’सौरभ दास’ यांनी ट्विटरवर अखिल ‘भारतीय-वेदना’ प्रस्फुटित करताना, जे प्रभावी व प्रासंगिक भाष्य केलंय… त्यांच्या ‘X’ वरील त्या संदेशाच्या ओघवत्या मराठी-अनुवादावरील ‘धर्मराज्य-प्रतिक्रिया’…

(सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या गणपती-दर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आले होते…त्याचे फोटो मिडीयातून झळकले आणि देशाच्या सदसद्विवेक बुद्धीला एकच धक्का बसला…’सौरभ दास’ यांनी ट्विटरवर ही अखिल ‘भारतीय-वेदना’ प्रस्फुटित करताना, जे प्रभावी व प्रासंगिक भाष्य केलंय…त्या त्यांच्या ‘X’ वरील संदेशाचा ओघवता मराठी-अनुवाद…वाचकांच्या सोयीसाठी आम्ही खालीलप्रमाणे सादर करीत आहोत…तत्पूर्वी, संपूर्ण वेगळ्या धाटणीची ‘धर्मराज्य-प्रतिक्रिया’ खालीलनुसार देतो आहोत…)

———————————————————–

प्रति,

मा. सरन्यायाधीश,

भारताचं सर्वोच्च न्यायालय, दिल्ली

महोदय,

आपल्या घरच्या गणपतीच्या आरती व पूजनाला, देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी आले होते…त्याचे फोटो मिडीयातून झळकले आणि समस्त भारतीय जनतेच्या मनाला प्रचंड धक्का बसला…सर्वांनाच निरतिशय क्लेश झाले! न्यायालयातील न्यायाधीश आणि सरकार…यामध्ये, शक्यतोवर ‘‘जसं आपण ‘करोना’काळात सामाजिक-अंतर ठेऊन वावरत होतो; तसंच अंतर अपेक्षित असताना, ही आपल्यातली नको तेवढी जवळीक तमाम भारतीय जनतेला आपण विनासंकोच बेधडक दाखवून दिलेलीच आहे. शिवाय, आपला देश, घटनात्मकदृष्ट्या ‘निधर्मी’ असतानाही, आपल्या अशा बेजबाबदार कृतितून…सगळ्या देशालाच, आपण एक चुकीचा ‘संदेश’ दिलेला आहे…आपल्याकडे व देशाच्या पंतप्रधानांकडे, या अशा सगळ्या धार्मिक बाबींसाठी भरपूर वेळ आहे, असं सरळ सरळ दिसतंय (आम्ही उगाचच, आपण खूप व्यस्त वगैरे असता, अशी आमची गैरसमजूत करुन घेत असतो)… तेव्हा, तुम्ही केवळ एका विशिष्ट धर्माचरणाला अनुसरुन केलेल्या कृतिबद्दल…भारतीय-अध्यात्मानुसार ‘पापक्षालनार्थ’, पंतप्रधानांना सोबत घेऊन कुठल्यातरी मशिदीत, चर्चमध्ये, गुरुद्वारामध्ये आणि बुद्धविहारामध्ये एकापाठोपाठ एक जाऊन प्रार्थना कराच. अन्यथा, या भारतीय जनतेचा तुमच्यावर विश्वास बसणं फार कठीण आहे…तो विश्वास, जो याअगोदरच क्षतिग्रस्त झालाय, त्याला आता तर, तुमच्या कृतिनेच फार मोठा धक्का पोहोचलेला आहे!

…हो, तुम्ही दोघांनी एकत्र येऊन जोडीने ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव घडवून आणलाय आणि देशाची पायाभरणी करणाऱ्या त्या ३८९ सदस्यीय संविधान-सभेतल्या प्रत्येक सदस्याचा तुम्ही सपशेल पराभव केलेला आहे, तुमच्याच कृतिने! तांत्रिकदृष्ट्या कदाचित तुम्हालाच काय, अन्य कुणालाही त्यात फार काही त्रुटी किंवा दोष आढळणार नाहीत; कारण, तुम्ही म्हणाल, ‘‘बाबासाहेबांनी कुठे लिहून ठेवलंय की, पंतप्रधानाला आपल्या घरी गणेश-पूजनासाठी सरन्यायाधीशांना बोलवता येत नाही म्हणून’’…

…तेव्हा, शब्दांचा कीस पाडत शाब्दिक खेळांचे पतंग उडवणाऱ्यांनो, ध्यानात ठेवा, ‘भारतीय-अध्यात्म’, हा एक असा अलौकिक ठेवा आहे की, तुम्ही तुमच्या नकली ‘हिंदुत्वा’चे बाहू पसरुन…जसे महाभारत युद्ध संपल्यानंतर भीमाला मिठीत करकचून आवळून यमसदनी पाठवण्यासाठी धृतराष्ट्राने आपले बाहू पसरले होते…तसे तुम्ही दोघांनी, ‘भारतीय-अध्यात्मा’ला मिठीत करकचून आवळू पाहिलंत; तरी ते तुम्हाला शक्य होणार नाही. ‘हिंदुत्व’, ही कुणाची जहागिरदारी नाही, मनसबदारी नाही किंवा न्यायालयात प्रविष्ट (Sub-Judice) बाब नव्हे…आणि, ‘जाज्वल्य हिंदुत्व’ कशाशी खातात, हे ना भाजपाई-संघीय लोकांना कळलंय, ना ते त्यांना जाणून घ्यायचंय!

…त्यांना आणि त्यांच्या शिंदेगट-अजित पवारगट यासारख्या मांडलिकांना फक्त आणि फक्त, ‘हिंदुत्वा’चा अनैतिक आधार घेऊन राजकारण नावाचा ‘धंदा’ जोरात चालवायचाय, बस्स!

जाज्वल्य हिंदुत्वात ‘विद्वेषा’ला बिलकूल थारा नाही (Malice and Hatred towards None)…तिथे फक्त, ‘प्रेम, सत्य आणि न्यायनीति’चा जागता पहारा आहे! असं हिंदुत्व, प्रासंगिक शत्रुत्वाचा, अन्याय, अत्याचाराचा ‘प्रतिकार’ कठोरपणे जरुर करतं…तसा तो केला गेलाच पाहिजे; पण, उगाचच कुठल्या समस्त जातजमातीचा ‘तिरस्कार’ कधिच करत नाही!

…ज्यांना ‘गणपती किंवा गणेश’ हे दैवत, पार्वतीमातेच्या अंगावरच्या मळापासून बनलंय, असं वाटतं…त्यांच्या बुद्धिची कीव, ती किती करावी?

‘हत्तीचं शिर व मनुष्य देह’ अशा, या महान दैवताचा मतितार्थ, भारतीय-अध्यात्माला काय व कसा अभिप्रेत आहे, याचं या बनावट हिंदुत्ववाद्यांपैकी कोणाला विश्लेषण-संश्लेषण कधि करता येईल?

…तर ते विश्लेषण सत्यार्थाने आहे, ‘मनुष्ययोनी आणि प्राणीयोनि’तलं महान ‘अद्वैत’’!

ज्या भारतीय-अध्यात्मात (अर्थातच, जाज्वल्य हिंदुत्वात…भाजपा-संघीय ढोंगी-बनावट हिंदुत्वात नव्हे) ‘मनुष्य आणि प्राणिजात’ यातसुद्धा तन्मयता-समरसता मानली जाते, जोपासली जाते…तिथे, भारतीय-अध्यात्माचं एक मोठं व महत्त्वाचं अंग असलेल्या जाज्वल्य हिंदुत्वात, मनुष्यजातीच्या आपापसातील ‘विद्वेषा’ला कधि थारा मिळू शकेल?

…तेव्हा, आजपर्यंतच्या अनेक घटनाक्रमांकडे पहाता…’Yes, both of you are ‘guilty’!’’

…पण, आज फक्त, ताज्या घटनेवरच लक्ष केंद्रित करत, पुन्हा एकवार आपणास नम्रपणे सुचवतो की, केल्या अपराधातून ‘मुक्ति’ मिळवण्यासाठी (जाज्वल्य हिंदुत्वात, मोकळ्या मनाने शरणागत झालेल्या अपराध्याला ‘क्षमा’ करण्याची तरतूद आहेच) मशिदीत, चर्चमध्ये, गुरुद्वारामध्ये आणि बुद्धविहारामध्ये जाऊन जोडीने प्रार्थना करा आणि पुनश्च भारतीय न्याय-व्यवस्थेवरचा विश्वास कायम राखण्याला मदत करा…धन्यवाद!

…राजन राजे

——————————————————————————————————

Saurav Das on X:

आजच्या रात्री सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या घरात चित्रित झालेली अस्वस्थ करणारी दृश्ये देश पहातोय. न्यायालयीन-व्यवस्थेचं पावित्र्य आपल्या आपल्या हृदयात जपून ठेवणाऱ्यांसाठी, हे एक फार मोठं अभद्रसूचक दुश्चिन्हच होय…ते न्यायालयं आणि सरकार, यामधील अत्यावश्यक असणारं अंतर धोकादायकरित्या पुसून टाकणारं आहे…दोन्हींमधील ‘रेषा’ जाहिरपणे अंधुक-अस्पष्ट झाल्याचं दाखवून देणारं आहे.

केवळ, भविष्यातील देशाच्या सरन्यायाधीशांनाच नव्हे; तर, देशभरातल्या सर्वच जिल्हा न्यायालये, उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालयाधील प्रत्येक न्यायाधीशासाठी…जो यातून अगदी धोकादायक संकेत जातोय, तो फारच काळजी करायला लावणारा आहे. या एका साध्या गोष्टीतून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपल्या वारशापेक्षाही कितीतरी अधिक महत्त्वाचं असं काही धोक्यात टाकलंय. तत्त्वतः त्यांनी अवघ्या संस्थेच्या विश्वासार्हतेशीच तडजोड केलेली आहे. लोकांना न्यायव्यवस्था स्वतंत्र असल्याचं वाटावं म्हणून न्यायसंस्थेचा प्रमुख या नात्याने तिचं स्वातंत्र्य त्यांनी अबाधित राखणं अपेक्षित होतं. पण, हे दृष्य एकदम  विरुध्द टोकाच्या ध्रुवावरचं चित्र रंगवतंय.

सध्याचं सरकार, हे न्यायालयांपुढचं सर्वात मोठा दावेदार पक्ष आहे. दोन्ही पक्षांमधील वाढती मित्रता, ही लोकशाहीसाठी काळरात्र ठरेल! परिणामांच्या लाटा न्यायालयीन कचेऱ्यांच्या बर्‍याच पलिकडे जाऊन पोहोचतील. पुढल्या दाव्यांसाठी, याचा काय अर्थ लावायचा?

न्यायपीठाला आव्हान देणं, प्रश्न विचारणं आणि उत्तरदायी बनवणं…ही ज्यांची जबाबदारी आहे, अशी वकीलांची असोसिएशन, कुठल्याही विचारधारेचा असलेला वकीलवर्ग…या घटनेनंतर सरळ सरळ गायब आहे. सर्वोच्च न्यायालयाची बार असोसिएशन कुठे आहे आज? ज्या संस्थेमार्फत ते सेवा देतात, ती संस्थाच तडजोडीचा बट्टा लावून बसलेली असेल…तर, पुढे काय होणार? कारण, नजरेसमोर सरन्यायाधीशांच्या घरातलं जे दृश्य उलगडतंय, तो फक्त काही एक देखावा नाहीय, बरोबर? न्यायालयीन स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या अस्तित्वाशी हे सर्वकाही निगडीत आहे.

निवृत्तीपश्चात ‘‘बिनकामाचा मोठा मोबदला’’ मिळवण्यासाठी, आपल्या मुलांना आरामदायी मोठ्या पगाराची नोकरी मिळण्यासाठी, स्वतःच्या पदोन्नतीसाठी…कुठल्या स्तरापर्यंत झुकतात याबाबत, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची चाललेली कूजबूज वाढत चाललीय. हे सडणं-कुजणं जर अनियंत्रित झालं तर, ते खोलवर झिरपेल. ज्या संस्थेविषयी आपल्याला एवढं ममत्व असल्याचं, सरन्यायाधीश दावा करत असतात; त्या संस्थेला आपण किती हानी पोहोचवलीय, याचा ते थोडातरी विचार करतायत?

काही मोजके सन्माननीय अपवाद वगळता, आपल्या संसद-सदस्यांनीही याची फारशी दखल घेतलेली नाही.

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, यांनी देशाच्या ‘सदसद्विवेक बुद्धीचे रक्षक’ म्हणून एखादं वक्तव्य नको होतं करायला?

इतर संसद-सदस्यांनी याचा निषेध करुन न्यायालयीन-स्वातंत्र्याचं एकासुरात महत्त्वं नको का अधोरेखित करायला? जेव्हा सैन्यदलाच्या प्रमुखांनी राजकीय-विधाने केली होती, तेव्हा त्यांनी पूर्वी तसं केलं होतंच. मग, इथे त्यांना कोणी थाबवलंय? ट्विटर वरील केवळ एखादी प्रतिक्रिया, या लोकशाहीच्या तिसऱ्या स्तंभासाठी काही कामाची नाही. आपल्या लोकसभा-सदस्यांनी यावर आवाज उठवला पाहिजे. मोदी-सरकारच्या इतर कुठल्याही कृतिला ‘घटनाविरोधी’ असल्याचा दोषारोप करण्याएवढीच ही कृति देखील ‘घटना-विध्वंसक’ आहे.

—————————————————————————————————–