रोहिणीच्या मृत्यूस जबाबदार कोण…???

इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या रोहिणी निमसे या शहापूरच्या (मौजे-अल्यानी) १९ वर्षीय तरुणीचं घरी झोपेत मण्यार हा विषारी साप चावून शहापुरच्या उपजिल्हा इस्पितळात पुरेशा योग्य उपचाराअभावी (उदा. ICU Bed सह इतर वैद्यकिय-सुविधा व तज्ज्ञ डाॅक्टरांचा अभाव) आज दुर्दैवी निधन झालं….

मुरबाड-शहापूरसारख्या ग्रामीण भागात, जेथे समृद्धी महामार्ग, काळू-शाई धरणे, एमआयडीसी कारखाने, निवासी व व्यापारी संकुले आदि मोठमोठे हजारो कोटींचे प्रकल्प उभारले जात असताना…आजही तेथे सर्पदंशाने अथवा विंचू चावून मोठ्याप्रमाणावर जिवितहानी होत असेल; तर, या काँक्रिटच्या तथाकथित विकास-प्रकल्पांचं काय लोणचं घालायचं का, हा सवाल आहे. अशा महाकाय प्रकल्पांतून नेमकी कोणाची सोय साधली जातेय?

येथील लाडक्या दिडहजारी बहिणींच्या खात्यात किती व कधि पैसे आले, याचे हिशोब जाहीर होतात; पण, त्यांच्या रक्तात हिमोग्लोबीनचं प्रमाण इतकं कमी का…त्यावर वर्षांनुवर्षे ना चर्चासत्र झडतं, ना मूलभूत उपाययोजना होत. तरीही, इथले तेच तेच लोकप्रतिनिधी देशभरात ‘विक्रम’ ठरावा, एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येत रहातात. आमच्या मुरबाड-शहापूरमध्ये धर्मसंप्रदायांना पद्धतशीर ऊत आणला जातो; पण, हे असे जगण्याच्या आसाला भिडलेले प्रश्न, ते का ऐरणीवर आणू शकत नाहीत…हा प्रश्न त्यांना विचारायचा नको? …की, फक्त रस्त्यांवर व नाक्यानाक्यांवर आपल्या संप्रदायांच्या कमानी उभारणे, रस्त्यांची साफसफाई व वृक्षारोपण करणे…हीच, या निवेदन-निरुपण करणाऱ्या संप्रदायांची (‘व्यवस्थे’च्या दृष्टीकोनातून अगदी निरुपद्रवी असलेली) निवडक सामाजिक कामं आहेत??

एकाबाजुला अशा धर्मसंपदायांचा ‘हजेरीपट’ वाढणं आणि दुसर्‍याबाजुला अशा दुर्दैवी अपघाती मृत्युंचा ‘पट’ वाढणं किंवा एकाबाजुला स्थानिक महिलांचा धर्मसंप्रदायी हजेरी’पट’ वाढणं आणि महिलांच्या रक्तातलं हिमोग्लोबीनचं प्रमाण कमालीचं घटणं…ही भयंकर विसंगती, फक्त मुरबाड-शहापूरमध्येच दिसू शकते; कारण, आता अशा पंथ-संप्रदायांतून येथील लोकं षंढ आणि थंड घडवली जातायत. निरर्थक जपजाप्य करणारे आणि प्रवचनं झोडणारे, हे संप्रदाय म्हणजे बड्या राजकारण्यांचे हक्काचे मतांचे अड्डे बनलेत; म्हणून राजकारण्यांचं त्यांना भक्कम आर्थिक पाठबळ आहे… राजकारणी आणि संप्रदायी, एकमेकाच्या हातात हात घालून व भोळ्याभाबड्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत, आपापलं हित बेमालूम साधत असतात. त्यामुळे, कुठल्याही जगण्याच्या समस्येविषयीची स्थानिक जनतेत अजिबात जागरुकता नाही. अन्याय-भ्रष्टाचाराबद्दल तर तिला काहीही वाटेनासं झालंय. गावोगावच्या रस्त्यांची दुर्दशा (‘साजगाव-किसळ’, हा आमच्या शेतघरासमोरील ३ कि. मी. चा रस्ता तर तब्बल गेल्या ४० वर्षात एकदाही धड बनवला गेलेला नाही…कागदावर मात्र, तो अनेकदा होऊनही गेलेला असेल व संबंधित राजकारणी-कंत्राटदारांकडून जनतेच्या पैशाची लूट केली गेलेली असेल), विजेचा लपंडाव वगैरे प्रकार अगदी नित्याचेच! एमआयडीसी कारखान्यांमधील व एमएसईबी मधील लाखो तरुण कंत्राटी-कामगारांचा जगण्याचा नित्याचा कोंडमारा… हे या समृद्धीला पावणाऱ्या दोन्ही तालुक्यांचं लज्जास्पद व संतापजनक वैशिष्ट्यच!

रोहिणीच्या दुर्दैवी मृत्युने हा सारा भ्रष्टाचार व व्यवस्थेतल्या भयंकर व अक्षम्य त्रुटी चव्हाट्यावर आल्यामुळे…इथून पुढे तरी व्यवस्थेला जाग येईल, अशी अपेक्षा करावी का?

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)