‘कमल हसन’प्रमाणे ‘अनिल बोकिल’, मनाचा मोठेपणा दाखवणार काय???

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर-२०१६ रोजी नरेंद्र मोदी सरकारकडून धक्कादायकरित्या करण्यात आलेल्या, ‘नोटाबंदी’चं समर्थन करुन ‘घोडचूक’ करणाऱ्या, प्रख्यात बाॅलिवूड अभिनेता कमल हसनने ‘जाहीर माफी’ मागून मनाचा मोठेपणा दाखवला….. आता, अशी जाहीर माफी किंवा किमानपक्षी, जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याची पाळी, ‘अर्थक्रांती विधेयक व संकल्पने’चे प्रणेते श्री. अनिल बोकिल यांची आहे!

….पण, तेवढा मनाचा मोठेपणा स्वतः अनिल बोकिल आणि ‘अर्थक्रांती-प्रतिष्ठान’वाले दाखवणार आहेत काय???

जेव्हा, आपण समाजापुढे काही नवी हितकारक संकल्पना घेऊन जात असतो, तेव्हा प्रत्येक पावलावर अत्यंत सावधचित्त असणं, हे नावलौकिक कमावलेल्या प्रतिथयश व्यक्तिंकडून अभिप्रेत असतं. ज्या बेलगाम पद्धतीने, (खरंतरं, ती पद्धत अगदी ‘अश्लाघ्य’ म्हणावी इतपत हिडीस व उथळ होती) सर्वश्री अनिल बोकिलांनी नोटाबंदीचं समर्थन जाहीरपणे (विशेषतः, अचानकपणे मोठ्याप्रमाणावर उपलब्ध झालेल्या बऱ्याच टीव्ही-वाहिन्यांच्या पडद्यावर) सुरु केलं; त्यामुळे, (काही विशिष्ट सुधारणांसह) ‘अर्थक्रांती-संकल्पने’चा जोरदार पुरस्कार करणाऱ्या, आमच्यासारख्या जबाबदार व समाजहितैषी मंडळींना जबरदस्त धक्का बसला! प्रस्तुत ‘नोटाबंदी’ म्हणजे आपण मांडणी करीत असलेली ‘अर्थक्रांती’ नव्हे; या, वस्तुस्थितीचं खरंखुरं आकलन व्हायला ‘अर्थक्रांतीवाल्यां’ना एवढा मोठा काळ लागणं, हे केवळ अगम्यचं नव्हे…. तर, किमान त्यांच्या अपरिपक्वतेचं तरी लक्षण आहे वा त्यांच्या मुळातूनच लढाऊवृत्ती नसणाऱ्या नपुंसक ‘असहाय्यते’चं लक्षण आहे…. असो!!!

पण, या सर्व अवांछनीय घडामोडींमुळे सोन्यासारख्या ‘अर्थक्रांती-संकल्पने’च्या, पुढील प्रचार आणि प्रसार कार्यात, जी पीछेहाट सर्वत्र झालीयं…. होऊ पहात्येय, त्या समाजहानीचं काय?

म्हणूनच, आपणचं जन्माला घातलेल्या या अनुपम-संकल्पनेची, पुन्हा नव्यानं घोडदौड सुरु होण्यासाठी, आपली ऐतिहासिक चूक जाहीररित्या कबूल करण्याचं मोठेपणं, श्री. अनिल बोकिलांनी ‘नोटाबंदी’ वर्षपूर्तीनिमित्त दाखवणं, खचितच समयोचित व सुयोग्य पाऊल ठरेलं, ही ‘धर्मराज्य पक्षा’मधील आम्हा सर्वांची धारणा आहे !

धन्यवाद…

जय महाराष्ट्र II जय हिंद II

…… राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष… ‘जन-लोकपाल’ व ‘अर्थक्रांती’ विधेयकाचा हिरीरीने व जोडीने पुरस्कार करणारा भारतातील एकमात्र नोंदणीकृत राजकीय पक्ष!)