हे भगतसिंगाच्या आत्म्याला तरी रुचेल काय???

सर्वप्रथम, पंजाबच्या भगवंत मान यांच्या नेतृत्त्वाखालील आम आदमी पार्टीच्या सरकारचं मनःपूत अभिनंदन आणि सर्व आजीमाजी आमदार-मंत्र्यांचं बव्हंशी अनावश्यक व अतिशय खर्चिक असलेलं पोलिस-संरक्षण काढून घेण्याचा समयोचित पहिलावहिला प्रशासकीय निर्णय घेतल्याबद्दलही खूप खूप कौतुक!

त्याचसोबत, भगतसिंगांच्या ‘खाटकर कलान’ या जन्मगावी  ‘आप’च्या नव्या सरकारने आपला शपथविधी-सोहळा आयोजित करावा, हे खरोखरीच स्पृहणीय होय… मात्र, तो त्या भगतसिंगांच्या जन्मगावी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अगदी साधेपणाने पार पडला असता; तर, ते फारच प्रशंसनीय व अनुकरणीय ठरलं असतं (भगतसिंगांची स्वतःची रहाणी अतिशय साधी होती)… पण, त्यासाठी होऊ घातलेला अतिरिक्त खर्च आणि त्याहीपेक्षा, १०० एकरावरील उभं पिक उध्वस्त करणं, हे कितपत योग्य आहे, हा प्रश्न कुणी अरविंदजींना विचारायला नको? ही निसर्गघातकी कृति अरविंद केजरीवालकृत “हम करे सो कायदा”, ही हुकूमशाही मनोवृत्ती दर्शवत नाही काय? *भगतसिंगाच्या आत्म्याला तर, हे रुचणं शक्यच नाही; पण, ज्यांना उपोषणाच्या, आंदोलनाच्या अनंत यातना देऊन त्या पुण्याईच्या बळावरच केवळ, अरविंद केजरीवाल राजकारणात धूर्तपणे शिरकाव करत आज एवढे यशस्वी राजकारणी झालेत… त्या, ‘राळेगण सिद्धी’त सिंचनाचे शाश्वत-प्रयोग करणार्‍या अण्णा हजारेंसारख्या भूमिपुत्राला तरी हे कृत्य रुचेल काय, हा आजच्या घडीचा लाखमोलाचा सवाल आहे!

आम आदमी पार्टी पंजाबात ऐतिहासिक विजयाचा झेंडा रोवत असताना व गोव्यात विधिमंडळात चंचूप्रवेश करत असतानाच…. दिल्लीच्या गोकुळपुरी झोपडपट्टीत ६० झोपड्यांना आग लागून तब्बल ७ जणांचा बळी जात होता; पण, त्याविषयी, अरविंद केजरीवाल यांनी चकार शब्द काढल्याचं आमच्यातरी ऐकिवात नाही, हे ही काय दर्शवतं?

दिल्लीत हवेचं भयंकर प्रदूषण आणि वाढतं उष्णतामान, निसर्ग-पर्यावरणाच्या संरक्षण-संवर्धनासंदर्भात युद्धपातळीवर काम करण्यासाठी सतत इशारे, फटकारे देत असताना, तुम्हाला १०० एकरावरील पिकं शपथविधीसाठी बेलाशक उध्वस्त कराविशी वाटतात, हे केवढं निषेधार्ह आहे? शेती, ही जीवनपद्धतीच प्रामुख्यानं असताना, ही पिकं तयार होण्यापूर्वीच उध्वस्त करताना, तुम्ही किती नुकसान भरपाई पैशाच्या स्वरुपात देता, ही बाब साफ गौण आहे. कागदाच्या रुपयांच्या गठ्ठ्यांनी त्या नष्ट केल्या गेलेल्या ‘हिरवाई’ची भरपाई होऊ शकत नाही, एवढं समजण्याइतपत निसर्ग-पर्यावरणीय संवेदना अरविंदजींकडे आहेत काय, हे तपासून पहावं लागेल. निसर्गाप्रति, सर्व प्राणीमात्रांप्रति जेवढा शक्य कोटीतला असेल तेवढा आदर, प्रेम दाखवायलाच हवं, हे जातिवंत भारतीय अध्यात्म होय… जसं वर्ष २०१६ मध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’वाल्यांनी त्यांच्या ‘जागतिक सांस्कृतिक महोत्सव’ शिबिरासाठी यमुनातिरावरचा निसर्ग उध्वस्त केला होता (ज्यासाठी, त्यांना ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने रु.५ कोटींचा दंड ठोठावला होता) आणि ज्याचा आम्ही त्याचवेळी तीव्र निषेध केला होता… त्याच धर्तीची, ही मानसिकता नव्हे काय? दोनचार एकरावरच्या पिकाचा एकवेळ विध्वंस समजून घेता आला असता; पण, १०० एकरावरचं उभं पिक, त्यातला ‘अन्नांश’ (ज्याला, आपण भारतीय तत्त्वज्ञानात ‘पूर्ण ब्रह्म’ म्हणतो) आपल्याला, राष्ट्रीयस्तरावर पक्ष-प्रचारासाठी नष्ट करावासा वाटावा, यातचं सगळं आलं!

आम्हाला आम आदमी पार्टीच्या यशाचं आणि कार्याचं जरुर कौतुक आणि अप्रूप आहे; परंतु, इथून पुढे, कुठलेही शासकीय-प्रशासकीय निर्णय व कारभार हा निसर्ग-पर्यावरणाचा सखोल विचार करुनच करण्याची नितांत गरज असताना, हे घडावं… यामुळे, आमच्या अंतरी एक कळ उमटून गेल्याशिवाय कशी राहील? ‘आप’ला आमच्या इतःपर शुभेच्छा आहेत, त्यांनी जरुर हवंतरं काँग्रेस किंवा अन्य कुठल्याही पक्षाची राष्ट्रीयस्तरावर जागा भरुन काढावी, दिल्लीतही सत्तारुढ व्हावं; पण, हा राजकीय यशाचा ध्वज फडकवत असताना ‘जागतिक तापमानवाढी’च्या पर्यावरणीय महासंकटकाळात एक गोष्ट आवर्जून ध्यानात ठेवावी की, “निव्वळ, भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ व तत्पर कारभार देऊन भागणार नाही; तर, माणसाचं आणि निसर्ग-पर्यावरणाचं टोकाचं शोषण-उध्वस्तीकरण करणाऱ्या ‘भांडवलशाही’विरुद्ध दंड थोपटून उभं रहाण्याचं ‘भगतसिंगांसारखं क्रांतिकारक व अवघड कार्य’ तुम्हाला पार पाडावं लागेल… ते करण्याची, “आजवर दिल्लीच्या कारभारात कधिही न दाखवलेली मानसिकता व प्रखर राजकीय इच्छाशक्ती (उदा. कंत्राटी-कामगारपद्धतीचं निर्मूलन अथवा बेफाम कार्बन-ऊत्सर्जन करणाऱ्या काँक्रिटच्या विकास-प्रक्रियेला रोखत दिल्लीच्या निसर्ग-पर्यावरणाचं संतुलन राखणं)” अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीकडे आहे काय???”

अन्यथा, आमच्या महाराष्ट्रात जशा शिवजयंत्या किंवा आंबेडकर जयंत्या-मयंत्या फक्त साजर्‍या केल्या जातात… पण, व्यवहारात त्यांच्या राजनीतिला अथवा संदेशाला, तत्त्वज्ञानाला कधिही उतरवलं जात नाही, अशा नुसत्या ‘वरकरणी पद्धती’चं फसवं राजकारण निदान ‘भगतसिंगां’च्या नावाने तरी नकोच!

अरविंदजी, याद राखा… आपण भगतसिंगाचं नाव घेऊन कारभार करण्याचा संकेत आम्हाला देताय… भगतसिंग, हा ‘साम्राज्यवाद आणि भांडवलशाही’विरुद्ध लढणारा डाव्या विचारसरणीचा आणि ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोशिएशन’चा सदस्य होता, तेव्हा तुम्ही “कंत्राटी-कामगार पद्धती’च्या (contract-labour system) निर्मूलनाचं काय करणार आहात,  याचा जबाब द्या अरविंदजी… आमचं चुकत नसेल तर, याच कंत्राटी-कामगार पद्धतीविरोधात आपण निवडणूक प्रचारात फायदा व्हावा म्हणून, पंजाबमध्ये मोहाली येथे नोकरीत ‘कायम’ करण्यात यावं म्हणून अनेक वर्षे तडफडणार्‍या शालेय शिक्षकांच्या आंदोलनात याच कंत्राटी-कामगारपद्धतीविरुद्ध आपण भाषणबाजी केली होतीत, बरोबर ना, अरविंदजी? पण, दिल्लीत सरकारी अथवा खाजगी क्षेत्रातली “गुलामी व नव-अस्पृश्य” स्वरुपातील ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ आपण नाहीशी केलीत, असं आजवर काहीही घडलेलं नाही.

तेव्हा, दिल्लीत तो आपहो ही… लेकिन, ‘ठेकेदारी-मजदूरीहटाने (contract-labour system) के मामले की दिल्ली, ‘आपको नजदिक लगती है या दूर… ये हम जरुर देखेंगे, तभी तो आपके भगतसिंग के प्रति लगन और लगाव की सही पहचान होगी!

जाता जाता, ….”राजकारण, समाजकारण आणि अध्यात्म” याची सांगड घालत ‘स्थानिक-अस्मिता’ जपणारं, निसर्ग-पर्यावरणाच्या संरक्षण-संवर्धनासाठी ‘कार्बन-ऊत्सर्जन’ रोखू पहाणारं, मर्यादित जनसंख्या व पर्यावरणपूरक साधी अर्थव्यवस्था व जीवनशैली कवेत घेणारं; तसेच, शोषण-भ्रष्टाचार रोखू शकणारं जातिवंत ‘राजकारण’ या देशात केलं जाण्याची नितांत गरज आहे आणि हे अरविंद केजरीवाल यांना मान्य आहे का, हे ही पुढील काळात दिसून येईलच… धन्यवाद!”

…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष… भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी हरित पक्ष‘)