ज्योतिराव फुले: भारतीय इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व

११ एप्रिल १८२७ रोजी, सावतामाळी या शूद्र जातीतल्या  ‘गोर्‍हे’ कुटुंबात गोविंदराव व चिमणाबाईंच्या पोटी समतेची आणि सत्यशोधनाची ‘ज्योत’ घेऊन ‘ज्योति’राव जन्माला यावा आणि त्याच दिवशी पुण्याच्या पेशवाईचा (जरी, पेशवाई १८१८ साली राजकीयदृष्ट्या शनिवारवाड्यावर ‘युनियन जॅक’ फडकावून इंग्रजांनी संपुष्टात आणली होती) ‘मेरुदंड’ असलेला शनिवारवाडा आगीत जळून पूर्णतया भस्मसात व्हावा… हा नियतीचा एक अजब, विलक्षण ‘संकेत’ असला; तरीही, म. ज्योतिबा फुल्यांनी आयुष्यभर ब्राह्मणांचा द्वेषच केला, हे असं म्हणायचं; तर मग, “ख्रिस्त, महंमद, मांग, ब्राह्मणासी धरावे पोटासी बंधू परी”, हे असं कुणी लिहीलं?

स्वत:च्याच घरातील विधवा, निराधार ब्राह्मण स्त्रियांवर चार भिंतीत अत्याचार केल्या गेलेल्यानंतरची त्यांची बाळंतपणं कुणी केली? त्यांनी स्वत: दत्तक घेतलेला मुलगा ‘यशवंत’ कोण होता? जोतिबा आणि सावित्रीमाई यांना शेणगोटे कुणी मारले? ते मारणाऱ्या एखाद्याचा तरी ज्योतिराव-सावित्रीमाईंना मिळून मरणाचा द्वेष असता; तर, त्यांना ‘धडा’ शिकवण्यासाठी फुलेंनी एक तरी ‘नथ्थ्या’ तयार नसता केला का?

….ते तर, त्यांना सहजशक्य होतं. बालपणी आईवडिलांकडून मुलं जगावीत म्हणून, काही नवस बोलला गेल्याने, बायकी वळणाचा पोषाख, ‘नथ’ घातला जाणारा म्हणून ‘नथुराम’… म्हणूनच, हे असं विचित्र नाव, त्यापूर्वी किंवा त्यानंतर ते तसं नाव, कुठेही आढळत नाही. त्यामुळे, बालपणापासूनच एका न्यूनगंडाने पछाडला गेलेला तो नथ्थू, आपला ‘पुरुषार्थ’ नि:शस्त्र महात्म्याची हत्या करुन सिद्ध करता झाला, असा एकूण प्रवाद आहे. तेव्हा, त्या नराधमाच्या नावात ‘रामा’चा उच्चार तरी कशासाठी व्हावा?

असो, म. फुलेंचा विचार केवळ ब्राह्मणेतर नजरेने पाह्यला जाऊ नये; खरंतरं, तो ‘फुले-विचार’ म्हणजे, सर्व जातीजमातींच्या भल्यासाठी असलेलं सर्वंकष ‘सत्यशोधकी तत्त्वज्ञान’च होय. फुले-दांपत्य केवळ, महिला-शाळांपुरतेच मर्यादित नाही… ते त्यापलिकडे कितीतरी व्यामिश्र पसरलेले आहे. प्रथमतः शिवरायांची समाधी शोधणारे व शिवजयंत्योत्सव साजरा करणारे किंवा पहिलं शिवचरित्र लिहीणारे व पोवाडा गाणारे, ते म. फुले… इथपर्यंत आपला फुले-परिचय बहुधा मर्यादित असतो; पण, २८ नोव्हेंबर-१८९० या दिवशी महात्मा फुले वारले आणि त्यानंतर, शिवछत्रपतींचा खरा इतिहास आपल्याला पारखा झाला, हे आपण नीट समजावून घेत नाही! आपल्या राजाचा उत्तुंग इतिहास दडपून ठेऊन राजकीय सोयीनं खोट्या इतिहासाची मांडणी… प्रवचनं, पोवाडे आणि पुस्तकांच्या रुपाने जी, म. फुल्यांच्या मृत्यूनंतरच एकदा सुरु झाली, ती दुर्दैवाने, बहुजनांच्या आळसामुळे व अभ्यस्त न रहाण्यामुळे आजही सामाजिक-राजकीय पीडा थांबायला तयार नाही!

“फुले वाॅज फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह रिव्हाॅल्युशनरी ऑफ इंडिया, आफ्टर गौतम बुद्ध”, असं एका मोठ्या राजकीय विचारवंतानं १९४५ सालीच लिहून ठेवलंय.

“फुले, हे ऑब्जेक्टिव्ह मटिरियल रियालिटी”त स्वत:ला गाडून घेऊन रचनात्मक काम करणारे होते. खरंतरं, साम्यवाद्यांनाही असं जमिनीवरचं काम करुन, ते मुठीत पक्कं धरुन ठेवता आलं असतं… पण, ते तसं ठेवायला त्यांच्या अतिरेकी पोथीनिष्ठतेमुळे व अव्यवहार्य भूमिकेमुळे त्यांना जमलं नसावं. त्यामुळेच, देशात ढोंगी, बेगडी ‘हिंदुत्वा’च्या बिरुदाखाली ‘उजव्या’ विचारसरणीच्या लोकांचं चांगलंच फावलं… आणि, त्यातूनच, महाराष्ट्रात मराठी माणसाचा ‘अवसानघात’ करणारे ‘उजव्या’ विचारसरणीचे राजकीय पक्ष आणि संघटना फोफावू शकल्या (ज्या, मराठी माणसांच्या नावाने जन्मल्या, वाढल्या आणि त्यांचाच, विश्वासघात करत्या झाल्या)!

सद्यस्थितीत, शाहू, फुले, टिळक, गांधी, नेहरु, पटेल, आंबेडकर, सुभाषचंद्र बोस इ. प्रत्येक महापुरुषाच्या नावाने अनेकांनी आपली राजकीय-दुकाने व्यवस्थित थाटलेली आहेत आणि ती आजच्या कोविड-१९ व त्याच्या विविध उत्परिवर्तित विषाणूजन्य साथीच्या काळातही जोरात चालू आहेत. त्यातली अनेक राजकीय दुकाने, ‘फुले-दांपत्या’च्या पुण्याईचा गैरवापर करुन आजही तूफान चाललीयत. त्यामुळेच, या एकूणच महापुरुषांसंबंधाने जाणिवपूर्वक निर्माण केले गेलेले सगळे वाद… वैचारिक वगैरे अजिबात नसून, दोनचार राजकीय-दुकानदारांमधले ते गाजलेले व प्रसंगी संबंधित सर्वांच्या राजकीय फायद्यासाठी मुद्दाम गाजवलेले वाद आहेत, इतकंच फक्त!

थोडक्यात, “गांधी, पटेल, सुभाष, नेहरु, बाबासाहेब गेले; पण, हे ‘दुकानदारसाहेब’ मात्र, जायचेच राहून गेले”… आणि, ते तसे कधि जाणारही नाहीत; कारण, ‘दुकानदारी’ परंपरेने चालणारी गोष्ट आहे!आपलं प्राॅडक्टच कसं चांगलं, दुसर्‍याचं कसं वाईट आणि आपणच कसे आपल्या प्राॅडक्टचे अधिकृत विक्रेते आहोत, आपली कुठेही ‘शाखा’ नाही… ही अशी, उघडीनागडी नफेखोर व्यापारी भाषा आणि स्पर्धा, इथे चालते. भाबडे, अज्ञानी लोक… याला विचारसरणी वगैरे समजतात.

फुल्यांची ‘ब्राह्मणद्वेषी’ भासवली गेलेली भाषा, ही उत्तरपेशवाईमधल्या ब्राह्मणशाहीतल्या भयंकर अन्याय-अत्याचाराविरुद्धची स्वाभाविक व नैसर्गिक प्रतिक्रिया होती. मात्र, “द्वेषाचे निर्मूलन, द्वेषाने होत नसते; हे त्या ‘जाणत्या’ने ओळखले होते. म्हणूनच, ब्राह्मण समाजाने तुमच्यावर अत्याचार केले म्हणून, तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करा”, असं ते कधीच बोलले नाहीत. उलट जर, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक समानता येणार असेल तर, पिढ्यानपिढ्या झालेले अत्याचारही आम्ही विसरायला तयार आहोत…” ही आभाळाएवढ्या उंचीची भूमिका घेणारा ज्योतिराव, एक ‘महात्मा’ होता!

विधवा विवाहबंदी, शिक्षणबंदी, विधवा केशवपन, पादत्राणे वापरावयास बंदी… अशा अनेक गुलामीच्या अमानुष शृंखलांमध्ये तत्कालीन ‘स्त्री’ अडकलेली होती. ‘पुनर्विवाह बंदी’ला सहाय्यभूत होणारी, ब्राह्मण जातीतील विधवा स्त्रिच्याच्या ‘केशवपना’ची ओंगळ, विकृत प्रथा मोडीत काढण्यासाठी ज्योतिबांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला होता, हे विसरुन चालेल? ज्योतिबांनी विधवा-विवाह चळवळ सुरु केली, ती कोणासाठी?

न्या. महादेव गोविंद रानडे यांची बहीण, विधवा म्हणून परत आली, त्यावर ज्योतिबा आपल्या समाजसुधारक मित्राला, न्या. रानडेंना म्हणाले, “महादेवराव, ही तर समाजसुधारणेची फार मोठी संधी या कौटुंबिक संकटात चालून आलीय. तुम्ही बहिणीचा पुनर्विवाह करुन द्या.”…

मनातून ज्योतिबांचा सल्ला पटत असूनही तेव्हा, कुटुंबियांकडून होणार्‍या संभाव्य विरोधामुळे न्या. रानडेंची तशी हिंमत झाली नाही आणि त्यांनी स्वतःच्या बहिणीचा पुनर्विवाह टाळून तिच्यावर एकप्रकारे अन्याय करणंच पसंत केलं. याच, न्या. रानडेंनी स्वतः मात्र आपली पत्नी वारल्यानंतर ३२ व्या वर्षी ११ वर्षीय मुलीशी पुनर्विवाह केला होता.”कथनी आणि करनी” यात फरक नसणारा, ज्योतिबा, हा एक दुर्मिळ ‘अवलिया’च!

बाल-तरुणवयात विधवा झालेल्या ब्राह्मण जातीतील स्त्रियांच्या निसर्गसुलभ भावनांचं दमन करणारी ‘पुनर्विवाह बंदी’ धर्ममार्तंडांकडून लादली गेल्यामुळेच, काही स्त्रियांकडून होणार्‍या तारुण्यसुलभ चुकांची (त्या, चुका तरी कशा म्हणणार?) परिणती म्हणून होत असलेले गर्भपात, बालहत्या, आत्महत्या टळाव्यात म्हणून, अशा महिलांसाठी  महात्मा फुलेंनी १८६३ मध्ये ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ स्थापन केले. तिथे अशा स्त्रिया गुपचूप आपले ‘समाजमान्यता’ नसलेलं बाळंतपण आटोपून स्वतःच्या व जन्मलेल्या बाळाच्या जीवासह, स्वतःसोबत घराण्याचीही इज्जत वाचवत होत्या, बदनामी टाळत होत्या. आज हे निदान ऐकण्यास तुलनेनं काहीसं सहज जरी वाटत असलं; तरी, दिडशे वर्षांपूर्वीचा महाकर्मठ व दांभिक काळ आठवून कल्पना करा… आजही, अशा काही सामाजिक सेवासुविधा उभारणं, बिलकूल सोपं नाहीच! आपल्याच जातीत जन्मलेल्या स्त्रियांच्या, या अडचणी ब्राह्मण समाजातील कुण्या तत्कालीन समाजसुधारकास दिसल्या नाहीत अथवा दिसल्यावरही, त्यावर प्रत्यक्ष कृती करण्याची हिंमत केलेली दिसत नाही.

महात्मा फुलेंनी जातीपातींनी केलेल्या जातीय अपकृत्यांवर पुराव्यासह प्रासंगिक टीका प्रच्छन्न शब्दांत अत्यंत कठोरपणे जरुर केली… पण, कधीच कोणत्या जातीचा ठरवून द्वेष केला नाही किंवा कोणत्याच जातीच्या विरोधात कार्य केले नाही. कोल्हापुरच्या शिवाजीराव या दत्तकपुत्राच्या गादीसंदर्भातील दिवाण माधवराव बर्वे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात, ‘मराठा’चे संपादक लो. टिळकांच्या ‘जामीना’साठी कोणी ‘टिळक-समर्थक’ उभं रहात नसताना ज्योतिरावांच्या सांगण्यावरून त्यांचे मित्र रामशेठ उरवणे यांनी टिळकांना जामीन दिला… एवढचं नव्हे; तर, २६ डिसेंबर-१८८२ रोजी मुंबईच्या डोंगरी कारागृहातून ४ महिन्यांच्या कैदेनंतर त्यांची सुटका झाल्यावर, पुणे येथे ज्योतिबांनी टिळक-आगरकरांचा जाहीर सत्कार केला.

विष्णुशास्त्री चिपळूणकर, हे शेवटपर्यंत ज्योतिबांचे अत्यंत कडवे विरोधक. चिपळूणकरांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला परवानगी मिळत नव्हती. त्यावेळी ज्योतिरावांच्या सांगण्यावरून डॉ. घोले यांनी चिपळूणकरांच्या मृत्यूबद्दल वैद्यकिय साक्ष दिली होती. तसेच, चिपळूणकरांचे डॉक्टर मित्रसुद्धा मृत्यूचा दाखला देण्यास तयार नसताना फरासखान्यात स्वहस्ताक्षरात चिपळूणकरांच्या मृत्यूचा दाखला देऊन ब्रिटीश सरकारच्या फरासखान्याकडून त्यांच्या अंत्यविधीला परवानगी मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, हे ब्राह्मणद्वेषी कसे असू शकतात?

व्यवसायाने फुलांच्या सुगंधाशी बांधल्या गेलेल्या (म्हणूनच, आडनाव ‘फुले’ पडलेले) या ज्योतिराव-सावित्रीमाई दांपत्याला ज्या जातीकडून शेणगोटे खावे लागले होते, त्याच ब्राह्मण जातीतल्या विधवा काशीबाईंच्या मुलाला त्यांनी ‘दत्तक’ घेतले आणि त्याच्या नावे आपली सगळी चल-अचल संपत्ती करुन त्याला चांगले शिक्षण देऊन डॉक्टर बनवले… पण, हे असं सावित्रीमाई-ज्योतिबांचं महान व्यक्तित्व, लोकांपर्यंत यांना कुणाला पोहोचूच द्यायचं नसेल तर?

महात्मा फुले म्हणजे, एक सामाजिक परिवर्तनकारी, शिक्षक, नगरपालिका सदस्य, शिक्षण तज्ज्ञ, पहिला शेतकी अभ्यासक, कामगार नेता, संघटक, कवी-लेखक असं विभिन्न पैलू असलेलं व्यक्तित्व! कुठल्या जातीधर्माला वाहिलेलं त्यांचं कार्य नव्हतं; तर, ते समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी वाहिलेलं होतं.

‘सत्यशोधक चळवळीच्या, सत्यशोधक समाजा’च्या या प्रवर्तकाला ‘अज्ञान, अन्याय, असत्या’चा सगळा अंधःकारच पिऊन टाकण्याची महान ‘तहान’ लागली होती… समता, सत्यावर आधारित न्यायी समाजसत्तेच्या उभारणीसाठी ‘पंचप्राण’ अर्पण करायला आसुसलेल्या, या महात्म्याची ‘प्राणज्योत’, अखेर २८ नोव्हेंबर-१८९० रोजी निमाली… पण, त्यानंतर, ‘फुले’ समजून घ्यायला आणि ‘फुले’ समजून सांगायलाही आपण कमी पडलो… त्यामुळेच, “फुले वेचिता बहरु कळियासी आला”, असं न होता, फुल्यांची ‘सत्यशोधक चळवळ’ बहरण्यात मागे पडली !!!

जाता जाता, म. फुले झोपताना आपल्या उशीखाली, बिछान्याखाली ‘दांडपट्टा’ ठेवीत असत… दिडशे वर्षांपुर्वीच्या सनातनी, कट्टर-कर्मठ रुढीवाद्यांविरोधात नुसतेच ‘दंड’ थोपटून निःशस्त्र उभे नव्हते; तर, शिवछत्रपतींप्रमाणेच अखंड सावध राहून ‘दांडपट्टा’ उगारुन उभे होते…. हे फारच उच्च दर्जाचं ‘शहाणपण’ होय!

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)


{संदर्भ: चंद्रकांत झटाले (अकोला), सोमनाथ कन्नर, राजेंद्र फातर्पेकर वगैरे तज्ज्ञ मंडळींचे समाजमाध्यमातील संदेश व त्यांच्याशी झालेल्या सखोल चर्चा तसेच, समग्र फुले साहित्य}