“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १७

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १७

————————————————————

भारतीय-अध्यात्मानुसार “राजाकडे द्रव्य नसलं, अन्नधान्य नसलं, अगदी सैन्य नसलं तरी चालेल; पण, त्याच्याकडे ‘विश्वास’, हा असलाच पाहिजे”…त्यातून सगळंच पुन्हा उभारता येईल; पण, जर विश्वासच नसेल तर उपयोग काय?

…दिल्लीश्वर, हे उद्योगपती ‘अदानी’चे मित्र असलेले ‘अडाणी’ सत्ताधीश आहेत, सतत खोटं बोलणारी माणसं आहेत ही; ज्यांच्याविषयी, दिल्लीत असं म्हटलं जातं की, “ऐसा कोई ‘सगा’ नहीं…जिनको इन्होंने ‘ठगा’ नहीं!”

आग, पाणी, देशातला कायदा आणि निवडणुकीच्या वेळेस देशातली जनता…यापासून सांभाळून रहायला हवं, हे बहुधा हे सत्ताधीश, सत्तेच्या नशेत विसरुन गेलेत!

तुमचं मंगळसूत्र, सोनंनाणं, गोठ्यातील म्हशी म्हणे, काँग्रेस हिसकावून घेणार आहे आणि म्हणे, राजीव गांधींना इंदिरा गांधींची सगळी संपत्ती वारसा-हक्काने हडप करायची होती, म्हणूनच त्यांनी ‘वारसा-हक्क’ कायदा रद्द केला…यांच्या जीभेला काही हाड? कशीही वळवळते, कितीही खोट बोलते.

देशाच्या संपत्तीवर मुसलमानांचा ‘पहिला अधिकार’ आहे, असं मनमोहनसिंग किंवा राहुल गांधी…कधि चुकून तरी बोललेत? पण, नरेंद्र मोदी-अमित शहा सरकारने मात्र, देशाच्या संपत्तीवर ‘अंबानी-अदानी’, या दोन गुजराथ्यांचा ‘पहिला हक्क’ असल्याचं, आपल्या कृतिने आजवर दाखवून दिलंय…बाकी, ८० कोटी भारतीय ‘दरिद्री-नारायणां’ना दरमहा ५ किलो मोफत धान्याची भीक!

तेव्हा, नवतरुणाईला हे गर्जून सांगायला हवं,

“सुनो, मेरे बेरोजगार नौजवानों…

भँवर जब भी डुबोएगा,

उभार देकर मारेगा…

मोदी-शहा NDA सरकार,

तुमको 5 किलो राशन देकर मारेगा!”

तुम्हाला, मोदींचा ट्रेनच्या गर्दीतला किस्सा आठवतो? बसायला जागा मिळावी म्हणून त्यांनी अजमावलेला, तो भविष्य-कथनाचा किस्सा…खरंतरं, त्यांच्या थापेबाज, बनेल, हातोहात टोपी घालण्याच्या स्वभावाचं मूर्तिमंत दिग्दर्शन करणारा असला…तरी, तो ही खोटा निपजावा? एका पत्रकार-लेखकाच्या पुस्तकात वर्णिलेला किस्साच, जसाच्या तसा, नरेंद्र मोदींनी ‘उचलेगिरी’ करत आपल्याला सांगितलाय, हे नुकतंच उघड झालंय…म्हणजे, त्यातही खोटेपणाच?

दुसरीकडे, यांच्या ‘अनर्थकारणा’मुळे देशात भयानक आर्थिक-विषमता धुमाकूळ घालतेय… देशातल्या २१ अब्जाधीशांकडे (Blood Billioners) ७० कोटी लोकांकडे आहे, तेवढी संपत्ती आहे. सोबतच बेरोजगार-अर्धरोजगारी, महागाईचा देशात कहर माजलाय.

फसव्या ‘गुजरात-माॅडेल’वाल्या गुजराथमध्ये मकरसंक्रांतीचे पतंग हवेत उडवले जात असतानाच, देशाच्या अर्थसंकल्पाच्या वेळेस अनेक आश्वासनांचे, जुमल्यांचे पतंग गेल्या १० वर्षांत उडवले गेले….

“पैसा झाडाला लागत नाही किंवा एखादा भोंदू साधू हवेतून हात फिरवून हातचलाखीने निर्माण करतो”, तसा निर्माण होत नाही…मग, अचानक भाजपा सरकारच्या काळात लाखो कोटी रुपयांचे उड्डाणपूल, रस्ते-महामार्ग वगैरे पायभूत-प्रकल्प (Infrastructure Projects) प्रकल्प आलेच कसे….तर,

१) प्रथम म्हणजे, ७० वर्षांची नेहरु-इंदिरा गांधींच्या काँग्रेस-सरकारांनी सार्वजनिक-उद्योग व संस्था उभारुन केलेली कमाई, बेदरकारपणे मोदींच्या मित्रांमध्ये स्वस्तात वाटून टाकत, जो पैसा उभारण्यात आला त्यातून….

२) आणि, बेसुमार व अगदी ५० वर्षांच्या अतिप्रदीर्घ मुदतीची कर्ज काढून (जे ७० वर्षांत, काँग्रेस-सरकारने कधिही केलं नाही), ज्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या डोक्यावर आजमितीस जवळपास दिड लाखाचं कर्ज आहे…ज्याबाबत, अगदी IMF सुद्धा गंभीर इशारा देतेय

३) काँग्रेसच्या ७०वर्षाच्या काळात एकूण ५५ लाख कोटींचं कर्ज काढलं होतं…तर, यांच्या सात पटीने कमी म्हणजे केवळ, १० वर्षांच्या भाजपा-सरकारच्या काळात २१० लाख कोटींचं कर्ज देशाच्या डोक्यावर झालंय

४) शिवाय, या प्रकल्पांतून ‘चारों उंगली घी में’ अशी भाजपा-सरकार व राजकारण्यांची चंगळ झालेली…प्रकल्प-उभारणीतून तत्काळ मिळणारी टक्केवारी व टोल-वसुलीची मोठी कमाई आणि वरुन भरभक्कम मतांची बेगमी…असं, हे भाजपाई-समीकरण आहे

अभिजनवर्गातील प्रतिवर्ष सरासरी दिड लाख लोकं २०१४ पासून भारताचं नागरिकत्व सोडून परदेशी कायमचे निघून गेलेत…हे कशाचं लक्षण?

नुकतचं ऑस्ट्रेलियन सरकारच्या Department of Foreign Affairs and Trade (DFAT) ने जारी केलेल्या निर्देशानुसार ऑस्ट्रेलियातल्या अभिजनवर्गाला (Big Politicians, VVIPs, Big Businessmen etc.) भारतात दौर्‍यावर जाताना आपला नेहमीच्या वापराचा फोन (अँड्रॉईड किंवा ॲपल वगैरे) घेऊन न जाता; साधा फोन (ज्याला, Burner Phone म्हणतात व जो ‘Use & Throw’ असतो) घेऊन जाण्याचे निर्देश दिलेत; जे सर्वसाधारणपणे, चीन, रशिया, हाँगकाँगसारख्या ठिकाणी जाताना दिले जातात…हे कशाचं द्योतक आहे?

…म्हणजेच, केवळ देशाच्या रुपयाची व देशाच्या अर्थव्यवस्थेचीच प्रचंड घसरण होतेय, असं नव्हे; तर, देश-विदेशात आजवरच्या भारतीय-प्रतिष्ठेचीही झपाट्याने घसरण होतेय…या सगळ्याच घसरणीला लगाम घालायचा; तर, ‘इंडिया-आघाडी’ला लोकसभा-निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून द्यावं लागेल…जय हो!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)  (क्रमशः)