सावित्री नदी पूल दुर्घटनेतील मृतात्म्यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे गदगदत्या अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली……

“सावित्रीमाई पाहुणी आली, गेली रस्त्यावरुन वाहून…

भिंत खचली, कठडा तुटला, पूल अर्धा गेला वाहून….

जाता जाता, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले….

पती-प्राणार्थ झुंजणारीनं, शेकडों जीवांना यमसदनी कसे धाडले….”

१९२८ साली ब्रिटीशांनी बांधलेला (मे-२०१६ रोजीच्या रिपोर्टनुसार शासन दरबारी उत्तम स्थितीतला पूल, अशी आश्चर्यकारक नोंद असलेला) सावित्री नदीवरचा पूल वाहून जातो आणि कागदाच्या होडीसारख्या वरुन जाणाऱ्या दोन एसटी बस व इतर वाहने सोबत वाहून जातात…. अनेक प्रवाशांचा नाहक बळी जातो, हे सगळचं फार फार दुःखदायक व हृदय पिळटवणारं आहे !

सावित्री नदीवरचा हा, जवळपास शंभर वर्ष जुनापुराणा चुना-दगडाविटांनी बांधलेला ब्रिटीशकालीन पूल आणि नवा पूल उण्यापुर्‍या आठ-दहा वर्षांपूर्वीच बांधलेला…. तोही, हवा तेवढा रुंदीला नाही; म्हणूनच, जुन्या पुलावरुन एकेरी वाहतूक सुरुच ठेवण्यात आलेली होती. आपण बांधलेल्या जुन्या पुलाचं आयुष्यमान संपल्याचं इंग्लंडकडून अत्यंत जबाबदारीने पाठवल्या गेलेल्या, पत्राकडे आमचे राजकारणी आणि प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करतं व अनेक निष्पाप जीव जातात…. यासाठी संबंधितांना फाशी नको द्यायला? त्यांच्यावर खुनाचाच गुन्हा दाखल व्हायला हवा…. सदोष मनुष्यवधाचा केवळ नव्हे ! म्हणून प्रथम, त्या तिथल्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना अटक करुन तुरुंगात डांबा…. अशी, ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आम्ही जोरदार व संतप्त मागणी करीत आहोत.

हे एकूण चित्र पाहीलं की, काही प्रश्न उभे रहातातच…..

१) इतकी वर्षे सत्ता भोगणारे काँग्रेस-राष्ट्रवादीवाले व १९९५-२०००मध्ये सत्ता भोगलेले व आता दोन वर्षांहून अधिककाळ सत्ता भोगणारे भाजप-शिवसेनावाले….. हे, राजकारणी आहेत की, थेट चोर-दरोडेखोर व निष्पापांचे बळी घेणारे खुनी आहेत ?
कुठल्याही स्वरुपाच्या मूलभूत उपाययोजना ‘न’ करता, “सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता” भोगणारे व काळीकृत्ये झाकण्यासाठी ‘पांढराफेक’ पोषाख घालून वावरणारे, हे सारे नेमके कोण आहेत आणि यांना आपण का सहन करतोयं ??

२) गोवा-मुंबई महामार्गावरील वीसएक पुलांपैकी फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच पूल, आपण स्वातंत्र्यापश्चात बांधले… बाकी सगळेच ब्रिटिशकालीन, हा काय तमाशा आहे ? कुठे जातो आणि कुठे मुरतो गोळा होणारा प्रचंड महसूली पैसा ?? कोण कोण होते इतकी वर्षे, या रायगड-जिल्ह्याचे पालकमंत्री??? जेएनपीटी सारख्या सर्वच ठिकाणी कंत्राटे घेत गब्बर होत, शेकडो-हजारो कोटींमध्ये खेळणाऱ्या ‘रायगड’च्या आमदार-खासदारांचं नेमकं काय करायचं जनतेनं ????

३) शिवछत्रपतींचा दीर्घकालीन वावर असलेला ‘रायगड-जिल्हा’…. स्थानिक शेकाप, काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजपा-शिवसेना या साऱ्यांचाच भ्रष्टाचाराचा ‘गड’ बनावा, ही केवढी संतापजनक व उद्वेगजनक अशी गंभीर बाब आहे ?

४) गेले काही दिवस सातत्याने पाऊस कोसळत असतानाही स्थानिक-प्रशासनाला (ज्यात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक वगैरे तथाकथित बडी मंडळी आलीच) या आणि अशा जीर्ण पुलावरील वहातूक, निदान कोसळणाऱ्या पावसाला आणि बेफाम वेगाने वाहाणार्‍या नद्यांना उतार पडेपर्यंत दुसरीकडून सहजी वळवता नसती आली?… पण, पैसे खाण्यात, सामान्य जनतेला नडण्यात तत्परता आणि कार्यक्षमता दाखवणारे पोलीस, महसूल इ. खात्यातील कर्मचारी, गटारीची नवटाक मारुन गटारात आडवे झाले होते काय? यालाच, आम्ही “रक्तपिपासू-शोषक व्यवस्था” (Vampire-State System) म्हणतो !

५) बिल्डर-राजकारण्यां’कडून ‘बिल्डर-लाॅबी’च्या आर्थिक हितासाठी राबवल्या जाणार्‍या, विविध पुनर्वसन योजनांद्वारे (एसआरए, बीएसयूपी आणि पीपीपी) महाराष्ट्रात ठाणे-मुंबई सारख्या शहर-उपनगरांमधून सामान्य मराठी माणसांना देशोधडीला लावलं जातं; तेव्हा, त्याकामी प्रस्थापित स्थानिक ‘बिल्डर-राजकारण्यां’कडून, पैसा कमावण्यासाठी व्हीजेटीआय वगैरे सारख्या शासकिय संस्थांकडून, तत्परतेनं बोगस ‘स्ट्रक्चरल-ऑडिट रिपोर्ट’ पटापट तयार करुन घेतले जातात. तसं काही पूल, रस्ते व सामायिक सुविधांच्या बाबत होताना दिसत नाही. एवढे बळी घेतल्यानंतरच राज्याच्या बांधकाम मंत्र्यांना पुलांच्या मजबुतीची शास्त्रीय पहाणी (structural audit) करण्याचं सुचणार काय?

६) रोज विविध ठिकाणी टोलचा भरमसाठ महसूल आजही गोळा होत असताना, रस्त्यांची आणि पुलांची ही अवस्था कशी ?

७) रेल्वेसाठी, विमान वाहतुकीसाठी स्वतंत्र ‘सुरक्षा-आयोग’ (Safety Commissions) असतात, तसे रस्ते वाहतुकीसाठी का नाहीत ?

८) सरतेशेवटी, निसर्गाच्या विरुद्ध व्यवहार केल्याने निसर्ग-पर्यावरणीय संकटे (वाढते उष्णतामान, महापूर, दुष्काळ, वादळे-चक्रीवादळे, भूकंप इ.) पूर्वीपेक्षा कितीतरी पट अधिक तीव्रतेनं व वारंवारितेनं थैमान घालू लागलीयतं; तेव्हा, तातडीनं आपणं निसर्ग-पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीकोनातून कडक पाऊले उचलणार आहोत की, नाही…. हा ही प्रश्न यासंदर्भात शिल्लक रहातोच आहे !

तेव्हा, आता या सगळ्या ‘व्यवस्थे’चचं ‘ऑडिट’ होणं गरजेचं आहे…. सावित्री नदीच्या पुरात पुलासोबत वाहून गेलेल्या निष्पाप जीवांना, आपल्या स्वार्थापोटी मृत्युच्या दरीत लोटणारे, आता टीव्हीच्या पडद्यावर चमकताना पाहणं, हा नुसत्या डोळ्यावरचा अत्याचार नाही, तर आपल्या आत्म्यावरचा बलात्कार देखील आहे !

राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)