‘हिंदू-मुस्लिम एकता सद्भावना यात्रा’ रॅली

आपल्या धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कामगार-कर्मचारीवर्गाने आणि ‘सेऊ’च्या सभासदांनी, या भयंकर उष्म्यात (‘जागतिक तापमानवाढी’मुळे तापमान जवळपास ४३-४४° सेंटीग्रेड पर्यंत पोहोचलेलं असताना) एवढी मोठी रॅली काढण्यासाठी, जी मेहनत घेतली व त्यात धाडसाने प्रत्यक्ष सहभाग घेतला… त्याला, तोड नाही!

अन्य कुठलाही प्रस्थापित राजकीय नेता वा पक्ष, वाटेल तेवढा पैसा फेकूनही अशी रॅली, या दाहक उष्णतामानात काढूच शकणे नाही… कारण, त्यासाठी, या अन्याय-अत्याचार व शोषण करणार्‍या व्यवस्थेविरुद्ध आतूनच संतापाची ‘धडपड-तडफड’ (fire in the belly) व संघटनेप्रति, नेत्याप्रति जातिवंत कळकळ, असावी लागते… म्हणूनच, मराठीत यासाठी खास म्हण आहे, “तेथे पाहीजे जातीचे”!

कामगार जात, कामगार धर्म… यातून प्रदीर्घकाळाने पुन्हा उभा राहीला, ही आजच्या मोर्चाची विशेष बाब होय. मुस्लिम समाजाने जर, आपलं नेतृत्त्व काही अंशी का होईना, स्विकारलं… तर, त्यात त्यांचंही आणि समस्त कामगार-कर्मचारीवर्गाचंही भलं आहे. त्यातूनच, या बनावट, बेगडी व फसव्या ‘हिंदुत्वा’ला कायमचा शह देण्याचं, पवित्र कर्तव्य आपल्या हातून पार पडेल!

आजवर धादांत खोटा इतिहास सांगून आणि नेहरु-गांधींसारख्या महनीय व्यक्तिंची यथेच्छ खोटी बदनामी करुन… आणि, त्यांच्यातल्या ‘कःपुरुष’ असलेल्यांना खोटे क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर व महान व्यक्तित्वाच्या ‘खास बनावटी’चे बनवून, यांची राजकीय पोटं भरली नाहीत… म्हणून, स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांनीसुद्धा मराठा, ओबीसीमधली व इतरही जातधर्मातली ‘तथाकथित आक्रमक’; पण, सोयीनुसार, सुपारी घेऊन भूमिका हुकमी बदलणारी ‘राजकीय व्यक्तिमत्व’ खरेदी करुन, ही लोकं पुन्हा जातधर्माच्या नावावर दंगली पेटवायच्या आणि त्यातून, मतांचं ध्रुवीकरण करुन राजकीय फायदा लाटायच्या कामाला पुन्हा लागलीयत.

पुढची २०२४ ची लोकसभा निवडणूक, तुमचंआमचं भविष्य ठरवणारं आहे… त्यादृष्टीनेच, भांडवलदारांचे हितसंबंध राखण्यासाठी, यांची ‘राजकीय-दलाली’ची दुकानं नव्यानं बेफाम चालू झालीयत; तेव्हा, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. त्यांच्या धार्मिक-विद्वेषा’च्या राजकारणाला कामगार-शेतकर्‍यांनी वेळीच आवर घालून, दिल्लीच्या सत्तेवरुन त्यांना हुसकावलं; तर आणि तरच, या भारतात व महाराष्ट्रात आपल्याला काही भविष्य शिल्लक राहील… अन्यथा, सगळा काळा अंधारच वाट्याला असेल आपल्या!

महाराष्ट्रात कम्युनिस्टांना हलवून जागं करणं, त्यांना पुढावा देणं आणि त्यांच्या भूमिकांमध्ये सुयोग्य ‘लवचिकता’ आणून त्यांना आपल्यासोबत जोडून घेणंही अत्यावश्यक आहे. कॉ. डॉ. विवेक मॉन्टेरो व कॉ. अजित पाटील या महनीय कम्युनिस्ट-व्यक्तित्वांच्या उपस्थितीने त्यावर, शिक्कामोर्तब केलंय, असं मानायला जागा आहे. ‘धर्मराज्य पक्षा’ने स्विकारलेला व्यावहारिक, लवचिक व संवेदनशील ‘कम्युनिझम’, ही आजच्या ‘भांडवलशाही रोगग्रस्त’ काळाची मोठी गरज आहेच! तसेच, काँग्रेस, आपल्या यापुर्वीच्या १) ‘खाउजा’सारख्या (खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण) घातकी ‘भांडवली’ भूमिकांमध्ये मोठे बदल करुन खराखुरा ‘हिंद स्वराज’मधला वगैरे ‘गांधीवाद’ स्वीकारते का, २) ‘जनलोकपाल-विधेयक’ आणते का,  ३) मोदी सरकारचे ‘काळे कामगार कायदे’ (४ कामगार कायद्यांची, कामगार-कर्मचारीवर्गाचा साफ सत्यानाश करणारी, ‘श्रमसंहिता’) आणि ‘गुलामी व नव-अस्पृश्यता’स्वरुप असलेली ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ रद्द करते का…. हे ही नीट तपासून पहावं लागेल व त्यादृष्टीने, काँग्रेसचे राज्यसभा खासदार व ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री कुमार केतकरांचं आजच्या ‘संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चा’त येणं, महत्त्वाचं ठरु शकतं.

त्याचबरोबर, आजच्या “संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चा’च्या सांगता प्रसंगी, महत्त्वाचं प्रतिपादन फिरोझभाई आणि नरुद्दिनजी नाईकांचं होतं, ते म्हणाले, “मुस्लिमांनी आता स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करताना तरी, आपल्यात काही सुयोग्य बदल घडवले व आपल्या आजवरच्या ‘धर्मबाह्य चुका’ स्वतःहून सुधारल्या तर, धर्माच्या नावावर तेढ, विद्वेष निर्माण करुन दंगली पेटवणाऱ्यांना व त्यातून मतांची बेगमी करणार्‍यांना मूळातून संधिच मिळणार नाही!” …हे ज्या दिवशी घडेल, त्या दिवसापासून मुस्लिमांचं नष्टचर्य संपायला आणि त्यांचं अनन्वित शोषण थांबायला धडाक्यात सुरुवात होईल आणि त्याद्वारे, जशी सुल्झर पंप्स् कंपनीसह अनेक कंपन्यांमधून आपण जे सर्व धर्मीय कामगार-कर्मचार्‍यांसाठी शिवछत्रपतींच्या ‘धर्मनिरपेक्ष’ राजनीतिला स्मरुन आदर्शवत शांति-सलोख्याचं वातावरण निर्माण केलं; तसंच, जातधर्मनिरपेक्ष निरोगी वातावरण, आपण किमान या महाराष्ट्रदेशात निर्माण करु शकू…. यात शंकाच नको.

आज ‘धर्मराज्य’चा कामगारांचा आवाज (दि. १ मे-२०२२), आंतरराष्ट्रीय कामगारदिनाच्या व महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने या मोर्चाद्वारे दणदणीत उठलेला आहे… तो ‘आवाज’ तसाच, लोकसभा निवडणुकीपर्यंत पुढे दिमाखाने रेटत नेणं, ही आपली सगळ्यांची मोठी जबाबदारी राहील, हे कृपया ध्यानात घ्या… धन्यवाद!

…जय हो!!!

… राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)