पाटेकरांच्या सुता, ….तेव्हा कुठे गेला होता तुझा “धर्म ” ???……

दहा वर्षांची घुसमट, एकदाची निर्धाराने संपवत, तनुश्री दत्ताने नाना पाटेकराला जमिनीवर पाठ टेकवायला लावलीय…. या तिच्या हिंमतीबद्दल तिचं कौतुक करावं, तेवढं थोडचं!

सर्वसाधारणपणे, भारतीय समाजातीलच काय; पण, अगदी प्रगत राष्ट्रांमधील (अगदी हाॅलिवूडच्या ‘मर्लिन मन्रोसारख्या ख्यातनाम नट्यासुद्धा) महिला वा महिला कलाकार, आपल्या लैंगिक शोषणाबद्दल वा लैंगिक अत्याचाराबद्दल बोलायला सहजी तयार होत नाहीत (त्यातलं सध्या भयंकर गाजणारं प्रकरण म्हणजे, हाॅलिवूड निर्माता ‘हार्वी वाईनस्टीन’)… त्यातील, अनेक अभागिनी तर, आयुष्यात उताराला लागल्यानंतर आपल्या जीवनभरच्या अस्वस्थतेला मोकळी वाट करुन देतात, ठसठसत्या वेदनेला एकदाचं तोंड फोडतात! दुर्दैवाने, आजही समाजातली स्त्रियांची अवस्था पहाता, हे असं सत्यकथन करायला उशिराने धाडस होणं, फारसं आश्चर्यकारक नाहीच…. एकतर कोणी विश्वास ठेवणार नाही वा समाज काय म्हणेल, या साद्यंत भितीनं आणि कारकीर्द बरबाद होऊन आर्थिकदृष्ट्या बरबाद होऊ, या भितीनं देखील! मध्यंतरी ‘जितेंद्र’ या बुजूर्ग नटाविरुद्ध त्याच्याच भाचीनं बलात्काराची तक्रार केली होती…. त्याचं पुढे काय झालं?

हेतूतः, कोणी महिला, आर्थिक लाभासाठी वा व्यक्तिगत सूड उगवण्यासाठी वा कोणाच्या इशाऱ्यावरुन अशातऱ्हेची खोटी तक्रार, बदनामी करण्यासाठी वा त्रास देण्यासाठी करुसुद्धा शकेल…. पण, त्यातला तसा परस्पर “अर्थपूर्ण वा संघर्षपूर्ण संबंध” हुडकून काढणं, पोलिसांना वा न्यायालयाला फारसं अवघड जाणार नाही. प्रस्तुत “तनुश्री-नाना” प्रकरणात दुरान्वयेदेखील असं काही घडलं असण्याची शक्यता, सकृतदर्शनी तरी बिलकूल दिसत नाही. *जेव्हा, पिडीत महिलांमध्ये कारपरत्वे हिंमत येते. थोडी परिस्थिती अनुकूल होते… तेव्हा, त्या बारीकसारीक तपशीलासह इतकी वर्षे दाबून धरलेले ‘सत्य’ कथन केलं जाण्याची शक्यता निर्माण होते. त्याबाबत, आपण मध्ये किती काळ गेला, असा संशय व्यक्त करत रहाण्यापेक्षा, खोलात जाऊन सूक्ष्मपणे ‘सत्यता’ (अशा गुन्हेगारी तपासणीच्या सध्या उपलब्ध असलेल्या लाय डिटेक्टर टेस्ट, पाॅलिग्राफ चाचणी, नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग इ. वैद्यकीय चाचण्या-तपासण्या, गरज भासल्यास वापरुन) पडताळून पहाणं गरजेचं आहे आणि तेच योग्य आहे.

तनुश्रीचा लढा बरोब्बर दहा वर्षांपूर्वी सुरु झाला…. त्यावेळचं तिचं प्रतिपादन आणि आजचं प्रतिपादन, यात लवलेशाचाही फरक नाही…. फरक एव्हढाचं की, तेव्हा ती वयानं लहानं होती आणि तर नाना वयानं ‘थोराड’! तेव्हा, तिला हिंमत देणारं कुणी नव्हतं, पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी, नेहमीच्या बदमाषीने ‘वरुन’ आलेल्या आदेशानुसार, तिच्यावरचा दबाव वाढवण्यासाठी तिच्याविरुद्ध ‘नाना पाटेकर गटा’ची क्राॅस FIR दाखल करुन घेतली.

आज दहा वर्षांनंतर वयाच्या परिपक्व अवस्थेत, तिनं पुन्हा या आव्हानाला तोंड द्यायचं ठरवलं असेल, तर “शिवबा-संतां”च्या महाराष्ट्रातल्या सज्जनशक्तिला, या रणरागिणीच्या पाठीशी ठामपणे, ‘धर्मकर्तव्यम्हणून उभं राहायला हवच!

एका गाजलेल्या व बड्या बड्या राजकारण्यांशी खास ‘मैत्रीपूर्ण हितसंबंध’ जुळवून असणाऱ्या कलाकाराशी ‘सत्यकथन’ करुन एकप्रकारे ‘पंगा’ घेतल्याने, बाॅलिवूडच्या पाशवी पुरुषी-अहंकाराला ठेच लागली….. त्यातून, कलाकार, निर्माते, दिग्दर्शक सारे एक झाले आणि सगळ्यांनीच ‘कट’ रचून, त्या “हाॅर्न ओके प्लीज” सिनेमातून तनुश्रीला काढून टाकलं…. तिचं पुढचं संपूर्ण करियरच बरबाद केलं गेलं. ‘मनसे’ दहशत माजवली गेल्याचं (‘मनसे स्टाईल’ने गाडीवर चढून नाचले, टायरची हवा काढली, गाडीच्या काचा फोडल्या), तनुश्रीने व्हायरल केलेल्या व दहा वर्षांपूर्वीच पोलिसांना सादर केलेल्या व्हिडिओमध्ये, सगळं नीट स्वच्छ दिसतय… अजून काय आणि कुठले पुरावे पाहीजेत? ‘सिंटा’ नांवाची आर्टिस्ट असोशियनसुद्धा हेतूतः गप्प बसली.

‘हार्वी वाईनस्टीन’ प्रकरणापश्चात सुरु झालेल्या, हाॅलिवूडच्या ‘मी टू’ (#MeToo) मोहिमेला अवघ्या बाॅलिवूडने भरभरुन पाठींबा दिला… पण, प्रत्यक्ष बाॅलिवूडच्या अशाप्रकारच्या घटनांबाबत मात्र, त्यांची “हाताची घडी, तोंडावर बोट”! ब्लॅक बकचा बाॅलिवूड हत्यारा, क्रूरकर्मा सलमान खानला पाठीशी घालणारे, जाहीरपणे सहानुभूती व्यक्त करणारे, एवढ्या मोठ्या तनुश्री प्रकरणाबाबत मात्र बहुतांशी अगदी चिडीचूप कसे बसू शकतात? ‘रिलायन्स फाऊंडेशनच्या पैशावर चालणारा ‘(अ)सत्यमेव जयते वाला अमीर खान (‘असत्यमेव जयते’…. का ? तर, त्याने देशातली अमानुष कंत्राटी-कामगार पद्धत, भीषण आर्थिक विषमता, कारखाने व वाहनांद्वारे होणारं घातकी कार्बन-ऊत्सर्जन व रासायनिक प्रदूषण, राजकारणी-बडे उद्योगपती-सरकारी अधिकारी वगैरेंनी मिळून बनलेली रक्तपिपासू-शोषक व्यवस्था… यासारख्या सगळ्यात मोठ्या समस्यांवर ना कधि त्या तथाकथित ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमातून भाष्य केलं, ना कधि करणार होता) तोंडात मूग गिळून गप्प आहे. शिल्पा शेट्टीसारखी योगाचे धडे देणारी अभिनेत्री या प्रकरणी, कुंपणावर बसलीय… मग, तिची टीव्हीवरची ‘योगसाधना’ काय चुलीत घालायचीय? चित्रांगदा सिंगचं आणि प्रियंका चोप्राचं मात्र अभिनंदन, जाहीर पाठींब्याबद्दल…. पण, अमिताभ तू मात्र शुंभासारखा गप्पच (It’s Brutes you too…)? तुझा आणि परवीन बाबीचा बेबनाव झाला, तिने वेडाच्या भरात तुझ्यावर वेडेवाकडे आरोप केले…. तेव्हा कुणी आम्ही अवाक्षराने तरी, तुझ्याविषयी वाईटसाईट बोललो? अरे, “विवाह्यसंबंध गुन्हा नाही”, हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याअगोदर, कितीतरी वर्षे आधीच, तुझं आणि रेखाचं पडद्यावरचं प्रेम आम्ही कौतुक आणि आनंदाने उचलून धरलचं की! तू हरिवंशराय बच्चन, या महान व शालिन कवीचा मुलगा आहेस व स्वतः एक अभिजात-सुसंस्कृत कलाकार आहेस (म्हणजे, तुझे एकजात सगळ्या डँबिस व भ्रष्ट राजकारण्यांशी असलेले ‘लागेबांधे’ आम्हाला मान्य आहेत, असं नव्हे… त्या, तुझ्या स्खलनशीलतेवर आम्ही आजही प्रचंड नाराज आहोत आणि राहूच!) त्यामुळे, परवीन बाबीवर तू काही अन्याय-अत्याचार केला असशील, हे संभवतच नव्हतं आणि ते बिलकूल सत्यही नव्हतं… ती यथावकाश मनोरुग्ण असल्याचंही पुढे निर्विवाद सिद्ध झालं. पण, तू “नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता” प्रकरणात “अळीमिळी गूपचिळी” स्विकारावीस, ही बाब नुसती संतापजनक व चिंताजनकच नाही; तर, एकूण तुझे “राजकीय लागेबांधे” पहाता, ते फारसं आश्चर्यजनकही नाही!

त्यामुळे देशातली तुझ्यासारखी अनेक ग्लॅमरस-व्यक्तिमत्वं (लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, हल्लीचा सैराट फेमनागराज मंजुळे इ. इ.), बहुसंख्य साहित्यिक, लेखक-दिग्दर्शक, खेळाडू, कलाकार, संशोधक-शास्त्रज्ञवर्ग, वकील, डाॅक्टर्स, खाजगी व सरकारी अधिकारीवर्ग यासारखी बुद्धीमंत बाळं आणि हल्लीचे उदंड झालेले, लाखोंचे निर्बुद्ध कळपबाळगणारे सरकारी संत वा तथाकथित सद्गुरु…. ज्याप्रमाणे, आपल्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी या रक्तपिपासू-शोषक (Vampire State-System) व्यवस्थेशी अर्थपूर्ण-हातमिळवणीकरुन बसलेले असतात, त्यांच्यापैकीच तू एक अग्रणी होय म्हणायचा! त्यामुळे, या असल्या निर्मम-शोषक व्यवस्थेशी झुंज देण्याची ना तुझी औकात‘, ना तुझी मानसिकता…. म्हणून, तुझ्याकडून, ‘नाना पाटेकर’ प्रकरणी न्यायाचा पक्ष घेण्याची, तनुश्री दत्ताने जशी वेडी अपेक्षा केली, तशी ती करण्याएवढे, आम्ही भोळसट नाही, हे अमिताभजी, तुमचं दुर्दैवं!!!

या अशा, निराशाजनक-उद्वेगजनक पार्श्वभूमीवर, कलाकारांनी वैयक्तिकरित्या मला फोन करुन नव्हे, तर, जाहीरपणे मला पाठींबा देण्यासाठी बोललं पाहीजे”, असं जेव्हा, तनुश्री दत्ता म्हणते, तेव्हा ती आपली दशकभराच्या जखमेवरची खपली उघडून भळभळणारी जखम दाखवत असते, हे लक्षात घ्या. खरंतरं, आपला जीव गलबलून जावा, एवढी त्या ‘वेदने’त आर्तता गुंफलेली असते… पण, आधुनिक समाजातल्या सुखवस्तू-लब्धप्रतिष्ठीतांची जीभ केव्हाचीच गळून गेलीय, मेंदू बधीर झालाय आणि कान बहिरे!

तनुश्री पुढे जाऊन तडफडून म्हणतेय, मी कोणी अभागिनी वगैरे आहे, असं कृपा करुन कोणी समजू नये… मी लढवय्यी आहे आणि लढणार आहे. मी स्वतः कोणीतरी आहे, माझं स्वतःची म्हणून सांगण्यासाठी काही सत्यकथाआहे… हे सत्यकथन, मी केवळ माझ्या समाधानासाठी नाहीय करत; तर, पुढील पिढ्यांच्या भल्यासाठी करतेय…. माझा संघर्ष पाहून, त्यांना अशातऱ्हेच्या प्रसंगांना सामोरं गेलेल्यांना, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी हिंमत होऊ शकते, हिंमत व्हायला हवी! आज मला काहीप्रमाणात का होईना, जो बाॅलिवूड नटनट्यांकडून जाहीर पाठींबा मिळतोय, त्याबद्दल मी निश्चितच कृतज्ञ आहे… पण, तो पाठींबा केवळ वाच्यार्थाने वरकरणी असू नये. ज्या कलाकारांना या घडल्या घटनेबद्दल खरोखरीच संताप आला असेल, त्या कलाकारांनी या असल्या नाना पाटेकरसारख्या पडद्यावर नायक असलेल्या पण, वास्तवातल्या खलनायकअसलेल्या सोबत काम करण्यास ठाम नकार दिला पाहीजे… तरच, त्यांच्या पाठींब्याला काही अर्थ आहे. जर, मी वाचा फोडलेल्या अत्याचाराविरुद्ध पूर्वीप्रमाणे, दहा वर्षांनंतरही काहीच कारवाई झाली नाही; तर, मी हा देश कायमचा सोडून जाईन… पण, जाताना लोकांना एकच गर्जून सांगेन की, आता, तुम्ही मुकाट्याने गप्प बसा… कारण, तुमची बेसुमार ढोंगबाजी, तुमचा बेफाम दुटप्पीपणा आता लपणं शक्यच नाही; तो, तुमच्या घराचं छप्पर फाडून बाहेर  पडलाय!!!”

महाराष्ट्रातलीच एक महिला जेव्हा, न्यायासाठी असा टाहो फोडून आक्रोश करते तेव्हा, …जिजामाता, हिरकणी, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई, अहिल्याबाई यांचं साधं नांवसुद्धा तोंडाने घेण्याचा अधिकार आपण गमावलेला असतो, हे लक्षात ठेवा!!!

त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे…. रिचा छड्डा, राधिका आपटेसारख्या नवोदित कलाकारा, चरित्रनायिका रेणुका शहाणे व सध्याची आघाडीची नायिका कंगना राणावत तनुश्रीच्या सुरात सूर मिसळतायतं…. मध्यंतरी, प्रियंका चोप्रानेही पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं की, मी तोंड उघडलं तर, बाॅलिवूडमधल्या अनेक धेंडांना तोंड दाखवायलाही जागा शिल्लक रहाणार नाही…. दिवंगत श्रीदेवीही असचं काहीसं व्यथित होऊन बोलल्याचं, वाचकांना स्मरत असेलच. तनुश्री-नाना प्रकरणावर, डिंपल कपाडिया उत्स्फूर्तपणे संतापून म्हणाली की, नाना पाटेकर, हे अतिशय तिरस्करणीय व्यक्तिमत्त्व आहे… मी त्याच्या व्यक्तित्वाची काळी बाजूजवळून पाह्यलीय (Nana Patekar is an obnoxious personality…. I have seen his dark side).” नाना पाटेकरच्या वकिलाने एका वाहिनीला प्रतिक्रिया देताना जे म्हटलयं, त्यातूनच या साऱ्यांची बळजोरी करणारी “पाटेकरी” पुरुषी-मानसिकता दिसून येते…. तो वकील म्हणतो, नाना ने तनुश्री से ऐसा क्या किया? हाथ लगाया की, कपडे में हाथ डाला?”

आणखी एका अपेक्षेप्रमाणे, या व्यक्तिगत अन्याय-अत्याचाराच्या प्रकरणाला कुठलंही, यःकिंचितही संयुक्तिक कारण नसताना, “मराठी-अमराठी” असा बदमाषीचा राजकीय-रंग चढवला गेला नसता, तरचं नवल…. नशीब, तुनश्रीच्या बाजूने आवाज उठवणारी रेणुका शहाणे, ही ‘अमराठी’ असल्याचा ‘जावईशोध’ कोणी ‘मनसे’वाल्यांनी अजून लावलेला नाही! हे अत्यंत घृणास्पद व गलिच्छ राजकारण, १९७० नंतर महाराष्ट्रातल्या एका धनिक मराठी राजकारणी घराण्यानं, ढोंगी ‘शिवसेवा’ म्हणून वारसाहक्कानं चालवायला घेतलयं…. त्यातून, अनेक निष्पाप कलाकार, कलावंत आजवर उध्वस्त झालेत. पण, त्यांच्या वेदना, भयगंडापोटी कायमच्या ‘मुक्या’च राह्यल्या. मात्र, अंतरी असल्या “नाना कळा” असणारे कलाकार, संभावितासारखे समाजासमोर खोटा मुखवटा धारण करत, राजकीय आशिर्वादावर असली पातकं करुनही, सगळं पचवून बिनधास्त वावरतं राहीलेत! नुकताच, ‘बिल काॅस्बी’ या कृष्णवर्णीय अमेरिकन कलाकाराला हाॅलिवूड अभिनेत्री व कलाकारांचं लैंगिक शोषण करण्याबाबत न्यायालयाकडून सजा फर्मावली जाताच, त्या संपूर्ण ‘बिल काॅस्बी’ प्रकरणाला ‘वर्णभेदा’चा रंग अनेक डँबिस कृष्णवर्णीय राजकारण्यांकडून तत्काळ चढवला गेला. तसेच, काही वर्षांपूर्वी अझरुद्दिनवर मॅच-फिक्सिंगचे आरोप झाल्यावर कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आलं, तेव्हा त्याला अचानक आपला अल्पसंख्याक “मुस्लिम धर्म” आठवला…… त्यातलाच, हा अत्यंत गर्हणीय व संतापजनक प्रकार आहे, बस्स्!

“नाना, तू शिवछत्रपतींच्या राजनीतिला, त्यांच्या आदर्शांना काळीमा फासलेला आहेस, असं सकृतदर्शनी तरी दिसतयचं (पुढे न्यायालयात काय सिद्ध होतं, ते यथावकाश कळेलच)….

फक्त, कल्पना करुन बघा, “आज शिवछत्रपतीअसते तर…..???” कोण किती मोठा कलाकार आहे, मोठ्या हुद्द्याची वजनदार व्यक्ति आहे; याची काडीमात्र पर्वा न करता, शिवछत्रपतींनी महाराष्ट्रातल्या माताभगिनींच्या अब्रूला बेभान होऊन हात घालण्याची मानसिकताबाळगणाऱ्याचा एकतर रांझ्याच्या पाटलासारखा चौरंग्याकेला असता, नाहीतर जंगली श्वापदांनी त्याच्या देहाचे लचके तोडण्यासाठी टकमक टोकावरुन ढकलून दिला असता…. “

मित्रहो, शिवछत्रपतींपश्चात महाराष्ट्र केवढा बदललाय, केवढा अधोगतीला गेलाय???….सिनेमातलं दृश्य चित्रित करण्याच्या निमित्ताने, तिचा ठाम विरोध असताना, महाराष्ट्रात एका महिला कलाकाराची विटंबना होते आणि… ती पहाणारे, जाणणारे सगळे स्तब्ध रहातात…. कमाल आहे!

१९७० नंतर “मुं.बा.पुरी”त (मुं = मुंबई आणि बा = बारामती) राजकारण नांवाची, बिनभांडवली धंद्याची दुकानं टाकून बसलेल्या आणि मुखातून सदैव शिवछत्रपतीं”चा ढोंगी गजर करणाऱ्यांनी, ही महाराष्ट्राची नैतिक दुर्दशा केलेली आहे…. कधि यातून महाराष्ट्र जागा होऊन बाहेर पडणार?

नाना…. जरी, आमच्यासारख्या सुजाण नागरिकांनी कधिही खरी मानली नसली; तरीही, अत्यंत कौशल्याने तू तुझी ‘प्रतिमा’, “महाराष्ट्राचा उत्तुंग आदर्श” अशी उभी करण्यात आजवर बव्हंशी यशस्वी झालास…. पण, शरमेने “मराठी शान आणि मान” खाली घालायला लावणाऱ्या तुझ्या कथितकृत्यांमुळे आणि चाळ्यांमुळे, तू उभ्या महाराष्ट्रालाच “आरोपीच्या पिंजऱ्या”त उभा केलायस, याची साधी जाणिव तरी तुला आहे का? मराठी माणसांची सर्वसाधारण प्रतिमा, “चुलत सेनां”नी याअगोदरच पुरेशी काळवंडून ठेवलीय…. ती तू पार काळीकुट्ट करुन टाकलीयस, असं निदान मनातल्या मनात तरी नाही का वाटत तुला, नाना ?? अरे, केवढं महाराष्ट्रानं तुझ्यावर प्रेम केलं…. कुठलाही सुविचारकुठे वाचला, स्फुरला की, मराठी-तरुणाई तत्काळ तुझ्या नांवानं तो व्हायरलकरायची. आम्हाला तो त्यांचा पोरखेळ पाहून छातीत धस्स् व्हायचं; कारण, “अंदरकी बात आम्ही जाणून होतो”. तुझ्यासारखे असे अनेक तद्दन खोटे आदर्शवतवाटणारे काही IPS पोलिस अधिकारी आजही आहेत… जे, मराठी तरुणाईला नीतिमत्तेचे धडे वर्तमानपत्रातून स्तंभ चालवून देत असतात वा प्रमुख पाहुणे म्हणून सभांमधून देत असतात… पण, त्यांचे चिखलामातीने बरबटलेले पाय, आम्ही स्वतः पाह्यलेले आहेत, अनुभवलेले आहेत…. तेही नाना, तुझ्याच पावलावर पाऊल ठेऊन चालणारे म्हणायचे, नाही का? वाटायचं, हे कधि ना कधि उघड्यावर येऊ घातलं होतचं. पण, एकदा का उघड्यावर आलं की, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ती अत्यंत शरमेची बाब होणार होती आणि दुर्दैवाने घडलं तसचं! तनुश्रीनं आता फक्त ‘श्रीगणेशा’ केलायं…. दबक्या आवाजात का होईना, “मी टू” म्हणतं, अनेक नटनट्या त्या सुरात सूर मिसळण्यास, तनुश्रीची ‘री’ ओढण्यास उत्तरोत्तर धजावायला लागताना दिसतील, आजच दिसतायत!

अरे नाना, मराठी-तरुणाईनं अवसानघातकी धोके, धक्के…. कुणा कुणाकडून आणि किती झेलायचे? त्यामुळे, स्वाभाविकच ही पिढी श्रद्धाहिन व आदर्शहिन अशी, ‘सैराट’ होत चाललीय…. हा, ‘शिवबा-संतां’च्या महाराष्ट्रापुढचा फार मोठा धोका आहे, पिढ्यापिढ्यांचं ते नुकसान आहे!

नाना, आमच्या असं ऐकिवात आहे की, तू तुझं काहीबाही “आत्मचरित्र” लिहून पूर्ण करत आणलयस…. आणि, म्हणे ते तुझ्या मृत्युनंतरच प्रकाशित व्हावं, असा तुझा दंडक आहे? जरं ही ऐकीव माहिती खरी असेल; तर, नाना, तुला आमचं खुलं आव्हान आहे की, माणसं ज्यावेळी आपलं आत्मचरित्र अशारितीने मृत्युपश्चात प्रकाशित व्हावं, अशी इच्छा धरतात…. तेव्हा, त्याचा ढोबळमानाने अर्थ असा असतो की, ती व्यक्ति स्वतःच्या सदसदविवेक बुद्धी आणि आत्म्याला स्मरुन सारं लिहीलं…. नाना, तुझ्या आयुष्यातले सत्यउघडकीला आणण्याचं निदान आतातरी त्यानिमित्ताने तू धाडस दाखवतोस की,…. कालपरवाच्या पत्रकार परिषदेतून पळ काढलास, तसा आत्मचरित्राच्या प्रत्येक पानातून पळ काढत फेकमफाककरतोस, ते यथावकाश कळेलचं!!!

…. वाचू दे आम्हाला नाना, राजकारण्यांशी असलेल्या तुझ्या ‘अर्थपूर्ण’ मधुर संबंधांचे विस्फोटक किस्से आणि हो, तुझ्या हातून घडलेले भयंकर प्रमादसुद्धा… नाना, आम्ही तुझ्या आत्मचरित्राची वाट पहात आहोत, निदान तिथे तरी “अपनी रुह से इमान रखनेवाला नाना”, सापडतोय का पाहूया… तेवढ्यानं, तुझ्याविषयीचा उरलासुरला आदर जिवंत राहावा, ही ईशचरणी प्रार्थना!!!

                                     ….. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)