आजची ‘भिती’ उद्याचं ‘भविष्य’ ठरेल…

जर, इंग्लंड नांवाचं छोट्याश्या बेटासारखं एकच राष्ट्र, आपल्या अनैसर्गिक-अशाश्वत स्वरुपाच्या औद्योगिक उत्पादनांमुळे आणि त्यांचा बेगुमान वापर करण्याच्या बेबंद जीवनशैलीमुळे…. मानवी-शोषणासह निसर्ग-पर्यावरणविषयक एवढ्या मोठ्या समस्या जगापुढे निर्माण करु शकत असेल…. तर, भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या खंडप्राय देशाने, तोच विनाशकारी ‘पाश्चात्य विकासाचा मार्ग’ निवडला तर काय अनर्थ ओढवेल, याची कल्पनाच केलेली बरी. इंग्लंड-युरोपच्या आर्थिक साम्राज्यवादाने आज, जगातल्या मानवीसमूहांना अनिर्बंध शोषणाद्वारे गुलामीच्या शृंखलांनी जखडून ठेवलेलं असताना, नजिकच्या भविष्यात भारतासह, जगातल्या ३०० कोटी लोकसंख्येनं जर हा निसर्ग-पर्यावरणाला अंति घातक असा ‘पाश्चात्य मार्ग’ निवडला तर, हे जग गवतातल्या हरणटोळांसारखे उघडनागडं त्वचाहिन निसत्व बनेल”, १९२८ साली काढलेले हे आपल्या महात्म्याचे महान उद्गार आहेत!

स्वातंत्र्यापश्चात लोकसंख्येची घनदाट लोकसंख्येच्या भारताने जगभरात साम्राज्यवादाचं जाळं पसरलेल्या इंग्लंडपेक्षा वेगळी पाऊलवाट चोखाळली पाहिजे, हे म. गांधींनी अचूक जाणलं होतं. ब्रिटीश ‘विकासप्रारुप’ इतर जगभर पसरलेल्या आपल्या वसाहतींच्या अनिर्बंध शोषणाने चालू रहाणं (जरी, अंति जगाच्याही दृष्टीने ते घातकी असलं तरी) शक्य होतं…. तशी अनुकूल परिस्थिती भारताला उपलब्ध नव्हती. त्यामुळेच, विकासाच्या महामार्गावरचं प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक टाकणं गरजेचं असतानाच आपण पाश्चात्य विचारधारा अवलंबून, या देशाच्या समृद्ध निसर्ग-पर्यावरणाचा अतोनात विध्वंस आणि सामान्य माणसांच्या सन्मान व सुरक्षेचा सत्यानाशच जणू हाती घेतला.

जनसंख्या आणि जीवनशैली या दोन्ही बाबींच्या बेगुमान व अनियंत्रित वाढीनं राष्ट्राच्या निसर्गाचा आणि पर्यावरणाचा घास घेतला गेला…. जल, जंगल आणि जमीन, यावर विनाशकारी आक्रमण त्यामुळेच तर होऊ लागलं! तरी आजही, जनसंख्या आणि जीवनशैली कठोरपणे रोखणं, हा आपल्या राजकीय पटलावरचा साधा विषयसुद्धा बनू नये, हे या देशाचं केवळ आजचं दुर्दैव नव्हे; तर, नजिकच्या काळातले ते दुर्दैवाचे प्रलंयकारी दशावतार आपल्याच डोळ्यासमोर घडताना दिसतील.

जैवसमृद्धीची असंख्य शिवारं असलेल्या आपल्या भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशांनी तर, निसर्ग-पर्यावरणासंदर्भात विकासाच्या नांवाखाली केलेली क्षुल्लक चूक देखील अक्षम्य ठरु शकते… अशी संवेदनशील स्थिती असताना; जेव्हा, “मोठमोठी अवाढव्य धरणं बांधणे”, हाच आधुनिक विकासाचा मूलमंत्र, असा मोठा गैरसमज पाश्चात्यविचारधारेनं प्रेरित नेहरु, आंबेडकर, पटेल, पंत, प्रसाद वगैरे मंडळींचा त्याकाळी होता. तेव्हा हाच ‘महात्मा’ दूरदृष्टीने, आपल्या जे.सी.कुमारप्पा, राधाकमल मुखर्जींसारख्या निसर्ग-पर्यावरणवादी सहकाऱ्यांसह, कंठशोष करुन त्याला कडाडून विरोध दर्शवत होता आणि तो किती योग्य होता, हे आत्ता आत्ता कुठे हळूहळू आपल्याला उमगू लागलयं. पं. नेहरु तर तेव्हा, “मोठी अवाढव्य धरणं, ही आधुनिक भारताची मंदिरे होतं”, असं उच्चरवाने गर्जू लागले होते.

शहर मोडून खेड्यांकडे कूच करा, हा म. गांधींचा ‘अंतिम-सत्यवादी’ संदेश, पाश्चात्य विकास-संकल्पनांच्या नादी लागून आपल्या राष्ट्रीय धोरणकर्त्यांनी साफ धुडकावला. त्याची कटू आणि विध्वंसक फळं आज आपण चाखतो आहोत आणि अजूनही आपल्याला पुढे जाऊन ती चाखायचीच आहेत…. आणि, तो उत्पात पहाण्यासाठी कदाचित आपली नातवंड-पंतवंड अस्तित्वातसुद्धा शिल्लक रहाणार नाहीत, हे सध्या घोंघावणाऱ्या नैसर्गिक महासंकटांमुळे (जागतिक तापमानवाढ, अनाकलनीय व अपरिवर्तनीय पर्यावरणीय बदल, भूकंप, महाभयंकर वादळे, अतिवृष्टी-पूर, दुष्काळ, ज्वालामुखींचे भीषण उद्रेक, गोड्या पाण्याची टंचाई, प्रदूषण, नापिकी इ. इ.) पुरेसं स्पष्ट होऊ लागलयं. तरीही, आपला ‘एक टक्का’ शासकवर्ग तथाकथित विकासाचा गजर करीत डोळ्यावर कातडं ओढून बसलेला दिसतोय. पण, हे ‘हस्तीदंती मनोऱ्या’तील नाटक कुठपर्यंत चालू ठेवणं परवडू शकेल, याचा आता सुजाण जनतेनं अत्यंत तातडीने व गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे!

विकास नांवाचा अनर्थकारी विकार जडलेल्या मूढांना, हे प्रतिपादन त्याज्य वाटणं स्वाभाविक आहे; पण, त्याने नजिकच्या भविष्यात होऊ घातलेला मानवासह सजीवसृष्टीचा संहार थांबणं केवळ अशक्य आहे! उणीपुरी काही दशकं मानवजातीच्या हातात आहेत…. तेवढ्यात काही पावलं धोरणकर्त्यांनी भारतासह जागतिक पातळीवर उचलली नाहीत, तर आजची ‘भिती’ उद्याचं ‘भविष्य’ ठरेल… तेव्हा कुठलाही उपाय मानवजातीच्या हाती शिल्लक राहीलेला नसेल, हा या आजच्या पर्यावरणदिनाचा भयकारी संदेश आहे!!!

                    …राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष, भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी पक्ष)