आजचे ‘पुतिन’कालीन ‘रशियन्स’ म्हणजे, कालचे ‘हिटलर’कालीन ‘जर्मन्स’ नव्हेत!

रशियाचा अध्यक्ष कोण… ब्लादिमीर पुतिन की, पहिल्या महायुद्धात रशियाला आपल्या वासवी, सैतानी लालसेने खड्ड्यात घालणारा रासपुतिन’ ???

हे युद्ध, ‘रशिया विरुद्ध युक्रेन’, असं मुळीच नसून ‘‘एकटे ब्लादिमीर पुतिन विरुद्ध अवघा युक्रेन’’… असं असल्यामुळेच, प्रचंड दडपशाही व जीवाला मोठा धोका असतानाही प्राणाची पर्वा न करता बरेच जबाबदार रशियन नागरिक, पुतिनच्या रशियात निदर्शनं करण्याचं जीवघेणं धाडस करतायत, हे फारच कौतुकास्पद व अनुकरणीय आहे. पुतिनच्याच विकृत व नृशंस मनोवृत्तीचा रशियाचा भूतपूर्व अध्यक्ष जोसेफ स्टॅलिन म्हणायचा की, ‘‘निवडणुकीत मतदार महत्त्वाचे नसून ‘मत मोजणारे’ महत्त्वाचे असतात’’ (आपल्याकडे, EVMs महत्त्वाची असतात). त्याच मनोवृत्तीचा पुतिन, त्या तशाच हडेलहप्पी व दडपशाहीने आजवर बेगुमानपणे निवडणुका जिंकत आलाय… विरोधकांना सरळ ठार मारत किंवा विषप्रयोग करत आलेला आहे. एवढंच नव्हे; तर, अतिरेक्यांवर कारवाई करताना, त्यांनी वेठीस धरलेल्या आपल्याच जनतेचेही खुशाल मुडदे पाडत आलेला, हा पुतिन नावाचा क्रूर, पातकी आणि घातकी माणूस होय!

१९९१च्या सोव्हिएत युनियनच्या विघटनापश्चात, अमेरिका किंवा अन्य नाटो सदस्य राष्ट्रांच्या तुलनेत काहीशा कमजोर पडलेल्या रशियाला भलेही, पुतिनच्या राक्षसी राजवटीत बळकटी प्राप्त झालेली असो… तरीही, पुतिनच्या दुर्दैवाने आणि उर्वरित जगाच्या सुदैवाने, ‘पुतिन’कालीन ‘रशियन’ नागरिक म्हणजे, कालचे ‘हिटलर’कालीन ‘जर्मन’ नागरिक मुळीच नव्हेत! जर्मन्स जसे, हिटलरच्या हुकूमशाहीतल्या राजवटीतल्या सुरुवातीच्या चकाचौंध औद्योगिक व इतर प्रगतीने अगदी नको इतके भारावून गेले होते आणि म्हणून हिटलरच्या पूर्ण ‘आहारी’ गेले होते; तशी रशियन जनता काही ‘दूधखुळी’ बनून पुतिन यांच्या आहारी गेलेली नाही, जाणार नाही! कारण, जी ‘युरोपियन भूमी’, आपल्यावर लढल्या गेलेल्या पहिल्या व दुसर्‍या महायुद्धापश्चात साफ पोळून निघाल्यावर, आपल्या भूमिवर पुन्हा कधि युद्ध होऊ शकेल, हा विचारच झटकून मोकळी झाली होती… तिच्यावरच, अचानक पुतिन परत हे महाप्रलयंकारी ठरु शकणारं युद्ध, जबरदस्तीने लादून बसलेत आणि या अक्षम्य अपराधाला ती युरोपियन भूमी, त्यांना क्षमा करणं शक्यच नाही!

त्यामुळेच, ‘‘ज्यांच्या रक्षणार्थ आपण हे युद्ध पुकारलेलं आहे, असा पुतिन यांचा ढोंगी दावा आहे… ती, स्थानिक रशियन भाषिक युक्रेनियन जनता (अगदी म्हातारीकोतारी माणसंसुद्धा) देखील रशियन रणगाड्यांना रोखून रशियन सैनिकांना बेधडक ‘‘आमच्या देशातून परत जा, हा देश आमचा आहे’’, असं जागोजागी ठणकावून सांगतेय! म्हणूनच तर, अशा युक्रेनियन लष्करी व नागरी कडव्या प्रतिकारामुळे पुतिनना रशियन सैन्याचं ढासळलेलं मनोबल उंचावण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागतेय!

हे सगळं चित्र असं असताना… आमचं मात्र, इथे अजून तळ्यातमळ्यातच चाललंय, हे कसलं लक्षण आहे… रशियाने भलेही, आपल्याला अतिशय अवघड व अडचणीच्या परिस्थितीत मोक्याच्या प्रसंगी मदत दिली असेल व आजही देत असेल… त्याबद्दल, आपण कायम रशियाचं ‘उपकृत’ असलोच पाहीजेत, ऋणी राहीलोच पाहीजेत! पण, याचा अर्थ, रशियाला (खरंतरं, व्यक्तिशः ब्लादिमीर पुतिनना) आंतरराष्ट्रीय पातळीवर हकनाक युक्रेन-युद्धासारखा अमानुषपणा अथवा स्थानिक पातळीवर वाटेल तो क्रूर नंगानाच करायला पूर्ण मोकळीक द्यायची आणि त्याचा साधा निषेधही करायचा नाही… असा होऊच शकत नाही. ‘‘भारतीय उज्ज्वल व जाज्वल्य आध्यात्मिक परंपरा व संस्कृती, खचितच असा अगोचरपणा करायला ‘मुक्तद्वार’ देऊच शकत नाही’’. अन्यथा, महाभारतात ‘मृत्युंजय कर्ण’, दुर्योधनाच्या अन्यायी बाजुला उभा राहीला म्हणून, ‘वध्य’ ठरु शकला नसता; कारण, तसं पहाता दुर्योधनाने तर, कर्णावर सात जन्म फेडता येणं अशक्य, एवढे मोठे उपकार करुन ठेवले होते!

कदाचित, हे आपलं बावनकशी ‘हिरण्यगर्भा’सारखं तेजस्वी ‘भारतीय-अध्यात्म’ एव्हाना, तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या स्मरणातून सोयिस्कररित्या निघून गेलं असेलं किंवा त्यांना नवा ‘जावईशोध’ लागला असेल; तो, नाॅस्ट्राडॅमसच्या नावावर गेले कित्येक वर्षे बेमालूम खपवल्या गेलेल्या भविष्याचा… काय तर म्हणे, आता या रशिया-युक्रेन युद्धातून ‘‘तिसरं महायुद्ध घडून, भारत तर, ‘हिंदू राष्ट्र’ होणारच; शिवाय, जगभर ‘हिंदुधर्म’, हाच ‘विश्वधर्म’ होणार’’… म्हणूनच हो, ही अशी, म. गांधीच्या तीन माकडांसारखी त्यांची सद्यस्थितीतली ‘‘अळीमिळी गूपचिळी’’ (म. गांधींची हिंदुत्ववाद्यांना ‘ॲलर्जी’ असली तरी, ती माकडं काही आमच्या सहजी स्मरणातून जात नाहीत आणि अशावेळी, नेमकी ती आठवतातच)!

…बरं, हिंदुधर्म ‘विश्वधर्म’ होणार म्हणजे काय, तर पुन्हा यांच्या लेखी असलेल्या ‘जातिवंत’ शूद्रांना पशुतुल्य वागणूक देणारी ‘अस्पृश्यता’ लेवून अमानुष ‘चातुर्वर्ण्य-व्यवस्था’ येणार, शुद्रांच्या हाती भिकेचा कटोरा येऊन गळ्यात पेशवाईतल्या प्रमाणे गाडगीमडकी येणार?? नेमकं काय होणार??? पण, हे असले अडचणीचे प्रश्न, अशा प्रसंगी विचारायचे नसतात… हिंदुत्वाच्या नशेत फक्त, ‘चूर’ रहायचं, मग खालून तळागाळातल्या माणसांवरील अन्याय-अत्याचार-शोषणाचा कितीही ‘धूर’ निघाला तरी तो खुशाल निघो…

तेव्हा, तथाकथित हिंदुत्ववाद्यांनो, नाॅस्ट्राडॅमसच्या खर्‍याखोट्या भविष्यवाणीचा, काय तुम्हाला सध्याच्या तुमच्या अवघड परिस्थितीत फुटकळ टाईमपासम्हणून आधार घ्यायचा असेल; तो खुशाल घ्या… पण, अंधभक्तांनो, पिढ्या न् पिढ्या, जसं या देशातल्या भोळ्याभाबड्या, अशिक्षित जनतेला अंधश्रद्धेच्या अंधारयुगात कारस्थानी वृत्तीने व जबरदस्तीने आजवर ढकलंत आलात; तसं, आपली स्वतःची रशिया-युक्रेन युद्धात गेलेली लाज सावरण्यासाठी पुन्हा एकवार त्यांना ढकलू पाहीलंत, तर याद राखा !!!

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)