महात्म्या, तू आज तुझ्या पार्थिव देहात हवा होतास रे….

महात्म्या, बरोबर १५५ वर्षांपूर्वी तू ट्याँहा ट्याँहा करत रडत जन्माला आलास खरा; पण, तेव्हा नियती प्रसन्न मुद्रेनं हसत होती…जशी ती कधि शाक्यराजा शुद्धोधन आणि राणी माया यांच्यापोटी सिद्धार्थ गौतम जन्माला आला होता, तेव्हा हसली होती!
…हे असं काहीही असलं; तरी नियतीने महात्म्या, जन्मक्रम चुकवलाच! ५ मे-१८१८ ला जन्म घेणाऱ्या कार्ल मार्क्सऐवजी तू आणि तुझ्याऐवजी, तुझ्या जन्मदिनी म्हणजेच २ ऑक्टोबर-१८६९ रोजी कार्ल मार्क्स जन्माला आला असता तर? तर, कदाचित आज जी नृशंस, शोषक, अत्याचारी स्वरुपातील ‘भांडवलशाही’ जगभरात धुमाकूळ घालत मानवजातीसह अवघ्या सजीवसृष्टीच्या अस्तित्वालाच वेठीला धरु पहातेय…त्या, अंति विनाशकारी ‘भांडवली-व्यवस्थे’ऐवजी जगभरात ‘गांधीवाद-साम्यवाद-समाजवादा’ची (Gandhism-Communism-Socialism), जग व जन कल्याणकारी रुजवात झाली असती…पृथ्वीवरील जगणं, हा मानवासह सर्वच प्राणिमात्रांसाठी आनंददायी सोहळा झाला असता, ज्याचं वर्णन रामायणातल्या ‘रामराज्या’त आणि महाभारतल्या ‘गोकुळा’त, पांडवांच्या ‘इंद्रप्रस्था’त सापडतं! कारण, अगदी उघड आहे की, “गांधीवाद आणि मार्क्सवाद, यांचा विलक्षण मिलाफ होत…मार्क्सची ‘वर्गविहीन समाजरचने’ची क्रांती, ही रक्तरंजित ‘वर्गसंघर्षा’तून न येता, रक्तविहीन जागृतीद्वारे ‘वर्गसमन्वया’तून अवतरली असती” आणि म्हणूनच, फलद्रूप ठरुन चिरस्थायी बनली असती.

महात्म्या, तू स्वतःचा देहच नव्हे; तर, जगताच्या कल्याणासाठी…आपलं अवघं जगणंच, एक कठोर तपश्चर्या पहाणारी ‘प्रयोगशाळा’ बनवलीस आणि तुझ्या ‘सत्याच्या प्रयोगा’तून जे नवनीत बाहेर पडत होतं…ते भारतवर्षासह सगळं जगच, आकण्ठ प्राशन करत असतानाच…ज्या क्रौर्यपूर्ण रक्तपाताला तू जगातून नाहिसा करु पहात होतास; तोच तुझ्या नशिबी आला…
कुणी नीचात्म्यांनी, तुझ्या देहाची रक्तलांछित चाळण केली, त्यालाही आज पाऊण शतक उलटून गेलं!
…आदि-अंत नसलेल्या काळाच्या उंबरठ्यावर पाऊणशतकी मापटं, उलथून टाकलं जात असतानाच…राक्षसी-महात्त्वाकांक्षेनं युद्धग्रस्त झालेल्या या जगाला आणि त्यातूनच, तप्त-ज्वरग्रस्त बनलेल्या वसुंधरेला, शांत-संयत करण्यासाठी कधि नव्हे एवढी तुझी निकड भासतेय…
तू जर आज असतास; तर खचितच आपला देशच काय, संपूर्ण जगच…आज ज्या भयशंकित अवस्थेत अन्याय-अत्याचार ग्रस्त झालंय, तसं कधिच झालं नसतं!
…सरतेशेवटी, प्रत्यक्ष असण्याची एक अदम्य ताकद असते…म्हणूनच तर, त्या नीचात्म्यांनी…त्या पापात्म्यांनी, तुला जगातून नाहीसा करण्याचा घाट घातला! अनेक प्रयत्नांति ते एकदाचे यशस्वी झाले खरे…पण तरीही, तुझ्या काटकुळ्या देहातलं, तुझ्या निर्लेप आत्म्याचं ‘निशाण’ फडफडत उच्चरवाने जगाला दीपस्तंभासारखी योग्य दिशा आजही…न थकता, निराश न होता दाखवू पहातंय, त्या फडफडत्या चिरंजिवी ‘निशाणा’ला तुझ्या जन्मदिनी ‘धर्मराज्य-सलाम’…!!!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)