यावेळेस, ‘शिकार्या’चीच ‘शिकार’ होण्याची शक्यता अधिक….
एकापेक्षा अधिक अत्याधुनिक F-15 अमेरिकी विमाने कुवेतमध्ये कोसळल्याच्या धक्कादायक बातम्यांनी आपली… ‘ऑपरेशन-सिंदूर’समयीची फ्रान्स बनावटीची भारतीय मिराज लढाऊ विमाने, पाकिस्तानकरवी पाडली जाण्याची, भाजप-संघीय सरकारने दडवून ठेवलेली ‘जखम’ पुन्हा ताजी व्हावी! भले, इराणने ती F-15 विमाने पाडल्याचा दावा करो किंवा भले, ती कुवेतच्या नजरचुकीने ‘फ्रेंडली-फायर’मध्ये पाडली गेल्याचा (प्रत्यक्षात, एवढी लष्करी ‘कुवत’, कुवेतमध्ये नाहीच), स्वतःचं लज्जारक्षण करु पहाणारा, अमेरिकी दावा असो…कुठेतरी, ‘ऑपरेशन-सिंदूर’प्रमाणेच चीनच्या विमानविरोधी अत्याधुनिक-तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचा संशय बळावल्याखेरीज रहात नाही. गेल्यावर्षीच्या अमेरिका-इस्रायलच्या, इराणवरील हल्ल्यानंतर चीनने, इतर वस्तुमालासमवेत शेकडो क्षेपणास्त्रांसाठी (मिसाईल्स) ‘घन राॅकेट इंधना’साठी म्हणून लागणाऱ्या, ‘सोडीयम-परक्लोरेट’चा किमान वर्षभर पुरेल एवढा…म्हणजे, जवळपास २ हजार टनाचा साठा, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील ‘बंदर अब्बास’मधून इराणला पाठवल्याची खात्रीलायक बातमी, यासंदर्भात महत्त्वाची आहे. त्यामुळेच, यावेळेस ‘शिकार्या’चीच ‘शिकार’ होण्याची शक्यता दिवसेंदिवस बळावत असून…इराणऐवजी अमेरिका वा इस्रायलमध्येच नव्हे; तर सौदी, बहारीन, कुवेत व कतारमध्ये सत्तांतर वा सत्ताबदल होण्याची मोठी शक्यता आहे.
…आखाती युद्धात, प्रथमच असं घडतंय की, इस्रायलने युद्ध पुकारलेल्या राष्ट्रापेक्षा दुपटीहून अधिक मनुष्यहानी इस्रायलची व्हावी; त्यामुळेच, इराणचे खोमनेई लपूनछपून रहाण्यास, ‘शिया’ परंपरेनुसार नकार देत खुलेआम ‘हौतात्म्य’ पत्करत असताना…इस्रायलचा ‘एपस्टिन-फाईल्स’मधला लिंगपिसाट, गुन्हेगार व नृशंस ‘सत्ताधीश’ तोंड लपवत, या बंकरमधून त्या बंकरमध्ये पळतोय!
ॲडाॅल्फ हिटलरला जशी ‘ग्रेटर जर्मनिक राईश’ची आत्मघातकी स्वप्न पडत होती…तशाच, ‘ग्रेटर-इस्रायल’च्या कुस्वप्न-पूर्तिसाठी (Promised Land), मध्यपूर्वेत आपलं बेलगाम वर्चस्व स्थापन करण्याचा इस्रायलला अधिकार…मात्र, बाकीच्यांना काहीच अधिकार नाही का? अमेरिकेच्या दृष्टीकोनातून, पर्शियन-संस्कृतीचा अडीच-तीन हजार वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेला इराण ‘दहशतवादी’ आणि पाकिस्तान कुणी फार सोज्वळ लोकशाही राष्ट्र की, काय? इराण अण्वस्त्रसज्ज होण्याच्या नुसत्या व नसत्या कुशंकेने, इराणवर आक्रमण करण्याची जशी होते…तशी ‘बुद्धी’, अमेरिकेला पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतर, कधि का झाली नाही… की, फरक इतकाच करायचा की, पाकिस्तानमध्ये मध्यपूर्वेसारखे तेलाचे साठे नाहीत आणि युरेनियमसारखी दुर्मिळ व मौल्यवान खनिजेदेखील नाहीत. शिवाय, पाकला अण्वस्त्रसज्ज होऊ देऊन, त्यातून भारतावर अंकुश ठेवण्याचा, अमेरिकेचा ‘नापाक’ इरादा थोडाच कधि लपून राहीलाय?
…सध्या इराणमधील परिस्थिती अशी आहे की, जोपर्यंत खोमेनेई नावाचा जुन्या पठडीतला सर्वोच्च नेता होता, तोपर्यंत इराणमध्ये “आपला इस्लाम-धर्म अणुबॉम्ब, रासायनिक वा जैविक अस्त्रं…अशी ‘सामूहिक संहाराची शस्त्रे’ (Weapons Of Mass Destruction) बनवण्याची परवानगी देत नाही”, ही विचारधारा टिकून होती; मात्र, अमेरिका-इस्रायलने सत्तांतर घडवण्याच्या बेफजूल नादात, खोमेनेईंची जी बेकायदेशीर हत्या केलीय…त्यापश्चात, आज अज्ञात असलेलं, इराणमधलं जहाल नवतरुण-नेतृत्त्व, ‘अणुबाँब’ बनवण्याच्या दिशेने जाण्याची शक्यता खूपच बळावलीय!
…यातून एक अर्थ मात्र, स्पष्ट होत जातो की, इराणने आजवर इस्रायलसारखं अण्वस्त्रसज्ज ‘न’ होण्यात मोठीच चूक केलीय; अन्यथा, इराणवर उठसूठ आक्रमण करण्याची खुमखुमी, अमेरिका-इस्रायलला कधि झाली नसती…जशी ती, उ. कोरियाच्या बाबतीत कधि होत नाही!
…राजन राजे, अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष (क्रमशः)

