भारत सरकारच्या निती-आयोगाने जाणिवपूर्वक सदोष ‘पर्यावरणीय आघात-मोजमाप’ करुन (EIA) व ‘NGT’पुढे जाताना ‘Terms of Reference’ मध्येच बदमाषीने बदल केला व तो ‘कॉम्प्रमाईज्ड-NGT’ने मान्य केलेला दिसतोय!
————————————-
अंदमान निकोबार बेटांच्या विकासासाठीचा ९२ हजार कोटींचा (पूर्वी जाहीर केलेला प्रकल्पखर्च ७५ हजार कोटी…म्हणजे, भ्रष्टाचार व दलालीच्या माध्यमातून ‘मारुतिच्या शेपटा’सारखा खर्च वाढतोच आहे)
प्रकल्प-आराखडा NGTने मंजूर केलेला दिसतोय. या प्रकल्पामुळे ‘युनेस्को’ने ‘जागतिक संरक्षित जंगल’ तसेच, ‘जागतिक नैसर्गिक वारसा’ असा विशेष दर्जा दिलेल्या ‘ग्रेट निकोबार’च्या जंगलांवर आता घाला घातला जाणार आहे.
या आराखड्यानुसार, ग्रेट निकोबार बेटावर आंतरराष्ट्रीय स्तरावरचं मोठं बंदर, आंतरराष्ट्रीय विमानतळ, ऊर्जाप्रकल्प आणि प्रचंड मोठी वसाहत उभारण्याचा (ज्यात, तब्बल ५५ मीटर रुंदीचा रस्ता आणि मुळात फार थोड्याप्रमाणात उपलब्ध असलेलं गोडं पाणी श्रीमंतांच्या गोल्फ कोर्ससाठी वापरलं जाणार) सरकारचा नापाक इरादा आहे… ज्यामुळे, ग्रेट निकोबार ‘बायोस्फिअर रिझर्व्ह’ आणि ‘गॅलॅथा बे अभयारण्य’ या दोन संरक्षित भागांचा बळी जाणार आहे. जवळपास ९-१० लाख संख्येनं असलेल्या शेकडो नव्हे, तर हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या वृक्षराजीवर (पुराणवृक्ष) कुऱ्हाड पडून, ग्रेट निकोबारच्या १००० चौ. कि. मी. भूभागापैकी एक चतुर्थांश म्हणजे, २५० चौ. कि. मी. जंगलाची भयंकर कत्तल होणार आहे! आपल्या सत्यानाशी भांडवली-दुराग्रहाने, सुमारे ६५० प्रकारच्या वनस्पती आणि ३३० वन्यप्राण्यांच्या प्रजातींचं माहेरघर असलेलं… जगातलं अतुलनीय, अत्यंत दुर्मिळ असं हे ‘जैववैविध्य’ नष्ट करुन तुम्ही निसर्गाचं ‘थडगं’ आणि पर्यावरणाचं ‘स्मशान’ बांधू पहाता आहात!
बरं, हे सगळं निसर्ग-विध्वंसन कशासाठी चाललंय… ग्रेट निकोबार बेटांच्या जैविक-विकासासाठी नव्हे; तर, दिल्लीश्वरांच्या खास मर्जीतल्या बड्या भांडवलदारांच्या आणि तिथे नव्याने आलिशान वसाहतीत रहायला येणाऱ्या अदमासे ६ लाख अतिश्रीमंतांच्या ऐय्याशीसाठी (बहुतेक भविष्यात अमेरिकेच्या ‘एपस्टिन-फाईल्स’नंतर, भारतातल्या भाजप-संघीय बड्या राजकारण्यांच्या व भांडवलदारांच्या ‘ग्रेट निकोबार-फाईल्स’ उघडाव्या लागतील)!
हसदेव जंगल (छत्तीसगड), आरे कॉलनी (बुलेट-ट्रेन, मुंबई) वगैरे प्रकल्प व नाशिकच्या ‘कुंभमेळा’ नावाच्या ‘दंभमेळ्या’साठी जंगलाचं भक्षण करुनही, न भागणारी अशी कुठली ‘बकासुरी-भूक’, या उठताबसता हिंदुत्वाचा नौटंकी गजर करणाऱ्या भांडवल’शहां’ना लागलीय? हिंदूधर्म, हा मूलतः ‘निसर्ग-पर्यावरणस्नेही’ असताना, असं उफराटं वर्तन त्यांनी पोसलेले ‘शहेनशहा’ करत असताना…तथाकथित ‘हिंदुत्ववादी’ दिवट्यांना, याविषयी काहीच वाटत नाही?
पूर्वी लहानपणी आम्ही ‘लाकूडतोड्या’ची गोष्ट मन लावून ऐकायचो… आताशी, ऐकावी लागते, ती भाजप-संघीय ‘जंगलतोड्या’ सरकारची आणि उद्या ऐकावी लागेल कहाणी…अमेरिकेतल्या व्हर्जिनिया आयलंड्समधील ‘एपस्टिन-फाईल्स’सारख्या शरमेनं भान खाली घालायला लावणार्या अतिश्रीमंतांच्या नृशंस-ऐय्याश कथा! ग्रेट निकोबार प्रकल्पाच्या उभारणीद्वारे एका पाचूच्या बेटावरील हिरव्याकंच जंगलांचा विनाश करण्याचा घाट विद्यमान भारत सरकारने घातला आहे. अशा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’च्या धोरणाने आपण भारतातल्या अंदमान-निकोबारचंच नाही; तर, जगाच्या पर्यावरणाचं नुकसान करतो आहोत… याचं भान, या बेभान ‘गुजराथ-लॉबी’ सरकारला राहिलेलं नाही. ‘‘पृथ्वीवरचा निसर्ग, हाच खरा परमात्मा आणि माणूस, हा त्या ‘परमात्म्याचाच अंश’ म्हणजे, निसर्गाचाच अविभाज्य भाग आहे’’, हेच हिंदूधर्माचं वैश्विक-प्रतिपादन राहिलेलं आहे. हिंदुंच्या एकातरी धर्मग्रंथात, या अशा निसर्ग-पर्यावरणाचा विध्वंसक बळी देणाऱ्या, विनाशकारी ‘विकासा’चा ओझरता तरी पुरस्कार केला गेलाय का किंवा त्याला पाठीशी घातलं गेलंय का? ‘वसुधैव कुटुंबकम्’ तसेच, ‘अहम् ब्रह्मास्मि’ म्हणत, चराचरात परमात्म्याला पहाणार्या ‘शिवबा-संतां’च्या महन्मंगल ‘हिंदुत्वा’चा ओजस्वी ‘महासागर’ कुठे आणि जातधर्म-विद्वेषानं भरलेलं, अन्याय-अत्याचार-शोषणाचा वरवंटा फिरवणारं आणि निसर्ग-पर्यावरणाचा विध्वंस करणारं…भाजपाई ‘हिंदुत्वा’चं सडलेलं ‘डबकं’ कुठे?
अंदमान-निकोबारच्या जंगलांची हाक… या मोदी-शहा रासवट-राजवटीत भारताच्या मुख्य भूमीपर्यंत पोहोचायला तयार नाही, याचा अर्थ आम्ही खऱ्याअर्थाने ‘हिंदू धर्मीय’ नव्हेत… तेव्हा बनावट-ढोंगी हिंदुत्ववाद्यांनो, आपले ‘‘दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे’’, ही नौटंकी बंद करा!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष… भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही ‘हरित-पक्ष’
…The First Green-Political Party Of India)

