“प्राॅफिट आणि प्राॅफेट”…या एकमेकाशी फटकून रहाणार्या ‘परस्परविरोधी’ बाबी आहेत….
उष्माघातामुळे हाजयात्रेत झालेले, एक हजाराहून अधिक निष्पाप बळी… हा आहे, सौदी अरेबियाला ‘जागतिक तापमानवाढी’तून बसलेला एक तडाखा आणि त्यातून नियतीने शिकवलेला धडा!
जो इस्लाम, साधं व्याज आकारु देत नाही आणि अंगमेहनत (मनुष्यऊर्जा) व पशूऊर्जेच्या बळावर साधीसुधी, जीवनावश्यक गरजांवर भर देणारी (जिचं, ‘कार्बन-फूटप्रिंट’ नगण्य असतं व जी मुळातूनच ‘निसर्ग-पर्यावरणस्नेही’ असते) जीवनशैली शिकवतो… त्या इस्लामच्या शिकवणुकीच्या विरोधात जाऊन, खनिज तेलाच्या व्यवसाय-बरकतीतून ओंगळवाण्या श्रीमंतीचा ‘धनी’ झालेल्या सौदी अरेबियासारख्या; तसेच, भारतासकट, जगभरातल्या सर्वच ‘कार्बनकेंद्री भांडवली-व्यवस्थे’वर अर्थकारण चालवणाऱ्या देशांसाठी, हा एक ‘WakeUp Call’ आहे!
खऱ्याअर्थाने, या जगात ‘विकसित’ म्हणावा, असा एकही देश अस्तित्वात नाही… सगळ्यांचीच वाटचाल अंति विनाशाकडे सुरु आहे; फक्त, मध्ये एक भौतिक प्रगती व संपन्नतेचा ‘पडाव’ आलाय एवढंच!
सौदी अरेबिया, हा लौकिक अर्थाने निरतिशय संपन्न देश; तर कोस्टा रिका, जाॅर्डन, कोलंबिया हे तसे गरीब देश म्हणायचे.
कोस्टा रिकामध्ये तर खनिज किंवा जीवाश्म इंधन (तेल, कोळसा, नैसर्गिकवायू), महत्त्वाची खनिजं व धातू सापडत नाहीत, ज्यामुळे सर्वसाधारणपणे भांडवली-संरचनेत श्रीमंती येते. खरंतर, त्यादृष्टीने पहाता ‘भांडवली-परिभाषे’त कोस्टा रिका हा देश, दुर्दैवीच म्हटला पाहिजे…पण, वस्तुस्थिती ही आहे की, वरील सर्वाच्या अभावामुळेच तो देश खूप सुदैवी व आनंदी देश बनलाय. तिथली वीज ही, खनिज पदार्थ जाळून नव्हे; तर, नैसर्गिक-स्त्रोतांचा कल्पक वापर करुन ‘कार्बन-फूटप्रिंट’ कमीतकमी राखून बनते. लोक एकोप्याने व कमीतकमी गरजांवर आधारलेल्या ‘निसर्ग-पर्यावरणस्नेही जीवनशैली’द्वारे आनंदाने जगतात. याउलट नाॅर्वे, स्वीडनसारखे तथाकथित अतिप्रगत देश…आपल्या भौतिक-संरचनेचा परमोच्च बिंदू गाठल्यानंतर, एखाद्या परजिवी बांडगुळासारखे इतर देशांच्या नैसर्गिक-संसाधनांचं अपरिमित शोषण करतच, आपला GDP टिकवून धरतायत… GDPचा, अर्थाअर्थी ‘मानवी-कल्याणा’शी संबंध उरलेला नसून; तो ‘मानवी-शोषणा’चा निर्देशांक बनलाय!
“जेवढा GDP मोठा, तेवढं निसर्ग आणि माणसाचं शोषण मोठं”….
सौदी अरेबियासारखे कट्टर इस्लामपंथी देश, इस्लामचा धर्मग्रंथ, ‘कुराणा’ला अनुसरुन फक्त, ‘दारुबंदी’ करुन धन्यता मानतात आणि तिथेच थांबतात…प्रत्यक्षात सौदी, अमाप खनिज तेल खोदून काढून व ते जाळून, हवेत कार्बन तर सोडतोच; पण, भारतासह इतर देशांसाठी तेलाचा प्रमुख निर्यातदार बनून, आपल्या तेलाच्या पैशातून आलेल्या श्रीमंतीच्या ‘बुरख्या’आडून जगभरात अब्जावधी बॅरल तेलाची; म्हणजेच, पर्यायाने पर्यावरण-विनाशक ‘कार्बन-ऊत्सर्जना’ची निर्यात करतो…आणि, हे करताना त्याला आपण ‘कुराणा’च्या शिकवणुकीच्या विरोधात जाऊनच, आपल्या देशाची अर्थव्यवस्था चालवतोय, याचं भान ठेवावंस मात्र, वाटत नाही!
…याचं कारण, सौदी अरेबिया हा, अमेरिकेच्या नादाने एक ‘भांडवलशाहीप्रधान’ देश बनलाय…तेथील राजेशाही, वेशभूषा, खाणंपिणं भले इस्लामशी वरकरणी तादात्म्य राखून असेल; पण, आतून ‘भांडवलशाही’ किंवा ‘भांडवली-व्यवस्था’ रटरटा उकळतेय!
“भांडवलशाही, ही माणसातल्या पशूतुल्य वासनांना व संवेदनशून्यतेला बेफाम मोकाट सोडणारी आणि त्यावर कुणाचंही धड पूर्णपणे नियंत्रण नसणारी; तसेच, जगभरातल्या, वरपासून खालपर्यंत, सगळ्याच जनतेला आपलं आत्मघातकी व अनिवार ‘व्यसन’ जडवणारी अशी… एक सर्वव्यापक ‘स्वयंचलित’ यंत्रणा-मंत्रणा असल्याने, ती मानवासह एकूणच सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी कितीतरी अधिक धोकादायक आहे!” जागतिक-तापमानवाढीच्या महासंकटातसुद्धा अजूनही लोकांना, आपापल्या धर्मश्रद्धांना प्राणापलिकडे कवटाळून बसावसं वाटणं, हे माणसांमधली संवेदनाचं नव्हे; तर, ‘शहाणपण’ही संपुष्टात येत चालल्याचं दुर्दैवी लक्षण नाही, तर दुसरं काय आहे?
निदान, सजीवसृष्टीसह मानवी-अस्तित्वच धोक्यात आणलेल्या, ‘जागतिक-तापमानवाढी’च्या (म्हणजेच, पर्यायाने ‘हवामान-बदला’च्या) महासंकटाच्या भीषण पार्श्वभूमीवर तरी, “निसर्ग हीच ‘जात’ आणि पर्यावरण हाच, अखिल मानवजातीचा ‘धर्म’ बनला पाहीजे आणि त्याला अनुरुपच, जनसंख्या-जीवनशैली व अर्थव्यवस्थेचं प्रारुप आखलं गेलं पाहिजे… यापेक्षा परमात्म्याकडे, अल्लाहकडे व आकाशातल्या बापाकडे अजून काय वेगळं मागणं मागायचं…???”
…राजन राजे