प्रश्न: ‘प्लास्टिक बंदी’च्या मोठ्या दंडाबाबत आपल्या ‘धर्मराज्य पक्षा’चं मत काय आहे???

माझं उत्तर: दुर्दैवाने असं काही केलं नाही तर, स्वांतसुखाय मध्यमवर्ग व एकूणच जनता कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेत नाही, हा सार्वत्रिक अनुभव आहे… दंड त्रासदायक आहे खरा, पण भविष्याच्या दृष्टीकोनातून ही प्लास्टिकबंदी व त्याकारणे केला जाणारा दंड, “इष्टापत्ती” ठरावी.

अशाप्रकारचे मोठे आर्थिक दंड नागरीसुविधा योग्यप्रकारे न पुरविणारा व अनधिकृत बांधकामांना आशिर्वाद देणारा महापालिका अधिकारीवर्ग, संबंधित राजकारणीवर्ग (नगरसेवक व राजकीयपक्ष पदाधिकारी) यांनादेखील व्हावेत… ही आम जनतेतून या निमित्ताने पुढे आलेली मागणी, अगदी योग्य आहे!

मात्र, बऱ्याच जणांना कल्पनादेखील नाही की, निसर्ग-पर्यावरणविषयक समस्यांनी एवढं गंभीर स्वरुप धारण केलयं की, पुढील पिढ्यांचं व सगळ्या सजीवसृष्टीचं अस्तित्व, संभाव्य सर्वनाश टाळून, टिकवून धरायचं असेल तर, “प्लास्टिक, रंग व रंगद्रव्ये (कपडे, इमारती, वस्तू इ. साठी वापरले जाणारे शोभिवंत कृत्रिम रंग… फक्त काही निवडक अपवाद वगळता उदा. जहाजांच्या बाहेरील भागाला खाऱ्या पाण्यात झपाट्याने गंजून जाऊ नये म्हणून वापरले जाणारे ‘गंजप्रतिबंधक’ रंग) आणि आंघोळीचे साबण- कपडे धुण्याचे डिटर्जंट्स् यांच्या उत्पादन-वापरावरही तातडीने संपूर्ण बंदी आणणं निकडीचं बनलेलं आहे!

त्यातून, जमीन, पाणी व हवा यांचं प्रदूषण तर कमी होईलच; शिवाय, शहरातल्या उंच इमारतींतलं बहुतांश सांडपाणी (मलःनिस्सार वगळता… त्यावरही सोपी प्रक्रिया करुन त्याचं सर्वोत्तम दर्जाच्या ‘सोनखता’त करता येईलच) फारसा वीजेचा वापर न करता थेट गुरुत्वीयबलाच्या आधारे शेतीसाठी वापरता येऊ शकेल… तेवढी खेड्यापाड्यातील अधिकाधिक जमीन अत्यल्प खर्चात लागवडीखाली येऊ शकेल.

आपली एकूणच मध्यमवर्गीय जीवनशैलीचं कमालीची कार्बन व प्रदूषणकेंद्री झालेली आहे… त्यामुळे, आपण या पृथ्वीमातेवरील संसाधनांचा वेडावाकडा, अनिर्बंध व विकृत उपभोग घेऊन आगामी पिढ्यांना (म्हणजेच, आपल्या नातंवंड, पंतवंड वगैरे पुढील पिढ्यांना) जणू उद्याचा उगवता सूर्यच नाकारत आहोत… त्यांच्या पुढ्यात आपल्या चंगळवादी जीवनशैली व आततायी उपभोगीवृत्तीमुळे अंधाराचं ताट वाढून ठेवत आहोत, याचं आपणा सर्वांना ना ज्ञान, ना जाणिव, हे केवढं भयानक आहे!!!

सुरुवातीला, हा जीनवशैलीतला मोठा बदल खूपच त्रासदायक वाटू शकतो… पण, आपसूक शाश्वत व निसर्ग-पर्यावरणस्नेही पर्याय पुढे येतीलच (उदा. ऊन्हात अवघे काही तास तापलेली स्वच्छ वस्त्रगाळ माती, साबणापेक्षाही कितीतरी अधिक आपलं शरीर स्वच्छ करुन त्त्वचा चमकदार आरोग्यदायी बनवते… कपड्यांसाठी रिठे वगैरेंसारखे पारंपारिक पर्याय आहेतच). सरतेशेवटी, “गरज, ही शोधांची जननी असतेच” आणि शिवाय आपल्याला “शाश्वत जीवन हवं की, अल्पजिवी जीवनशैली व अर्थव्यवस्था हवी”, याचा निर्णय नजिकच्या भविष्यात घ्यावाच लागणार आहे… त्यालाच अनुसरुन वरील भाष्य आहे, हे कृपया समजून घेणे!

…. राजन राजे (अध्यक्षः धर्मराज्य पक्ष… भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी हरित पक्ष)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत