत-कुंठत जगत रहायचं…. ना कुठल्या मराठी ओठावर हसू फुलत, ना चेहऱ्यावर आशेचा भाव दिसत…  ना कसली नीति, ना भविष्याची क्षिती…. ना फुकटेपणाची चीड, ना कसला खेद, ना खंत, ना अन्याय-शोषणाविरुद्ध खदखद… हे आजचं लाजिरवाणं ‘मराठी-वास्तव’ आहे… ते नाकारुन कसं चालेलं?

मुंबई-ठाणे (आता, पुणे-नाशिक वगैरे सगळीच महानगरं) येथून दूर हाकलला जात जात, मराठी-माणूस आता डोंबिवली-कल्याण-टिटवाळा-अंबरनाथ-कसारा-बदलापूर रेल्वेस्थानकं पार करत आता थेट “कर्जत”पर्यंत परागंदा झालाय…. इथे त्याची अनिवार्यपणे ‘भिंतीला पाठ’ टेकेल; कारण, अजून पुढे पळायला त्याला मार्गच उपलब्ध नाही! यानंतर, एक तो परिपूर्ण स्वरुपाचा ‘गुलाम’ होईल किंवा त्याची ‘भिंतीला पाठ’ टेकल्याने तो ‘विद्रोही-विध्वंसक’ बनेल…. दोन्ही अवस्था अंति घातकी आहेत!

१०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून अगदी संपन्न नाही, … तरी, शिवबा-संतांचा न्यायनीतिमान, उन्नत-उदात्त महाराष्ट्र घडविण्याची आलेली संधि विशिष्ट राज्यघटना तरतुदी आणि ‘ठाकरी-पवारी’ राजकारणाने महाराष्ट्राने गमावली! महाराष्ट्राचा ‘विकास’ होतोय… विकास झाला म्हणतात…. मग, आम्ही सामान्य मराठी माणसं, मराठी कामगार नेमके त्या ‘विकास-चित्रा’त कुठे आहोत? आमचं त्यातलं स्थान कोणतं?? आम्हा, मराठी कामगार-शेतकऱ्यांना रोज उठून, जीवावर उदार होऊन आंदोलनं का करावी लागतायत???

१५व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार १९७१च्या ऐवजी २०११ची जगगणना प्रमाण मानली जाऊन, ज्या उत्तरभारतीयांनी अत्यंत बेजबाबदार व बेबंदपणे आजवर आपली ‘पिल्लावळ’ वाढवत नेलीयं (आणि, आजही तिचं, लोकसंख्यावाढीची एकमेव कारखानदारी तिथे तूफान चालूच आहे)…. त्यांना ‘शिक्षा’ मिळण्याऐवजी भरघोस ‘बक्षिसी’ मिळणार आहे…. याहीपुढे मतांच्या बदमाषीच्या राजकारणात मिळत रहाणार आहे. हे सगळं, लोकसंख्याधारित मतांचं राजकारण, महाभयंकर आहे… मराठी माणसांना महाराष्ट्राच्याच जमिनीत गाडणारं आहे!

याची मराठ्यांना अज्ञानापोटी आणि आळसापोटी जाणिव नसली तरी, दक्षिण भारत जागा आहे…. आणि, तिचं मोठी आशा आहे!!

महाराष्ट्र आणि दक्षिण भारतानं एकत्र येऊन ‘स्वायत्तते’चा मुद्दा नेटाने लावून धरलाच पाहिजे!!!

भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून, अजूनही जर फार मोठ्या स्वरुपाचा उत्पात वा रक्तपात न होता…. महाराष्ट्रातली साधनसंपत्ती, नोकरी-व्यवसाय, धंदे, निवासी जागा व शेतजमीन मराठी हातातून, चिमटीतून पूर्णतः निसटून द्यायची नसेल…. उरलासुरला महाराष्ट्राचा निसर्ग व ढासळणारं पर्यावरण वाचवायचं असेलं; तर, “राष्ट्रांतर्गत राष्ट्र…. स्वायत्त-महाराष्ट्र…. शिवछत्रपतीराष्ट्र”चा नारा महाराष्ट्राच्या सांदीकोपऱ्यात घुमवून महाराष्ट्रासह देशात काश्मीरच्या धर्तीवर ३७० कलमाचा आग्रह, मराठी तरुणाईला यापुढे युध्दपातळीवर धरावाच लागेल….

अन्यथा भविष्यात, १ मे चा महाराष्ट्रदिन व कामगारदिन… हा, “महाराष्ट्रातल्या मराठी कामगारांचा ‘मरणदिन’ म्हणूनच साजरा करावा लागेल” !!!

जय महाराष्ट्र |  जय हिंद ||

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)

दोन पिढ्यांमधला जगण्यातला फरक….

एका वडिलांनी आपल्या मुलाला दिलेले अतिशय सुंदर, समर्पक उत्तर….
दोन पिढ्यांमधला जगण्यातला फरक…. प्रत्येकाने वाचावं असं काही….

एका तरुणाने आपल्या वडिलांना विचारले:

“तुम्ही पूर्वीच्या काळी कसे काय हो रहात होतात???”

तंत्रज्ञान नाही…
विमाने नाहीत…
इंटरनेट नाही…
संगणक नाहीत…
फारसे नाटक/सिनेमे नाहीत…
टीव्ही तर नाहीच….
एअर कंडिशनर नाही…
कार नाहीत
मोबाईल फोन नाहीत…

त्यावर बाबांनी उत्तर दिले…..

“बाळा, तुमची पिढी खालीलपैकी गोष्टी नसताना आज जसा राहू शकतो ना, तसेच तू सांगितलेल्या गोष्टींच्या अभावात आम्ही रहायचो”…..

श्रद्धा-प्रार्थना नाही…
प्राणिमात्रांविषयी करुणा नाही…
कुणाशी सन्मानपूर्वक वागणं नाही…
वडिलधाऱ्यांविषयी आदर नाही…
सुशीलता, लाजलज्जा नाही…
विनम्रता तर नाहीच नाही…
खेळ नाहीत, व्यायाम नाही …
योग-प्राणायामाचा तर पत्ताच नाही…
प्रत्येकाशी प्रत्येकक्षणी स्पर्धा, निकोप-निरपेक्ष ‘मैत्र’ नाही…
सखोल वाचन नाही…
अवघं जगणं उथळ, जगण्याच्या तत्त्वज्ञानाचा थांगपत्ता नाही…

१९४० ते १९८० या काळात जन्मलेलो आम्ही खरचं भाग्यवान होतो. आम्ही परिपूर्ण असं जीवन जगलो!

खेळताना आणि सायकल चालवताना आम्ही कधीच हेल्मेट घातलं नव्हतं. शाळेतून घरी आल्यावर आम्ही संध्याकाळपर्यंत मनसोक्त खेळलो. आम्ही टीव्ही नाही पहात बसलो. आम्ही आमच्या जिवाभावाच्या मित्रांसोबत खेळलो, बनावट-बदमाष इंटरनेट मित्रांबरोबर नाही.

आम्हाला जर कधी तहान लागली तर, आम्ही नळाचे, विहीरीचे पाणी प्यायलो, बाटलीबंद पाणी नाही प्यायलो. हाती पैसे कमी म्हणून, आम्ही एकाच ग्लासात दोघं मित्र ऊसाचा रस, सरबत पीत असू… त्यामुळे, वाटण्यातला निर्भेळ आनंद गाठी बांधला, ती काही आमची उपासमार नव्हती. आम्ही दररोज भरपूर वरण-भात-भाजी खात होतो, पण चायनीज, फास्टफूड खाल्ल्यासारखे आम्ही वजन वाढून लठ्ठ नाही झालो.

सर्वत्र हिरवळ, साधे मातीचे रस्ते म्हणून साध्या स्लिपर घालून फिरतानाही कधि त्रास जाणवला नाही…. आमच्या आई आणि वडीलांना आम्हाला निरोगी व शरीरसंपन्न ठेवण्यासाठी कोणताही विशेष आहार (ब्रॅण्डेड फूड) आम्हाला द्यावा लागला नाही. आम्ही स्वत:चे साधेसुधे खेळ स्वतः तयार करायचो आणि ते मनसोक्त खेळलो, त्या खेळांनी निसर्ग-पर्यावरणाचा कधि घात झाला नाही.
आमचे आईवडील श्रीमंत नव्हते. ते आम्हाला भौतिक सुख देऊ शकले नाहीत; पण प्रेम त्यांनी भरभरुन दिलं आणि आम्ही ते घेतलं. आम्हाला कधीही सेलफोन, डीव्हीडी, प्ले स्टेशन, व्हिडिओ गेम, पर्सनल कॉम्प्युटर, इंटरनेट चॅटचा विचारही शिवला नाही… तरीही पाचपन्नास खरेखुरे मित्र आम्ही राखून होतो. आम्ही आमच्या मित्रांच्या घरी कुठल्याही निमंत्रणाशिवाय कधिही जात होतो आणि एकत्र जेवायचो देखील.

अामच्यावेळी आमचं कुटुंब आणि इतर नातेवाईकांबरोबर असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे आम्ही खूप आनंदी होतो. आमच्या त्यावेळी काढलेल्या काळ्या-पांढऱ्या पुसट झालेल्या फोटोंमधूनच तुम्ही त्या ‘रंगीतस्मृति’ शोधू शकता.

आमची पिढी, एक अनोखी आणि अधिक समजूतदार पिढी आहे; कारण, आमची ही अशी शेवटची पिढी आहे की, ज्यांनी आपल्या वडीलधाऱ्यांच नेहमीेच एेकलं आहे आणि ज्यांना आज आपल्या मुलांचेही एेकावे लागत आहे! आणि, आम्ही अजूनही एवढे हुशार नक्कीच आहाेत की, आमच्यावेळी अस्तित्वात नसलेल्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करायचा, याचं मार्गदर्शन वेळप्रसंगी तुम्हाला करु शकतो !!!

जाता जाता बाळा, मला एक प्रश्न तुमच्या नवतरुण पिढीला विचारायचाय, “तुमची पिढी जर एवढी सुखसंपन्न, संसाधन-तंत्रज्ञानयुक्त व नशिबवान आहे; तर, मग ती थबकून कधि खराखुरा ‘विश्राम’, खरीखुरी विश्रांती का घेऊ शकत नाही… त्यासाठी, अनिवार्यपणे तब्येतीचा आणि कौटुंबिक स्वास्थ्याचा सत्यानाश करणाऱ्या मादक पदार्थांचाच आश्रय हरघडी का घ्यावा लागतो… सतत, वाघ पाठीशी लागल्यासारखी, तिला जीवनात प्रचंड धावपळ, दगदग का करावी लागत्येय ???”

आमच्याकडे आता वेळ मर्यादित आहे… त्यामुळे, तुम्ही आमच्यापाशी असलेल्या या निर्भळ आनंदी जगण्याच्या ‘ठेव्या’चा शक्य असल्यास वा इच्छा झाल्यास लाभ घ्या, “ठेविले अनंते, तैसेचि रहावे”, ही अतिशय निसर्ग-पर्यावरणपूरक जाज्वल्य मराठी संस्कृतीतली जीवनशैली, आमच्याकडून जाणून घ्या… स्वतः आनंदी व्हा आणि पुढच्या पिढ्यांचं अस्तित्व कायम राखा… त्यांना जगण्यासाठी सुयोग्य निसर्ग-पर्यावरण व नैसर्गिक संसाधनं शिल्लक ठेवा….. माणूस कितीही मोठा झाला, साधनसंपन्न झाला तरीही तो प्रथम ‘दयाळू-मायाळू’ असला पाहिजे आणि सरतेशेवटीही तो तसाच असला पाहिजे !!!

जगा, जगवा आणि जगू द्या!!!

“तो द्रवला, तिथेच चुकला की, तो दोष, त्या तशाच “व्यवस्थापकीय खेळी”ला पुन्हा एकवार ‘बळी’ पडणाऱ्या मराठी कामगारांच्या रक्तातलाच समजायचा?

{साधारण दहा-बारा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे…. ठाणे-कळवा येथील ‘मुकंद आयर्न’ या बड्या कंपनीतील, जगण्याची कोंडी झालेल्या कामगारांनी, राजन राजे यांना दीर्घकाळ अडलेल्या पगारवाढीच्या करारासंदर्भात, आर्त साद घातली. स्वाभाविकच, त्याला भरभरुन प्रतिसाद देत, हा ‘अवलिया’ त्यांच्या मदतीला धावून गेला… जे व्यवस्थापनं कामगारांना धूप घालत नव्हतं, त्याचं ‘मुकंद आयर्न’च्या व्यवस्थापनानं ‘राजन राजे’ नांवाला घाबरुन, उभ्या आयुष्यात कधि नशिबी नव्हता, असा तुलनेनं भरघोस पगारवाढीच्या कराराचा प्रस्ताव तेव्हा मुकंदच्या कामगारांपुढे ठेवला… प्रस्ताव हाती येताच, ‘राजन राजे’ या अवलियाला साफ बाजूला सारत (अर्थात, तिचं व्यवस्थापनाची प्रस्तावासंदर्भातली प्रमुख ‘अट’ होती), जाज्वल्य नेतृत्त्वाचा ‘विश्वासघात’ करुन एकदाचा तो करार, मुकंदचे कामगार पदरात पाडून घेते झाले. त्यानंतर, एक भीषण कालखंड मुकंद आयर्न कामगारविश्वात सुरु झाला…. अंधारयुग नुसतं पुन्हा अवतरलं, असचं नव्हे; तर, ते त्याची पडछाया त्यानंतर अधिकच गडद झाली! आता, मुकंदच्या कामगारांना ‘राजन राजे’ या अवलियाच्या समोर, मदतीसाठी पुन्हा तोंड दाखवायची सोय उरली नव्हती. अशात, एक पिढी कामगारांची जवळपास बदलून गेली… नव्या दमाच्या नवतरुण कामगारांनी पुन्हा विलक्षण आर्जव करत, या ज्वलंत नेतृत्त्वाला साकडं घातलं आणि तो अवलिया द्रवला… “तो द्रवला, तिथेच चुकला की, तो दोष, त्या तशाच “व्यवस्थापकीय खेळी”ला पुन्हा एकवार ‘बळी’ पडणाऱ्या मराठी कामगारांच्या रक्तातलाच समजायचा? गुलामगिरीच्या तब्बल एक हजार वर्षानंतर, ज्या थिजलेल्या मराठी रक्तातली ‘लाली’ वाढवून त्याला ‘विजिगिषूवृत्ती’चा परिसस्पर्श ‘शिवछत्रपतीं’नी दिला…. त्याचं ‘मराठी-रक्ता’ला, महाराष्ट्रात दशकानुदशके किळसवाणं राजकारण करत, एवढं कुणी आजवर सडवलं?? शिवछत्रपतींपश्चात, मराठी माणसांच्या रक्तातली ‘स्खलनशीलता’, शरीरात प्रदीर्घकाळ घर करुन रहाणाऱ्या ‘रोगजंतूं’सारखी वेळी-अवेळी ‘रोगनिर्मिती’ करत, आजही ठाण मांडून तशीच मौजूद आहे काय???… याचा फैसला वाचकांनी करावा, तो त्या नेत्याच्या शब्दस्फुल्लिंगांतूनच… ज्या नेत्याने, आजवर हे आणि असेच, ‘मराठी कामगारां’नी घातलेले असंख्य अवसानघातकी ‘घाव’ छातीवर, पाठीवर झेललेत…. तरीही तो तसाच, “रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे”च्या आणि ‘जातजमाती’च्या अर्थकारण-राजकारणाच्या विरोधात उभा आहे, उभा रहाणार आहे… ते केवळ, “श्रीकृष्णाचा जीवनसंदेश आणि शिवछत्रपतींची राजनीति, त्याने आपल्या रक्तात गोंदवून घेतलेली असल्यानेच… अवलिया हा असा की, ज्याला माणसाचा ‘जातधर्म’ माहित नाही, माहित आहे ते फक्त, आणि फक्त, ‘माणसाचं कर्म’… जमल्यास वाचा आणि विचार करा…. संपादक, ‘कृष्णार्पणमस्तु’… ‘धर्मराज्य पक्षा’चं मुखपत्र}

हे असचं होत असतं, असचं होणार, याची मला पूर्वानुभवावरुन पूर्वकल्पना होतीच. गेली तीन तपे मी हा सगळा मराठी माणसांनी, आपल्या आयुष्याचाच मांडलेला ‘भोंडला’, मांडलेला ‘बाजार’ मी पहात आलोयं. त्यामुळे, तशी मी ‘प्रवीण’ला दिलेली होती. म्हणूनच, आपलं मतं वा सल्ला सोशलमिडीयातून देण्याची मला बिलकूल इच्छा नव्हती! अनुयायांची पण कधितरी ‘परीक्षा’ व्हायला नको का? यापेक्षा काही वेगळं, प्रचंड बहुमताने घडलं असतं, तर ती कामगार जगतातली आश्चर्यकारक घटना म्हणून गणली गेली असती!

मित्रहो,

मराठी माणसांच्या नांवाने ऊठसूठ गळा काढणारे (प्रत्यक्षात, गळा कापणारे) यच्चयावत बदमाष मराठी राजकारणी आणि उद्योग जगतातली “जैन, गुज्जू, मारवाडी, सिंधी, पंजाबी” ही धनदांडगी मंडळी… कायम मला हेच सांगत आलेली आहेत की, “मराठी माणसं, ही फार थोडक्यात ‘बोली’ लावून विकत घेता येणारी किंवा वाटेला लावता येणारी ‘प्रजात’ आहे… त्यांना, बेडकासारखं जेमतेम दिड फुटावरच दिसतं; मग दिडशे फूट, दिडशे मीटर, दिडशे किमीची तर बातच सोडा! त्यांना जर धड, त्यांचं खरखुरं हित कळतं असतं, तर आम्ही (म्हणजे, धनदांडगे जैन, गुज्जू, मारवाडी) तुमच्यावर तुमच्याच राज्यात येऊन ‘राज्य’ करु शकलो असतो काय?” हेच उद्योगपती व त्यांचे दलाल (HR-अधिकारीवर्ग वा तथाकथित Labour Consultants) , “एक दफे पैसा गटार में फेकेंगे, लेकिन तुम्हारे मराठी कामगार को नहीं देंगे”, अशी बेधडक व बिनदिक्कत ‘मस्ती’ही वेळप्रसंगी आम्हाला दाखवत आलेले आहेत…. त्याचीही प्रमुख कारणं म्हणजे आपला आळस, लढाऊवृत्ती व दूरदृष्टीचा अभाव, आपसात माजलेली सुंदोपसुंदी आणि नीतिमत्ताशून्यता!!! आम्ही खऱ्या अर्थाने राजकियदृष्ट्या जागृत व्हायला तयार नाही आणि आमची राजकिय क्रांतीची भाषा, ही ‘आळशां’ची भाषा आहे… ‘सोशलमिडीया’तून बसल्याजागी टाईमपास करत घडवू पहात असलेली ‘व्हर्चुअल क्रांति’ची षंढ भाषा आहे!

कामगार चळवळीला (धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचा सन्माननीय अपवाद सोडून) आता नीति, न्याय व सहसंवेदनेची डूब राहीलेली नाही, हे फार मोठं दुर्दैवं व फार मोठी धोक्याची घंटा आहे…. आणि, ही अस्वस्थ करणारी परिस्थिती शिवबा-संतांच्या महाराष्ट्रात व्हावी, या सारखं दुर्भाग्य कुठलं? त्यामुळेच, योग्य राजकिय जागृतीही कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण करता येणं, आमच्या सारख्याना दिवसेंदिवस अशक्यप्राय होत चाललयं. निवडणुकीत सातत्याने होणारा “धर्मराज्य पक्षा”चा दारुण पराभव, हे त्याचचं द्योतक आहे! वेगवेगळ्या निवडणुकीतला हा पराभव ‘धर्मराज्य पक्षा’चा नसतो, तर प्रत्येकवेळी तो अवघ्या कामगारविश्वाचा असतो! त्यामुळेच, आज ना संसदेत, ना महाराष्ट्राच्या विधानभवनात, खराखुरा कामगारांचा आवाज उठवणारा साधा एकही ‘प्रतिनिधी’ नाही. मित्रांनो, तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की, आता कामगार आंदोलनांची पुण्याई आणि प्रभाव, या उच्चतंत्रज्ञानाधारित “रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे”त (Vampire-State System) झपाट्याने घटत चाललायं. ‘राजन राजे’ हाच काय तो ‘वेडापीर’, या विपरीत स्थितीत ती, जाज्वल्य कामगारहिताची अखेरची ‘मशाल’ हाती धरुन गेली पस्तीस-छत्तीस वर्षे अखंड चालतोयं! पुढील काळात ही व्यवस्था एवढी क्रूर व शोषक बनत जाईल की, त्याविरुद्ध साधा आवाजही उठवणं सोप जाणार नाही. ‘राजन राजे’ ही एक ‘नैतिक दहशत’च सध्या या मार्गात, त्यांना आडवी जातेयं एवढचं! अन्यथा, ‘कायम-कर्मचारी’ ही संकल्पनाच एव्हाना पूर्णतः बाद होऊन सगळेच ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी’ नांवाचे “गुलाम व नव-अस्पृश्य” म्हणून राब राब राबताना दिसले असते… असो!

पण, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, केवळ पगारवाढीच्या वा बोनसच्या आपल्या “आकड्यां”मध्येच जर, अवघी कामगार चळवळ अडकून पडणार असेल; तर, मग फारच कठीण आहे! कल्पना करा, शिवछत्रपतींना जर असे मावळे लाभले असते (की, जे फेकलेल्या आकड्यांमध्ये सहजी फसू शकतील) तर, शिवछत्रपती महाराज काय कप्पाळ करु शकले असते? अवघं शिवछत्रपतींचं सैन्यचं विकत घेण्याएवढी राक्षसी ताकद मोंगलांकडे होतीच की… पण, विकला जाणारा कुणी नव्हता की, बक्षिसीच्या आकड्यांमध्ये फसणाराही कुणी ‘मावळा’ नव्हता!

ठीक आहे, “सरतेशेवटी, मी माझं काम जीवाच्या कराराने करतोयं… करत रहाणार आहे. लोक साथ देतील न देतील… तो त्यांचा प्रश्न आहे. या लोकशाहीत (विशेषतः, सोशलमिडीयाच्या आक्रमणाने) वेडंवाकडं वागण्याचा अधिकार लोकांना, राजकिय समज असो वा नसो, ‘दरडोई एक मत’ असल्याने आहेच… आणि, तो ते वेळोवेळी वेडावाकडा बजावताना मी त्यांना पहातच आलोय. कालाय तस्मै नमः … नशीब समजायचं की, शिवछत्रपतींच्या काळात असली भुक्कड लोकशाही नव्हती!”

तेव्हा, मित्रांनो… तुम्ही मला रजा दिलीत तर फार बरं होईल. मुकंद आयर्नच्या कामगारांचा हा काही माझा पहिला अनुभव नव्हे… आणि, मुकंदच्याच कामगारांना एकट्यांना का दोष द्यायचा, सगळीकडे हेच मन विषण्ण करणारं चित्र आहे! “कालही आणि आजही, कुठेतरी तुम्हाला माझा ‘चार पैसे’ जास्त मिळण्यासाठी “उपयोग” झाला असेल, तर तेही नसे थोडके… ते समाधान गाठी बांधूनच तुमचा निरोप घेऊ पहातोय!!!

……नाट्यगृहात, पडदा वर जाण्याअगोदर ‘घंटा’ वाजते. पण, आजच्या मतदानाच्या निमित्ताने जी ‘घंटा’ कामगारांनी ‘मतदान’ करुन वाजवलीय, त्या ‘घंटे’मुळे मुकंद आयर्नच्या कामगारांच्या भविष्याचा ‘पडदा’ वर जातो की खाली येतो… हे नजिकच्या भविष्यात कळेलच! जे काही मला आपलं प्रेम लाभलं, त्या प्रेमाबद्दल मी समस्त कामगारांना…. ज्यांनी, आयुष्यात कधि मी ऐकला नाही, अनुभवला नाही, अशा ‘मुर्दाबाद’ वगैरे कटू शब्दांत माझा भरसभेत निषेध केला वा आज ज्यांनी विरोधी मतदान केलं, त्या सर्व कामगारमित्रांनाही, मनःपूर्वक व अगदी अंतःकरणपूर्वक धन्यवाद मी देतो. झालचं तर, तुमचं सदैव भलं व्हावं, ही ईशचरणी प्रार्थना करुन व मनोकामना बाळगूनच आपला निरोप घेतो !!! पुनश्च धन्यवाद…..

जय महाराष्ट्र, जय हिंद !!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष आणि धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)

“लाल रक्ताची होळी-धूळवड खेळतच ‘लालबाग’मधून वाढलेल्या व त्यातूनच पुढे फोफावलेल्या”, ‘शिवसेने’नच ‘नगर’च्या दहशतीवर ‘सामन्या’तून कोल्हेकुई करावी ???

नगरची दहशत, ही आजकालची नाही…. सहकारातला ‘स्वाहाःकार’ म्हणून गणल्या गेलेल्या साखरकारखानदारीच्या अफाट पैशातून पवार-ठाकरेंच्या ‘बेरजे’च्या राजकारणाद्वारे पोसली गेलेली ही अमानुष ‘दहशत’, गेल्या काही दशकांची आहे!
एका बाजूला अण्णा हजारेंसारखी समाजहितैषी मंडळी जन्माला घालणारा हा जिल्हा, दुसऱ्या बाजूला ही क्रूर पिल्लावळ पोसत आलायं…. अंगाखांद्यावर खेळवत आलायं, ही या जिल्ह्याची फार मोठी लाजिरवाणी शोकांतिका आहे!!!
याच नगरमध्ये सध्या, “आरटीआय आणि अॅट्रासिटी” हा मोठा बिनभांडवली धंदाच बरकतीला आलाय असं नव्हे; तर ती एक भली मोठी ‘राजकीय फॅक्टरी’च बनलीयं…. आणि, सर्वपक्षीय आशिर्वादाने धूमधडाक्यात ती तिथे दिवसाचे चोवीस तास, वर्षाचे बारा महिने चालू असते. एकएका नगरसेवकाच्या ‘खरेदी’वर बेधडक करोडोंची बोली लावणारे महाबदमाष राजकारणी (यात, सध्या गाजणाऱ्या दुहेरी हत्याकांडावर, बिनपैशाचा राजकीय-तमाशा करणारी ‘शिवसेना’ अग्रक्रमाने आलीच) भारतात अन्यत्र, फार थोड्या ठिकाणी पहायला मिळतील. निवडणूका जिंकल्यावर कोऱ्याकरकरीत नोटांवर (म्हणजेच, लक्ष्मीला पायदळी तुडवणाऱ्या) थयथया नाचणाऱ्या राजकीय अवलादी, या नगरच्या मस्तवाल राजकारणातच तुम्हाला आढळतील (ठाण्यातल्या, अशाच एका तुरुंगात आतबाहेर करणाऱ्या व अनेकवेळा खात्रीने निवडून येणाऱ्या नगरसेवकावर, असले पूर्वी आरोप झाल्याचं वाचकांना स्मरत असेलच)!

महाराष्ट्रात, एकाच घराण्यातील राजकीय कर्तेपुरुष(?) आणि त्यांच्या बाया, विविध राजकीय पक्षांमध्ये आपल्या ‘राजकीय धंद्या’च्या सोयीसाठी विखुरलेले असण्याचा… किंवा, विविध राजकारणी आपापसात ‘व्याही’ बनण्याचा एक नवा यूपी-बिहारी राजकीय “माफिया-फंडा” सर्वदूर पसरलायं. पोलिसी ‘खाकी वर्दी’, ही त्यांच्यासाठी मग फक्त एक ‘खेळणं’ बनतं…. किंवा कधिही, कसाही वाजवायचा एक ‘खुळखुळा’ बनतो! त्यातूनच, “सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय”, हे पोलिसी-ब्रीद टिश्श्यूपेपरवरच्या विष्ठेसारखी हवी तशी, हवी तेव्हा ‘फ्लश्’ करता येणारी बाब बनल्याचं प्राक्तन उरल्यासुरल्या, शिवबा-संतांच्या महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत जनतेसमोर येतं !
मुळात, हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढेच कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व धाडसी पोलिस अधिकारी असण्याची गंभीर स्थिती असताना, अशा पोलिस अधिकाऱ्यांचं खच्चीकरण केलं जाणं… ही शासन कुठल्याही पक्षाचं असो, रोजची बाब झालीयं. नगरला कृष्णप्रकाश, लखमी गौतमांसारखे लाखमोलाचे पोलिस अधिक्षक लाभले, पण त्यांना तिथून तत्काळ हटवण्यात आलं. आजचे नगरचे पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा प्रामाणिक अधिकारी आहेत; पण, त्यांनी निदान आता तरी, कृष्णप्रकाश आणि लखमी गौतमांसारखी ‘दबंगगिरी’ दाखवण्याची खूप मोठी गरज आहे… अन्यथा, हे लोण वेडंवाकडं महाराष्ट्रात हातपाय पसरायला वेळ लागणार नाही.

या सगळ्या अनर्थाला जेवढे राजकारणी व प्रशासक जबाबदार आहेत, तेवढेच… पैसे घेऊन, दारु पिऊन, बिर्याण्या झोडून मतदान करणारे मतदार आणि त्यातही, संवेदनशून्य-स्वार्थी मध्यमवर्ग जास्त जबाबदार आहे… “सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता”, ही कधिही न संपणारी ‘कापूसकोंड्या’ची गोष्ट बनलीय. या अ(न)र्थव्यवस्थेचा काही अंशी फायदे लाटणारा ‘मध्यमवर्ग’, शेषनागाच्या फण्याप्रमाणे काम करत, ही, “रक्त-पिपासू शोषक” व्यवस्था तोलून धरतोयं…. ही अत्यंत क्लेशकारक व अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. जोपर्यंत, आपल्यावर प्रत्यक्षात काही शेकत नाही; तोवर, “मला काय त्याचं”, ही मध्यमवर्गीय संवेदनशून्यता व बेफिकीरीच समाजात अमानवी व्यवहारांना कमालीचं उत्तेजन सध्या देताना दिसतेय! असल्या, सर्रास दृष्टोत्पत्तीस येणाऱ्या नृशंस गुन्हेगारीची पाळेमुळे, या मध्यमवर्गीय मनोवृत्तीतच दडलेली आहेत. आम्ही फक्त ‘जातधर्मा’च्या बाबतच असलो तर, बेगडी व ढोंगी संवेदनशील असतो. बाकी, समाज वा देश कुठल्या दिशेला चाललाय, याच्याशी आम्हाला काहीही देणंघेणं नसत.

ज्यांना ‘सामना’ दैनिक ‘संतमहात्मे’ म्हणून हिणवतोयं, ते नगरचे तथाकथित राजकीय ‘सैतान’, शिवसेनेच्या मांडवाखाली ‘राजकीय मांडवली’ करुन गेल्याचं ‘सोयीचं विस्मरण’ सामनाकारांना होणारच…. त्यात विशेष आश्चर्य ते काय? नगरचे लोकप्रतिनिधी आपण कसे निवडून आणतो, हे सेनेनं स्वतःला एकदा विचारुन पहायला काय हरकत आहे…. पण, ते तसं कधिही करणार नाहीत. कारण, पवार-ठाकरेंना फक्त ‘इलेक्टिव्ह् मेरिट’ची पडलेली असते, त्यांना राजकीय (की, राक्षसी?) ताकद उभी करायची असते… ती देखील, महाराष्ट्रातल्या यच्चयावत महापुरुषांच्या सदैव पंचारती ओवाळत !!!

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)