दंगली करण्यात, सध्या ‘मुस्लिम/ओबीसी’ अनेकठिकाणी आघाडीवर दिसतात… कारण, अनुसूचित जाती-जमातीचे (SC/ST) तरुण आता थोडेबहुत शहाणे व्हायला लागलेत म्हणून, हल्ली, स्वतःच्या घरातली व जवळची पोरंबाळं सुरक्षित घरी आहेत, हे नीट तपासून, “पेटवा रे पेटवा” असं नेतेमंडळींनी म्हटलं तरी, सहजी दंगली पेटत नाहीत आणि चुकूनमाकून पेटल्या तरी चारपाच दशकांपूर्वी वेड्यावाकड्या पेटायच्या तशा पेटत नाहीत, पेटणार नाहीत….
सत्यपरिस्थिती ही आहे की, या बहुजन समाजातील तरुण मंडळींना आपल्या ‘नादी’ लावणारी… ही प्रस्थापित किंवा प्रस्थापित होऊ पहाणारी राजकीय नेतेमंडळी खाजगीत, या बहुजन पोरांविषयी काय बोलतात, हे कुणीतरी त्यांना ऐकवायलाच पाहीजे (अर्थात, तरीही या बहकलेल्या तरुणाईच्या डोक्यात काही प्रकाश पडेल, याची आशा करणं बव्हंशी व्यर्थच असलं तरीही)….
या सर्व जातधर्माच्या नावाने (बहुतेक सगळीच नेतेमंडळी यात आली, विशेषतः, ‘घराणेबाज’ नेतेमंडळी) राजकारण करणाऱ्या नेतेमंडळींच्या मते, “या बहुजन पोरांच्या अकला ‘गुडघ्या’त असतात, त्यामुळे त्यांना ‘टिश्शूपेपर’सारखं वापरुन फेकून द्यायचं आणि आपलं राजकारण पुढे रेटत रहायचं… ही पोरं, खालच्या स्तरावर कसल्या तरी निमित्ताने अन्यथा, निमित्त शोधून किडूकमिडूक पैसे लाटून किंवा, ‘खंडण्या’ गोळा करुन पोटं भरत रहातात आणि कधितरी जास्तच अंगाशी आलं तर, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाऊन वा तुरुंगात सडून संपतात… पण, आपलं राजकारण त्यांचा असा ‘बळी’ देऊनच पुढे सरकवायचं असतं आणि ते अशारितीने, एकदा का ‘बाद’ झाले की, पुढची तरुणाईची फळी नव्याने ‘भरती’ व्हायला तयार असतेच. मग, कुठलं तरी पद त्यांना चिकटवून द्यायचं (साधं ‘इमारत-प्रतिनिधी’ म्हटलं तरी, त्यांची खंगलेली टिनपाट छाती वर येते) आणि ती तशी भरपूर हजारोंनी पदं तयार करता यावीत म्हणून, पक्षाचे असंख्य वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळे विभाग काढायचे, काढत रहायचे, बस्स्.”
दुसरं राजकारणाचं तत्त्वं म्हणजे, “ज्या पक्ष पदाधिकाऱ्याविषयी पैसे खाण्याच्या, खंडण्या गोळा करण्याच्या जास्त तक्रारी येतील… त्यालाच बढती देऊन मोठा करायचा” म्हणजे, ‘पक्षनिधी’ आणि पक्षाचा दरारा म्हणे, मोठा होत जातो!”*
…..आता सांगा, यातून “मराठी समाज घडेल की, साफ बिघडेल???” आज तो त्यामुळेच, साफ बिघडून नीतिशून्य झालाय आणि म्हणूनच, म. फुलेंच्या शब्दात, “नितीविना मति, मतिविना गति जाऊन”, स्वतःच्याच महाराष्ट्रात दिशाहीन व बरबाद झालाय!
मात्र, त्यांची ही नेतेमंडळी आणि त्यांचे बगलबच्चे, शेकडो कोटींचा ‘भांडवली-खेळ’ महाराष्ट्राच्या छाताडावर केव्हाचेच खेळायला लागलेत!
ही असली नेतेमंडळी, आपल्या सैनिकांना, सभासदांना चुकूनही कधि ‘जनलोकपाल’ अथवा ‘अर्थक्रांती-विधेयका’सारख्या आंदोलनात, ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरोधातील मोहिमेत उतरवताना किंवा सन्मानजनक ‘किमान-वेतना’चा (आजच्या घडीला रु.३० हजार ते रु.३५ हजार) आग्रह धरण्यासाठी त्यांच्यात जागृती निर्माण करताना मुळीच दिसणार नाहीत आणि गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रात कधि दिसली नाहीत!
फक्त, भांडवलदारांची दलाली करुन मराठी माणसांना अगदीच झालं तर, “पोटाला लावताना दिसतील (म्हणजे, ‘अर्धरोजगारा’पेक्षाही खराब हालत)” आणि वरं, कोणी तुटपुंज्या पगाराविषयी तक्रार केली तर, “××××, दिलीय ती नोकरी कर, नाहीतर, रस्त्यावर उपाशी मरशील”, ही धमकी देणार (कारण, म्हणे, “कारखाना जगला तरच, कामगार, जगेल”… जसं काही कामगारांखेरीज, कोणालाच कारखान्यांची गरज नाही. जेव्हा, कामगारांपेक्षाही, या सगळ्या भांडवली-व्यवस्थे’ला “साथ आणि हात” देणाऱ्यांना त्याची जास्त गरज असते. कामगार काय, शेतात हात काळे करुनही, रस्त्यावर खड्डे खोदूनही कसंही पोट भरेल)
थोडक्यात, अशा ‘आदेश-संस्कृति’नं महाराष्ट्राच्या बुद्धीचा आणि सारासार विवेकाचा घात झाला!
“काळाच्या ओघात, जो समाज मागे पडतो, पडलेला असतो… त्याचे स्वतःचे काही अंगभूत दोष, दुर्गुण असतातच; ते नाकारुन किंवा त्यावर इलाज न करता, त्याच्याकडे ‘डोळेझाक’ करुन आपल्याला त्याला ‘समाज’ म्हणून, फारसं पुढे नेताच येणार नाही… महाराष्ट्रातला, मराठी कामगार-कर्मचारीवर्ग मागे पडला, देशोधडीला लागला, १०×१० च्या नगरांमध्ये त्याचा श्वास कोंडला गेला, त्याची नोकरीची शाश्वती संपली, कधि ‘मराठीत्व’ तर, कधि ‘हिंदुत्व’ अशा दोन टोकांवर तो कायम लंबकासारखा टोलवला जात राहीला….. हे सगळं आक्रित, उपरोल्लेखित अवगुणांमुळेच, दोषांमुळेच घडलं… दोष केवळ नेत्यांचाच नाही; तर, मराठी पोरांचा आणि त्यांच्या आईबापांचाही आहेच!”
…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)
ही पोस्ट बहुजन तरुणांच्या आईबापांसाठी –
मंडल आयोग, रथयात्रा, बाबरी पतन, ९२-९३ च्या मुंबई दंगली, नामांतर आंदोलन या जागतिकीकरण स्वीकारायच्या आधीच्या आणि नंतरच्या एकूण ५-६ वर्षातल्या काळात घडलेल्या आंदोलनात आणि दंगलीत महाराष्ट्रातील लाखो मराठा, महार, मुसलमान, OBC तरुणांची दंगलखोर म्हणून पोलीस दफ्तरी गुन्हेगारी नोंद झाली आणि नव्याने स्वीकारलेल्या जागतिकीकरणात पटापट नोकऱ्या निर्माण होत असताना या लाखो तरुणांना हातात डिग्री असूनसुद्धा बेरोजगार राहावे लागले.
याच काळात पुण्या-मुंबईतून कॉम्प्युटरची डिग्री सोडा, अवघे काही महिन्याचे सर्टिफिकेट कोर्स केलेले प्रामुख्याने ब्राम्हण समाजातील तरुण या सर्व कोलाहलात सहभागी न होता अमेरिकेत, युरोपात नोकऱ्या करायला अक्षरशः झुंडीने जायला लागले. पुण्यात पेठेत १० बाय १० च्या खोलीत राहणाऱ्या या कुटुंबांनी पुढे याच पोरांनी अमेरिकेतून कष्ट करून पाठवलेल्या पैशातून प्रभात रोड, कोथरुड, एरंडवणे भागात चांगली घरे आणि गाड्या घेतल्या. जागतिकीकरणाचा खरा फायदा या तरुणांनी करून घेतला.
आज जेव्हा अमेरिकेचे नागरिकत्व किंवा ग्रीन कार्ड घेतलेली ही ९०-९२ सालची तरुणाई (आजची पन्नाशी ओलांडलेली पिढी) जेव्हा भारतात सुट्टीसाठी काही दिवस येते तेव्हा त्यांना रिक्षा किंवा ओला-उबर मध्ये फिरवायला, त्यांची व्यवस्था बघायला त्यांच्याच पिढीतील दंगली-आंदोलनात वाया गेलेली बहुजनांची पिढी लाचारपणे हजर असते. आजही आपल्याकडे पानटपऱ्या चालवणारे पन्नाशीतले बहुजन लोक आशिकी, फुल और कांटे ही त्यांच्या उमेदीच्या काळातली गाणी ऐकत बसतात, त्या पोरींच्या आठवणीत ज्या ह्यांच्या बेरोजगारीमुळे दुसरीकडे लग्न करून गेल्या.
आपल्या पोराने जर आयुष्यभर रिक्षा/टॅक्सी चालवू नये, विना अनुदानित शाळेत मास्तरकी करू नये, हमाली करू नये, कर्जबाजारी होवून शेतात फास घेवू नये, उतारवयात कुणापुढे लाचारीने हात पसरू नये असे वाटत असेल ना…. तर सगळ्यात पहिल्यांदा चौकातल्या राजकीय पक्षाच्या आणि संघटनेच्या फ्लेक्सवर दिसणाऱ्या आपल्या पोराच्या एक मुस्काटात फोडा (पोलिसांनी ते करण्यापेक्षा आईबापाने करणे केव्हाही चांगले!) आणि त्याला अभ्यासाला लावा. कुठलाही मोदी, गांधी, पवार, फडणवीस, ठाकरे, भिडे, मुंडे, पाटील तुमच्या घरातील चूल रोज पेटवायला येणार नाहीये. तुमच्या पोरावर केसेस पडल्या तर कुणी जामीन करायला येणार नाहीये.
आजच्या काळात आयुष्यात पुढे जायचे असेल तर तुमच्या पोरा-पोरींचे आदर्श गांधी, आंबेडकर, नेहरू यांसारखे विद्वान आणि विधायक मार्गाने सामाजिक बदल घडवून आणणारे नेते पाहिजेत. तिघेही आधी बॅरिस्टर होते आणि नंतर समाजाला शहाणपण शिकवायला गेले होते. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना वगैरे दलिंदर गोष्टीत, मोर्चात, बैठकीत, मोहिमेत आणि दंगलीत जर तुमचे अर्धशिक्षित कुलदीपक जात असतील आणि तुम्ही त्यांना थांबवत नसाल तर आईबाप म्हणून तुम्ही नालायक आहात आणि तुमच्या पोरांचे सगळ्यात मोठे वैरी आहात! थोडी अक्कल येवू द्या!!!
– डॉ. विनय काटे