आज ‘नथुराम’ असता, तर म. गांधींना गोळ्या घालायची त्याला गरज भासली नसती…..

नमामि गंगे” आणि “माँ गंगामैय्याने मुझे यहाँ बुलाया है….” असं म्हणतं, उ. प्रदेशच्या वाराणसीमधून निवडणूक लढवणारे नरेंद्र मोदी, केवढे महान “गंगाभक्त” नव्हे काय? अहो, महाभारतातल्या गंगापुत्र पितामह भीष्म वा कुंतीपुत्र  दानशूर कर्णाची ‘गंगाभक्ती’ही थिटी पडावी… एवढी नरेंद्र मोदींची ‘गंगाभक्ती’ खरोखरीच अगम्य-अवर्णनीय नव्हे काय??

दिवाळीच्या मुहूर्तावर गंगेला लाखो तेलाचे दीप अर्पण करणारे मोदी पहा आणि गंगेच्याच किनाऱ्यावर वाराणसीत नीता अंबानींचा, कुबेराला लाजवणारा ५०वा वाढदिवस साजरा करण्याचा घाट घालणारे मोदी पहा…. खरोखरीच, “या सम हाच”, असा अलौकिक ‘गंगाभक्त’ म्हणवले जायला, एवढ्या या उपरोल्लेखित घटना, पुरेशा नव्हेत काय? त्या अतुलनीय ‘मोदी-गंगाभक्ती’ची साक्ष अजून कशाप्रकारे द्यायला हवी???

या माँ ‘गंगाभक्त’ मोदींचं बिचाऱ्यांचं दुर्दैवं मात्र, एवढं मोठं की, जसजशी निवडणूक-२०१९ जवळ सरकायला लागलीय, तसा सगळाच सावळागोंधळ सुरु झालाय. किती किती म्हणून प्रकरणं एकेक करत बिचाऱ्यांच्या अंगावर येऊन शेकावीत? अंबानींचं कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारं ‘राफेल’, विदेशी काळापैसा भारतात आणून त्यातून प्रत्येक भारतीय खात्यात १५ लाखाचा भरणा, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या, ‘नोटबंदी’सारखे महंमद तुघलकी निर्णय, ज्या आधारसक्तिला आणि GSTला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून तीव्र विरोध केला… तिचं धोरणं वेडीवाकडी राबवणं, ज्या रुपया घसरणीवरुन मनमोहनसिंग सरकारची भयंकर खिल्ली उडवली…. त्याचचं निर्लज्ज आणि केविलवाणं समर्थन करण्याची वेळ येणं वगैरे वगैरे (यादी खूप मोठी आहे, ती या लेखापुरती आवरती घेऊया)

हे सगळं कमी पडतयं की काय म्हणून या ‘संतसज्जन’ गंगाभक्ताची, तथाकथित “गंगाभक्ती”सुद्धा, सध्या थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभी रहावी? काळानं एखाद्यावर सूड उगवायचा, तो किती आणि कसा??

घटनाच तशी घडलीय…. संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी! एका महान देशभक्ताचा आणि पितामह भीष्मांचा आणि कौंतेय कर्णाचा खराखुरा जाज्वल्य ‘वारसा’ सांगणाऱ्या (‘नमामि गंगे’सारखा, भोळसट-मूर्ख लोकांची मत निवडणुकीत मिळवण्यापुरताचा ढोंगी-बनावट वारसा नव्हे) ‘गंगाभक्ता’चा बळी…. काल, ११ ऑक्टोबर-२०१८ रोजी नरेंद्र मोदी सरकारनं घेतलाय!!!

कोण होता, हा देशासाठी स्वेच्छेनं ‘कुर्बान’ होणारा अवलिया? आपल्यासारखी कुणी साधीसुधी इसामी नव्हती; तर ते होते, स्वामी ज्ञान स्वरुप सानंद म्हणजेच, आयआयटी-कानपूर (IIT-Kanpur)सारख्या जगविख्यात तंत्रज्ञान विद्यापीठात तहहयात ‘पर्यावरण-अभियांत्रिकी'(Environmental Engineering) शिकवणारे प्राध्यापक “जी. डी. अग्रवाल”!

शंकराच्या जटेतून जिनं पृथ्वीवर पदार्पण केलं, असं आपल्या पुराणात म्हटलं गेलयं, त्या गंगेसारख्या नद्यांची दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत जाणारी अवस्था पाहून, तो महान पर्यावरणवादी जीव, पर्यावरण-अभियांत्रिकी शिकवता शिकवता अस्वस्थ झाला नसता तर नवलच!! गंगाशुद्धीकरण-प्रकल्प राबविण्यासाठी २२,००० कोटींचा निधी सरकारकडून जाहीर होऊनही धड त्यातला एक चतुर्थांश हिस्साही त्याकामी खर्च होत नाही… जो काही पैसा खर्च झाला तो गंगेच्या पाण्यातच बुडाला….. आणि “गंगा और भी मैली होती चली गयी”!!!

जी. डी. अग्रवाल ऊर्फ स्वामी ज्ञान स्वरुप सानंद, नांवाचा हा “देशभक्त गंगापुत्र”, गंगेची ही उत्तरोत्तर वाईट होत जाणारी स्थिती (कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे इतर रासायनिक प्रदूषणासोबत अत्यंत घातकी आर्सेनिक प्रदूषण, जलचराचं उध्वस्तीकरण इ. इ.) पाहून फारच व्यथित व्हायचा. आंदोलनं केली, पत्र्यवहार केले, जनजागृती करण्याचे चटके सोसले, असंख्यांना उन्हातान्हात-पावसापाण्यात वणवण हिंडत ‘गंगा’ वाचवण्यासाठी हा गडी भेटत राह्यला. पण, सगळं “पालथ्यावर पाणी” आणि तेही गंगेचचं!

त्यातच, तथाकथित सदगुरु श्री श्री रविशंकरांच्या “आर्ट ऑफ लिव्हींग”वाल्या संप्रदायाने यमुनातिरी अट्टाहासाने शिबिर भरवून तिच्या किनारपट्टीचीही प्रचंड नासधूस केली. गंगा तर प्रदूषणाने हातची चाललीच; पण, स्वतःला समाजाचे अध्यात्मिक ठेकेदारम्हणवून घेणारेसुद्धा, आता तिच्या जुळ्या बहिणीला “यमुने”लाही सोडायला तयार नाहीत… तिलाही पुरती भ्रष्ट करायला, बाटवायला सरसावलेत…. अशातऱ्हेनं, चारही दिशा अंधारुन आल्याचं ध्यानी येताचं, हा पुण्यात्माकमालीचा अस्वस्थ झाला! “स्वामी निगमानंदांसारखी मलाही माझा देह त्यागण्याची तयारी करावी लागेल”, असं काहीसं, सोबतच्या मंडळीशी ते पुटपुटायला लागले.

यावर्षीच्या १३ जूनला, त्यांनी सरकारला पत्र लिहीलं की, “गंगेला प्रदूषणमुक्त आणि बांध-बंधारेमुक्त करा अन्यथा, मला म. गांधींच्या मार्गाने निर्वाणीचं पाऊल उचलावं लागेल!” …

अण्णा हजारेंच्या ‘लोकपाल-नियुक्ती’ संदर्भातील पत्रव्यवहाराची जी गत करण्यात आली, तिचं गत स्वामी ज्ञान स्वरुप सानंदांच्या पत्राच्या नशिबी आली…. आपल्या पत्राला PMO कडून केराची टोपली दाखवण्यात आल्याचं पाहून, परिस्थितीपुढे हतबल झालेला हा “अध्यात्मिक संत” (नशीब तो कुणी मुस्लिम वा डाव्या विचारांचा नव्हता…. अन्यथा, देशद्रोह्याच्या रांगेत, एव्हाना ते शेवटून पहिले दिसले असते!), यावर्षीच्या २२ जूनपासून आपल्या हरिद्वारमधील आश्रमात ‘आमरण उपोषणा’ला बसला. मध्यंतरी, प्रशासनाने त्यांना जबरदस्तीने ‘एम्स’ (AIIMS) इस्पितळात दाखल केलं… पण, हा अवलियाबधला नाही. उच्च न्यायालयात लढत देऊन हा परमवीरआपला जीव, आश्रमात परत जाऊन “गंगेवरुन ओवाळत” राह्यला… ती नुसती भंपक, नरेंद्र मोदीफेम, मतं मिळवण्यासाठी उद्योगपतींनी पुरवलेल्या तेलावर चालणारी, लाख दिव्यांची फसवी-ढोंगी आरतीनव्हती…. ती होती, आपले पंचप्राणचेतवलेली अंतरात्म्यातून फुललेली एक “प्राणांची ज्योत, प्राणांची आरती”!!! ….त्याच प्राणांच्या आरतीतून बरोब्बर ११२ दिवसांनंतर प्राणांची आहूतीप्रसवली, ब्रह्मांडांत विलीन होण्यासाठी…. अवघी गंगामय क्षणभर स्तब्ध झाली… डोळ्यातलं पाणी तिच्या कंपित झालं…. एक लाट वेडीवाकडी वेदनेनं उसळली, किंचितशी थरारली आणि मग, एका महात्म्याचे प्राण आपल्यात सामावून घेऊन शांत झाली…. “प्रदूषित गंगा”, पुन्हा नेम धरुन नित्यनेमानं वाहू लागली !!!

अशी माणसं समाजात असतात, असे  ‘परमवीर’ असतात…  म्हणून त्यातल्या त्यात समाजात, सृष्टीचं बरं चालेलेलं दिसतं… देशभक्ती, म्हणजे फक्त सीमेवर लढत छातीवर गोळ्या झेलणं नव्हे (अर्थात, एकही गुजराथी भाषिक असा काही अविचारकरत नसतो… तो फारतर अतिरेकी अन्नसेवनानं झालेल्या आम्लपित्तावर वा अॅसिडीटीवर उपाय म्हणून अँटॅसिडच्या गोळ्या मात्र नित्यनेमानं सेवन करत असतो)… त्यापेक्षा, कितीतरी पटीने ही उच्चतम देशसेवाच नव्हे; तर, आपल्या माता वसुंधरेची सेवा आहे!!!

२०१० साली असचं स्वामी ज्ञान स्वरुप सानंदांनी, म. गांधींना स्मरुन गंगामैय्येसाठी उपोषण आरंभलं होतं….. ते पाहून, मनमोहनसिंगांनी तत्काळ भागिरथी नदीवरील घातल्या जाणाऱ्या भल्यामोठ्या बांध-बंधाऱ्यांची कामं थांबवली होती. नरेंद्र मोदी सत्तेवर येताच, ती पुढे निर्दयपणे व बेगुमानपणे सुरु झाली आणि स्वामी ज्ञान स्वरुप सानंदांचा बळी घेईपर्यंत, ती पुढे सुरुच राह्यलीत…. याहीपुढे सुरुच रहाणार आहेत… कोण कुठला हा स्वामी, काय त्याची औकात, काय त्याच्या प्राणांचं मोल ???

मित्रहो, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात १०५ बळी घेणारे, मोरारजी देसाई परवडले…. नरेंद्र मोदींसारखा संवेदनाशून्यपंतप्रधान भारतानं आजवर कधि पाहिला नाही… पुन्हा म्हणून भारत कधि पहाणार नाही !!!

आज नथुराम असता, तर म. गांधींना गोळ्या घालायची त्याला गरज भासली नसती….. ती कामगिरी, गोळ्या न झाडताच, मोदी सरकारच्या PMO ने चपखल पार पाडली असती… अरे, बा नथुरामा, थोडं थांबायला हवं होतसं, उगाचच फासावर लटकलास रे!!!

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष… भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी हरितपक्ष)