“रामशास्त्री प्रभुणे आणि जे. चेलमेश्वर… एका खणखणीत नाण्याच्या दोन बाजू !!!”

नुकतेच २२ जून-२०१८ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वश्री जे. चेलमेश्वर हे सात वर्षांच्या सेवेपश्चात, एका वादळी पार्श्वभूमीवर निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालय नांवाच्या संस्थेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारी आणि न्यायमूर्ती नेमणुकीच्या पद्धतीतलं दोष दिग्दर्शन करणारी, अशी ती वादळी पार्श्वभूमी होती…

“हिटलरसुद्धा सत्तेत कायम रहाणार नव्हता व सर्वोच्च न्यायालयातील उद्वेगजनक सद्दस्थितीही (ज्यात, न्यायदानातल्या मूलभूत पवित्र मूल्यांचा र्‍हास होत होता) कायम रहाणारी नाही”, असा भारतीय न्यायदानाच्या इतिहासात प्रथमच राणाभीमदेवी थाटात पवित्रा घेत सर्वोच्च न्यायमूर्ती श्री. दीपक मिश्रा यांच्या गैरकारभाराविरुद्ध सहकारी न्यायमूर्तींसह बेधडक जाहीर ‘पत्रकार परिषद’ घेण्याचा बाणेदारपणा न्यायमूर्ती जे. चेलमेश्वरांनी दाखवला. त्यामुळेच, भारतीय जनतेला सुस्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयात “ऑल् इज् नाॅट् वेल्” याचा उघड साक्षात्कार झाला, जे होणं ही ‘काळाची गरज’ बनली होती!

याच न्यायमूर्ती जे. चेलमेश्वरांनी केंद्र सरकारच्या, उत्तराखंडात रावत सरकार बडतर्फ करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाविरुद्ध निकाल देणार्‍या, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून, गुणवत्तेनुसार सुयोग्य पण, सेवाज्येष्ठतेबाबत वादग्रस्त, अशी जोरदार शिफारस ‘काॅलेजियम’मधून करण्याची हिंमत दाखवली होती.

भारतीय लोकशाहीला तारणारा, असा सर्वात महत्त्वाचा निर्णय जे. चेलमेश्वर व एस्. नझीर या खंडपीठाने, निवडणूक प्रक्रिया सुधारण्याबाबत व अधिक पारदर्शक करण्याबाबत १६ फेब्रुवारी-२०१८ रोजी दिला.

त्यामुळे, खालील क्रांतिकारक गोष्टी घडल्या….

१) निवडणूकीसंबंधी नियमावली (१९६१) च्या नमुना क्र.२६ मध्ये सुधारणा,

२) सदरहू नमुना अर्जात अपुरा वा चुकीचा तपशील देणार्‍या उमेदवाराचा निवडणूक अर्ज रद्द ठरविण्याचा अधिकार,

३) लोकसभा वा राज्यविधिमंडळात निवडून जाणाऱ्या खासदार-आमदारांच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा उत्पन्न जास्त आढळल्यास लोकप्रतिनिधी म्हणून निवड रद्द करणे… त्यासंदर्भात, चौकशी करणारी स्थायीसमितीची निर्मिती आणि लोकप्रतिनिधींवरील भ्रष्टाचाराच्या खटल्यांचा तातडीने निपटारा,

४) त्यादृष्टीनं, उमेदवार वा उमेदवाराची पती/पत्नी वा त्यावर अवलंबून असलेले जवळचे नातलग यांनी मिळविलेल्या सरकारी कामांच्या कंत्राटांचा संपूर्ण तपशील उघड करणे

“मी भारतीय जनतेला, भारतीय राज्यघटनेला आणि मी सर्वोच्च न्यायालयाचं न्यायमूर्तीपद स्विकारताना घेतलेल्या शपथेला बांधिल आहे… कुठल्याही केंद्रिय सत्तेला नव्हे”, असं ठणकावून सांगणारा, हा दुर्मिळ अशा “रामशास्त्री बाण्या”चा न्यायाधीश होता. केवळ, राजकारणीच नव्हे; तर, अनेक निवृत्त न्यायमूर्तीही दिल्लीतील सरकारी आलिशान बंगले वर्षानुवर्षे बळकावून बसण्याची परंपरा असताना, ती याच रामशास्त्री बाण्याने कठोरपणे मोडून काढणार्‍या या न्यायमूर्तीने, निवृत्तीच्याच दिवशी सरकारी बंगला सोडून एक नवा आदर्श निर्माण केलाय!

निवृत्तीपश्चात बड्या पगाराच्या वा मोठ्या लाभसुविधा असलेल्या कुठल्याही सरकारी वा खाजगी नेमणुकीलाही सुस्पष्टपणे नकार देणाऱ्या, या ‘रामशास्त्री’ला ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने त्रिवार सलाम !!!

संदर्भ, रामशास्त्री प्रभुणे, या पेशव्यांच्या दरबारातील ‘नररत्ना’वर येऊन ठेपल्यामुळे… या निमित्ताने या महान व्यक्तिमत्वाचा थोडक्यात पण, अत्यंत महत्त्वाचा परिचय महाराष्ट्राला होणं, नितांत गरजेचं आहे, असं आम्हाला वाटतं!

‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन सातत्याने आम्ही, “एकवेळ पोटाला भाकरी मिळाली नाही तरी, चालेल; पण, न्याय हा प्रत्येकाला मिळालाच पाहिजे”, असं प्रतिपादन करत असतो…. त्याचं मूळ कारणचं हे की, ‘न्यायदान’, हे इतकं परमपवित्र कार्य होय की, ते ‘सत्ता’ वा ‘मत्ता’ यामुळे यःकिंचितही झाकोळून जाताच कामा नये; मग, ‘न्यायदान’ हे सत्तेपुढे वा पैशापुढे लाचार होण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो? आपल्या देशात अभावानेच खन्ना, चंद्रचूड, चेलमेश्वर यासारखे ‘रामशास्त्री बाण्या’चे न्यायमूर्ती होतात, म्हणूनच देशाच्या लोकशाहीची ही आजची अराजकसदृश्य भयानक स्थिती आहे!

राज्यघटनेनं लोकशाहीचा स्वतंत्र व स्वायत्त स्तंभ म्हणून जरी ‘न्यायसंस्थे’ची उभारणी केलेली असली; तरी, ती संस्था राबवणारे हातच व्यवस्थेचे ‘गुलाम’ होऊ लागले की, जनतेचा शेवटचा ‘आशेचा किरण’ही विझून जातो आणि देशात अन्याय-अत्याचार-विषमता-गुन्हेगारीचा कहर माजतो, जे आपल्या देशात स्वातंत्र्यापश्चात टप्प्याटप्प्याने घडत आलेलं दिसतय!

म्हणूनच, जे. चेलमेश्वरांच्या निवृत्तीप्रसंगी रामशास्त्री प्रभुणेंचं स्मरणं यथोचितच नव्हे; तर, अत्यावश्यक ठरतं. ज्यांच्या निःपक्षपाती, कठोर न्यायदान पद्धतीमुळे व ज्यांच्या आदर्शवत स्वाभिमानी, नीतिमान आचरणामुळे मराठी भाषेला “रामशास्त्री बाणा”, हा नवा सघन वाकप्रचार मिळाला… मराठी-संस्कृती अधिक संपन्न झाली, तो हा रामशास्त्री प्रभुणे कोण आणि त्याची स्वभाववैशिष्ट्ये कोणती… ती आपण जाणून घेणं, निश्चितच सार्वजनिक हिताचं ठरेल.

‘बाळंभट्टी’ ही, ‘मिताक्षरा’ या ग्रंथावरील ज्यांची टीका, ब्रिटीश न्यायालयात प्रमाणभूत मानली जात होती, अशा बाळंभट्ट पायगुडे नांवाच्या काशीस्थित विद्वान गुरुकडे खडतर शिक्षण पार पाडून, ‘राम’ नांवाचा एकेकाळचा अशिक्षित घरगडी, जिद्दीने ‘रामशास्त्री’ बनला!!! स्वाभाविकच उत्तर पेशवाईतलं ‘न्यायमूर्तीपद’ त्यांच्याकडे चालून आलं, जे त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही, न डगमगता केवळ हिरण्यगर्भासारख्या तेजस्वी सत्यप्रज्ञेवर निभावलं. त्यांच्या वैयक्तिक कारकीर्दीची थोडक्यात झलक खालीलप्रमाणे……

१) घाशीराम कोतवालसारखी तत्कालीन भ्रष्टाचाराची प्रकरणे पेशवेकाळातही गाजत असल्याने पेशवेकाळही भ्रष्टाचारात मागे नव्हता. पण, अत्यंत तत्त्वनिष्ठ, न्यायनिष्ठूर, निस्पृह असलेले रामशास्त्री… पोशिंद्या पेशव्यांपुढे कधिही, कुठल्याही प्रसंगी झुकले नाहीत.

२) एकदा सलग तीन दिवस माधवराव पेशव्यांना, महत्त्वाच्या कामानिमित्त भेटण्याचा रामशास्त्र्यांचा प्रयत्न, केवळ माधवराव पेशवे पुजापाठात गुंतलेले असल्याने विफल ठरला. त्यामुळे, सात्विक संतापाने  रामशास्त्रींनी पेशव्यांना खडे बोल सुनावले की, “राज्यकर्त्यांचे खरे देव देव्हाऱ्यात नसतात; तर, ते प्रजेमध्ये असतात…. पूजापाठातच जर वेळ घालवायचा असेल तर, आपण दोघेही काशीला जाऊ, तिथला ‘गंगाघाट’ हे पूजेसाठी उत्तम स्थान आहे!” त्यानंतर, लहान वयाच्या माधवराव पेशव्यांमध्ये फार मोठा स्वभाव बदल घडून आला व ते कसोशीने राज्यकारभार चालवू लागले (नाहीतर, सध्याचे सर्वपक्षीय राजकारणी आणि राज्यकर्ते पहा… ते स्वतःही सार्वजनिकरित्या असल्या पूजापाठ-कर्मकांडात व्यग्र असतातच, शिवाय भोळ्याभाबड्या सामान्य जनतेलाही फाजील धार्मिक उन्मादाची केवळ अफूचीच मात्रा नव्हे, तर ‘अॅनेस्थेशिया’ देत असतात… उदा. सावर्जनिक गणेशोत्सव-सत्यनारायण पूजा, हळदीकुंकू, दहीहंड्या इ. व विविध सद्गुरुंच्या बुवाबाजीत, आपल्या राजकीय-स्वार्थासाठी सामान्य जनतेला अडकवून ठेवत असतात)

३) माधवराव पेशव्यांची पत्नी रमाबाईंनी चैत्र गौरीच्या हळदीकुंकू समारंभप्रसंगी ‘लंकेची पार्वती’ असणाऱ्या रामशास्त्रीबुवांच्या पत्नीला, काशीबाईंना, समारंभानिमित्त घालायला दिलेले आपले काही दागिने मोठ्या मनाने दान केले. दारात आलेल्या आपल्या सालंकृत पत्नीला पहाताच रामशास्त्रींचा संताप अनावर झाला…. तरीही ते संयम राखत पत्नीला एवढेचं म्हणाले, “बाईसाहेब, आपण कुणी पेशव्यांच्या ‘मानकरीण’ आहात वाटतं. आपण रस्ता चुकलात, हा गरीब रामशास्त्र्यांचा वाडा आहे. पेशव्यांचा शनिवार वाडा पलिकडे आहे.”

काशीबाई काय समजायचं ते समजल्या व शनिवार वाड्यात जाऊन रमाबाईंना दागिने परत करुन आल्या, हे काही सांगायला नकोच.

४) पेशवे नारायणरावांच्या खुनात राघोबाबादादाच दोषी आहेत, हे निर्विवाद सिद्ध झाल्यानंतर राघोबादादांना, “देहान्त प्रायश्चित्त, हीच एकमेव शिक्षा”, असं न्यायमूर्ती या नात्याने रामशास्त्रींनी गर्जून सांगितलं. पण, पेशवेपद त्यजून न्यायासनाची ही शिक्षा मानण्यास राघोबादादा तयार होईनात. तेव्हा संतप्त रामशास्त्र्यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा फेकून शनिवार वाडा सोडला.  “या पाप्यांच्या राज्यात मला पाणीसुद्धा प्यावयाचं नाही”,असं म्हणतं ते जे निघाले, ते तडक वाईला मुगावी पोहोचले.

५) पेशवाईतील बारभाईच्या कारस्थानानंतर नाना फडणवीसांनी (नाहीतर, मोदी-शहा द्वयीची मर्जी राखण्यासाठी न्यायसंस्थेवर व प्रशासनावर अवांछनीय दबाव आणणारे आताचे ‘फडणवीस’ बघा!) मिनतवाऱ्या करुन परत त्यांना न्यायाधीशपदी आणलं. मात्र, सततचा आत्यंतिक मनस्ताप व दगदग यामुळे रामशास्त्र्यांची तब्येत ढासळू लागली. मृत्यूपूर्वी (२५ ऑक्टोबर-१७८९) नाना फडणवीसांनी रामशास्त्रीबुवांच्या मुलाची कोणत्या पदावर नियुक्ती करावी, असं शेवटचे श्वास मोजणाऱ्या या निस्पृह न्यायशास्त्रींना विचारताच, हा महापुरुष उद्गारला, “कोणतीही योग्यता नसलेल्या माझ्या मुलाला पेशव्यांची धोतरे धुण्याचं काम द्यावं… त्याची योग्यता तेवढीच आहे!”

नाहीतर, आपल्या बिनलायकीच्या, गुणवत्ताशून्य पुत्रपौत्रांना, लेकीसुना-जावयांना, नातलगांना…. राजकारणात, शिक्षणक्षेत्रात, उद्योग-व्यवसायात ‘येनकेनप्रकारेण’ जबरदस्तीने पुढे आणणारे आजचे ‘महाभाग’ कुठे???

रामशास्त्री प्रभुणेंच्या पायधुळीचीही लायकी नसलेले कःपुरुष, आज सर्वच क्षेत्रात सत्ता आणि मक्तेदारी गाजवताना दिसतायतं…. हे आजच्या सडलेल्या, किडलेल्या अमानुष व्यवस्थेचं (ज्याला, आम्ही सातत्याने ‘रक्तपिपासू-शोषक व्यवस्था’ किंवा ‘व्हँपायर-स्टेटसिस्टीम’ म्हणतं असतो) मूळ कारणांपैकी एक होय!!!

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. चेलमेश्वरांच्या निवृत्तीनं इतिहासाची काही पानं फडफडत मागे वळली, ती थेट उत्तर पेशवाईत रामशास्त्र्यांच्या वाड्यापर्यंत जाऊन पोहोचली…. इंग्रज इतिहासकार ग्रँड डफ म्हणून गेला, “रामशास्त्री, हा अत्यंत तेजस्वी, विद्वान ब्राह्मण होता. असा न्यायशास्त्री पुन्हा होणे नाही!!!”

अशा, रामशास्त्रींचं उत्तर पेशवाईतलं कठोर न्यायदान कुठे आणि आताचं उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती के. एम. जोसेफांना सर्वोच्च न्यायालयात  काॅलेजियमची दुहेरी शिफारस असतानाही तांत्रिक मुद्द्यावर नकार देत, ‘पक्षपात’ करणारं मोदी-शहा सरकारचं ‘न्यायदान’ कुठे….

“कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी”!!!

…..राजन राजे  (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)