“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १४ : इंदिरेनं देशाला ‘दान’ दिलेलं ‘मंगळसूत्र’ आणि सोनियाजींनी ‘बलिदानं दिलेलं ‘मंगळसूत्र’….

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १४

——————————————————————–

इंदिरेनं देशाला ‘दान’ दिलेलं ‘मंगळसूत्र’ आणि सोनियाजींनी ‘बलिदानं दिलेलं ‘मंगळसूत्र’….

फाळणीपूर्व दंगलींनी देश खिळखिळा झालेल्या अवस्थेतच, भारताला स्वातंत्र्य मिळालेलं…विकास-प्रक्रियेवर व पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चीनसारख्या बलाढ्य शेजार्‍याशी ‘हिंदी-चिनी भाई भाई’ करत, संबंध सौहार्दपूर्ण ठेवण्याखेरीज भारत-सरकारला गत्यंतर नव्हतंच…अशातच, चीनने पाठीत खंजीर खुपसत भारतावर १९६२मध्ये हल्ला केला! देशांतर्गत संसाधनांची मोठी वानवा होती. यास्तव, पं. जवाहरलाल नेहरुंनी आर्त स्वरात भारतीय जनतेला मदतीची हाक दिली. तेव्हा, त्यांची मुलगी ‘प्रियदर्शिनी’ (रवींद्रनाथ टागोरांनी दिलेली उपाधी) इंदिरा गांधी यांनी, आपले सगळेच्या सगळे जडजवाहीर, दागिनेच काय तर, आपलं ‘मंगळसूत्र’ देखील देशाला दान म्हणून देऊन टाकलं होतं… आपल्यापैकी किती जणांना याची कल्पना आहे?

…आणि, राहुल-प्रियंकाच्या आईनं (सोनियाजींनी) तर, आपलं ‘मंगळसूत्र’चं देशाच्या ‘बलिवेदी’वर चढवलं होतं!

या भाजपाई-संघीय लोकांनी अशी किती बलिदानं देशासाठी आजवर दिलीयतं? बलिदानं देणं तर, सोडाच; पण, मोंगल असोत वा असोत ब्रिटीश… स्वातंत्र्य-चळवळीला ‘अपशकून’ करणारे हे, कायमचं सत्तेच्या सिंहासनाची हुजरेगिरी करत आलेत… परंपरेनं, ‘स्वातंत्र्यवीरा’ऐवजी ‘माफिवीर’ पैदा करणार्‍या या जमातीचं, ‘बलिदान’ नव्हे; तर लाचारी, खोटेपणाचा कळस, जातधर्मविद्वेष हेच यांचं ‘बलस्थान’ राहीलेलं आहे!

 

…आणि ४ जूनला, शंभर टक्के ‘मावळते’ ठरणारे आजचे पंतप्रधान, सत्तालालसेपोटी वाटेल त्या थराला जात…”म्हणे, मुसलमानांची घरं भरण्यासाठी केंद्रात सत्तेवर येताच, देशातील गोरगरीब हिंदू भगिनींच्या गळ्यातलं ‘मंगळसूत्र’, काँग्रेस हिसकावून घेणार असल्याचा हिणकस कांगावा करतायत”.

यांच्याच म्हणण्यानुसार, “या अमृतकाळात अस्मानातून ‘सप्तर्षी’ म्हणे, यांना पथदर्शन करताहेत”… *धर्माचं ध्रुवीकरण आणि जातीयवादाचं समीकरण” मांडणारं, असलं हिणकस मार्गदर्शन, अखिल जगताच्या कल्याणाची धुरा वहाणारे, ते सप्तर्षी कधि करतील?

…दांभिकता-असत्यकथन, पाताळयंत्री कारभार आणि जनसामान्यांची ‘जातधर्मा’च्या नावावर चाललेली सततची फसवणूक व अतोनात शोषण, निसर्ग-पर्यावरणाचा विध्वंस करणाऱ्यांनो, …कशाला, ऋषिमुनींच्या, शिवबा-संतांच्या महन्मंगल हिंदुधर्माला बदनाम करता??

…तेव्हा, असा, अगदी खालच्या पातळीचा माणूस, पंतप्रधान म्हणून गेली १० वर्ष, देशाची फसवणूक करत देशाच्या उरावर बसलाय, हे देशाचं केवळ दुर्भाग्यच नव्हे; तर, फार मोठं वैचारिक दारिद्र्यही आहे!

“कधि कधि आपलंच रक्त,

आपल्याला फसवतं…

आणि रामाच्या पोटी,

एखादा रावण प्रसवतं!”

या परमपावन भरतभूमीनं आपल्याला चकवलंय आणि तिच्या मुशीतून ‘अपघात’ म्हणून ही रावणाची पिलावळ तिनं प्रसवलीय!

फरक इतकाच आहे की, “रामायणात रावण, सीतेचं अपहरण करण्यासाठी ‘साधू’चा वेष परिधान करुन आला होता…लोकसभा-निवडणूक-२०२४मध्ये तो, ‘लोकशाही’रुपी सीतेचं अपहरण करण्यासाठी, बेमालूम ‘रामा’चाच वेष परिधान करुन आलाय”!

ही त्यांची वेषांतर, हे त्यांचं सोंगंढोंगं… आपण अचूक ओळखून, देशाचं ‘तिसरं स्वातंत्र्ययुद्ध’ बनलेल्या या निवडणुकीत…’श्री राम’ म्हणणार्‍या बनावट हिंदुत्ववाद्यांना, ४ जून रोजी उघडणाऱ्या मतपेटीच्या मर्माघातातून ‘हे राम’ म्हणायला लावायचंच!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) 

(क्रमशः)