दोनर्षांपूर्वी उत्तराखंड, आता केरळ (वायनाड…जिथे, हवामानखात्याकडून फक्त तयारीला लागण्याच्या, २४ तासात जास्तीतजास्त २०४.४ मि.मी. पावसाच्या नारिंगीरंगाची सावधगिरीची सूचना अथवा ‘ऑरेंज ॲलर्ट’ दिला गेला होता; पण, प्रत्यक्षात दुपटीहून अधिक म्हणजे ४०९ मि.मी. पाऊस पडला आणि दिडशे लोक मृत्यूमुखी; तर, दोनशेहून अधिक गंभीर जखमी झाले) आणि पुढे ‘कोकण की, मुंबई’…???
पश्चिम घाट परिसरातील जैवबहुविधतेचं संरक्षण व जतन करण्याकामी नेमलेल्या (WGEEP) माधव गाडगीळ समिती (२०१०) व कस्तुरीरंगन समितीच्या (२०१२) शिफारशींकडे संबंधित सगळ्याच राज्य-सरकारांनी केलेलं अक्षम्य दुर्लक्ष…या ‘वायनाड-आपत्ती’च्या निमित्ताने ऐरणीवर आलंय!
एखाद्या रात्रभरात पडणाऱ्या तुफानी पावसावर लक्ष ठेऊन त्याचं पृथःक्करण करणारी यंत्रणा IMDकडे अद्यापपर्यंत नाही…’जागतिक तापमानवाढी’तून आलेल्या ‘जागतिक हवामान-बदला’च्या महासंकटाचा विचार करता, ढगफुटीसारखा अतिरेकी पाऊस कुठेही कधिही पडू शकतो. त्यामुळे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत हाहाःकार माजू शकतो, यासाठी आपण काय करतो आहोत, काय करणार आहोत…हा लाखमोलाचा प्रश्न आहे!
**आपण आपली जीवनशैली, अर्थव्यवस्था, विकासाचं प्रारुप… यात आमूलाग्र बदल करणार आहोत की, नाही?
**शहरीकरण व औद्योगिकीकरणातील काँक्रिटयुक्त ‘कार्बन-केंद्री’ विकासाच्या ‘विकारा’ला आवर घालणार आहोत किंवा नाही?
…लक्षात घ्या, मुंबईत पुन्हा पुन्हा २६ जुलै-२००५सारख्या नैसर्गिक आपत्ती येऊ घातल्यात.
त्यात, शेकडो नव्हे; हजारो मरणांचा सडा पडू शकतो. ‘अनियंत्रित’ कार्बन-ऊत्सर्जन करणाऱ्या ‘विकासा’च्या नादाने खुळावून, ‘विनाशपुरुष’ (‘विकासपुरुष’ नव्हे) बनलेली आपली राजकारणी, गौतम अदानीसारखी भांडवलदार व प्रशासकिय मंडळी… बुलेट ट्रेन, मेट्रो रेल्वे, गगनचुंबी इमारती, विस्तीर्ण महामार्गांचं जाळं…इत्यादींसाठी, *मुंबई आरे काॅलनी, झारखंडमधील विविध खाणकाम प्रकल्प, छत्तीसगडच्या हसदेव जंगलातील खनिकर्म ते थेट ग्रेट निकोबार दक्षिण टोकापर्यंत… भारतभर लाखो वृक्षांची, भातकापणीसारखी सहजगत्या क्रूर-कापणी एकतर करतायत किंवा ती त्यांच्याकरवी एव्हाना करुन पूर्ण झालीय.
पण, ज्यांच्यासाठी ‘पैसाच परमेश्वर’ बनलाय आणि ज्यांना ‘सत्तासुंदरी’नं वेडपिसं करुन सोडलंय…अशा वखवखलेल्या वृत्तीच्या वरपांगी ‘हिंदुत्ववादी’; पण, खऱ्याअर्थाने, औषधालाही ‘धार्मिक’ नसलेल्यांना, ते काय आणि कसं आकळणार?
…सध्याचा आधुनिक ‘भांडवली-समाज’, हा आतून कायम अशांत-अस्वस्थ आहे! आतून अशांत-अस्वस्थ असलेला माणूस, कधिही ‘धार्मिक’ असू शकत नाही. ती अशांति, ती अस्वस्थताच जर केवळ माणसाला…आपापल्या धर्मस्थळांकडे किंवा लाखो निर्बुद्धांचे कळप बाळगणाऱ्या तथाकथित ‘धर्मसंप्रदायां’कडे खेचून नेत असेल; तर, मग आपली धर्मस्थळं-प्रार्थनास्थळं व ते धर्मसंप्रदाय तरी, किती प्रमाणात खरे ‘धार्मिक’ असू शकतील? विविध धर्म, विविध धर्म-संप्रदाय व त्याचं माजलेलं ‘अवडंबर’, हे फक्त आता राजकीय, व्यावसायिक व धंदेवाईक अड्डे झालेत!
धर्म, म्हणजे खरंतरं मुळातून ‘संप्रदाय’च… संप्रदाय, म्हणजे ‘धार्मिक-मार्गा’वरचे टप्पे किंवा नदीतिरावरील विखुरलेले घाट… याचाच अर्थ, ‘धार्मिकता’, या अंतिम गंतव्य स्थानकावर पोहोचणं सुलभ होण्याची केलेली सोय…हे गंतव्य स्थान कुठलं; तर, आपल्याला ‘आत्मसाक्षात्कार’ घडणं, स्वतःची ओळख पटणं व खऱ्याअर्थाने सत्यान्वेषी व न्यायाचा आग्रह धरणारी ‘धार्मिकता’ अंतरंगाच्या रंध्रारंध्रातून खेळणं…
“अवघी चराचर सृष्टी, हीच परमात्म्याचंच प्रकट रुप आहे, आपण ‘निसर्गप्रेमी’ नसून निसर्गाचंच एक अपत्य, त्याचंच अविभाज्य अंग व त्याचाच आविष्कार आहोत”…असं मानण्यातून, जी आंतरिक शांति लाभते, तनमनाला वेढणारी स्वस्थता लाभते; तिचं खरीखुरी ‘धार्मिकता’ होय. कुठलाही धर्म, महत्त्वाचा नसून ‘धार्मिकता’ महत्त्वाची आहे; ‘देव’ महत्त्वाचा नसून ‘देवत्व’ महत्त्वाचं आहे! “पुर्णातून पूर्ण वजा जाता पूर्ण शिल्लक रहाणं, ही हिंदुधर्मातील संकल्पना काय किंवा शुन्यातून शून्य वजा जाता शून्य शिल्लक रहाणं; ही बौद्ध धर्मातील संकल्पना काय…दोन्हीचा निर्देश, धर्मापेक्षा ‘धार्मिकता’ आणि देवापेक्षा ‘देवत्व’ मोठं मानण्याकडेच आहे! मग, एखाद्या सानेगुरुजींनी सांगितल्यासारखा “जगाला प्रेम अर्पावे”, हाच आपसूक धर्म बनत जातो…सानेगुरुजींच्या ‘आत्महत्ये’सारखी दुर्दैवी व करुणाजनक घटना आणि फ्रेडरिक नित्शेनं प्रतिपादिलेलं ‘देव मरुन गेलाय’ किंवा श्रीराम लागू म्हणाले तसं, “परमेश्वराला रिटायर (निवृत्त) करा”, ही प्रतिपादनं, एकाच अर्थाच्या विविध कृष्णधवल छटा बनून जातात!
निसर्गाहून स्वतःला श्रेष्ठ समजण्यातून येणारे…कार्बन, रासायनिक, आण्विक ‘प्रदूषणकारी’ महाकाय-प्रकल्प म्हणजे, विकासाच्या गोंडस नावाखाली, रौद्रभीषण भविष्याची नांदी असलेलं, निसर्गाशी मांडलेलं ‘द्यूत’च…जे ‘भांडवली-व्यवस्थे’चं अटळ-अनिवार्य असं अपत्य आहे…ज्याला हे उमगलं, त्याच्यासाठी ‘निसर्ग’ हा धर्म व ‘पर्यावरण’ ही जात बनून जाते…दुसरंतिसरं काहीही शिल्लक रहात नाही, धन्यवाद!
…राजन राजे