‘आत्मनिर्भर’ नव्हे; ‘ट्रंपनिर्भर’ भारत (थँक्स टू, गौतम अदानी एपिसोड अँड एपस्टिन-फाईल्स)…!!!
कधिकाळी संत तुकाराम म्हणून गेले, “उरलो आता उपकारापुरता”…तर, आताचे ‘विश्वगुरू’ नावाचे आधुनिक ‘नाॅन बायाॅलाॅजिकल’ (संत तुकाराम जर ‘सदेह वैकुंठा’ला जाऊ शकतात; तर, आपला विश्वगुरू ‘नाॅन बायाॅलाॅजिकल’ असू नाही शकत?) संतमहंत म्हणतायत, “उरलो आता देशाला ‘बाजारपेठ’ बनवण्यापुरता”! मग, कुठे गेलं यांचं, ‘मेक इन इंडिया’? हे प्रकरण इथेच थांबत नाही…रशिया आणि अमेरिका, या दोन विरुद्ध ध्रुवांवर ‘लंबका’सारखे लोंबकळणारे हे भाजप-संघीय सरकार, भारतीयांच्या हितालाच अनिश्चिततेच्या व अनर्थाच्या दोरावर लोंबकळत ठेवू पहातंय. मुळच्या ३-४% वरुन १८%, ही सध्याची आयातकरातली वाढ, ही काय कमी आहे का आणि ती वाढ देखील ट्रंप यांच्या मर्जीनुसार अनिश्चिततेच्या भोवर्यात अडकलेली…तरीही, अंधभक्तांना उधाण आलेलंच!
…एकीकडे अमेरिका त्यांच्याकडील भारतीय स्थलांतरितांना अत्यंत क्रूरपणे हातात बेड्या घालून हाकलतेय आणि दुसरीकडे त्यांचा ‘काॅम्प्रमाईज्ड-शेतमाल’ (‘जनुकीय-परावर्तित’ अथवा Genetically Modified…GM) मात्र, भारतात ‘स्थलांतरित’ करु पहातेय, हे सगळं अजबच (‘खाउजा-धोरणा’च्या कालखंडातही आमच्यासारखी अनेक डावी मंडळी आग्रह धरत होती की, जागतिक-व्यापार संघटना अथवा WTOच्या माध्यमातून फक्त, वस्तुमालालाच सगळ्या देशांच्या सीमा खुल्या का करत आहात…त्यांची निर्मिती करणाऱ्या माणसांनाही खुल्या करा; म्हणजे, आपल्याकडचे ‘लेकुरे उदंड झाली’ असे, ‘उदंड’ झालेले उत्तर-भारतीय कामगार तिकडे पाठवता येतील)!
…या सगळ्याचाच अर्थ, आमच्या देशाचा पंतप्रधानच केवळ अमेरिकन-हितासाठी ‘काॅम्प्रमाईज्ड’ असतो, असं नव्हे; तर, देशात अमेरिकेतून आयात होणारा ‘शेतमाल’ही काॅम्प्रमाईज्ड असतो! रशियाचं तेल ३०% स्वस्तात खरेदी करणाऱ्या सरकारने, त्याचा रास्त फायदा कधिच भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवला नाहीच आणि आता अमेरिकन टॅरिफ २५% वरुन १८%पर्यंत येताना…रशियाने मधल्या काळात दिलेली दरातील सूट, आपण ‘धारातिर्थी’ ठेवतोय, याचंही भान त्या उधाण आलेल्या अंधभक्तांना नसावं?
…लक्षात ठेवा, या अमेरिकन भांडवलदारवर्गाला, भारत ही जगातील सगळ्यात मोठी ‘लोकशाही’ आहे, त्याच्याशी काडीचंही सोयरसुतक नाही; पण, भारत, ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे, याचं मात्र भयंकर आकर्षण व अप्रूप आहे!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)

