कालचा ‘शुक्रवार’ डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी ठरला ‘घातवार’; पण, कुठवर…???
कुठलाही हुकूमशहा, मग तो अमेरिकेचा असो वा भारताचा…तो ‘संत्रस्त संमंधा’सारखाच असतो; त्यातून, तो आपल्या अहंमन्यतेतून उचापती-कुरापती काढणं कधिच थांबवत नाही; ट्रंप म्हणजे “आधिच मर्कट, तशात मद्य प्याला” अशी अवस्था झालेला राष्ट्रप्रमुख! तेव्हा, ट्रंपदेखील त्याच नियमानुसार, २० फेब्रुवारी, २०२६च्या फेडरल-कोर्टाच्या ‘टॅरीफ’ बेकायदा असल्याच्या निर्णयाला बगल देण्याचा कसोशीने प्रयत्न करतीलच.
लक्षात घ्या, शेती क्षेत्राकडे आजवर आपल्या अंदाजपत्रकात अक्षम्य दुर्लक्ष झालेलं किंवा ‘GDP’च्या टक्केवारीत कमालीची घसरण झालेलं असतानाच, ‘शेती क्षेत्र’ या व्यापार-करारातून प्राधान्यक्रम मिळवतं झालंय…ते का व कसं? अमेरिकन शेतकऱ्यांची झालेली ‘कोंडी’ फोडण्यासाठी भारत ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ त्यांना केव्हाचीच मोकळी करुन हवी होती आणि या व्यापार-कराराद्वारे ते अघटित घडू पहातंय, म्हणूनच. भारतातील सोयाबीन व मका, ही दोन्ही पिकं प्रामुख्याने बिहार आणि मध्यप्रदेशातील…अमेरिकेतील या पिकांचं उत्पादन ‘जनुकीय-परावर्तित’ (Genetically Modified…GM) असल्याने भारतात त्याला मानवी-आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य विपरीत परिणामांमुळे बंदी होती. पण, आताच्या होऊ घातलेल्या नव्या भारत-अमेरिका व्यापार-कराराद्वारे ‘Non-Tariff barriers’ची दुसर्या पातळीवरची ढालीसारखी असलेली संरक्षणात्मक बाब काढून टाकल्याने, अमेरिकेतील स्वस्त सोयाबीन-मका भारतीय बाजारपेठेत आक्रमण करेल…आणि, मग बिहार आणि मध्यप्रदेशातील शेतकरी हवालदिल होतील (पुढील काही वर्षे तेथे निवडणुका नसल्याने, ते मोदी-शहा सरकारला अगदी सहजसाध्य आहे) आणि त्या शेतकऱ्यांचं ‘स्वस्त मजूर’ (‘कंत्राटी-कामगार’ नावाचे ‘गुलाम) म्हणून महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणावर ‘पलायन’ सुरु होईल; म्हणजे, पुन्हा एकवार आजवर जे घडत आलं, ते आणि तेच घडेल…”कुणाचं ओझं कुणाच्या खांद्यावर”, असं उत्तर भारतीयांचं महाराष्ट्रावरील दडपण अजून वाढेल…तसाही, मराठी गद्दार-दलाल राजकारण्यांमुळे, नेहमीप्रमाणे ‘महाराष्ट्र’ उभा आहेच, सगळ्या भारताला पोसायला आणि आसरा द्यायला! हे उत्तर भारतीय लोक, आजवर तिथल्या बाहुबली राजकारण्यांनी लाथ घातली म्हणून आणि आता या कराराद्वारे, अमेरिकन शेतकी-निर्यातदारांनी त्यांच्या ढुंगणावर लाथ घातली म्हणून…ते त्या लाथेने उडून महाराष्ट्रात येणार व महाराष्ट्रातल्या मराठी-कामगारांच्या नोकऱ्यांवर लाथ मारणार…असा हा कालपरवापर्यंत ‘भारतीय’ असलेला फुटबॉलचा खेळ, आता या अमेरिकन व्यापार-करारातून ‘जागतिक’ खेळ बनू पहातोय! हीच परिस्थिती युरोप-अमेरिकेतल्या प्रचंड आयातीमुळे काश्मीर-हरयाणाच्या बदाम-सफरचंदांची होणार आहे…सोयाबिनसह इतर कडधान्यांचीही तिचं गत! तेव्हा, अमेरिकी व्यापार-कराराच्या पार्श्वभुमीवर, प्रश्न एवढाच शिल्लक उरतो की, “भारतीय जनता, (विशेषतः, मराठी-माणसं) या थापेबाजांचं ‘थडगं’ पुढील निवडणुकांमधून बांधणार की, स्वतःच्या लोकशाही-भविष्याचं ‘थडगं’ भाजप-संघियांना बांधू देणार…???”
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (समाप्त)

