“तो द्रवला, तिथेच चुकला की, तो दोष, त्या तशाच “व्यवस्थापकीय खेळी”ला पुन्हा एकवार ‘बळी’ पडणाऱ्या मराठी कामगारांच्या रक्तातलाच समजायचा?

{साधारण दहा-बारा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे…. ठाणे-कळवा येथील ‘मुकंद आयर्न’ या बड्या कंपनीतील, जगण्याची कोंडी झालेल्या कामगारांनी, राजन राजे यांना दीर्घकाळ अडलेल्या पगारवाढीच्या करारासंदर्भात, आर्त साद घातली. स्वाभाविकच, त्याला भरभरुन प्रतिसाद देत, हा ‘अवलिया’ त्यांच्या मदतीला धावून गेला… जे व्यवस्थापनं कामगारांना धूप घालत नव्हतं, त्याचं ‘मुकंद आयर्न’च्या व्यवस्थापनानं ‘राजन राजे’ नांवाला घाबरुन, उभ्या आयुष्यात कधि नशिबी नव्हता, असा तुलनेनं भरघोस पगारवाढीच्या कराराचा प्रस्ताव तेव्हा मुकंदच्या कामगारांपुढे ठेवला… प्रस्ताव हाती येताच, ‘राजन राजे’ या अवलियाला साफ बाजूला सारत (अर्थात, तिचं व्यवस्थापनाची प्रस्तावासंदर्भातली प्रमुख ‘अट’ होती), जाज्वल्य नेतृत्त्वाचा ‘विश्वासघात’ करुन एकदाचा तो करार, मुकंदचे कामगार पदरात पाडून घेते झाले. त्यानंतर, एक भीषण कालखंड मुकंद आयर्न कामगारविश्वात सुरु झाला…. अंधारयुग नुसतं पुन्हा अवतरलं, असचं नव्हे; तर, ते त्याची पडछाया त्यानंतर अधिकच गडद झाली! आता, मुकंदच्या कामगारांना ‘राजन राजे’ या अवलियाच्या समोर, मदतीसाठी पुन्हा तोंड दाखवायची सोय उरली नव्हती. अशात, एक पिढी कामगारांची जवळपास बदलून गेली… नव्या दमाच्या नवतरुण कामगारांनी पुन्हा विलक्षण आर्जव करत, या ज्वलंत नेतृत्त्वाला साकडं घातलं आणि तो अवलिया द्रवला… “तो द्रवला, तिथेच चुकला की, तो दोष, त्या तशाच “व्यवस्थापकीय खेळी”ला पुन्हा एकवार ‘बळी’ पडणाऱ्या मराठी कामगारांच्या रक्तातलाच समजायचा? गुलामगिरीच्या तब्बल एक हजार वर्षानंतर, ज्या थिजलेल्या मराठी रक्तातली ‘लाली’ वाढवून त्याला ‘विजिगिषूवृत्ती’चा परिसस्पर्श ‘शिवछत्रपतीं’नी दिला…. त्याचं ‘मराठी-रक्ता’ला, महाराष्ट्रात दशकानुदशके किळसवाणं राजकारण करत, एवढं कुणी आजवर सडवलं?? शिवछत्रपतींपश्चात, मराठी माणसांच्या रक्तातली ‘स्खलनशीलता’, शरीरात प्रदीर्घकाळ घर करुन रहाणाऱ्या ‘रोगजंतूं’सारखी वेळी-अवेळी ‘रोगनिर्मिती’ करत, आजही ठाण मांडून तशीच मौजूद आहे काय???… याचा फैसला वाचकांनी करावा, तो त्या नेत्याच्या शब्दस्फुल्लिंगांतूनच… ज्या नेत्याने, आजवर हे आणि असेच, ‘मराठी कामगारां’नी घातलेले असंख्य अवसानघातकी ‘घाव’ छातीवर, पाठीवर झेललेत…. तरीही तो तसाच, “रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे”च्या आणि ‘जातजमाती’च्या अर्थकारण-राजकारणाच्या विरोधात उभा आहे, उभा रहाणार आहे… ते केवळ, “श्रीकृष्णाचा जीवनसंदेश आणि शिवछत्रपतींची राजनीति, त्याने आपल्या रक्तात गोंदवून घेतलेली असल्यानेच… अवलिया हा असा की, ज्याला माणसाचा ‘जातधर्म’ माहित नाही, माहित आहे ते फक्त, आणि फक्त, ‘माणसाचं कर्म’… जमल्यास वाचा आणि विचार करा…. संपादक, ‘कृष्णार्पणमस्तु’… ‘धर्मराज्य पक्षा’चं मुखपत्र}

हे असचं होत असतं, असचं होणार, याची मला पूर्वानुभवावरुन पूर्वकल्पना होतीच. गेली तीन तपे मी हा सगळा मराठी माणसांनी, आपल्या आयुष्याचाच मांडलेला ‘भोंडला’, मांडलेला ‘बाजार’ मी पहात आलोयं. त्यामुळे, तशी मी ‘प्रवीण’ला दिलेली होती. म्हणूनच, आपलं मतं वा सल्ला सोशलमिडीयातून देण्याची मला बिलकूल इच्छा नव्हती! अनुयायांची पण कधितरी ‘परीक्षा’ व्हायला नको का? यापेक्षा काही वेगळं, प्रचंड बहुमताने घडलं असतं, तर ती कामगार जगतातली आश्चर्यकारक घटना म्हणून गणली गेली असती!

मित्रहो,

मराठी माणसांच्या नांवाने ऊठसूठ गळा काढणारे (प्रत्यक्षात, गळा कापणारे) यच्चयावत बदमाष मराठी राजकारणी आणि उद्योग जगतातली “जैन, गुज्जू, मारवाडी, सिंधी, पंजाबी” ही धनदांडगी मंडळी… कायम मला हेच सांगत आलेली आहेत की, “मराठी माणसं, ही फार थोडक्यात ‘बोली’ लावून विकत घेता येणारी किंवा वाटेला लावता येणारी ‘प्रजात’ आहे… त्यांना, बेडकासारखं जेमतेम दिड फुटावरच दिसतं; मग दिडशे फूट, दिडशे मीटर, दिडशे किमीची तर बातच सोडा! त्यांना जर धड, त्यांचं खरखुरं हित कळतं असतं, तर आम्ही (म्हणजे, धनदांडगे जैन, गुज्जू, मारवाडी) तुमच्यावर तुमच्याच राज्यात येऊन ‘राज्य’ करु शकलो असतो काय?” हेच उद्योगपती व त्यांचे दलाल (HR-अधिकारीवर्ग वा तथाकथित Labour Consultants) , “एक दफे पैसा गटार में फेकेंगे, लेकिन तुम्हारे मराठी कामगार को नहीं देंगे”, अशी बेधडक व बिनदिक्कत ‘मस्ती’ही वेळप्रसंगी आम्हाला दाखवत आलेले आहेत…. त्याचीही प्रमुख कारणं म्हणजे आपला आळस, लढाऊवृत्ती व दूरदृष्टीचा अभाव, आपसात माजलेली सुंदोपसुंदी आणि नीतिमत्ताशून्यता!!! आम्ही खऱ्या अर्थाने राजकियदृष्ट्या जागृत व्हायला तयार नाही आणि आमची राजकिय क्रांतीची भाषा, ही ‘आळशां’ची भाषा आहे… ‘सोशलमिडीया’तून बसल्याजागी टाईमपास करत घडवू पहात असलेली ‘व्हर्चुअल क्रांति’ची षंढ भाषा आहे!

कामगार चळवळीला (धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचा सन्माननीय अपवाद सोडून) आता नीति, न्याय व सहसंवेदनेची डूब राहीलेली नाही, हे फार मोठं दुर्दैवं व फार मोठी धोक्याची घंटा आहे…. आणि, ही अस्वस्थ करणारी परिस्थिती शिवबा-संतांच्या महाराष्ट्रात व्हावी, या सारखं दुर्भाग्य कुठलं? त्यामुळेच, योग्य राजकिय जागृतीही कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण करता येणं, आमच्या सारख्याना दिवसेंदिवस अशक्यप्राय होत चाललयं. निवडणुकीत सातत्याने होणारा “धर्मराज्य पक्षा”चा दारुण पराभव, हे त्याचचं द्योतक आहे! वेगवेगळ्या निवडणुकीतला हा पराभव ‘धर्मराज्य पक्षा’चा नसतो, तर प्रत्येकवेळी तो अवघ्या कामगारविश्वाचा असतो! त्यामुळेच, आज ना संसदेत, ना महाराष्ट्राच्या विधानभवनात, खराखुरा कामगारांचा आवाज उठवणारा साधा एकही ‘प्रतिनिधी’ नाही. मित्रांनो, तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की, आता कामगार आंदोलनांची पुण्याई आणि प्रभाव, या उच्चतंत्रज्ञानाधारित “रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे”त (Vampire-State System) झपाट्याने घटत चाललायं. ‘राजन राजे’ हाच काय तो ‘वेडापीर’, या विपरीत स्थितीत ती, जाज्वल्य कामगारहिताची अखेरची ‘मशाल’ हाती धरुन गेली पस्तीस-छत्तीस वर्षे अखंड चालतोयं! पुढील काळात ही व्यवस्था एवढी क्रूर व शोषक बनत जाईल की, त्याविरुद्ध साधा आवाजही उठवणं सोप जाणार नाही. ‘राजन राजे’ ही एक ‘नैतिक दहशत’च सध्या या मार्गात, त्यांना आडवी जातेयं एवढचं! अन्यथा, ‘कायम-कर्मचारी’ ही संकल्पनाच एव्हाना पूर्णतः बाद होऊन सगळेच ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी’ नांवाचे “गुलाम व नव-अस्पृश्य” म्हणून राब राब राबताना दिसले असते… असो!

पण, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, केवळ पगारवाढीच्या वा बोनसच्या आपल्या “आकड्यां”मध्येच जर, अवघी कामगार चळवळ अडकून पडणार असेल; तर, मग फारच कठीण आहे! कल्पना करा, शिवछत्रपतींना जर असे मावळे लाभले असते (की, जे फेकलेल्या आकड्यांमध्ये सहजी फसू शकतील) तर, शिवछत्रपती महाराज काय कप्पाळ करु शकले असते? अवघं शिवछत्रपतींचं सैन्यचं विकत घेण्याएवढी राक्षसी ताकद मोंगलांकडे होतीच की… पण, विकला जाणारा कुणी नव्हता की, बक्षिसीच्या आकड्यांमध्ये फसणाराही कुणी ‘मावळा’ नव्हता!

ठीक आहे, “सरतेशेवटी, मी माझं काम जीवाच्या कराराने करतोयं… करत रहाणार आहे. लोक साथ देतील न देतील… तो त्यांचा प्रश्न आहे. या लोकशाहीत (विशेषतः, सोशलमिडीयाच्या आक्रमणाने) वेडंवाकडं वागण्याचा अधिकार लोकांना, राजकिय समज असो वा नसो, ‘दरडोई एक मत’ असल्याने आहेच… आणि, तो ते वेळोवेळी वेडावाकडा बजावताना मी त्यांना पहातच आलोय. कालाय तस्मै नमः … नशीब समजायचं की, शिवछत्रपतींच्या काळात असली भुक्कड लोकशाही नव्हती!”

तेव्हा, मित्रांनो… तुम्ही मला रजा दिलीत तर फार बरं होईल. मुकंद आयर्नच्या कामगारांचा हा काही माझा पहिला अनुभव नव्हे… आणि, मुकंदच्याच कामगारांना एकट्यांना का दोष द्यायचा, सगळीकडे हेच मन विषण्ण करणारं चित्र आहे! “कालही आणि आजही, कुठेतरी तुम्हाला माझा ‘चार पैसे’ जास्त मिळण्यासाठी “उपयोग” झाला असेल, तर तेही नसे थोडके… ते समाधान गाठी बांधूनच तुमचा निरोप घेऊ पहातोय!!!

……नाट्यगृहात, पडदा वर जाण्याअगोदर ‘घंटा’ वाजते. पण, आजच्या मतदानाच्या निमित्ताने जी ‘घंटा’ कामगारांनी ‘मतदान’ करुन वाजवलीय, त्या ‘घंटे’मुळे मुकंद आयर्नच्या कामगारांच्या भविष्याचा ‘पडदा’ वर जातो की खाली येतो… हे नजिकच्या भविष्यात कळेलच! जे काही मला आपलं प्रेम लाभलं, त्या प्रेमाबद्दल मी समस्त कामगारांना…. ज्यांनी, आयुष्यात कधि मी ऐकला नाही, अनुभवला नाही, अशा ‘मुर्दाबाद’ वगैरे कटू शब्दांत माझा भरसभेत निषेध केला वा आज ज्यांनी विरोधी मतदान केलं, त्या सर्व कामगारमित्रांनाही, मनःपूर्वक व अगदी अंतःकरणपूर्वक धन्यवाद मी देतो. झालचं तर, तुमचं सदैव भलं व्हावं, ही ईशचरणी प्रार्थना करुन व मनोकामना बाळगूनच आपला निरोप घेतो !!! पुनश्च धन्यवाद…..

जय महाराष्ट्र, जय हिंद !!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष आणि धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत