अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##2

मनमोहनसिंगांना ‘मौनीबाबा’ म्हणून कालपरवापर्यंत हिणवणारा; आता, स्वतःच एक खराखुरा व डरपोक ‘मौनीबाबा’ म्हणून, भारतीय-जनतेला सामोरा येता झालाय!


…असो ‘ऑपरेशन-सिंदूर’ वा असोत ‘एपस्टिन-फाईल्स’…वाॅशिंग्टनमधून आलेल्या एका फोनवर आमची ‘हाफचड्डी’ पिवळी होत असताना (जी भारतीय-स्वातंत्र्यलढ्याच्या काळात, कायमच तशी ‘पिवळी’ होती); गेली ४६ वर्षे (वर्ष-१९७९च्या इस्लामिक-क्रांति व अमेरिकी-दुतावासातील कर्मचाऱ्यांच्या ओलीस-नाट्यापश्चात) देशाचा श्वास घुसमटून टाकणाऱ्या अमेरिकी आर्थिक-निर्बंधांना निर्भयतेने व निर्धाराने तोंड देणाऱ्या इराणने; ज्याप्रकारे, अतिउन्मत्त झालेल्या अमेरिका-इस्रायलसारख्या राक्षसी-सत्तांचा, कमालीच्या शौर्याने मुकाबला करायला प्रारंभ केलाय…त्याचं कौतुक व्हायलाच हवं!
आपले सर्वोच्च नेते गद्दारीतून मारले गेल्यानंतर देखील “दुश्मन का दोस्त, दुश्मन” या वैश्विक-सुत्रानुसार, सौदी अरेबिया व इतर आखाती मुस्लिम देशांनाही अंगावर घ्यायला आजच्या अवघड स्थितीतही इराण कचरत नाही… त्या ‘इराणी-हिंमती’ला कडकडीत ‘धर्मराज्य-सलाम’! भांडवली-जगताच्या ऐशोआरामाला चटावलेल्या आणि चंगळवादी अमेरिकेच्या जीवावर स्वतःला सुरक्षित समजणार्‍या तथा अमेरिकेचे ‘गुलाम’ बनलेल्या…दुबई-सौदी-अमिरातीमधल्या ‘शेखां’ची ‘शेखी’ एव्हाना पुरती उतरली असेल… बुर्ज खलिफाची, प्राणीविश्वातल्या ‘जिराफा’सारखी उंचच उंच मान, इराणच्या हल्ल्यापुढे साफ झुकलेली जगाने पाहिली, हे ही नसे थोडके!
पाकिस्तान-भारत, दोन्ही ठिकाणी झालेल्या मुस्लिम-समुदायाच्या निदर्शनांतून अमेरिका-इस्रायल व तेथील नृशंस नेतृत्त्वासोबतच ‘सौदी अरेबिया’च्याही (तेथे मोहम्मद पैगंबरांचं जन्मस्थान ‘मक्का’ आणि कर्मभूमी ‘मदीना’ ही मुस्लिमांसाठी परमपवित्र असलेली स्थळे असूनही) विरोधात, तीव्र निषेधाच्या गगनभेदी घोषणा उठत होत्या…लक्षात घ्या, गुप्तचर-यंत्रणांनी वारंवार इशारा देऊनही खोमेनेईंनी लपूनछपून रहाणं साफ नाकारलं आणि हसत हसत देशासाठी ‘हौतात्म्य’ पत्करलं (नाहीतर, आमच्याकडचे नेते…शेकडो कमांडोंच्या सुरक्षा-गराड्यात राहूनही त्यांची, संसदेतल्या महिलांपुढे ‘टर्किफाय’ होते)! खोमेनेईंच्या क्रौर्यपूर्ण व दमनकारी कार्यशैलीबद्दल जरुर आक्षेप असावेत (भारतात, सध्या भाजप-संघीय राजवटीत, त्याचंच प्रतिबिंब बव्हंशी आढळतं, त्याचं काय करायचं?), ते आक्षेप आहेतच…पण, पाकिस्तानसारख्या सुन्नी देशातील देखील, लाखोंच्या संख्येनं जनता खोमेनेईंच्या कुटुंबासमवेतच्या हत्येपश्चात रस्त्यावर उतरते; याचा सरळ अर्थ, ‘हुसेन इब्न अलि’ यांच्या ‘करबला’ (इराक) येथील सातव्या शतकातील बलिदानानंतरचं, हे त्या दर्जाचं ‘हौतात्म्य’ ठरु पहातंय!

…राजन राजे, अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष (क्रमशः)