शिवछत्रपती, म्हणजे केवळ ‘तलवारबाजी’ नव्हे; तर, उच्चकोटीच्या जीवनमूल्यांसाठी लावलेली ‘प्राणांची बाजी’ होय… शिवछत्रपतींचा भर ‘तलवारी’पेक्षा ‘नांगरा’वर आणि ‘नागरी-संस्कृती’वर होता!
…”सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः” म्हणून, शिवछत्रपतींचा राज्यकारभार, राजनीति आजही कालसुसंगत ठरावी…. शिवछत्रपतींनी भूदासांवरील असलेली वतनदार-सरंजामदारांची अमर्याद पिळवणूक करणारी हुकमत व सत्ता संपुष्टात आणली… सरंजामदार-जमीनदारांकडील अतिरिक्त जमीन काढून घेऊन त्याचं भूहिनांना वाटप केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, “कुळांना जमिनीचे पट्टे कसायला देऊन त्यांच्या आयुष्याला स्थिरता दिली”… याचाच, आजच्या परिभाषेतला अर्थ, जणू “कंत्राटी-कामगार प्रथेच्या गुलामीत अथवा ‘नीम (NEEM)च्या अमानुष पिळवणुकीच्या चक्रात अडकलेल्या तळागाळातील हतबल व अभागी स्थानिक श्रमिकवर्गाला नोकरीत कायम करुन त्यांना सुखसमाधान दिलं… नेहमीच टांगणीवर असणाऱ्या त्यांच्या अनिश्चित-अस्थिर जगण्याला ‘स्थिरता’ दिली”… हीच ती, कल्याणकारी-जाज्वल्य अशी खरीखुरी ‘शिवशाही’ होय!
…उलटपक्षी, आज उठसूठ शिवछत्रपतींच्या नावाचा उठताबसता उदघोष करणारी, शिवछत्रपतींची जयंति थाटात साजरी करणारी किंवा जागोजागी शिवछत्रपतींचे पुतळे उभे करणारी भ्रष्ट-ढोंगी-दलाल राजकारणी मंडळी, आपल्याच मायमराठी श्रमिकवर्गाला “कंत्राटी-कामगार पद्धतीत व नीम (NEEM)मध्ये ढकलून, रक्तपिपासू-शोषक व्यवस्थेच्या हातात हात घालत, त्यांच्या रक्ताघामाची अगदी स्वस्तात बोली लावून लिलाव पुकारताना महाराष्ट्रभर जागोजागी दिसतायत”, …या महाभयंकर पातकाला शिक्षा कुठली? आज शिवछत्रपती असते; तर, कल्याणकारी शिवछत्रपतीनीतिशी बेईमानी करणाऱ्या, या आजच्या सरसकट सगळ्या बदमाष राजकारण्यांना, एकतर त्यांनी हत्तीच्या पायदळी तुडविले असते किंवा रांझ्याच्या पाटलासारखा चौरंग्या करत त्यांचा कडेलोट केला असता!
…. मराठी माणसांना, आपल्या नजरेसमोर, आपल्याच ‘महाराष्ट्र’ नावाच्या ‘शिवछत्रपतीराष्ट्रा’त मराठी-श्रमिकवर्ग गुलामगिरीत कायमचा खितपत पडलेला पहायचा नसेल; तर, “शिवजयंति साजरी करत असताना, हा एक शिवछत्रपतींचा ज्वलंत जीवनसंदेश, विसरुन कसं चालेल”???
मित्रहो, आपल्याला बाकी शिवकालीन इतिहास चांगल्यापैकी माहिती असतो; पण, ‘शिवछत्रपती’ हा आजवरचा एकमेव असा ‘शासक’ की ज्यानं, तत्कालीन ‘मराठी भाषे’च्या संवर्धनासाठी आणि पर्यायाने ‘मराठी-संस्कृती’ ऊर्जस्वल होण्यासाठी जाणिवपूर्वक फार मोठं योगदान दिलेलं आहे, हे आम्हाला फारसं ठाऊक नसतं!
शिवबा-संतांची आपली ‘मायमराठी-संस्कृती’, हे भारतीय-अध्यात्माचं अवघ्या विश्वाला पथदर्शक ठरावं, असं ‘निसर्ग-पर्यावरणस्नेही’ अनुपम लेणं आहे! अवघं चराचर ‘अस्तित्व’ हेच, ‘ईश्वरतत्त्व’ मानणारी… सगळं जगच आपल्या प्रेमळ कवेत सामावून घेणारी विश्वगामी, विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, “मराठी-संस्कृती”!! म्हणूनच, “कांदा, मूळा, भाजी अवघी विठाई माझी” म्हणणारे संत सावता माळी, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” म्हणणारे संत तुकाराम किंवा “विश्वात्मक देणं, मागणारं पसायदान” प्रसवणारे ज्ञानदेव आणि “राज्यातील जंगल-जमिनीलाच काय तर, भाजीच्या देठाला आणि गवताच्या काडीलाही तळहातावरील फोडासारखे जपणारे”, शिवछत्रपतींसारखे विश्ववंदनीय-निसर्गपूजक राज्यकर्ते…. अशी, एकापेक्षा एक सरस निसर्ग-पर्यावरणवादी महापुरुषांची ‘मांदियाळी’, केवळ ‘मराठी-संस्कृती’चं जगाला देऊ शकली… “जे जे जगी जगते तया, माझे म्हणा… करुणा करा,” असं आळवणाऱ्या महन्मंगल मराठी-पौर्वात्य संस्कृतिनंच तर, पृथ्वीचं ‘आईपण’ कालपर्यंत हळूवार काळजात जपलं नव्हतं का?
पण, आज संवेदनाशून्य शासकांनी आणि खुज्या नीतिमत्तेच्या शहाणपण’ गमावलेल्या बुद्धिवाद्यांनी भरलेल्या, या अमानुष जगाच्या विनाशासाठी, आता कुठल्याही अॅटमबाॅम्ब्सच्या फुटण्याची मुळीच गरज उरलेली नाही. त्यासाठी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाप्रति बेफिकीर असलेली आधुनिक जीवनशैली, तसेच शेती-उद्योगातील रासायनिक प्रक्रिया आणि लोकसंख्येच्या विस्फोटाच्या स्वरूपातील, जगाच्या कानाकोपऱ्यात ठाण मांडून बसलेले ‘टाईम-बॉम्ब्स्’ पुरेसे असतानाही, त्यात कोविद-१९ सारख्या नवीन ‘करोना-विषाणू’सारख्या अतिसूक्ष्म तरीही, अतिप्रभावी अशा संहारक-जैवास्त्रांची नियतीनं भर टाकलेली आहे… शून्यातून करोडो वर्षांपूर्वी सुरु झालेला हा ‘जैविक-प्रवास’, पुन्हा शून्याकडेच वळण्याची, ही प्रलयंकारी लक्षणे होतं!
अशावेळी, वेळ हाताची निसटून जाण्याअगोदरच, आमच्या विकासाच्या मैलाच्या प्रत्येक दगडातला माणुसकीचा-भूतदयेचा झरा सदैव जिवंत असेल आणि शिवबा-संतांच्या शिकवणुकीनुसार निसर्ग-पर्यावरणाच्या संरक्षणा-संवर्धनाबाबत कुठलीही तडजोड न करताच, प्रगतीच्या प्रत्येक वास्तूची ‘कोनशिला’ बसविली जाईल… याची, आपण साऱ्यांनीच सुनिश्चिती करायला हवी; अन्यथा, आपण आपल्याच हातानं आपल्या कबरी खणत राहू…. कालही, आजही आणि उद्याही !!!
आजच्या मराठी-तिथीनुसार असलेल्या ‘शिवजयंति’चे (राम-कृष्ण-बुद्ध-हनुमानाप्रमाणेच, शिवछत्रपतींसारख्या ‘युगपुरुषा’ची जयंति, ‘फाल्गुन वद्य-तृतिया’ या मराठी-तिथीनुसारच साजरी केली जायला हवी… मोगलांप्रमाणेच ज्या, आंग्ल शासकांविरुद्ध शिवछत्रपती उभे ठाकले, त्यांच्या इंग्रजी-कॅलेंडरनुसार नव्हे!) हेच खरे संदेश होत… एकाचवेळी, “माणूस आणि निसर्गाच्या शोषणा”च्या संदर्भात, अमोघ व मूलगामी असलेले हे लोकविलक्षण संदेश, मराठीमनांच्या सांदीकोपऱ्यात तुतारीच्या धारदार सुरांप्रमाणेच, बधिर झालेल्या मराठी-मेंदूंना झिणझिण्या येईपर्यंत घुमले पाहीजेत; तरच, पुढे शिवछत्रपतीनीतिनुसार आचरण-व्यवहार घडेल… नुसत्या शिवजयंत्या साजऱ्या करुन, पुतळे उभारुन किंवा शिवछत्रपतींचा नामजप करुन काय उपयोग???
II जय महाराष्ट्र, जय हिंद II
.…..राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष, भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही हरित पक्ष… “संयुक्त महाराष्ट्रानंतर, राष्ट्रांतर्गत राष्ट्र ‘स्वायत्त-महाराष्ट्र’, शिवछत्रपतीराष्ट्र”!!!)