काही तथाकथित उजवे विचारवंत आणि त्यांच्या दुटप्पी विचारधारेचा पर्दाफाश

काही तथाकथित उजवे विचारवंत’ (डावे, नेहमीप्रमाणेच गोंधळलेले), इतरेजनांना शहाणेठरवत, स्वतःला शहाणपणातला जर बापसमजत असतील; तर, त्यांची प्रथम पाळंमुळं तपासून चपखल उत्तर देणं, अगत्याचं ठरतं… कारण, ‘‘चातुर्वर्ण्य आधारित छुपी वर्चस्ववादीउजवी विचारसरणी असलेले काही जीवात्मे’, आम्ही युक्रेन-रशिया युद्धविषयक विविध संदेशांतून, जाज्वल्य भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचाच संदर्भ देत, त्यांचं धोरण-पंगुत्व’ (माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांच्या तथाकथित धोरण-पंगुत्वावर टीकेचे प्रहार करणारे, ते हेच) साफ उघडं पाडल्यामुळे जाम चवताळलेले आहेत, एवढं मात्र खरं…!!!

हे शल्यकर्मकरण्यापूर्वी, ‘‘राक्षसी-महत्त्वाकांक्षाग्रस्त राष्ट्रप्रमुख किंवा बडे भांडवलदार… सत्तेनं व मत्तेनं मदमस्त झालेले हे दोन्ही वर्ग, समस्त मनुष्यजातीसाठी सारखेच धोकादायक आहेत’’… हे जाणून घेऊया आणि मग, या मुखंडांना प्रत्युत्तर देण्यासाठी काही वैश्विक सत्यांची मांडणी करुया….

** ‘‘समोरचा ताकदवान आहे, केवळ अधिक सामर्थ्यवान आहे; म्हणून, कुणालाही शरणागतीचा आगंतुक सल्ला देणारे’’, स्वतः, (रशिया, अमेरिका, चीन किंवा इंग्लंड-फ्रान्स-जर्मनी-स्पेन सारख्या युरोपियन राष्ट्रांसारखेच) सैतानी महत्त्वाकांक्षाग्रस्त म्हणून आक्रमक असतात… ज्यांना, कुठल्याही ‘मानवीमूल्यां’ची यःकिंचितही पर्वा नसते… ती सारी ‘मानवीमूल्ये’, त्यांच्या ‘‘कुणाच्याही जगण्यावर बिनदिक्कत आक्रमण करुन विजय मिळवायचाच’’, या त्यांच्या ‘वर्ण-वर्चस्ववादी’ राक्षसीवृत्तीपुढे यःकश्चितच ठरतात… ते सांगतायत, पसरवतायत ते जाज्वल्य ‘हिंदुत्व’ नव्हेच, ते भारतीय-अध्यात्म तर नव्हेच नव्हे… ती म्हणजे, महन्मंगल ‘पौर्वात्य-अध्यात्मा’वर चढलेली रोगट ‘बुरशी’ होय, ते हेतूतः पसरवतं असलेलं बेगडी ‘अध्यात्म’, हे त्यांच्या सोयीचं भेसळीचं अध्यात्म होय!

हा देश वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, म. गांधींचा म्हणून शांततामय सहजीवनाचा जसा आहे; तसाच, तो ‘‘विनाशायच दुष्कृताम्’’ असं ठणकावून सांगत महाभारत युद्धाचं अग्निकुंड पेटवणार्‍या श्रीकृष्णाचाही आहे….

‘‘कौरवांचं सैन्य अठरा अक्षौहिणी आणि पाडवांचं फक्त सात अक्षौहिणी; शिवाय, एकापेक्षा एक सरस महान योद्ध्यांनी खच्चून भरलेलं कौरवसैन्य पाहून व अर्जुनाची कुरुक्षेत्रावरची युद्धारंभीची भ्रांतचित्त अवस्था पाहून, अशा विचारवंतांच्या तर्काप्रमाणे (रशियाच्या प्रचंड सामर्थ्यापुढे युक्रेनने लवकरात लवकर गुडघे टेकणं, हाच युद्ध थांबवण्याचा एकमात्र उपाय म्हणणारे, हे विचारवंत) श्रीकृष्णाने युद्धापूर्वीच ‘शरणागती’ पत्करायला हवी होती, नाही का?

**फक्त, भारतातल्या या अतिरेकी उजव्या विचारसरणीच्या लोकांचं ते कडवं ‘राष्ट्रप्रेम’ आणि दुसर्‍यांचा म्हणजे, तमाम युक्रेनियन जनतेचा तो मात्र राष्ट्रप्रेमाचा जणू होलिकोत्सवातला ‘रंग’, अशी शेलक्या शब्दात निर्भत्सना, हे लोक आपल्या सोयीने करणार… वा रे, व्वा!

विशेष, म्हणजे, स्थानिक रशियन भाषिक युक्रेनियन जनता (अगदी म्हातारीकोतारी माणसंसुद्धा) रशियन रणगाड्यांना रोखून रशियन सैनिकांना बेधडक ‘‘आमच्या देशातून परत जा, हा देश आमचा आहे’’, असं जागोजागी ठणकावून सांगतेय. गटागटाने रशियन भाषिक युक्रेनियन नागरिक रशियन जागोजागी आक्रमणाचा जाहीर निषेध करीत आपले रशियन पासपोर्ट सरळ जाळून टाकतायत. प्रख्यात युक्रेनियन टेनिसपटूंसह अनेक खेळाडू, कलाकार, युक्रेनियन विश्वसुंदरीदेखील रशियन आक्रमणाचा तीव्र विरोध, निषेध जाहीरपणे करतायत… हे केवळ, देशप्रेम जाज्वल्य असल्याचंच लक्षण नाही; तर, हा लढा ‘‘माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु’’ (आठवा, भारतावरचं १९६२ चं चिनी आक्रमण आणि त्यावेळेस आकाशवाणीवरुन गाजलेलं हे गाणं) अशी मूळ रशियन भाषिकांसह तमाम युक्रेनियन नागरिकांची प्रबळ भावना आहे, पण त्याची यांच्या लेखी किंमत शून्यच नव्हे; तर, तो त्यांच्या लेखी एक महामूर्खपणा होय! व्हिएतनामसारखं छोटेखानी राष्ट्र, बलाढ्य अमेरिकेशी लढलं (आणि, सुदैवाने जिंकलं)… तो ही, यांच्या कथनानुसार मूर्खपणाच ठरावा!

**प्रत्येक पिढी, हे एक ‘स्वतंत्र’ असं, नवं राष्ट्रचं असतं, हे ‘वैश्विक सत्य’ होय आणि आपण घेतलेल्या निर्णयानुसार भल्याबुर्‍या परिणामांसहित आपापल्या मर्जीने जगण्याचा प्रत्येक पिढीला हक्क असतो, असलाच पाहिजे… त्यादृष्टीनेच, आताच्या युक्रेनमध्ये युनोच्या देखरेखीखाली निर्भय व खुल्या वातावरणात रशियन सरकारच्या ‘नाटो’कडील मागणीसंदर्भात युक्रेनमध्ये (आणि, खरंतरं मूळ रशियातसुद्धा) ‘सार्वमत’ (Referendum) घेतलं जाण्याचा आग्रह, जर पुतिन यांचे हेतू शुद्ध असता; तर, त्यांनी नक्कीच धरला असता. एखादे राष्ट्र भौगोलिकरित्या आमच्या जवळ आहे अथवा अन्य त्या राष्ट्राच्या परराष्ट्रीय धोरणामुळे आमच्या राष्ट्राला धोका उत्पन्न होऊ शकतो म्हणून, ‘‘संबंधितांनी आमच्याच इच्छेनुसार, आमच्याच तंत्राने जगलं पाहीजे’’, असं हुकूमशहासारखे फर्मावणारे व त्यातूनच, असे ताकदीच्या बळावर लहानसहान राष्ट्रांना ‘बुलडोझ’ करु पहाणारे अमेरिकन असो, चिनी असो वा रशियन सरकार असो… अशा सगळ्यांचाच धि:क्कार व प्रतिकार झालाच पाहीजे. समाजमाध्यमातून असे विखारी संदेश लिहीणारे, कधितरी असा ‘सार्वमता’चा आग्रह धरु शकतील आणि न घेणाऱ्यांचा सार्वत्रिक धिःक्कार करु शकतील?

**सरतेशेवटी, ही पृथ्वीमाता, केवळ माणसांचीच नव्हे; तर, सर्वच प्राणीमात्रांची जननी आहे, त्या सर्व ईश्वरी अंशांचा आपण शक्य तेवढा सन्मान राखलाच पाहीजे.

शिवाय, आपणही सगळे अखेर निसर्गतः स्वतंत्र बुद्धी, प्रज्ञा लाभलेले मनुष्यप्राणी आहोत आणि माणसांना जगण्यासाठी केवळ, ‘भाकरी’च लागत नाही; तर, आपलं ‘माणूसपण’ जपलं जाणं, अतिशय महत्त्वाचं असतं. आम जनतेला जोवर, अडचणीचं किंवा घातकी ठरत नाही; त्या मर्यादेपर्यंत सुयोग्य व प्रमाणबद्ध ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ माणसाला प्राणाहूनही प्रिय असतंच, असलंच पाहीजे! ‘‘सत्य आणि न्याय’’, हे प्रसंगी अन्नाहूनही अधिक प्रिय असणारा; तो खरा माणूस… अन्यथा, चतुष्पाद प्राण्यांमधला आणि आपल्यातला फरक तो काय? ‘‘सारा अंधारचं प्यावा, अशी लागावी तहान… एका साध्या सत्यासाठी, देता यावे पंचप्राण’’, असं म. म.  देशपांडे नावाचा कवी, कोणाला उद्देशून बोलतोय??

**१९६५, १९७१, १९९९ कोणतंही युद्ध घ्या, आर्टिकल ३७०चा संदर्भ घ्या (जो उजव्या विचारसरणीसाठी फार महत्त्वाचा आहे)… त्यावेळेस, रशियाने भारताला आणीबाणीच्या प्रसंगी मदत केलेली आहे, असं उच्चरवात सांगणारे हे भाडोत्री ‘विचारवंत’ मग, १९६२ चा संदर्भ का देत नाहीत… ज्यावेळेस, भारतीय ‘मित्रत्व’ साफ झुगारुन, ‘‘ब्लड इज थिकर दॅन वाॅटर’’चा अवसानघातकी परिचय देत, रशियाला, ‘लाल’चीनच्या (ही सुद्धा उजव्यांची खास भाषा) ‘बंधुत्वा’चा पुळका आला होता? त्यावेळी, अमेरिका भारताच्या मदतीला धावली; म्हणूनच तर, चीन एकतर्फी युद्धबंदी जाहीर करायला बाध्य झाला ना?

**या सगळ्यासोबत, विशेष महत्त्वाचा मुद्दा हा की, रशियातले काही बडे भांडवलदार (Oligarchs) सध्या ‘‘सरकार नियंत्रित भांडवलशाही’’ला (State Capitalism) तीव्र विरोध दर्शवायला लागलेत, याचाच दुसरा अर्थ, ‘‘शासन-नियंत्रित भांडवलशाही (State-Capitalism) जर, ‘आग’ असेल; तर, आगीतून खाजगी-भांडवलशाहीतल्या ‘कंपनी-दहशतवादा’च्या (Corporate-Terrorism) फुफाट्यात सर्वसामान्यांनी सापडायचं’’ असाच होतो, यापलिकडे दुसरंतिसरं काहीही नाही. यावर, हे ‘भांडवलधार्जिणे’ उजव्या विचारसरणीचे लोक चकार शब्दही उच्चारणार नाहीत, हे नीट ध्यानात घ्या.

**जगभरातल्या सर्वसामान्य जनतेच्या सुखसमाधानाच्या, शांततापूर्ण सहजीवनाच्या आणि ‘विचारस्वातंत्र्या’च्या दृष्टीकोनातून अमेरिका, हे राष्ट्र तर, अनेकदृष्टीने ‘खलनायक’ आहेच. म्हणूनच तर, ऑस्कर वाईल्ड , ‘‘America is the only country that went from ‘barbarism’ to ‘decadence’, without ‘civilisation’ in between’’ म्हणायचा. मग, या उजव्या लोकांना, ‘‘आपल्या राष्ट्राची भरभराट व्हावी, युद्धसामुग्री तयार करणाऱ्या भांडवलदारांची प्रचंड बरकत व्हावी… म्हणून, कारस्थानं रचत जगभरात विविध ठिकाणी युद्ध पेटवून देणाऱ्या’’ नृशंस अमेरिका-युरोपच्या, ‘‘वरुन आकर्षक पण, आतून अतिशय क्रूर असलेल्या भांडवलशाहीविरुद्ध’’ ‘ब्र’ उच्चारताना आपण कधि पाहीलंत काय?

…तेव्हा, मूळ मुद्दा, ‘‘माणुसकीजन्य व्यवहार सांभाळण्याचा आणि माणुसकीशून्य व्यवहार करणाऱ्यांचा प्रतिकार करण्याचा आहे’’, हे ध्यानात ठेवलंच पाहीजे… मग, तो कुठलाही देश असो, वा व्यक्ति! ज्या भगवतगीतेचे दाखले, ही उजवी लोकं ऊठसूठ देत असतात, ती गीता, कुठल्याही किंमतीवर ‘‘माणसाशी मैत्र वा शत्रूत्व असता कामा नये… तर, फक्त, त्याच्या चांगल्या किंवा वाईट प्रवृत्तींशीच असायला हवं’’, असं निक्षून सांगते.

चीन, रशियासारख्या कम्युनिस्ट राष्ट्रांवर ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ हननाचा आरोप करणारी अमेरिका किंवा इतर पाश्चात्य राष्ट्रे… यांनी जगावर अक्षरशः लादलेली त्यांच्या पद्धतीची ‘भांडवलशाही’ कितपत ‘व्यक्तिस्वातंत्र्या’ची बूज राखते? त्यांच्या काॅर्पोरेट-क्षेत्रात तर, ‘Corporate-Terrorism’ चा प्रचंड नंगानाच जगभरात चालू आहे. त्याविरुद्ध, हे असले उजवे ‘अतिशहाणे’ काही बोलणार आहेत का कधि… की, आता काही छोट्या राष्ट्रांपेक्षाही अधिकची वार्षिक उलाढाल नोंदवणार्‍या बड्या, महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्या, या ‘‘टू बिग टू फेल’’ झाल्यामुळे आपण, त्यांनी कितीही अन्याय-अत्याचार-शोषण केलं तरी, त्यांची गुलामगिरी स्विकारत त्यांच्यापुढे ‘शरणागत’च रहायला हवं, असं म्हणणार?

…ज्यापद्धतीने, ‘कर्मसिद्धांत’ आपल्या सोयीने अतिशय चुकीच्या पद्धतीने, या उजव्या लोकांनी भोळ्याभाबड्या बहुजनांना सांगून हजारो वर्षांची गुलामगिरी खुबीने त्यांच्यावर बेमालूम लादली… तशाच स्वरुपाची, कितीही आणि काहीही अन्याय-अत्याचार झाला तरी, ‘‘प्रतिकारशून्य राहून पराभूत मानसिकता जाणिवपूर्वक निर्माण करणारी, ही शरणागतीची सूचना आहे’’, एवढंच!

**काॅमेडियन म्हणून युक्रेनियन अध्यक्षांना हिणवू पहाणार्‍यांना म्हणावंस वाटतं, ‘‘जे गांभीर्य, जी राष्ट्रीय समज, जे देशप्रेम त्यांच्याकडे आहे… तेवढं, राजकारणात आयुष्य घालवणार्‍या तुमच्या नेतेमंडळींकडे नाही. पाकिस्तानचा पंतप्रधान, एक क्रिकेट खेळाडू म्हणून, त्यालाही तुम्ही हिणवणार का? उलटपक्षी, अशा ‘हटके’ राष्ट्रप्रमुखांकडेच एक स्वतंत्र, सुस्पष्ट, निरोगी दृष्टिकोन असू शकण्याची शक्यता अधिक असते.

**बाकी, ‘रशिया’चं वकीलपत्र घेतल्यासारख्या (खरंतरं, हे वकीलपत्र, ‘दादागिरी’ करणाऱ्या तमाम ‘वर्चस्ववादी’ प्रवृत्तींचं आहे… या क्षणाला फक्त, ती जागा चीन-अमेरिकेऐवजी रशिया भूषवतोय, इतकंच) समाजमाध्यमांतील बाष्फळ विधानांची जराही दखल घेण्याची गरज आम्हाला वाटत नाही… कारण, ते मुद्दे सहजी खोडून काढता येतील; पण, या असल्या, मेंदू ‘व्यवस्थे’कडे गहाण ठेवणार्‍या विचारवंतांच्या नादाला लागण्यात काहीही अर्थ नसतो, एवढं तरी ‘शहाणपण’ आमच्यात नक्कीच आहे…

…जेव्हा, निसर्ग-पर्यावरणीय महासंकटांच्या पार्श्वभूमीवर माणसातलं ‘माणूसपण’ जागं करण्याची गरज असताना… जागतिक तापमानवाढ नियंत्रित ठेवण्याकामी ‘कार्बन-ऊत्सर्जन’ रोखण्यासाठी वैश्विक-पातळीवर सामंजस्य राखून अर्थव्यवस्थेत व जीवनशैलीत फार मोठे क्रांतिकारक बदल घडवून आणण्याची तातडीची गरज असताना… संभाव्य आण्विक युद्धासारख्या मानवाच्या ‘अमानवीय’  निर्बुद्ध व संवेदनाशून्य कृतिने निर्जीव, तप्त ग्रहाच्या दिशेकडे होऊ शकणारी पृथ्वीमातेची फरफट, आपण रोखण्यासाठी आजच भूमिका घ्यायची की, ‘‘आजचं मरण उद्यावर ढकलायचं?’’ ….कारण, ही आण्विक युद्धाची सुरसुरी आज पुतिन नावाच्या ‘रा(क्ष)सपुतिन’ला आलीय, उद्या ती अन्य कोणाला येतच राहील… सबब, कोणाच्या कसल्या राष्ट्रीयहित-अनिवार्यतेची वगैरे बाष्फळ कलमबहादुरी न गाजवता अथवा भाकड चर्चा न करता… ‘मानवीमूल्य’, मानवी अधिकार तसेच निसर्ग-पर्यावरण जपणारी ठोस, सडेतोड भूमिका घेण्याची, हीच वेळ आहे…

आणि, पृथ्वी ही काही नोकरी, धंदा, उद्योग-व्ययसाय अथवा केवळ कुठलं करिअरकरण्यासाठी नसून (सत्ताधार्‍यांच्या आणि भांडवलदारांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तर, नाहीच नाही); फक्त आणि फक्त, सुखासमाधानाने साधं जीवन जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी आहे, हे नीट जाणून घेत… आपापल्या राष्ट्रीयत्वाच्या, राष्ट्रीयहिताच्या मर्यादित रिंगणापलिकडे जाऊन वैश्विक-नागरिकत्वाची एक जबाबदार भूमिका आपल्यापैकी प्रत्येकाने निभावणं, ही आताच्या पर्यावरणीय-महासंकटंग्रस्त काळाची तातडीची गरज आहे… धन्यवाद!

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)