लंगडे विकृत नेतृत्त्व आणि लंगडणारा समाज (गिरीदंतजातककथा)

{ही गिरीदंतजातककथा, मला ‘संजय पगारे’ (८९२८४५५१०५) या एका जाज्वल्य बुध्द धम्म प्रसारकाने व्हाॅट्स्अॅपवर पाठवली. पण, ही कथा एवढी मर्मग्राही आहे आणि तिचा संदेश एवढा व्यापक व मर्मभेदी आहे…. की, तो प्रखर संदेश, वर उल्लेखल्याप्रमाणे फक्त, अनुसूचित जातीजमातींपुरताच मर्यादित नसून, महाराष्ट्रातील तमाम ‘मराठी माणसां’ना तंतोतंत लागू आहे.}

म. फुले, टिळक, सावरकर, आंबेडकर, सेनापती बापट, एस.एम. जोशी, ना.ग. गोरे, डांगे प्रभृतींपश्चात १९७० नंतर महाराष्ट्रात, ज्या बारामतीकर व मुंबईकर घराणेबाज राजकारण्यांनी, जो आजवर “विकृतीपूर्ण” राजकीय धुमाकूळ घातलाय….. त्या भ्रष्ट, घराणेबाज, भावना चेतविणाऱ्या, राडेबाज, करमणूकप्रधान व फाजीलउत्सवप्रियतेवर भर असलेल्या, धनदांडग्या जैन-गुज्जू-मारवाडी उद्योगपती व व्यापाऱ्यांची उघड दलाली करत आम मराठी जनतेचं टक्केवारीतून खुलं शोषण करणाऱ्या व मराठी समाजावर अत्यंत खुबीने “व्यक्तिस्तोम” लादणाऱ्या….. या “लंगड्या” मराठी राजकारण्यांमुळेच, आज सामान्य मराठी माणूस महाराष्ट्रात गुलामीच्या अवस्थेत पोहोचलाय आणि बरबाद झालाय!

ज्यादिवशी, निर्धाराने सर्व बळ एकवटून हा मराठी माणूस, हे आपल्या मानेवरचं, विचाराने “लंगड्या” असलेल्या या घराणेबाज राजकारण्यांचं ‘जू’ फेकून देईल…. तेव्हाच, हो तेव्हाच त्याच्या जीवनातल्या गुलामीच्या व अधःपतनाच्या अंधःकारात आशेचा पहिला सूर्यकिरण प्रवेश करेल…अन्यथा, उषःकाल तर राहीला दूरच, पण या गुलामीच्या काळरात्रीला कधि अंत शिल्लक रहाणार नाही… आपल्याच महाराष्ट्रातल्या लालकाळ्या मातीतलं त्याचं ‘लंगडणं’ मग कधि थांबणं नाही!!!

….. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)} 

एके काळी वाराणसीत साम नावांचा राजा राज्य करीत होता आणि ‘बोधिसत्त्व’ त्याचा प्रधान होता. राजाला एक अत्यंत उत्तम घोडा आणून नजर करण्यात आला होता. तो जरी उत्तम जातीचा होता, तथापि प्रशिक्षित नव्हता. म्हणून गिरिदंत नावाच्या अश्वशिक्षकाच्या स्वाधीन त्याला करण्यात आले. गिरिदंत लंगडा होता, तो घोड्याचा लगाम धरून पुढे चालला असता लंगडत लंगडत चाले. काही दिवसांतच घोडाही लंगडू लागला. घोड्याच्या पायाला रोग झाला, असं वाटून सर्व अश्ववैद्यांना बोलावून परीक्षा करविली गेली. पण चिकित्सेअंति घोड्याला कोणताच रोग नाही, असे निष्पन्न झाले. तेव्हा राजा मोठ्या काळजीत पडला. इतका चांगला घोडा आपणांस मिळाला, पण तो थोड्याच दिवसात लंगडा व्हावा, याबद्दल राजाला फार वाईट वाटले.

ते पाहून बोधिसत्त्व म्हणाला “महाराज, आपण काळजी करू नका. मी या संबंधाने नीट विचार करून घोड्याच्या विकृतीचं, रोगाचं मूळ कारण शोधून काढतो.”

त्या दिवसापासून बोधिसत्त्वाने घोड्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली. गिरिदंत जेव्हा हातात लगाम धरून पुढे जाऊं लागला, तेव्हा त्याच्या मागोमाग घोडादेखील लंगडत चालू लागला. ते पहाताच, बोधिसत्वाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो राजाजवळ जाऊन म्हणाला. “महाराज घोड्याला ना कोणता रोग, ना कोणतीही विकृती! हा घोडा, खरोखरीच मूलतः उत्तम दर्जाचा गुणग्राही आहे. मात्र, गुरूजी लंगडत चालण्याचे कौशल्य आपल्याला शिकवीत आहेत, असं वाटून तो घोडाही लंगडत चालतोय…. लंगडण्याचं ते अवघड कौशल्य अल्पावधीतच त्या घोड्यानं आत्मसात केलय व तो तसा आपल्या शिक्षकाप्रमाणे हुबेहूब लंगडत चालतोय…. अश्वशिक्षक बदला, दुसरा एखादा धडधाकट शिक्षक ठेवलात, तर हा घोडा लंगडण्याची आत्मसात केलेली विकृती सोडून देऊन खात्रीने नीट चालू लागेल, दौडू लागेल.”

“राजाने बोधिसत्त्वाच्या सल्ल्याप्रमाणे दुसरा अश्वशिक्षक ठेविला. पहातापहाता, तो जातिवंत घोडा नवीन शिक्षकाची चाल पाहून स्वतःही व्यवस्थित चौखूर उधळू लागला!”

तात्पर्य:- कोणत्याही राज्याचे, संघाचे नेतृत्त्व सरळ, इमानदार, निष्कलंकित असावे! त्यांचा गुरू, नेता अथवा मार्गदर्शक असा ‘विकृत’ नसावा. तसे असेल तर सर्वजण त्याचेच अनुकरण करतील आणि सर्वांचाच विनाश ओढवेल. बोधिसत्त्व बाबासाहेबांनंतर (त्यांच्या नेतृत्त्वानंतर) आपल्या समाजाची हीच अवस्था झाली आहे!!!

                                                         संकलन – अरविंद भंडारे

                                             संदर्भ – जातककथा, धम्मानंद कोसंबी