जागो, सजग हो जाओ…. अभी नहीं, तो कभी नहीं !!!

नुकताच (४ मार्च-२०१९) प्रकाशित झालेला संयुक्त राष्ट्रसंघाचा (यूनो) सहावा ‘‘जागतिक पर्यावरणाचा आढावा’’ (6th Global Environment Outlook) हा, संपूर्ण जगताला अत्यंत गंभीर इशारा देऊ पहातोय!

‘‘शाश्वत स्वरुपाच्या विकासा’’चं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व त्याद्वारे, निसर्ग-पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पॅरिस करारात नमूद केलेल्या सर्व उपाययोजना कुठलीही हयगय न करता, युध्दपातळीवरुन अंमलात आणाव्या लागतील, असा हा अहवाल म्हणतोय. १९९७ साली पहिला ‘‘जागतिक पर्यावरणाचा आढावा’’ (6th Global Environment Outlook) प्रकाशित झाल्यानंतर, दिवसेंदिवस निसर्ग-पर्यावरणाबाबत जागतिक पातळीवर अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झालीय. जगातील केवळ १२% शहरांमधील हवा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे बऱ्यापैकी शुद्ध आहे… तर, पृथ्वीच्या पाठीवरील हीच सगळी ‘स्मार्ट’ आणि विकासाच्या भुलभुलैय्याच्या मागे धावणारी शहरे, जगाचं ८०% हवामान-पर्यावरण प्रदूषित करीत आहेत, असंही, या अहवालात सप्रमाण मांडण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर, जागतिक पातळीवरुन सर्वच बाबतीत तातडीने करावयाच्या उपाययोजनांबद्दलही सखोल मार्गदर्शन, या सहाव्या ‘‘जागतिक पर्यावरणाचा आढावा’’ (6th Global Environment Outlook) अहवालात सविस्तरपणे करण्यात आलय. विशेषतः, तरुणपिढीला याबाबत मोठ्याप्रमाणावर जागरुक करण्यात आलेलं असल्यामुळे, जगात, प्रगत देशातील तरुणाईमध्ये ‘‘विनाशकारी विकासा’’बद्दल हळूहळू घृणा निर्माण होऊ लागलीय. फलस्वरुप, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनीसारख्या देशांमधील जागरुक शाळकरी मुलं, या ‘‘विनाशकारी विकासाला रोखा आणि आमचं, उद्याचं जग, सुरक्षित राखा’’… म्हणून शाळा सोडून संप, आंदोलने करु लागलीयत. दरडोई खनिज तेलाचा, पोलाद-लोखंडाचा, सिमेंटचा खप किती व काॅम्प्युटर, मोबाईलची विक्री किती…. या, मापदंडावरच केवळ आधारलेल्या, विनाशकारी विकासाऐवजी आम्हाला ‘‘निसर्ग-पर्यावरणस्नेही शाश्वत विकास हवा’’, असा धोशा जगात सर्वत्र तरुण मुलंमुली लावताना दिसतायत!

या पार्श्वभूमीवर, सर डेव्हिड अॅटेनबरो बीबीसी-१ दूरदर्शनवाहिनीवरुन एक अत्यंत संवेदनशील व पर्यावरणीय विस्फोटक सत्य मांडणारी ‘चित्रफित’ (documentary) लवकरच प्रसारित करणार आहेत. सर डेव्हिड अॅटेनबरो यांच्या म्हणण्यानुसार, २० वर्षांपूर्वी ते स्वतः, अशातऱ्हेनं निसर्ग-पर्यावरणसंदर्भात परिस्थिती, एवढी वेगाने बिघडत जाईल, याची साधी कल्पनाही कधि करु शकले नव्हते!

या माहितीपटात, कॅलिफोर्नियामध्ये गतवर्षी लाखो हेक्टर जंगलात, जागतिक तापमानवाढीमुळे भडकलेल्या वणव्यांसारख्या प्रलयंकारी घटनांचा ‘‘आँखो देखा हाल’’ पेश केलदा जाणार आहे… त्याचसोबत, अनेक नामवंत हवामानतज्ज्ञ, पर्यावरणशास्त्रज्ञ वगैरे पर्यावरणविषयाशी संबंधित व्यक्तिंच्या, पृथ्वीतलावरील मानवासह सजीवसृष्टीच्या अत्यंत धोकादायक भवितव्याबाबत, मुलाखतीही ते घेणार आहेत. याच, सर डेव्हिड अॅटेनबरो यांनी गतवर्षीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘‘जागतिक हवामान बदल परिषदे’’च्या शुभारंभाला बोलताना म्हटलं होतं, ‘‘अनाकलनीय स्वरुपाचे हवामानातील तीव्र व घातकी बदल, हे गेल्या हजारो वर्षांतील मनुष्यजाती समोरचं सर्वात मोठं आव्हान व धोक्याचा कंदील आहे!’’

… तेव्हा, काँक्रिटचा कार्बनकेंद्री ‘विकास’ नांवाच्या भुतानं झपाटलेल्या मराठी-तरुणाईनं, याबाबत अनभिज्ञ राहून कसं चालेलं? तेव्हा, ऊठा…. संत तुकारामांच्या मराठमोळ्या वचनाला जागूया, ‘‘ठेविले अनंते तैसेचि रहावे… चित्ती असू द्यावे समाधान!’’…. ‘‘जगा, जगवा आणि जगू द्या’’ हाच आपला धर्म, हीच आपली जात होऊ द्या !!!

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष…. भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही पक्ष)