भारतीय गव्हाचं कोठार, एम्. एस्. स्वामीनाथनकृत हिरव्या क्रांतिचा अग्रदूत, आधुनिक भारतातल्या मंदिरां‘चं राज्य (इति पंडित नेहरु…) म्हणजेच, अवाढव्य मोठ्या धरणांचं राज्य… वगैरे वगैरे ‘विशेषणे‘ मिरवणारं ‘पंजाब राज्य‘, स्वातंत्र्यापश्चात ‘घडता पंजाब‘पासून ‘बुडता-बिघडता पंजाब‘ असा प्रवास करता कसं झालं, हा एक मन विषण्ण करणारा “विनाशकारी रासायनिक-यांत्रिक शेतीविकासा”चा आत्मघातकी ‘प्रवास‘ आहे……
पूर्वीच्या सुखीसमाधानी पंजाबला जणू, एम्. एस्. स्वामीनाथनकृत तथाकथित रासायनिक-यांत्रिक शेती-विकासाची ‘भूतबाधा’ झाली आणि “जंतूनाम् जीवनम् कृषि:” ही, शाश्वत निसर्ग-पर्यावरणस्नेही व अस्सल भारतीय ऋषिकृषी परंपरा जोपासणारा ‘पाच महानदांचा प्रदेश’ पंजाब, पाश्चात्य “विकास-संकल्पने”ची(की, विकार-संकल्पनेची?) भलीबुरी फळं चाखू लागला… अल्पकाळ सुबत्तेची; पण, अंति आत्मघातकी, अशी पाऊलवाट तो चालू लागला! शेतीकामाच्या निमित्ताने घराबाहेर पडून शेतात राबणाऱ्या, शेतमालविक्रीसाठी बाजारात फिरणाऱ्या पंजाबी बायाबापड्या… या रासायनिक-यांत्रिक शेतीच्या प्रादुर्भावाने, पुन्हा केवळ दिवाणघर ते स्वयंपाकघर अशा बंदिस्त चौकटीतच दिसू लागल्या… पंजाबी बायकांनी आपलं स्वातंत्र्य पूर्णतः गमावलं !
रासायनिक-यांत्रिक शेतीच्या ‘चकव्या’ने पंजाबी घराघरातून क्षणभंगूर का होईना; पण, सुबत्ता आली, हे खरं… पण, नीतिमत्ता काढता पाय घेती झाली. प्रेमाची, आपुलकीची नाती संपली आणि असुरक्षिततेची भिती हरेक ‘पंजाबी ललाटी’ प्रथमच ल्यालेली दिसू लागली !!
जुनी मातीची ‘कच्ची घरं, ‘पक्की’ झाली…. पण, ‘कच्ची’ म्हणून हिणवली जाणारी पारंपारिक घरं, अतिशय अल्पखर्चात व पर्यावरणाला बिलकूल धक्का ‘न’ लावता पिढ्यापिढ्यांना सुखाने बिनतक्रार आश्रय देत होती, तर तथाकथित महागडी व पर्यावरणावर मोठा आघात करणारी सिमेंटकाँक्रिटची घरं, धड एका पिढीला पुरता आसरा न देताच… पंचवीस-पन्नास वर्षांत डोळ्यादेखत मोडकळीला येऊ लागली. मग, पक्की घरं, सिमेंटकाँक्रिटच्या घरांना म्हणावं की, मातीच्या घरांना… हा प्रश्न, संवेदनशील पंजाबी मनाला सतावू लागला… पण, गोंधळलेल्या पंजाबी मनांना, या असल्या प्रश्नांचं उत्तर शोधणं मोठं अवघडं जातं होतं… पंजाबी शेतीचा प्रवास न थांबताच, तसाच आत्मघातकी घाटरस्त्यावरुन पुढे सुरुच राहिला.
त्या क्षणभंगूर विकासाची अपरिहार्य परिणती म्हणून एकाबाजूला पंजाबी रक्तात ‘रक्तशर्करा'(मधुमेहादि आजार) वाढू लागली; तर, दुसऱ्या बाजूला पंजाबी रक्तात ‘विषारी किटकनाशकां’चं प्रमाण भयावहरित्या वाढू लागलं! अनेक रोगांची माहेरघरं बनत, पूर्वीची ‘निरोगी-दणकट’ पंजाबी शरीरं… ठिसूळ, कमकुवत होतं होतं, पुढे धडाधड कर्करोगालाही बळी पडू लागली. पंजाबमधील “भटिंडा ते बिकानेर” ही पंजाबी कर्करोग्यांना उपचारासाठी घेऊन जाणारी आगगाडी, ‘कर्करोग आगगाडी’ (कॅन्सर ट्रेन) म्हणून कुप्रसिद्ध झाली. ती, याच ‘विनाशा’ची ‘फिरती खूण’ आहे… पंजाबच्या अंगाखांद्यावर खेळणारी एक अत्यंत गंभीर बाब आहे. अल्पस्वल्प काळ समृद्धिला पावलेला पंजाब, काही दशकांतच या विनाशकारी विकासाची फार मोठी किंमत मोजू लागलायं!!!
रासायनिक खते, यांत्रिकी खोलवरची नांगरट, विषारी कीटकनाशके आदिंमुळे शेताशेतांमधून ‘नापिकी’ फैलावली… शेकडो-सहस्त्र हेक्टर शेती, शेतात मीठ फुटल्यामुळे (खारवट व क्षारवट झाल्यामुळे) अनेक पंजाबी शेतकऱ्यांना सोडून द्यावी लागली… ‘काळी आई’ सोडण्याच्या वेदनेमुळे उभे राहणाऱ्या पंजाबी डोळ्यातल्या अश्रूंच्या ‘खारेपणा’चचं जणू प्रतिक, पंजाबी शेतीत जागोजागी दिसायला लागलं. काही मोठे शेतकरी शेती विकून न्यूझीलंड, इंग्लंड, कॅनडा वगैरे दूरदेशी स्थलांतरित झाले; तर, काही वैफल्यग्रस्त होऊन मादक पदार्थांच्या आहारी जात, शेताच्या बांधांवरच आडवे झाले… कित्येक गळफास लावून मेले, तर असंख्यांनी ज्या कीटकनाशकांच्या प्रयोजनांनी निसर्गातील कीडे-मकौडे, जीवजिवाणूंची बेलगाम-बेसुमार ‘हत्या’ केली, त्यांनी तिचं विषारी कीटकनाशके प्राशन करुन ‘आत्महत्या’ करणं पसंद केले!
तरीही, आजही आम्ही लक्षणांवरच इलाज करतोयं… तिचं आमची भारतीय मानसिकता बनू पहात्येयं. कधिकाळी आमचं भारतीय अध्यात्म, विश्वाला गवसणी घालणारं तत्त्वज्ञान प्रसवतं व पसरवत होतं…. केवळ, समस्यांच्याच नव्हे; तर, अस्तित्वाच्या मुळाशी जाऊन भिडणारं आमचं भारतीय अध्यात्म, हा आमचा अमूल्य ठेवा आहे… पशूपक्षी, कीटकांना अनंत यातना देणारी रासायनिक प्रयोगशाळा नांवाची ‘यातनाघरे’ बाहेर न उभारता, आपल्याचं देहाला, आत्मिक-प्रयोगशाळा बनवणारे ‘मुमुक्षू’ या भारताने जगाला दिले. पण, आता आम्ही क्षणभंगूर पाश्चात्य चंगळवादी जीवनशैली व विकासशैली अंगिकारुन वरवर इलाज करत, केवळ चुचकारत समस्या वाढवत नेणारे ‘नवभारतीय’ बनलो आहोत काय???
कुणी, “कुलवंत धालीवाल” नांवाचा इंग्लंडमध्ये स्थायिक असलेला “पंजाब दा पुत्तर”… ‘वर्ल्ड कॅन्सर केअर ऑर्गनायझेशन’ या इंग्लंडमधील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पंजाबमधील ‘भटिंडा ते बिकानेर’ आगगाडीची, ‘कर्करोग आगगाडी’ (कॅन्सर ट्रेन) ही अस्वस्थ करुन सोडणारी ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न करतोयं… अशी ठळक मोठी सध्या बातमी सर्वत्र माध्यमांमध्ये झळकतेयं!
हे सद्गृहस्थ आणि त्यांची संस्था काय करते; तर, पंजाबच्या गावागावांतून फिरुन कर्करोग तपासणी करते व कर्करोगाचं निदान लवकर करवून कर्करोग्यांना मोफत औषधे पुरवते…. उपक्रम चांगला आहे; पण, हा एकूणच पंजाबच्या आसाला भिडलेल्या “रासायनिक शेती” नांवाच्या ‘महासंसर्गजन्य महारोगा’च्या लक्षणांवरचा इलाज आहे…. मूळ रासायनिक-यांत्रिक शेती, या महाभयंकर रोगावरचा इलाज मात्र मुळीच नव्हे! त्यादृष्टीने, या अशा संस्था आणि व्यक्ति फारसं कामं करताना वा राजकीय चौकट, त्यादृष्टीने बदलण्याचा प्रयत्न करताना बिलकूल दिसत नाहीत, हे या देशाचं केवढं मोठं दुर्दैव आहे!
पंजाबच्या शेतांमधून भाक्रा, रणजित सागर, सिस्वान, दमसाल सारख्या मोठ्या धरणांच्या कालव्यांमधलं पाणी खेळत असताना, दुसऱ्या बाजूला त्यातून रासायनिक खतांचं आणि बेसुमार फवारलेल्या रासायनिक कीटकनाशकांचं ‘विष’ही जमिनीतून याच वहात्या-मुरत्या पाण्यासोबत खोलवर पाझरत होतं…. पाझरत पाझरत, ते पंजाबच्या विहीरी-तलाव-कालव्यांमध्ये कधि अलगद पोहोचलं… तिथून त्याचा “पंजाबी रक्ता”पर्यंत प्रवास कधि झाला… हे, असल्या विनाशकारी शेती-विकासाच्या आहारी गेलेल्या दुर्दैवी पंजाबला कळलं देखील नाही. गेल्या काही दशकांपासून या रासायनिक पदार्थरुपी विषोत्पन्न ‘कर्करोगा’चा पंजाबात सर्वदूर प्रसार झाला, तेव्हा प्रथमच त्याचं गांभीर्य नजरेसमोर ठळकपणे आलं. ते दृश्य इतकं विद्रूप व विराट आहे की, पंजाबमधील भटिंडा येथील कर्करोगी मोठ्याप्रमाणावर राजस्थामधल्या बिकानेर येथील कर्करोगावर स्वस्तात उपचार करणाऱ्या, ‘कर्करोग-इस्पितळां’मध्ये मुंग्यांची रांग लागावी, तशी रांग लावून उपचार घेताना दिसू लागले. आजही हे चित्र बिलकूल बदललेले तर नाहीच, उलटपक्षी त्याची व्याप्ती दिवसागणिक वाढत चाललीयं. परिणामी ज्या आगगाडीने हे प्रवासी प्रवास करायचे, त्या आगगाडीला ‘कर्करोग एक्सप्रेस’ हे लज्जास्पद नामाभिधान स्वाभाविकपणे पडलं!
तिथपर्यंत वैद्यकीय रोगप्रसाराची मजल थांबली; पण, ‘सामाजिक व राजकीय महारोगा’ची मजल अजून पुढेच जायची होती… याच एम्. एस्. स्वामीनाथनकृत रासायनिक-यांत्रिक शेती-विकासाची अपरिहार्य परिणाम, पुढे “उडता पंजाब”पर्यंत पोहोचली…. आशा इतकीच करायची की, ती “बुडता पंजाब”पर्यंत न पोहोचावी, म्हणजे मिळवलं !!!
….राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष, भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी पक्ष)