“वालधुनी मरणपंथाला, बांधकामे व प्रदूषित पाण्याने घोटला नदीचा गळा!”

….. ‘आजच्या (दि. २९ नोव्हेंबर-२०१७, बुधवार) दैनिक ‘पुण्यनगरी’च्या ‘वेध’ सदरात माननीय संपादक सोपान बोंगाणे यांनी, आपल्या जगण्याच्या आसाला भिडलेल्या एका अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!

याच संदर्भात, सध्या “भारतीय नद्यांचं पुनरुज्जीवन”, हा विषय घेऊन सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या वतीने औद्योगिक कंपन्यांच्या व जनतेच्या सहकार्यातून भारतभर एक फार मोठी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे…. फक्त, यात चिंतन व चिंता करण्याची बाब ही की, ज्यांनी ज्यांनी म्हणून आमच्या नद्या अनधिकृत बांधकामे करुन बुजवल्या, मोठमोठी धरणं बांधून नद्या अडवल्या व कारखान्यांचे सांडपाणी सोडून नद्या मोठ्याप्रमाणावर प्रदूषित केल्या; तेच, आज ईशा फाऊंडेशनला मोठा आर्थिक सहयोग देऊन, त्या माध्यमातून नद्या वाचवण्याचा ‘आव’ आणतायतं! अर्थात, श्री श्री रविशंकरांच्या “आर्ट ऑफ् लिव्हिंग”सारख्या तथाकथित आध्यात्मिक संस्थांनी (की, संस्थानांनी?) मध्यंतरी आपल्या दिमाखदार सोहळ्यासाठी ‘यमुनापात्रा’ची जी दुर्दशा केली होती व त्यासाठी, त्यांना ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने (NGT) जो मोठा दंड आकारला होता, ते पहाता “हे ही नसे थोडके” असं म्हणतं समाधान मानणं क्रमप्राप्तच आहे, दुसरं काय?

नद्या प्रदूषित व मृतप्राय होण्यात ज्यांनी, आजवर महाप्रचंड नफे (Corporate-Profits) कमवत, मोठी ‘खलनायकी’ भूमिका बजावलीयं… त्या ‘उद्योगसम्राटांना’, प्रशासकिय मंडळींना आणि ‘राजकारण्यां’ना आज, नद्या वाचविण्याकामी वरकरणी का होईना पण, ‘नायका’च्या भूमिकेत वावरताना पहाण्याचं प्राक्तन मात्र, या निमित्ताने भारतीय जनतेच्या नशिबी आलयं, एवढं मात्र खरं.

अनेक समाजहितैषी व पर्यावरणप्रेमी मंडळी याबाबत, फार पूर्वीपासूनच जनजागरणाची व प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. परन्तु, त्यांच्याहीपैकी अनेकांची दृष्टी “जल, जंगल आणि जमिनी” पलिकडे जायला तयार नाही…. “जनसंख्या आणि जीवनशैली” या बाबी, समाजवाद्यांच्या वा कम्युनिस्टांच्या अॅजेंड्यावर येऊ शकत नाहीत; हे त्यांच्या पोथीनिष्ठ व सवंग लोकप्रियता जोपासणाऱ्या ऱ्हस्व दृष्टीचं द्योतक आहे! त्यांनाही अंति विनाशकारी ‘विकासा’चं वेडं, हे लागलेलं आहेच!!!

“समुद्रवसने देवि पर्वत स्तनमंडले विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे”…. अशी पृथ्वीमातेची महती गाणारी महान आध्यात्मिक परंपरा असणाऱ्या भारतातच नद्यांची ही अशी दुरावस्था व्हावी, यासारखं दुसरं आपलं ‘राष्ट्रीय दुर्दैव’ कुठलं? तरीही, विनाशकारी मानवकृत महासंकटाकडे पहाण्याचा आपला दृष्टीकोन आजही अतिशय त्रोटक, प्रदूषित व आत्मघातकी आहे…. “जसं खाऊन खाऊन आपलं आरोग्य आपण बिघडवतो आणि पुन्हा खाऊन खाऊनच (औषधे वगैरे) ते बिघडलेलं आरोग्य तंदुरुस्त करण्याचा आपला विकृत प्रयत्न रहातो” तद्वतच, “औद्योगिक विकासातून नद्या प्रदूषित करायच्या, मृत्यूपंथाला न्यायच्या आणि औद्योगिक चक्र अव्याहत तसचं चालू ठेऊन औद्योगिक प्रयत्नांतूनच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत रहायचं” असं हे दुष्टचक्र, दळभद्री रक्तपिपासू-शोषक ‘व्यवस्थे’नं (Vampire-State System) आपल्या पाठीशी लावलेलं आहे. आम्ही फक्त लक्षणांवरच इलाज करण्यात धन्यता मानणारी, अत्यंत बेजबाबदार जमात झालेलो आहोत… मूळ रोग बरा करणं तर सोडाच; पण, त्याच्या वास्तव स्वरुपाकडे पहाण्याचीही प्रज्ञा व धैर्य आमच्याकडे नाही! आम्हाला आमच्या पुढल्या पिढ्यांच्या व अवतीभवतीच्या चराचरसृष्टीच्या भविष्याची व अस्तित्वाची काडीमात्र चिंता नाही…. आम्हाला फक्त पाश्चात्य पद्धतीने बेलगाम ‘भोग’ भोगत जगत रहायचयं आणि ‘मुह में राम और बगल में छुरी’ बाळगत भोंगळ व बोगस ‘हिंदुत्वा’चे गोडवे मिडीयातून, सोशलमिडीयातून गात रहात चराचरसृष्टीचा विध्वंस करायचायं…. पृथ्वीमातेचं जागोजागी पोट फाडून अय्याशी करतच रहायचीयं! जाज्वल्य हिंदुत्व, हा ‘धर्म’ नसून ती सघन भारतीय आध्यात्मिक परंपरा व पर्यावरण-निसर्गस्नेही अशी शाश्वतजीवनशैली आहे…. ती अवघ्या सजीवसृष्टीच्याच मुळावर उठणाऱ्या असल्या बेजबाबदार, भोगवादी ‘चंगळवादा’ला यःकिंचितही थारा देण्याची कल्पनाही सहन करु शकत नाही, एवढी तिची अमोघ विश्वव्यापकता आणि महानता आहे!

“अर्थव्यवस्था, जीवनशैली आणि जनसंख्या”… या सजीवसृष्टीवर बरावाईट प्रभाव टाकणाऱ्या, तीन सर्वात मोठ्या बाबी आहेत. पण, नद्यांचं पुनरुज्जीवन असो वा इतर निसर्ग-पर्यावरणीय संरक्षण-संवर्धनाच्या बाबी असोत, आमच्या चर्चा वा उपाययोजना, नेमक्या याच तीन मूलभूत बाबींकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करुन पुढे रेटल्या जातात! याची जबर किंमत पुढील काळात सगळ्यांनाच चुकवावी लागणार आहे. पण, तो काळ आपल्या जिविकेच्या कालखंडात येणार नाही, याची अटकळ बहुधा सध्याच्या पिढीनं बांधलेली आहे. त्यामुळेच, ‘स्वांतसुखाय’ अशा अधम, स्वार्थी व्यवहाराचा बेबंदपणा तिनं तसाच पुढे चालू ठेवलेला आहे. तर दुसरीकडे, पुढील पाच वर्षांनी येणाऱ्या वा कुठे ना कुठे, देशाच्या कानाकोपऱ्यात सतत चालू असणाऱ्या निवडणुकांच्या रणधुमाळीत, असल्या ‘स्फोटक व संवेदनशील’ विषयांना हातसुद्धा घालण्याएवढे मजबूत ‘हात’ (की, ‘छाती’?) कुठल्याही राजकीय पक्षाची वा राजकीय व्यक्तिंची असूच शकत नाहीत (एक फक्त “धर्मराज्य पक्ष” वगळता!)… हे दळभद्री व किळसवाण्या भारतीय राजकारणाचं प्रच्छन्न लक्षण आहे! आणि, प्रचलित अर्थव्यवस्थेच्या “लाभार्थीं”बाबत बोलालं, तर ‘व्यापक व वैश्विक’ जाणिवेच्या संदर्भात सगळीचं बोंब आहे…. एका चिनी म्हणीप्रमाणे जोपर्यंत, “शेवटची नदी सुकत नाही, शेवटचा वृक्ष वाळत नाही, शेवटचा पक्षी मरत नाही, वारा वाहणं थांबवत नाही; तोपर्यंत, माणसाला कळणारसुद्धा नाही की, तो सोनंनाणं, चांदी-हिरे-माणकं-रुपये खाऊन जगू शकत नाही!”

निसर्गनिर्मित जीवनचक्रातला आपला विनाशकारी हस्तक्षेप थांबवणं आणि जनसंख्या व जीवनशैली कुठल्याही किंमतीवर तत्काळ रोखणं, ही काळाची गरज आहे… अन्यथा, काळाच्या जबड्यात सगळचं गडप होऊन जाईल; कारण, माणसं वितंडवाद घालत बसतील, चर्चाचर्वण करत रहातील… पण निसर्ग, मानवी-कर्मदरिद्रीपणाची प्रतिक्रिया सर्वत्र देतोच आहे (Men argue, Nature acts!)…. परिणामतः, निसर्ग-पर्यावरणातली ‘पंचमहाभूतं’ खवळून उठू लागलीयतं’… भारतीय अध्यात्मात वर्णन केलेलं शिवशंकराचं ‘तांडवनृत्य’ सुरु झालेलं आहे…. त्या ‘डमरु’ वादनाचे रौद्रभीषण ध्वनीपडसाद, आपल्या बधीर कानावर कधि पडणार आणि “जाणिवपूर्वक ‘साप’ समजून अजून कितीकाळ आपण ‘भूई’ थोपटत रहाणार”… अजून कितीकाळ आपल्याला ते परवडू शकेल ???

                                ….राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष, भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष)