‘‘युक्रेन जर ‘नाटो’चा (NATO) सदस्य झाला तर, ‘नाटो’च्या कराराप्रमाणे अमेरिका आपले सैनिक, मिसाईल आणि अगदी अणुबॉम्ब युक्रेनमधे ठेऊ शकणार आहे… शिवाय, नाटोच्या करारानुसार नाटोच्या कोणत्याही देशावर जर हल्ला झाला तर नाटोमधील सर्व देश एकत्र येऊन त्या देशाविरुद्ध युद्ध करु शकतात… रशियाविरुद्ध जगातील ३०पेक्षा जास्त देश असा सामना सुरु होऊ शकतो… जे रशिया कसं स्विकारणार आहे?’’… अशी, पुतिनच्या रशिया-समर्थनाची आगाऊ आणि अगोचर भूमिका घेणारे काही अतिशहाणे, जेव्हा आता, चीन भारताला ‘QUAD’ {Quadrilateral Security Dialogue) वरुन धमकवायला लागलाय की, ‘‘QUAD म्हणजे, ‘एशियन-नाटो’च होय, त्यामुळे, आमच्या चीन देशाच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झालेला आहे’’… तेव्हा काय, आक्रमक रशियाची घेतली तशी, चीनची बाजू घेणार आहेत काय? या मुद्द्यावरुन उद्या चीनने भारतावर आक्रमण केले तर, आज रशियाची बाजू घेतायत तशी चीनची बाजू घेणार आहेत काय??…हा मोठा यक्षप्रश्न आहे आणि त्या रशियासमर्थक अतिशहाण्यांनी याचं उत्तर द्यावंच!
केवळ, ‘‘१९९१ पूर्वीचा USSR पुन्हा निर्माण करणारा नेता’’, या आपल्या छुप्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी युक्रेनवर आक्रमणाचं काहीबाही ‘निमित्त’ शोधणार्या ब्लादिमीर पुतिनसारख्या क्रूर व युद्धखोर हुकूमशहाला समर्थन देणं… हे, आजवरच्या आंतरराष्ट्रीयस्तरावरील राजकारणातील भारतीय नैतिक भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहेच.
भारत, हा QUAD मधील (अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान) एकमात्र देश आहे की, ज्याची उत्तर सीमा चीनला भिडलेली आहे आणि चीन, हा भारतासाठी १९६२च्या भारत-चीन युद्धानंतर भारताच्या संरक्षणासंदर्भातच नव्हे; तर, अस्तित्वासाठीही सर्वात मोठा धोका बनलेला आहे आणि, त्यापासून, आपल्या देशाच्या संरक्षणासाठी प्रसंगी, केवळ अमेरिकाच मदतीला धावून येऊ शकते, रशिया नव्हे (जे आपण १९६२ साली अनुभवलंय)! …म्हणूनच, सध्याची रशियन-समर्थनाची सर्वच दृष्टीने चुकीची भूमिका, भविष्यात आपल्यासाठी आत्मघातकीही ठरु शकते.
सरतेशेवटी, प्रत्येक सार्वभौम राष्ट्राला कुठल्या राष्ट्राशी कशाप्रकारची दोस्ती करायची… याचा, सारासार निर्णय घेण्याचा अधिकार मान्य हा करावाच लागेल. तोच अधिकार आज युक्रेन एवढा महाप्रचंड विध्वंस सोसून बजावू पहातोय, हे कमालीचं कौतुकास्पद आहे. पोलंडच्या भेटीवर आलेल्या अमेरिकन अध्यक्षांनी वाॅर्सा (पोलंड) मधील भाषणात सुस्पष्टपणे सांगितलं की, ‘‘रशियाचा विध्वंस करण्याचा नाटोचा कोणताही विचार नाही’’, एवढ्यावर ब्लादिमीर पुतिन यांनी समाधान मानून व युक्रेन ‘नाटो’चा सदस्य होणार नाही, या युक्रेनियन अध्यक्षांच्या आश्वासनावर विसंबून राहीलं पाहीजे… दुसरातिसरा पर्याय नाही; कारण, हे रशिया-युक्रेन युद्ध व्यक्तिशः ब्लादिमीर पुतिन यांचे आहे, ते रशियन जनतेच्या हितासाठी किंवा त्यांच्या ‘सार्वमता’नुसार (निदान, १९१४ मधील क्रिमियावरील आक्रमणात रशियन अधिपत्याखाली तोंडदेखलं का होईना पण, तेथील जनतेचं ‘सार्वमत’ किंवा Referendum घेतलं गेलं होतं) बिलकूल चाललेलं नाहीच! तिसरं आण्विक-महायुद्ध, हा कुणी जिंकण्याबिंकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही… सगळेच त्यात नष्ट होतील, हे सांगायला कुठल्या कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही.
तेव्हा, भारतासह (भारतातल्या डाव्या पक्षांनीसुद्धा) सर्वांनीच आता उशिरा का होईना रशियन नेतृत्त्वाचा तीव्र निषेध करायलाच हवा, मग त्यासाठी कितीही व्यापारी अथवा लष्करी नुकसान सोसावं लागलं तरी चालेल… कारण, असं ‘न’ करण्यातून जो संदेश जगभरात जातोय त्यातून होणारं सर्वच प्रकारचं नुकसान खूप मोठं असेल आणि ते भारताच्या आजवरच्या आंतरराष्ट्रीय नैतिक भूमिकेला भविष्यात खूप घातकी ठरेल.
पं. जवाहरलाल नेहरुंच्या काळापासून पौर्वात्य समृद्ध आध्यात्मिक वारसा लाभलेल्या भारताकडून जगाच्या कायमच वेगळ्या अपेक्षा राहीलेल्या आहेत आणि त्या तशा असणं, योग्यच होय. तिसरं महायुद्ध जगाच्या उंबरठ्यावर आणून ठेवणार्या १९६२च्या क्यूबन-संघर्षात जाॅन केनेडी, निकिता क्रुश्चेव्ह आणि फिडेल कॅस्ट्रो या तिन्ही संबंधित राष्ट्रप्रमुखांशी असलेल्या आपल्या दृढ वैयक्तिक संबंधांचा कौशल्यपूर्ण वापर करत पं. नेहरुंनी NAM (Non-Aligned Movement)चा आधार घेत पडद्यामागे राहून केलेली राजनैतिक शिष्टाई फारच फलदायी ठरली होती, हा इतिहास कसा विसरुन चालेल?
‘‘भांडवलखोर-नफेखोर आणि म्हणूनच युद्धखोर’’, अशा आजच्या ‘अस्वस्थ’ जगाला ‘‘अमन शांती व शांतिपूर्ण सहजीवनाचा मार्ग… गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, म. गांधी, पं. नेहरु, ओशोंसारखे ‘शांतिदूत’ जगाला देणारा, केवळ भारतचं दाखवू शकतो, ज्याने कधिही कुणावरही गेल्या २५०० वर्षाच्या ज्ञात इतिहासात सीमोल्लंघन करत आक्रमण केलेलं नाही’’… अन्य, कुठल्याही राष्ट्राची ती औकात नव्हेच!
…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)