बहुसंख्य सर्वसामान्यजन ‘नव भांडवलशाही व्यवस्थे’त(खाउजा)विकासाच्या परिघाबाहेर फेकले जाऊन एक ‘नव-अस्पृश्य’ जमात म्हणून जगत असताना मध्यमवर्गातील नवश्रीमंतीवर बेतलेल्या जीवनशैलीचं अनुकरण करण्यासाठी प्राणांतिक धडपड(उदा. ओव्हर टाईम, राजकारण्यांची दलाली व हुजरेगिरी, धंदाव्यवसायात बेकायदेशीर कामे, गुंडगिरी इ.)करीत असतात. या प्रक्रियेमध्येच गुन्हेगारी व भ्रष्टाचाराच्या ऑक्टोपसी संस्कृतीचं मूळ दडलेलं असतं.पर्यावरण विनाश व प्रदूषणाची बीजं ही, त्यातच रोवलेली असतात. एकीकडे मध्यमवर्ग भ्रष्टाचाराविरुद्ध आकांडतांडव व नक्राश्रू ढाळत असतो, परंतु या कँसिनो-इकॉनॉमित त्याला लायकीपेक्षा व जरुरीपेक्षा कितीतरी जास्त मिळणारा गलेलठ्ठ पगार व भत्ते, सकृतदर्शनी भलेही कायदेशीर असले तरी तो आम जनतेचं शोषण व लुटीतूनच आलेले असतात. हा ‘जैसे थे’ वादी नवश्रीमंत मध्यमवर्ग भ्रष्टाचाराची सोयीची संकुचित व्याख्या करण्याचा ‘स्मार्टनेस्’ दाखवण्यात सदैव गुंतलेला असतो.परंतु, आपली जगण्याची चंगळवादी जीवनशैली हाच गुन्हेगारी-भ्रष्टाचार व पर्यावरण विध्वंसाला अवघ मोकळं रान करुन देणारा मूलभूत व मुख्यस्त्रोत असतो, हे त्याच्या गावीही नसतं. गरिबी पर्यावरणावर जेवढा आघात करते, त्यापेक्षा मध्यमवर्गीयांची श्रीमंती सध्या कैकपटीनं अधिक पर्यावरणात अखिल सजीवसृष्टीसाठी विनाशकारक बदल(उदा. जागतिक तापमानवाढ, सागरी पाण्याच्या पातळीतील वाढ, जैवबहुविधतेचा ऱ्हास, जमीन-हवा-पाणी-अन्न यातील रासायनिक व आण्विक प्रदूषण इ.) वेगाने घडवून आणतेयं, याचं त्याला काहीही सोयरसुतक नसतं. ‘साधी राहाणी व उच्च विचारसरणी’… याला पूर्णपणे फाटा देऊन फाजील आत्मकेंद्रीपणा, आत्यंतिक स्वार्थीवृत्ती, संवेदनशून्यता, पोकळ आक्रमकवृत्ती (मूळात सुखासीनतेमुळे कमालीची भेदरट वृत्ती), तत्त्वशून्य, स्वसुखासाठी व सोयीसाठी देवधर्म आणि निसर्गाचा बाजार मांडणारा (प्रत्यक्षात पर्यावरण व जैवबहुविधतेचा ऱ्हास घडवणारा) व सर्व समस्यांना केवळ बेसुमार लोकसंख्यावाढीला जबाबदार धरणारा…. हा बेजबाबदार ‘ग्राहकवादी’ मध्यमवर्ग या असल्या किळसवाण्या संस्कृतिचा पाया ठरतो. फार्महाऊस घेताना तलाठ्याचा किंवा पासपोर्ट मिळवताना वा सिग्नल तोडताना पोलीसाचा भ्रष्टाचार पाहून त्याच्या मस्तकात तिडीक जाते. पण कोकणातले औष्णिकऊर्जा-खाणकाम प्रकल्प वा जैतापूरसारखे अंति पिढ्यापिढ्यांना घातक ठरणारे अणुप्रकल्प, सेझ-प्रकल्प तसेच, काळू-शाई धरणासारख्या वरकरणी विविध विकासप्रकल्पांच्या नांवाखाली लोकांच्या घरादारांवर फिरणारा नांगर पाहून वा इतर सजीवसृष्टीचा(वनस्पती, जलचर, पशूपक्षी) आपल्या डोळ्यासमोर होणारा निर्मम विध्वंस पाहताना फक्त बधीर मनानं सोयिस्कर बघ्याची भूमिका स्विकारतो….. प्रसारमाध्यमांचा पूरेपूर वापर करुन ‘आपणा सारिखे करिती तत्काळ’, या न्यायानं सर्वसामान्य जनतेला बिघडवणाऱ्या ‘लोकविरोधी’ राजकारणी, उद्योगपती-व्यापारी-बिल्डर आणि नोकरशहा यांच्या अभद्र युतीसोबतच मध्यमवर्गाची उपरोल्लेखित वृत्ती; हीच ‘नव्या भांडवली अर्थव्यवस्थे’ची ग्यानबाची मेख आहे !!!
एकुणच हा मध्यमवर्गीय समाज षंढांचा-ढोंग्यांचा आणि अफूची मात्रा पाजणाऱ्या आधुनिक संत-सद्गुरुबाबांचा व्हायला लागलायं!
…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)