‘‘लालबागचा राजा आणि अनंत अंबानींनी दान केलेला सोन्याचा मुकूट’’….

भारतातील ८० कोटीहून अधिक जनता दारिद्र्यात खितपत पडलेली असताना, जे अंबानी कुटुंबिय ८-१० हजार कोटीच्या बंगल्यात रहातात, त्या मुकेश अंबानींचा कनिष्ठ चिरंजीव व ज्याच्या लग्नात, भुकेकंगाल भारतीय जनतेच्या अश्रू  सुकलेल्या शुष्क डोळ्यांदेखत त्यांच्या ‘अठराविश्वे दारिद्र्या’ला अगदी खिजवल्यासारखा, वाकुल्या दाखवल्यासारखा शेकडो कोटींचा चुराडा, अगदी हसत हसत नुकताच केला गेला (म्हणूनच, त्या लग्नसमारंभात आग्रहपूर्वक आमंत्रण असूनही ‘न’ जाणाऱ्या ‘राहुल गांधीं’ना ‘धर्मराज्य पक्षा’चा कडकडीत सलाम)…त्या अनंत अंबानींनी ‘लालबागच्या राजा’ला २० किलो वजनाचा व १५ कोटी रु. किंमतीचा सोन्याचा मुकूट अर्पण केला….ही गोष्ट मराठी जनतेसाठी अभिमानाची की, आत्यंतिक शरमेची…मराठी-जनांना ती गुदगुल्या करणारी की, त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला नेणारी…???

रामायणातल्या कथेतले ‘वाल्या कोळ्या’चे कुटुंबिय, जर वाल्याच्या पापात सहभागी व्हायला तयार नव्हते; तर, तुम्हीआम्ही दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लावून…’लालबागचा राजा’सारख्या मंडळांच्या आणि त्या मंडळांना आर्थिक-सहयोग करणाऱ्या, राजाश्रय देणाऱ्या रक्तपिपासू-शोषक ‘भांडवलदारां’च्या (Blood Billioners) व ढोंगी-लुटारु राजकारण्यांच्या पापात, सहभागी का होतो?’’

…आपण सर्वसामान्य मराठी-माणसांनी आरंभलंय तरी काय? जगतोद्धाराची तळमळ अंतरी बाळगणाऱ्या शिर्डीच्या फकीराला (साईबाबांना) पण आम्ही सोन्याचे मुकूट घालणार आणि त्या ‘लालबागच्या राजा’ला सुद्धा?…कमालच आहे; बरं हे सगळं कधि, तर साधं ‘पायताण’सुद्धा खरेदी करताना, आमची मराठी-जमात दहा वेळा किंमतीची लेबलं चाचपून पहाण्याएवढी ‘कफल्लक’ असते, तेव्हा…आणि, लक्षात घ्या, आम्ही जेवढ्या काळात झिजलेली पायताणं बदलतो…त्यापेक्षाही कमी काळात, या धनदांडग्या गुजराथी-भाषिक भांडवलदारांनी डझनावरी महागड्या-आलिशान गाड्या एकतर बदललेल्या असतात किंवा नव्याने खरेदी केलेल्या असतात!

‘कर लो दुनिया मुठ्ठी में’वाला हा गुजराथी-भाषिक ‘भांडवलदारवर्ग’ आणि ‘भाजप-संघ’वाले…हे दोन्ही पक्ष, ‘‘अवघ्या समाजावर मुठभरांचं ‘वर्चस्व’ निर्माण करुन त्याद्वारे, दुनिया (म्हणजेच तुम्हीआम्ही, यांच्या पाशवी ‘मुठी’त आणि हे ‘हितसंबंधी’ लोकं एकमेकांच्या ‘मिठी’त) आपल्या पोलादी-पंजात, श्वास अडकेपर्यंत घट्ट आवळून धरुन नियंत्रित ठेवायची’’, या एकमात्र विचारसरणीने व एकाच हितसंबंधाने बांधलेले किंवा प्रेरित झालेले!

—————————-

रिलायन्स आणि पर्यावरण….

‘जागतिक-तापमानवाढी’ला कारणीभूत असणाऱ्या ‘कार्बन-ऊत्सर्जना’चा भारतातील सर्वात मोठा स्त्रोत असणाऱ्या रिलायन्सचं, जर पर्यावरणीय-लेखापरीक्षण (Enviro-Audit) केलं गेलं; तर,

रिलायन्स किती भयंकर तोट्यात आहे, हे दिसून येईल…पण, आपण लेखापरीक्षण करतो फक्त, कंपनीच्या अर्थव्यवहारांचंच! पाताळगंगेसारख्या नद्या व नाले प्रदूषित करणारे व करत रहाणारे रिलायन्सवाले…’जग्गी वासुदेव’ किंवा तत्सम आधुनिक ढोंगी संतांना (ज्यात, श्री श्री रविशंकर आणि रामदेव स्वामींसारखी बाकीची बरीच तथाकथित ‘संतमंडळी’ आलीच) करोडोंच्या देणग्या देणार आणि जग्गी वासुदेव, नद्यांच्या शुद्धीकरणाची भारतभर मोहिम राबवत शाबासकीसोबत प्रचंड निधी मिळवणार…अरे व्वा रे व्वा!

रिलायन्स आणि नीतिमत्ता….

भारतीय नीतिमत्तेची व पर्यायाने भारतीय-अध्यात्माची जेवढी हानी रिलायन्स-समूहाने आजवर केली असेल…तेवढी, कदाचित कुठल्याच उद्योग-समूहाने केली नसेल. काॅर्पोरेटीय हिणकस डावपेच आखण्यात, युनियन्स नेस्तनाबूत करुन वा विकत घेऊन ‘कंपनी-दहशतवाद’ निर्माण करण्यात; तसेच, सार्वजनिक-प्रशासकीय सेवेतील भ्रष्टतेला बेछूट उत्तेजन देत आपला काॅर्पोरेटीय-कार्यभाग साधून घेण्यात…’गौतम अदानी’चा अपवाद वगळता, रिलायन्सचा हात कुणीच कधि धरु शकलेला नाही, धरणारही नाही!

रिलायन्स आणि त्यांची उद्योगनीति….

राजकारण्यांशी व बड्या सरकारी अधिकारीवर्गाशी लागेबांधे निर्माण करत, कायदे वाकवून किंवा हवेतसे बदलून स्पर्धकांवर ‘येनकेन प्रकारेण’ मात करणे, स्पर्धकांना कोंडीत पकडून वा खिंडीत गाठून बाजारपेठेतली स्पर्धाच संपवणे, स्वतःची निरंकुश ‘मक्तेदारी’ निर्माण करणे…यात तर, रिलायन्सचा हातखंडाच!

————————————————————————————————

माझा आणि माझ्या कामगार-चळवळीचा ‘लालबागच्या राजा’चा जळजळीत अनुभव….

 

…वीसपंचवीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात ‘कंत्राटी-कामगार पद्धती’च्या ‘गुलामगिरी व नवअस्पृश्यते’ला औद्योगिक व सेवा क्षेत्रात ऊत येऊ लागल्यावर…एकदा नव्हे, लागोपाठ तीन वर्षे ‘लालबागच्या राजा’च्या चरणी नतमस्तक होऊन, आमच्या कामगारांच्या खास आग्रहास्तव, मी कामगारांच्या वतीने स्वतः नाक घासून गार्‍हाणं घातलं, नवस बोललो की… ‘‘देवा, आमची ताकद कमी पडतेय रे; तेव्हा, हे लालबागच्या राजा, महाराष्ट्रातल्या मराठी-माणसाला बरबाद करणारी ही ‘कंत्राटी-कामगार पद्धती’ची अवदसा एकदाची नाहीशी कर, मग मी तुझ्या मंडपाच्या प्रवेशद्वारापासून तुझ्या चरणापर्यंत माझ्या कामगारांसह जमिनीवर लोळण घेत येऊन तुझं दर्शन घेईन’’ …परिणाम काय झाला? तर, या अंबानीसारख्या बड्या उद्योगपतींच्या ‘लाॅबी’ने सरसकट सगळ्याच प्रस्थापित राजकारणीवर्गाला आणि कामगार-मंत्रालय व कामगार-खात्यातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरुन महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर ती ‘अवदसा’ बेलगाम पसरवली आणि आता कहर म्हणजे, अनंत अंबानी ‘लालबागच्या राजा मंडळा’चे प्रमुख कार्यकारी सल्लागारही बनलेत!

…किती तरुण मराठी मुलामुलींनी ‘‘आम्हाला चांगल्या पगाराची ‘कायम’ नोकरी मिळू दे’’ म्हणून, या लालबागच्या राजाला वर्षानुवर्ष तास न् तास आणि ताटकळत उभं राहून ‘साकडं’ घातलं असेल…नोकरीसाठी ‘नवस’ बोलणार्‍या अशा लाखो मराठी युवक-युवतींपैकी किती तरुण-तरुणींना अशा नोकऱ्या मिळाल्या? कोणी लावायचे हे ‘नवसाला देव पावण्या’चे हिशोब?? मग जेव्हा, माझ्या महाराष्ट्रातला जवळपास सगळाच मराठी कामगार-कर्मचारीवर्ग, या भांडवलदारवर्गाचा आज पूर्ण ‘गुलाम’ झालाय; तेव्हा या, (तथाकथित) नवसाला पावणाऱ्या देवाचं, करायचं तरी काय, ते ठरवाच…!!!

खरंतरं, अगदी व्यक्तिगत किडूकमिडूक ‘नवस’ (म्हणजे, खरंतरं स्वार्थच), हा ‘लालबागचा राजा’ काय किंवा कुठलंही तथाकथित ‘जागृत दैवत किंवा देवस्थान’ काय…कधिच पूर्ण करत नसतं. या सगळ्या आपल्या कमकुवत मनाच्या अंधश्रद्धा असतात….फारतर, कधिकाळी ‘‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला’’, असा एखादा योगायोग घडतो, इतकंच. पण, ज्यांच्या बाबतीत असा दुर्मिळ योगायोग कधिच घडत नाही; म्हणजेच, देव ज्यांच्या ‘नवसा’ला पावत नाही, अशांची संख्या…ज्यांच्या बाबतीत हा योगायोग घडतो (म्हणूनच, ते अंधश्रद्धेला सहजी बळी पडून त्या दैवताला ‘नवसाला पावणारा’ म्हणून बेफाम प्रचार करत सुटतात किंवा जाणिवपूर्वक आर्थिक-लाभासाठी तशा आख्यायिका पसरविण्याचं व्यवस्थित ‘मार्केटिंग’, संबंधित मंडळांकडून केलं जातं) त्यांच्यापेक्षा, शेकडो नव्हे; तर सहस्र पटीने मोठी असते; पण, ते बिचारे ‘मुके’ रहात असल्याने, त्या अंधश्रद्धेतला फोलपणा किंवा त्यातली खरी गोम कुणाच्या लक्षातच येत नाही.

————————————————————————————————

ही असली विविध ‘उत्सव-मंडळं’, मंडळं नसून भोळसट जनतेला, जीवनमरणाच्या प्रश्नांपासून जाणिवपूर्वक दूर नेत, आत्मग्लानीत ढकलणारी (तथाकथित हिंदुत्ववादी) भाजपवाल्यांची बनावट ‘कमंडलं’ आहेत. ती मराठी-मुलांना अभ्यासापासून दूर नेणारी आणि ‘सैराट’ होण्याला प्रोत्साहन देणारी आहेत…हे आम्ही मराठी-माणसं कधि ध्यानात घेणार आहोत?

…या ‘अतिरेकी’ (हो, हे नक्षलवादी किंवा काश्मीरच्या आतंकवाद्यांपेक्षा कैकपटीने अधिक घातकी दहशतवादी किंवा अतिरेकी आहेत) श्रीमंत गुजराथी-भाषिक भांडवलदारांकडून, अवघा महाराष्ट्र केव्हाचाच लुटला-लुबाडला-ओरबाडला जातोय…पण, या असल्या घातकी उत्सव-मंडळांमुळे व फाजिल उत्सवप्रियतेमुळे; तसेच, बेगडी-बनावट धार्मिकतेमुळे…महाराष्ट्राची साधनसंपन्न ‘मुं.ठा.पु.रा.ना.’ (मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक-नागपूर) ही प्रमुख शहरं व महाराष्ट्राची ७५%हून अधिक धनसंपदा, गुजराथी-भाषिक भांडवलदारांच्या घशात गेलीय…शिवबा-संतांच्या महाराष्ट्राची लालकाळी माती मराठी-मुठीतून निसटतेय आणि गुजराथी-मुठीत जाऊन स्धानापन्न होतेय… ते मराठी माणसा, तुझ्या ध्यानी येत नाहीये! ते तसं व्हावं, घडत रहावं…म्हणूनच ही मंडळं अशा भांडवलदारांकडून आणि अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर वगैरे ग्लॅमरस-व्यक्तित्वांच्या भेटीतील जाहिरातबाजीतून व मोठी आर्थिक मदत करुन जगवली जातात, वाढवली जातात!!

मराठी माणसा…मराठी तरुणा, ज्यादिवशी तू, या अशा सार्वजनिक मंडळांवर बहिष्कार घालून अंतर्यामी स्वहिताची व मराठी-समाजहिताची खरीखुरी जागृती पैदा करशील…गावागावात ‘‘एक गाव, एक गणपती’’ प्रथा राबवून गावागावातील सगळा ‘मराठी राडारोडा’ एकवटवशील’…तेव्हा आणि तेव्हाच, तुझ्या आर्थिक-उन्नयनाचा, शाश्वत सुखसमाधानाचा दरवाजा ‘सिम सिम खुल जा’, असा प्रथमच किलकिला व्हायला लागेल… कारण, त्यातूनच या रक्तपिपासू-निर्मम-शोषक भांडवली-व्यवस्थेला (Vampire-State System) प्रथमच आव्हान मिळण्याची शक्यता निर्माण झालेली असेल!

…अन्यथा, मराठी-माणसा, एक गोष्ट तुझ्या मेंदूत किंवा हवंतरं तुझ्या हृदयात, निश्चित कोरुन ठेव की… ‘‘हे तुझं ‘पातकं’च, तुला अरबी समुद्रात खोलवर बुडवणार आहे’’ …तेव्हा, ज्याची गेली चार वर्षांत एकही वीट रचली गेलेली नाही; तो शिवछत्रपतींचा घोड्यावर स्वार झालेला भव्य पुतळा, अरबी समुद्रात नक्की उभा असेल! तो नक्की यासाठी उभा असेल; कारण, या भाजप-संघीय आणि मिंधेगटाच्या भ्रष्ट-पातकी राजकारण्यांकडून सिंधुदुर्गच्या राजकोटावर नुकताच कोसळलेला कचकड्याचा पुतळा उभारण्याचं, जे ‘महापातक’ घडलंय… ते तमाम मराठी-जनतेच्या पूर्ण ध्यानात आलंय; त्यामुळेच, आता ‘‘हा अरबी समुद्रातला रेंगाळलेला पुतळा एकदाचा लवकर बांधून पूर्ण करणं’’, हे भाजप-संघ आणि त्यांचे ‘मांडलिक’ असलेल्या एकनाथराव-अजितदादांना अगत्याचं आहे…आणि, हो मराठी-माणसा, जेव्हा तू अरबी समुद्रात बुडत असशील; तेव्हा, ‘‘हेचि फल काय मम तपाला’’ अशा हताशपणे आणि विमनस्कपणे तो शिवछत्रपतींचा पुतळा, तुझ्याकडे पहाताना म्हणेल, ‘‘अरे, सूरत आपल्या मुलूखाची जाळपोळ करणाऱ्या मोंगलांची, परकियांना अर्थसाह्य करत ‘राष्ट्रकार्य’ नष्ट करणारी… म्हणून, मी एकदा नव्हे; दोनदा लुटली आणि स्वराज्य-उभारणीच्या कार्यात भर घातली आणि तुम्ही तर ‘त्यांना’ अवघा महाराष्ट्र दिवसाढवळ्या लुटू दिलात’’…???

…राजन राजे