व्हाय ओन्ली गांधी वॉज किल्ड ???

इतर कोणत्याही तत्कालीन भारतीय राजकीय नेत्यांपेक्षा, म. गांधींचीच हत्याघडवून आणावी… असं, ‘नथ्थू-पंथीयांना (नथुराम गोडसे पंथीयांना) तीव्रतेनं का वाटलं असावं???

…तर, त्याचं उत्तर हे की, “म. गांधी, ही केवळ काही विशिष्ट उद्देशपूर्तिच्या मर्यादित रिंगणात काम करणारी ‘व्यक्ति’ नव्हती; तर ती सगळ्या जगण्याच्याच आसाला आणि जगण्याच्या व्यामिश्रतेला भिडलेली आणि त्यावर, विद्रोही-कृतिसह प्रभावी भाष्य करणारी ‘महाशक्ति’ होती! ‘ब्रिटीश-भांडवलशाही’ गदागदा हलवत मोडून काढण्याची… पूर्णतया नेस्तनाबूत करण्याची क्षमता, म. गांधींच्या “Earth provides enough to satisfy every man’s needs, but not every man’s greed”, या निसर्ग-पर्यावरणस्नेही क्रांतिकारक विचारसरणीत होती… म्हणूनच, फक्त, साधा पंचा नेसणारा ‘गांधीबाबा’च सगळ्या तत्कालीन ‘भांडवलदारां’च्या नजरेत भयंकर खुपत होता (म. गांधी राणीच्या भेटीला गेले असतानाचे विन्स्टन चर्चिल यांचे फुत्कार आठवून पहा) आणि त्याचीच, परिणती त्यांच्या क्रूर हत्येत झाली… भले, मग, त्या समर्थनार्थ बदमाषीने हिंदू-मुस्लिम वैरभावाची, गांधीच्या तथाकथित ‘मुस्लिम-अनुनया’ची आणि पाकिस्तानला दिल्या गेलेल्या ५५ कोटींची तद्दन ढोंगी कोल्हेकुई, “व्हाय आय किल्ड गांधी”वाल्या नतद्रष्ट ‘ ‘नथ्थूपंथीयां’कडून कितीही केली जावो!

आजच्या, अवघ्या जगाला ग्रासणार्‍या, पर्यावरणीय महासंकटकालीन परिस्थितीत म्हणूनच, म. गांधींची “साधी रहाणी, उच्च विचारसरणी” हीच एकमात्र उपाययोजना म्हणून जोरकसपणे पुढे येऊ पहातेय, हे कशाचं लक्षण आहे? “शहरातून खेड्याकडे चला”, असा संदेश देत… नैसर्गिक शेती, नैसर्गिक आहारविहारासोबतच केवळ, ‘लहानसहान धरणां’चाच (महाकाय धरणांना त्यांचा तीव्र विरोध होता, त्या विरोधाचं महत्त्वं आज निसर्ग-पर्यावरणाचा विध्वंस होऊन सदरहू धरणं प्रचंड गाळाने भरल्यानंतरच आपल्या ध्यानी येतंय) तहहयात पुरस्कार करणारा, तो एकमेव द्रष्टा नेता होता!

नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, जलचरांचा नैसर्गिक अधिवास व मोसमागणिक होणारं त्यांचं नैसर्गिक स्थलांतर यांच्या सुरक्षिततेसाठी व नदीचं ‘जैविक-आरोग्य’ कायम राखण्यासाठी, नॉर्वेजियन सरकारने ट्राॅमसा नदीवरील धरण डायनाईटचा स्फोट घडवून उडवून दिलं, जेणेकरुन बंदिस्त झालेली नदी मोकळी होऊन पुन्हा खळाळून वाहू लागली. स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटनदेखील शक्य तिथे हाच नॉर्वेचा कित्ता गिरवत काही मोठी धरणं फोडून आपापल्या नद्यांचे प्रवाह मोकळे करणार आहेत… आम्ही मात्र, ‘माँ गंगे’ला अधिकाधिक धरणं व मोठमोठाले बंधारे बांधून साफ बंदिस्त करत सुटलेलो आहोत, मग त्या गंगामातेवरील अत्याचाराविरुद्ध आमरण उपोषणाच्या आंदोलनात संत निगमानंद, संत ज्ञान स्वरुप सानंद, संत गोपालदास, संत शिवदास यासारख्या जातिवंत संतमहात्म्यांचे जीव का जाईनात! भाक्रानांगल, हिराकूड, नागार्जुनसागर सारख्या महाकाय धरणांना ‘आधुनिक भारताची मंदिरे” म्हणून संबोधणार्‍या पं. जवाहरलाल नेहरुंनीही पुढे जाऊन, महाकाय धरणांनी निसर्ग-पर्यावरणाचा ढासळवून टाकलेला समतोल अनुभवल्यानंतर, आपल्या चुकीची जाहीर कबुली देत व म. गांधींच्याच विचारसरणीला अंतिमतः योग्य ठरवत, त्या मोठ्या धरणांना “महाकायतेचा महारोग”(Disease Of Gigantism) असं अखेर स्पष्टपणे म्हटलं होतं, हे इथे मुद्दाम नमूद करायलाच हवं.

“मानवी क्षमतेत ‘अत्यावश्यक’ भर घालण्याइतपतच मर्यादित ‘यांत्रिकीकरण’ असावं”… अशी, अलौकिक दूरदृष्टी व बौद्धिक झेप फक्त, पंचा नेसून उघड्या अंगाने फिरणाऱ्या त्या लोकविलक्षण ‘फकिरा’कडेच होती… भांडवलशाहीतल्या बेलगाम ‘शहरीकरण व यांत्रिकीकरणा’ला दिलं गेलेलं ते थेट ‘स्वदेशी’ आव्हानच होतं!

“वैष्णव जन तो तेणे कहिये, पीड परायी जाणे रे”, म्हणतं ‘दरिद्री-नारायणा’चं आर्थिक-पुनरुत्थान करु पहाणारा ‘गांधीवाद’… हे, मस्तवाल भांडवलशाहीला ग्रहण लाऊ शकण्याचं सामर्थ्य असलेलं ‘सुदर्शन-चक्र’च होतं!

टेलिफोन, टाईपरायटर या यंत्रांचा वापर करणारा हा महात्मा, “मानवी क्षमतेत भर घालणाऱ्या ‘यंत्रा’ला नव्हे; तर, मानवाचं उच्चाटन करणार्‍या ‘यंत्रवादा’ला माझा विरोध आहे” असं म्हणायचा किंवा “पहने सो काँते और काँते सो पहने” म्हणतं, ‘स्वदेशी’चा नारा द्यायचा; तेव्हा, तो एकप्रकारे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच भारतात ‘भांडवलीशाही’चा उधळू पहाणारा ‘अश्वमेध’च रोखू पहाण्याचं धार्ष्ट्य दाखवत होता. “ग्राहको देवो भव” (भांडवलशाहीचा कुठल्याही मार्गाने कमावलेला ‘नफा’ हाच ‘परमेश्वर’ असण्याच्या काळ्या पार्श्वभूमीवर) किंवा “गव्हाच्या पीठाच्या पुर्‍या करुन तळणं म्हणजे, त्यातला अन्नांश नाहीसा करुन सौम्य विष तयार करणं होय”… अशासारखी, त्या अवघड काळची मूलभूत प्रतिपादनं, त्या महात्म्याच्या प्रज्ञा आणि दूरदर्शीपणाचा प्रत्यय करुन देतात आणि आजही आपल्याला निव्वळ थक्क करुन सोडतात!

म. गांधींनी पाश्चात्य जगतातली विकसित होत चाललेली ‘भांडवलशाही’ जवळून पाहिली होती. ती निसर्ग-पर्यावरणाला प्रदूषित करण्यासोबतच त्याचा विध्वंस कशाप्रकारे घडवून आणतेय, एवढंच त्यांनी जाणलं किंवा पाहीलेलं नव्हतं…. तर, त्यापेक्षाही भांडवलशाहीच्या माध्यमातून अतिशय धोकादायक होत चाललेलं मानवी मनांचं ‘प्रदूषण’ आणि मानवी संवेदनांचं ‘विध्वंसीकरण’ही त्यांनी प्रत्यक्षात अनुभवलं होतं.  प्रशासक-व्यवस्थापक, शास्त्रज्ञ, लेखक-साहित्यिक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर्स, तंत्रज्ञ इ. बुध्दिजिवी मंडळींना भांडवलशाहीचा एक अपरिहार्य, अटळ परिणाम म्हणून, “आपली घरं किंवा फ्लॅट्स् भाड्याने द्यावेत; तेवढ्या सहजतेनं व सढळपणे, निव्वळ, आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी “आपले ‘मेंदू’ भांडवलशाहीच्या दरबारात बोली लावून सर्रास भाड्याने देताना”, तो ‘महात्मा’ उघड्या अंगावरच्या चष्म्यातून उघड्या डोळ्याने पहात होता… आणि तेवढाच आंतरिक वेदनेनं व्यथित होत होता. म्हणून, म. गांधींनी ‘स्वराज’ ही ‘प्रजासत्ताक-संकल्पना’, केवळ, ब्रिटीश वसाहतीकरणाविरुद्धच मांडली नव्हती; तर, त्यात ‘ब्रिटीश-भांडवलशाही’च्या अनिष्ट प्रभावातून झालेलं भारतीय समाजमानसाचं ‘वसाहतीकरण’सुद्धा (काळ्या त्वचेचे भारतीय ‘गोरे’…’Colonisation of Indian intellect’) घासूनपुसून नष्ट करणं, त्यांना अभिप्रेत होतं… म्हणूनच, तर तो ‘महात्मा’! कारण, ब्रिटीश भांडवलशाही-व्यवस्थेचे ‘लाभार्थी’ असलेली एतद्देशीय ‘काळ्या त्वचे’ची उच्चमध्यमवर्गीय बुद्धिमंत, सुशिक्षित (तत्कालीन I.C.S. वगैरे सरकारी सेवेतील व खाजगी क्षेत्रातील इतर बुध्दिजिवी) मंडळींच तर, ब्रिटीश-शासन चालवत होती… आणि, त्यांची ‘स्वराज’ ही संकल्पना, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच भारतात मूळ धरुन झपाट्याने विकसित होत चाललेल्या भांडवलशाहीवरचा व पर्यायाने या समस्त भांडवलदारवर्गावरचा फार मोठा ‘मर्माघात’ होता; ज्यामुळे, आतून ही बुद्धिमंत ‘भांडवलदार मंडळी’ नुसतीच संतापाने धगधगत नव्हती; तर, मनातून संतापाने साफ पेटली होती.

आणि, त्यातूनच, हिंदी चित्रपटातल्या ‘सलीम-जावेद’फेम डायलॉगप्रमाणे, “खून की प्यासी” झालेली ही सगळी स्वार्थी-लाभार्थी मंडळी…. प्रथम, “गांधीहत्या कोणाच्या माथी मारता येईल” (यासाठीच तर, नथ्थ्यानं ‘मुस्लिम वेष’ परिधान केला होता) आणि तो अश्लाघ्य प्रयत्न साफ फसला म्हणून, गांधी-हत्येपश्चात त्याचं ‘निमित्त’, जनसामान्यांच्या भावनेला हात घालून बेमालूमपणे कशातर्‍हेनं त्यांच्या समोर मांडता येईल, या कामाला ‘संघ’टितपणे व योजनाबद्ध पद्धतीने लागली… त्यातूनच, पुढे जाऊन “व्हाय आय किल्ड गांधी”च्या आत्यंतिक घृणास्पद व उलट्या काळजाच्या मखलाशीला प्रारंभ झाला!

 

……“हूं तो कर छूट जो”, असा गीतेतला ‘कर्मयोग’ आयुष्यभर साधणारं हे महान ऋषितुल्य व्यक्तित्व, अखेरच्या क्षणी, “हे राम” म्हणत, ‘राजयोगा’पर्यंतचा अमोघ प्रवास लिलया पार पाडतच ३० जानेवारी-१९४८च्या दुर्दैवी दिवशी अनंतात विलीन झालं!

….म्हणूनच तर, नथ्थूपंथींयांनी म. गांधींच्या देहाची चाळण करुनही ‘विचाररुपी’ गांधी काहीकेल्या ‘मरायला’ तयार नाही आणि कल्पांतीसुद्धा ‘मरणार’ नाही; उलट, हरघडी जाणार्‍या प्रत्येक दिवसासोबत, त्या महात्म्याच्या विचारसरणीची आणि संदेशाची ‘अनिवार्यता’ जगाच्या ध्यानी येऊ लागलीय…

ज्याला, नथ्थूपंथीयांनी मारलं, ‘तो गांधी’ मेल्यानंतर तर, दिवसागणिक अधिकच मोठा होऊ लागलाय आणि “सहन होत नाही व सांगताही येत नाही”, असं ते, ‘नथ्थूपंथींयां’च्या ऊरातलं फार मोठं शल्य बनून राह्यलंय!

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)