(चिलीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. गॅब्रियल बोरिक यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे पाठवलेल्या अभिनंदनपर मूळ इंग्रजी पत्राचा मराठी अनुवाद….)

श्री. गॅब्रियल बोरिक,
नवनिर्वाचित चिलीचे अध्यक्ष,
चिलीचे नवे अध्यक्ष म्हणून आपली निवड झाल्याबद्दल ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आम्ही आपलं हार्दिक अभिनंदन करीत आहोत व प्रत्यक्ष निवडीपूर्वी काही दिवस आधीच, मी स्वतः तसं, आमच्या फेसबुक-पेजवर आणि व्हाॅट्स्ॲप ग्रुप्सवर (आपल्या निवडीचं) भाकित केलं होतं!
अध्यक्ष महोदय, “भ्रष्टाचार तसेच, माणूस व निसर्गाचं शोषण, याबाबत कुठलीही तडजोड सहन न करण्या”च्या तत्त्वावर अतिशय तळमळीने काम करणारा आमचा ‘धर्मराज्य पक्ष’, हा भारतातील एकमात्र नोंदणीकृत ‘निसर्ग-पर्यावरणस्नेही हरित राजकीय पक्ष’ (Green Political Party) आहे. विशेषतः, भारतामधील महाराष्ट्र राज्यातील असंख्य कामगारांना सन्मानजनक जीवन प्रदान करण्यासाठी व त्यांच्यावरील अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी शेकडो आंदोलनांमध्ये सहभागी असणाऱ्या ‘धर्मराज्य पक्षा’ने, निसर्ग-पर्यावरणाचं संरक्षण-संवर्धन करण्यासंदर्भातही अनेक चळवळीत भाग घेतलेला आहे.
महोदय, जागतिक राजकारणाचा मागोवा घेतला; तर, आपली ‘अध्यक्ष’ म्हणून निवड होणे; हा, “(जागतिक)राजकारणाचा ‘लंबक डावीकडे’ झुकत चालल्या”बाबत, नवा व कमालीचा आशादायक निदर्शक असणे, हेच आम्ही विशेषत्वाने आपल्याशी संपर्क साधण्याचं अगदी उघड कारण आहे.
आर्थिक-विषमता, माणूस आणि निसर्गाचं चिंताजनक शोषण… यांचे अगदी हादरवून सोडणारे ताणतणाव व यातना आणि त्यातूनच, सामाजिक-राजकीय अस्थिरतेसह उद्भवणारी टोकाची पर्यावरणीय परिस्थितीजन्य महासंकटं… यांच्या गर्तेत अवघं जग सापडलेलं असताना; तसेच, या व्यतिरिक्त, आजवर अतिरेकी उजवे किंवा अतिरेकी डावे यांच्या छुप्या हुकूमशाही व्यक्तिमत्त्वांमुळेच प्रामुख्याने जागतिक राजकारण साफ बिघडून गेलं असताना…. आपल्या, या ऐतिहासिक विजयाला विशेष महत्त्व आहे.
आपल्या नेतृत्त्वाचा जसा गवगवा करण्यात आलेला आहे, अगदी तशाच ‘तरुण नेतृत्त्वा’ची सध्या जगाला गरज आहे. चिली देशातील तरुणपिढीला आपलं नेतृत्त्व, संकटातून बाहेर काढेल आणि जगभरातील पुढील पिढ्यांना यापुढे तोंड द्यायला लागू शकणाऱ्या ‘अस्तित्वा’च्या गंभीर प्रश्नांवर उत्तरं शोधून काढण्यासाठी मदत करु शकेल, अशी आम्हाला ठाम आशा आहे.
सध्या, लहानसहान राष्ट्रांच्या वार्षिक ढोबळ उत्पन्नापेक्षाही मोठी वार्षिक उलाढाल नोंदवणाऱ्या कंपन्या, आता कधि अपयशी ठरुच शकणार नाहीत, एवढ्या अतिरेकी मोठ्या झालेल्या आहेत आणि त्यातूनच, नफा कमावण्याच्या आपल्या अंतहिन सैतानी लालसेच्या पूर्ततेसाठी सरळ सरळ आपला (अनैतिक) प्रभाव वापरुन जगावर त्या नियंत्रण ठेवतायत. त्यांच्या महाकाय आकारातून झिरपून बाहेर पडणाऱ्या घृणास्पद ‘कंपनी-दहशतवादा’मुळे (Corporate-Terrorism) ग्राहक अथवा कामगार-कर्मचारी, असे दोघेही लाखोकरोडोंच्या संख्येनं दुःखात लोटले गेले आहेत व त्यांच्या करोडो आत्म्यांना पायदळी तुडवले जात आहे.
या एकमेकांत गुंतलेल्या समस्यांच्या मोहोळाला आपण कसं तोंड देता आणि चिलीच्या जनतेचं जीवन अधिक चांगलं व निश्चिंत कसं करता, हे निरखून पहायला आम्हाला आवडेलच.
कमालीच्या गुंतागुंतीच्या महसुली-संसरचनेत सुलभता आणण्यासाठी व सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी, इथे भारतात प्रस्तावित केल्या गेलेल्या ‘अर्थक्रांती-प्रतिष्ठान’ व ‘जनलोकपाल-विधेयका’सारख्या नवीन संकल्पनांचा, आपल्या खास निवडक लोकांच्या समितीला अगदी बारकाईने अभ्यास करायला सांगावा आणि त्यासोबतच, ‘कार्बन-ऊत्सर्जनाच्या मानवी-पाऊलखुणा’ घटवून निसर्गाचं रक्षण करण्यासाठी, शक्य तेवढा, म. गांधींच्या तत्त्वज्ञानाचा अवलंब केला जावा…. असं आम्ही, या निमित्ताने आपणास सुचवित आहोत. कंपन्यांमधील (वरपासून खालपर्यंत काम करणाऱ्यांमधील) आर्थिक-विषमता कमी करण्यासाठी किमान व कमाल वेतनमानात १ : १२ च्या आसपास गुणोत्तर राखण्याचा अंतर्भाव असलेलं, ‘राष्ट्रीय वेतन धोरण’ (NWP), आपल्या विषय(धोरण)पत्रिकेतील मुद्दा असेलच, अशी आम्हाला आशा आहे.
चिलीचे अध्यक्ष म्हणून आणि चिली देशाच्या नव्या राज्यघटनेचा अंतिमावस्थेतील मसुदा हातावेगळा करणारी एक प्रमुख असामी म्हणूनही, ‘डावीकडे झुकलेल्या’ आपल्या कौतुकास्पद ‘लोकशाहीवादी’ कठोर प्रयासाला (प्रवासाला), शक्य तेवढं यश लाभावं, अशी आम्ही येथे सदिच्छा व्यक्त करतो.
आम्ही आपणास हे लिहीत असतानाच, चिलीच्या दक्षिण भागातील १२,००० हेक्टर जंगलात वणवे भडकले असल्याचं आणि देशात, करोना व्हायरसचा सर्वत्र बेफाम फैलाव झाल्याचं आम्हास समजलं…. आपणा सर्वांनाच, या नैसर्गिक आपत्तींवर मात करता यावी, यासाठी आम्हा साऱ्यांचं हृदय तळमळतयं; तरीही, या(आपत्तीं)तूनच निसर्ग, पर्यावरण आणि माणसं… यांची एकाचवेळी काळजी वहाणार्या, आपल्यासारख्या भव्य ‘नेतृत्त्वा’ची गरजही अधोरेखित होतेय!
आपला,
…राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)