जय श्रीराम म्हणू नका… जय सियाराम म्हणा, कारण, तेच खरं पिढ्यापिढ्यांचं खास ‘रामा’साठीचं वात्सल्य, प्रेम आणि संवेदनशील असं, उत्तर भारतीय संबोधन होतं आणि तेच मराठीत ‘जय सीताराम’ होतं!
‘जय सियाराम, जय सीताराम’ला मागे सारुन ‘जय श्रीराम’सारखं काहीसं उग्र स्वरुपाचं राम-संबोधन, कधितरी लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेच्या काळाच्या आसपास उत्तर भारतात प्रसवलं, पसरवलं गेलं असावं… ते ही अगदी जाणिवपूर्वक! मुस्लिमांवर एकप्रकारे मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी, दहशत बसवण्यासाठी बनवलेलं असं रामाचं उग्र, रागीट स्वरुपाचं संबोधन, तत्पूर्वी फारसं भारतात कुठे प्रचलित नव्हतंच कधि!
आमची ‘सीता’माई किंवा ‘सीता’मैय्या, आली की, कारुण्य, प्रेम, वात्सल्य आपोआप तिच्या मागोमाग आलंच; पण, तिला जर जाणिवपूर्वक टाळलीत आणि खांद्यावर धनुष्यबाण घेतलेला, सीतेविना एकटा ‘राम’ दाखवलात की, तो प्रातःस्मरणीय असलेला, ममत्व, कुटुंबवत्सल, एकवचनी, आदर्शवत राम… संहारक, उग्र स्वरुपाचा बनलाच म्हणून समजा!
माझे वडील कट्टर मार्क्सवादी आणि म्हणून पूर्ण ‘नास्तिक’ जरी होते; तरी, माझे आजोबा अष्टौप्रहर रामाच्या व श्रीकृष्णाच्या भक्तित रंगलेले एक सच्चे ‘रामकृष्ण-भक्त’, म्हणून माझा आजोबांकडेच अधिक ओढा. आजोबा सांगायचे, “राम हा विष्णुचा ‘पूर्णावतार’ तर, श्रीकृष्ण, हा विष्णुचा ‘परिपूर्ण’ अवतार… म्हणून, रामाच्या व्यक्तित्वात काही दोष आपल्याला उघड दिसतात; पण, श्रीकृष्णाच्या व्यक्तित्वात, व्यवहारात तसा दोषपूर्ण लवलेशही आढळत नाही आणि म्हणूनच, ‘अपूर्ण’ अथवा दोषपूर्ण रामाला सहसा एकटा दाखवला जात नाही, ती ‘अपूर्णता’ भरुन काढण्यासाठी कायम तो लक्ष्मण, सीता व हनुमानासमवेतच दाखवला जातो… पण, विष्णुचा ‘परिपूर्ण’ अवतार असलेला श्रीकृष्ण मात्र, त्याच्या ‘स्वयंभू पूर्णत्वा’ने एकटा दाखवण्याची पूर्ण मुभा आहे, तसा तो अनेकदा हाती ‘सुदर्शन चक्र’ घेऊन दाखवलाही जातो!”
…असो, अयोध्येला ‘राममंदिर’ वगैरे बांधून रामाच्या नावावर फक्त, ‘मतां’चा जोगवा’ मागणारे… पण, प्रत्यक्षात जनकल्याणकारी ‘रामराज्या’ऐवजी… अस्मानाला भिडलेली महागाई, बेरोजगारी-अर्धरोजगारी, बेलगाम खाजगीकरण, ढासळती अर्थव्यवस्था लपवण्यासाठी दंगलप्रवण धार्मिक-उन्मादाचं ‘रावणराज्य’ उभं करणार्या” ‘लुच्च्या’ रामभक्तां’ची ‘जय सियाराम किंवा जय सीताराम’ऐवजी, ‘जय श्रीराम’, ही एक फसवी राजकीय चाल आहे, बस्स्… त्यात, जातिवंत ‘भावभक्ति’ अभावानेच आढळेल!
इथे ‘रामजन्मा’बाबत एक मजेशीर गोष्ट अशी की, प्रा. राम पुनीयानींसारख्या इतिहास संशोधकाच्या म्हणण्यानुसार, “अयोध्येच्या परिसरात आजमितीस अस्तित्वात असलेल्या अनेक छोट्यामोठ्या राममंदिरातील कुठल्याही मुख्य पुजार्याला विचारलंत तर, तो छातीठोकपणे ‘राम’ इतरत्र कुठे नव्हे; तर, आपल्याच मंदिरस्थळी जन्मल्याचं सांगतो”, म्हणजे, एकूणच ‘रामजन्मस्थळा’बाबत नाही म्हटलं तरी, थोडं संभ्रमाचंच वातावरण आहे.
बरं, सभोवतालचं वातावरण, जागतिक तापमानवाढीने एवढं आधीच तापलेलं असताना, अंगाअंगाची काहिली होत असताना (सर्वसामान्यांना तुमच्यासारखे सर्रास AC कुठून परवडणार?)… “भोंगे आणि आणि सोयिस्कर राजकीय सोंगे” यामुळे, सर्वसामान्यांच्या जगण्याची ‘कोंडी’ करणारे मूलभूत, गंभीर विषय साफ बाजुला टाकून, हकनाक राजकीय वातावरण तापवलं जातंय. या सध्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणात, प्रत्येक मराठी मनाला पडलेला एक प्रश्न असा की, अतिशय प्रभावी रचना असलेलं संत रामदासस्वामीकृत ‘मराठी’ श्रीहनुमानस्तोत्र मागे पडून (‘जय सियाराम, जय सीताराम’ सारखंच) महाराष्ट्रात उत्तर भारतीय ‘भैय्यां’चा खास असलेला ‘हनुमानचालिसा’ कसा काय पठण केला जातोय… त्यामुळे, संबंधितांनी रामदासस्वामींना सुट्टी दिली समजायची की, ‘मराठीत्वा’ला बुट्टी दिली म्हणायची?
कारण, “हिंदुत्व आणि मराठीत्व”, या दोन्ही परस्पर विरोधी बाबी आहेत… “हिंदुत्वाचं पाणी ओतलंत की, ‘मराठीत्वा’ची आग विझलीच समजा!”
…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)