भांडवली व्यवस्था आणि मध्यमवर्गाचा विकृति कडे प्रवास – अमानुषतेचे नवे उदाहरण

😩या पृथ्वीवर ‘भांडवली-व्यवस्थे’तील माणसाइतका क्रूर जीव, दुसरा कुठलाही असूच शकत नाही…क्रूरता-निर्दयता, तुझं नाव, दोन पायाचा ‘मनुष्यप्राणी’!

‘गोमाता’ तोंडाने जपत रहायचं आणि तिचे खाटीकखाने चालवणाऱ्यांकडून निवडणुकीसाठी ‘चंदा’ गोळा करायचा धंदा थाटायचा…’गोमाता’ म्हणत राजकारण करत रहायचं आणि तिला, तिच्या वासरापासून व वासराला, अधिकचा पैसा कमावण्यासाठी, तिच्या स्तन्यापासून क्रूरपणे तोडायचं (Invention of New Spike-Device)…घोर कलियुग, अजून दुसरं काय असतं?
ओशो, नेहमी म्हणायचे, “माणूस हा गाईचा आत्मा आणि माकडाचं शरीर, या संयोगातून उत्क्रांत होत घडलेला जीव आहे!”…गाईची महत्तता व तिला पाळणाऱ्या माणसांशी तिचं असलेलं ‘तादात्म्य’ वर्णन करताना, ते नेहमी उदाहरण द्यायचे की, “आपल्या धन्याच्या कुटुंबातलं कुणीही दगावलं की, गोठ्यात बांधलेल्या गाईच्या डोळ्यातून आपसूक झरझर अश्रू वाहू लागतात!”
…इथे फक्त, फरक इतकाच की, त्या गाईऐवजी, गाईच्या वासराच्या डोळ्याला धारा लागल्यात; पण, त्याच्या दुःखामुळे कुणा माणसाच्या डोळ्यात अश्रूचे दोनचार थेंब सोडाच; संवेदनेचा साधा अंशही कधि निर्माण होणे नाही!
विकृत ‘भांडवली-बुद्धिमत्ता’, कशी स्वतःसाठी क्रौर्यपूर्ण भौतिक समृद्धी-सुकाळ साधत जाते; पण, नैतिक-आंतरिक भूतदया व माणुसकीचा कसा दुष्काळ पैदा करत जाते…याचं, हे प्रत्ययकारी उदाहरण!

भांडवली-व्यवस्थेतला उच्चशिक्षित ‘मध्यमवर्ग’ प्रचंड मेहनतीने ‘काॅर्पोरेटीय-करियरिस्ट’ होतो, अनेक इतर क्षेत्रं गाजवण्यासाठी जीवाचं रान करतो; पण, समष्टीवर मनापासून प्रेम करणं, सर्व सजीवमात्रांमध्ये परमात्म्याचा अंश पहाणं… गोष्ट सोपी असली; तरी, काहीकेल्या त्याच्याकडून होत नाही आणि जग, भांडवली-बाजारपेठेतील अमानुष स्पर्धेपोटी अधिकाधिक संवेदनशून्य व अनैतिक बनत जातं!
त्याची अंततः परिणती म्हणून, पर्यावरणीय महासंकटातून उद्भवणाऱ्या विनाशाला-उत्पाताला, प्रामुख्याने ‘भांडवली-व्यवस्थे’तला मध्यमवर्ग जबाबदार असेल; ते त्यांचंच महापातक असेल!

…राजन राजे