‘नोटाबंदी’ नांवाची ‘नसबंदी’ केली गेलेली ‘प्रजा’

सोव्हिएत युनियनवर आपण लादलेल्या, निर्दय हुकूमशाहीच्या वरवंट्याखाली संपूर्ण देश भरडला जात असताना जोसेफ स्टॅलिन, एकदा पाॅलिटब्यूरोच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी आला; तेव्हा, त्याच्या हातात एक घट्ट धरलेली ‘जिवंत कोंबडी’ होती…. बैठकीत सर्वांसमक्ष, एकेक करुन त्या कोंबडीची पिसे, तो अत्यंत निर्दयपणे उपटून फेकू देऊ लागला.

बिच्चारी कोंबडी वेदनेनं तडफडत प्राणाच्या आकांतानं ओरडू लागली. त्त्वचेवरील रंध्रारध्रांतून, जागोजागी लाल रक्त ठिबकू लागलं! हृदय पिळवटून टाकणार्‍या तिच्या ओरडण्यानं, सगळीचं सभा हादरुन स्तब्ध झाली…. पण, या साऱ्या गोष्टींचा यःकिंचितही परिणाम न झालेल्या, क्रूरकर्मा स्टॅलिनने त्या कोंबडीच्या अंगावरची उरलीसुरली एकूणएक पिसे उपटून फेकून दिली आणि ती पुरती सोलवटलेली कोंबडी, खाली जमिनीवर टाकली. त्यानंतर लागलीचं त्यानं, आपल्या खिशातून कोंबडीचं खाद्यान्न बाहेर काढलं आणि कोंबडीसमोर फेकायला सुरुवात केली. त्या असहाय्य अवस्थेतही ती कोंबडी, ते पटापट टिपू लागली….. जसजसा, स्टॅलिन पुढे पुढे दाणे टाकत चालू लागला, तसतशी ती कोंबडी त्याच्या मागोमाग जाऊ लागली आणि शेवटी तर, त्याच्या पायाशी बसून, त्याच्या हातातले दाणे टिपायला लागली!

……पक्षाचं नेतृत्त्व करणाऱ्या, आपल्या सर्व पक्ष-सभासदांना उद्देशून स्टॅलिन मग म्हणाला, “ही कोंबडी, समस्त जनतेचं उत्तम प्रतिनिधित्व करते. तुम्ही जनतेच्या हातातली ताकद-सामर्थ्य जबरदस्तीने हिसकावून घ्या. जनतेची अनन्वित छळवणूक करा आणि तिला प्रसंगी हालअपेष्टा-मारझोडीलाही सामोरं जाण्यास भाग पाडा…. एवढे सोपस्कार पार पाडलेत की, तिला सरळ मोकळं सोडून द्या आणि त्या अशा असहाय्य व हतबल स्थितीत, जनतेच्या तोंडावर निव्वळ आपलं अस्तित्व तगवून धरण्यापुरते भाकरतुकडे फेकायला लागा…. हे करण्यात जर, तुम्ही यशस्वी झालात तर, जनता तुमच्या आदेशानुसार आयुष्यभर बिनतक्रार वागायला लागते… तुमच्यासमोर सदैव झुकायला लागते!

ती तुम्हाला मरेपर्यंत, एक अलौकिक ‘वीर’ म्हणून संबोधायला लागते.

ही असली भोळी, पण मूर्ख जनता, हे विसरुन जाते की, “ते तुम्हीच ‘हैवान’ असता, ज्यानं जनतेला मुळात या लाचार व दयनीय स्थितीत आणून सोडलेलं असतं”!!!

मित्रहो,

हे कुठेतरी आणि काहीतरी, आजच्या आजुबाजुच्या परिस्थितीशी साम्य आणि साधर्म्य दाखवणारं वाटतयं का आपल्याला???

…. जोसेफ स्टॅलिनच्या काळची ‘प्रजा’ आणि एकविसाव्या शतकातली आजची, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीतली, ‘नोटाबंदी’ नांवाची ‘नसबंदी’ केली गेलेली ‘प्रजा’, …..यात काही ‘गुणात्मक फरक’ असू शकतो का???

धन्यवाद…..

…राजन राजे (अध्यक्ष:  धर्मराज्य पक्ष)