रतन टाटा यांना श्रध्दांजली अर्पण करत असताना….

‘सामाजिक-योगदान’ देण्यात अपयशी ठरल्याचा ‘भांडवली-व्यवस्थे’वर ठपका ठेवणाऱ्या…महान उद्योगपती ‘रतन टाटा’ यांना श्रद्धांजली वाहत असतानाच; त्यांच्या ‘परिनिर्वाणा’ला जोडून आलेल्या आजच्या ‘जागतिक मानसिक-आरोग्य दिनी’ (World Mental-Health Day) तरी, ‘भांडवली-व्यवस्था’ स्वतःचं ‘आत्मपरीक्षण’ (Self-Reflection) करणार आहे किंवा नाही…???
———————————————————
कधि कुठल्या उद्योगपतीला भेटावसं चुकूनही वाटत नसताना…अनेकदा असं वाटून गेलं की, आपण ‘रतन टाटां’सारख्या, उद्यमशीलतेच्या नफ्यातोट्याच्या मर्यादित परिघापलिकडे, उत्तुंग आसमंतात झेपावू पहाणाऱ्या व्यक्तित्वाला, काही मोजके क्षण तरी एकटं भेटून बोलावं…विशेषतः, कंपनी-दहशतवाद (Corporate-Terrorism) व पर्यावरणीय-महासंकटांच्या पार्श्वभुमीवर त्यांचं मत जाणून घ्यावं म्हणूनच…पण, भांडवली-व्यवस्थेनं ‘हितशत्रू’ मानलेल्या आणि प्रस्थापित राजकीय-व्यवस्थेनं ‘RDX’सारखा विस्फोटक म्हणून ‘अस्पृश्य’ मानलेल्या माझ्यासारख्या, तशा नगण्य व्यक्तिला, ती भेट मिळणं दुरापास्तच नव्हे; तर, अशक्यप्राय होतं आणि घडलंही तसंच! त्यांच्या अखेरच्या काळात, ज्यांनी मराठी-माणसांची प्रचंड फसगत केली, अशा राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीसाठी रतन टाटा, आवर्जून जात असतानाची वृत्त ऐकताना-पहाताना, कुठेतरी अंतरी वैषम्याची एक कळ उमटून जायची; पण, त्याला काही इलाज नव्हता…’टाटासमूह’ देखील काळाच्या ओघात बराच बदलून गेल्याची, ती ‘निशाणी’ होती (‘नीरा राडिया’ प्रकरणाच्या गढूळ गंगेतून बरंच पाणी वाहून गेल्यानंतरची)!

आज राहून राहून वाटतं की, त्यांनीच उच्चारलेल्या ‘Societal Benefits’ची कक्षा लंघून जाणारं असं काही, मानवी-समाजाला अधिकच ‘क्रांतिकारी-योगदान’, त्यांना नक्कीच देता आलं असतं…कारण, त्यांच्या ‘टाटा’, या नावातच फार मोठी ताकद होती! काळ कुठलाही असो; तो काळपुरुष, ती नियती…प्रत्येक कालखंडात, काही व्यक्तिंच्या व्यक्तिमत्त्वात, एक अजब रसायन एवढं ठासून भरते की, अशा मोजक्या व्यक्ति, इतिहासाला अगदी काळाच्या प्रवाहाविरुद्ध जाणारं; पण, अंतिमतः समाजहितैषी असणारं मूलगामी स्वरुपाचं चांगलं वळण देऊ शकण्याची क्षमता बाळगून असतात…रतन टाटा, त्यापैकीच एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व! पण, असं असूनसुद्धा, तसं काही होणं, बहुधा नियतीला मंजूर नसावं….

“सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा, कुठं हाय हो…सांगा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय हो”, हे वामनदादा कर्डक यांचं गीत ऐकतच, आपण पूर्वी बिर्लांच्या तुलनेत टाटांना अजमावत आलो आणि आता अंबानी-अदानीसारख्या “नेसूचं सोडून डोईला बांधणाऱ्या” विधिनिषेधशून्य व उद्योग-यशासाठी, पैशासाठी, भांडवली-सत्तेसाठी कुठल्याही थराला जाणाऱ्या उद्योगपतींच्या तुलनेत पहातोय… तेव्हा, ते खचितच आभाळाएवढे मोठे वाटणं स्वाभाविकच!

१९९०-९१च्या ‘खाउजा’ धोरण संक्रमण-काळात, आपल्या मुलांसाठी नोकऱ्या मागणाऱ्या एका बड्या टाटा-कंपनीच्या युनियन-कमिटीला, “मला तुमच्या नोकऱ्यांची सध्या फिकीर आहे”, असं करड्या शब्दात बजावून त्यांची बोळवण करणारे रतन टाटा आणि सध्याच्या अवघड स्थितीत (जी कामगार-कर्मचारीवर्गासाठी कायमच मौजूद असते…जसे “Profits are Private & Losses are Public; अगदी तसेच, ‘सुगीचे दिवस’ कायमच भांडवलदारवर्गासाठी आणि ‘ओढगस्ती’चे दिवस कामगार-कर्मचारीवर्गासाठीच खास ‘आरक्षित’ असतात) “राष्ट्र उन्नती व उभारणीसाठी आठवड्याचे ७० तास काम करा”, असं ठणकून सांगणारे आजचे (वा)नरायणमूर्ती…यांच्यात भेद करताना स्वतंत्र बुद्धिच्या व सारासार विवेक बाळगून असणाऱ्या, कुणालाही स्वभावतः कष्ट पडावेत!
…कुठल्या देशाच्या विकासाविषयी बोलत असतो आपण? देश, दगडधोंड्यांचा-काँक्रिटच्या बांधकामांचा असतो काय? तो असतो, जिवंत हाडामांसाच्या माणसांचा…आशाआकांक्षा, ज्यांच्या धमन्यांतून निरंतर धावत असतात, अशा भावभावना-संवेदनांच्या चेतासंस्थांनी परिपूर्ण माणसांनी भरलेला प्रदेश, म्हणजे असतो देश!
…ज्यापद्धतीने, रासवट वृत्तीच्या (खरंतरं, पांढरपेशे गुंडच) HR/IR वाल्यांकडून ‘भांडवलदार-परममित्र’ असलेल्या राजकारण्यांना हाताशी धरुन अनेक टाटा कंपन्यांमधल्या युनियन्सचं साफ खच्चीकरण केलं गेलं…त्या कामगारांचे भोग, ज्याचे त्यालाच माहित! युनियन्स वगैरे काही फार आदर्शवत असतात…असं बिलकूल दावा असण्याचं कारण नाहीच. पण, “चीनची भिंत तडकली तर लिंपली जाते…तोडली जात नाही”, हे सूत्र ध्यानात असू द्या!
…सद्यस्थितीत, सगळ्याच छोट्यामोठ्या कंपन्या-कारखान्यांमधून युनियन्स जबरदस्तीने जवळपास संपुष्टात आणल्या गेल्यानं वा संबंधित HR/IR अधिकारीवर्गाकडून कटकारस्थानं रचून; तसेच, कामगार खात्याला हाताशी धरुन पोलिसांची सरकारी दमनयंत्रणा वापरुन व बिगर-सरकारी दमनयंत्रणासदृश व्यवस्था वापरुन (स्थानिक राजकारणी-गुंडांना आपल्याच जमातीचा ‘घाम-रक्त’ स्वस्तात विकायला लावून बक्कळ पैसा कमावणारे ‘कंत्राटदार’ बनवून, खाजगी बाऊन्सर्स वगैरे माजलेल्या भाडोत्री गुंडापुंडांची दहशत, रेड-फ्लॅगिंग, मोठ्या रकमेचे पर्सनल-बाॅण्डस व जागोजागीची CCTVची करडी नजर…हीच ती व्यवस्था) पूर्णतया नामोहरम करण्यात आल्यानंतरची भयावह व संतापजनक परिस्थिती पाहिल्यानंतर… बळकट पण, विचारी-नीतिमान असलेल्या जातिवंत ‘युनियन्स’च्या आवश्यकतेची तीव्रता भासल्यावाचून रहात नाही!
आजच्या घटकेला औषधाला देखील ‘लोकशाही’, कुठल्या आयटी-उद्योगात किंवा भारतातल्या इतर उद्योग-सेवाक्षेत्रात शिल्लक आहे काय, जिथे कामगार-कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा व महत्त्वपूर्ण काळ व्यतीत होतो? लैंगिक-शोषणापासून अनेकविध गैरप्रकार, आय-टी उद्योगापासून इतर उद्योग-सेवाक्षेत्रात मोठ्याप्रमाणात सुरु आहेत; पण, तरीही ‘काॅर्पोरेटीय-शांति’चा सन्नाटा पसरलेला आहे तिथे…ही कुठल्याही प्रार्थनास्थळीची पवित्र-शांतता नव्हे; ती आहे, स्मशानातल्या मुडद्याफरासांची अपवित्र-निर्जीव शांतता!
…तेव्हा, कामगारांच्या ‘सन्मानाने जगण्या’च्या आसाला भिडलेला आधारच नाहीसा करत, त्यांचं उध्वस्तीकरण कसं झालंय…ते आपली स्वार्थी-मतलबी झापडं बाजुला ठेऊन व अंतरी थोडी संवेदनशीलता जागवून…रतन टाटांना निव्वळ उपचार म्हणून श्रद्धांजली वाहणार्‍या भांडवली-व्यवस्थेत पुरत्या मुरलेल्या कुणी पहावंच! भांडवलदारांची श्रद्धांजली ‘उपचार’ का म्हणायची; तर, भांडवलदार, हे कुणाच्याच बापाचे नसतात…नसतो त्यांना कुठला ‘देश-प्रदेश’, असतो नजरेसमोर सदैव फक्त नफ्याचा ‘धनादेश’!

एक विचार राहून राहून मनात येतो की, ‘कंत्राटी-पद्धती’ने सरसकट तुटपुंज्या पगारावर ‘कंपनी-दहशतवादा’खाली (Corporate-Terrorism) गुलामगिरीत कामगार/कर्मचारी ‘नवअस्पृश्य’ म्हणून राबत असताना, तीन काळ्या कामगार-कायद्यांची ‘काळी कामगार-संहिता’ कामगारविश्वाच्या आसमंतात घोंघावत असताना, अनेक IT कंपन्यांमधल्या तरुणपिढीला या कंत्राटी-पद्धतीतल्या गुलामगिरीसोबतच कंपनी-व्यवस्थापकीयवर्ग ‘ताणतणाव हलका’ करण्याच्या (Stress Busters) मिषाने दारु, सिगरेट व इतर अंमली-पदार्थांच्या नादी लावत असताना व त्यांना ‘प्रोजेक्ट-कमिटमेंट’च्या नावाखाली मरमर राबवून घेतलं जात असताना किंवा भांडवली-व्यवस्थेतूनच केवळ उद्भवलेली आणि मानजातीसह अवघ्या सजीवसृष्टीचा संहार करण्याची प्रलयंकारी क्षमता बाळगून असलेली ‘पर्यावरणीय-महासंकटे’ धुमाकूळ घालत असताना… जे. आर. डी. टाटांचाही दृष्टीकोन, रतन टाटांसारखाच यासंदर्भात, काहीसा ‘निष्क्रिय’ (Passive) राहिला असता का?
आजच्या १० ऑक्टोबर या ‘जागतिक मानसिक-आरोग्य दिनी’ (World Mental-Health Day), अशासारखा प्रश्न तेव्हा अधिकच संयुक्तिक बनतो; जेव्हा, भारतात मानसिक-आजारांचा प्रकोप ‘कोविड-साथी’पेक्षाही जास्त पसरुन ‘उडता पंजाब’सारख्या घटना सर्वत्र घडत असतात, बंगळुरु-चेन्नईसारख्या हायटेक-सिटीमधला अत्युच्चशिक्षित तरुणवर्ग निव्वळ कामाच्या दबावापोटी आत्महत्याग्रस्त होतो (आणि, या घटना तुरळक वा मर्यादित नसून, त्या मोठ्याप्रमाणावर ‘प्रातिनिधिक-स्वरुपा’च्या असतात) किंवा ‘लॅन्सेट सायकियाट्री कमिशन’सारख्या संस्था २० कोटीहून अधिकचा तरुणवर्ग आयुष्यातली अस्थिरता व वैफल्यामुळे अंमली-पदार्थांच्या आहारी गेल्याची सप्रमाण धक्कादायक मांडणी करत असतात!

टाटा-समूहाने असंख्य फार मोठी सामाजिक कामं केलीत आणि जी केलीत, ती फक्त कुठल्या विशिष्ट जमातीसाठी नव्हे (मध्यंतरी, मी गुजराथी आहे आणि गुजराथचंच भलं पहाणार, असा ‘फुत्कार’ मुकेश अंबानींनी टाकल्याचं कानावर आलं होतं) तर, सर्वसामान्यांसाठी केलीत… हे अगदी निर्विवादच! उदाहरणार्थ TISS, TIFR सारख्या संस्था; तसेच, कर्करोगावर उपचार व संशोधन करणारी कर्करोग (कॅन्सर) इस्पितळे ही टाटांचीच देणगी (मात्र, ज्या भांडवली-व्यवस्थेच्या पैशातून ही इस्पितळे उभारली गेली; त्या भांडवली-व्यवस्थेचंच, कर्करोगासारखे भयंकर रोग, हे देणं आहे…हे विसरुन चालणार नाही)… त्यांनी बिर्लांसारखी देवळे, मंदिरे वगैरे जीवनावश्यक नसलेल्या बाबींवर व्यर्थ खर्च न करता (सध्या पुतळे आणि ऐश्वर्यसंपन्न प्रार्थनास्थळं बांधण्यावर हजारो कोटी उडवण्याचा वेडाचार व बेजबाबदार स्वार्थी राजकीय-विचार, देशात गेले दशकभर सुरु आहे), हे सामाजिक-योगदान दिलं, ही असाधारण बाबच!

…सरतेशेवटी, या औद्योगिक-क्रांतिच्या उण्यापुऱ्या तीन शतकांनीच दाखवून दिलंय की, ‘भांडवलशाही’ ही टाटांसारखी बर्‍यापैकी ‘उदारमतवादी’ असो वा अंबानी-अदानी-बिर्लांसारखी ‘आपमतलबी’ असो…ती येतेच ती, कार्बन-ऊत्सर्जन व अन्य प्रदुषणांच्या रुपानं (रासायनिक, आण्विक, विद्युत-चुंबकीय वगैरे) निसर्ग-पर्यावरणाच्या मुळावरच! पृथ्वी, ही काही उद्योग-उभारणीसाठी किंवा नोकरी देण्यासाठी नव्हेच, हे आता या भांडवली-विचारातून झालेल्या ‘अक्षम्य’ अशा मानवी-हस्तक्षेपाने खवळलेली नियतीच दाखवून देतेय…फक्त, पहाणाऱ्यांचे डोळे उघडे पाहिजेत!
त्यामुळेच, उद्योग-उभारणी वगैरे करणारे, मोजक्या काही दशकं-शतकांसाठी व मोजक्या काही पिढ्यांसाठी…नोकऱ्या-धंदे-व्यवसायातून औटघटकेची ऐषोआरामी जिंदगी देऊन जाणारे ‘नायक’ ठरतील…पण, प्रलयंकारी भविष्याचं ताट, पुढील पिढ्यापिढ्यांसाठी आरक्षित करण्याच्या महापातकाचेही तेच ‘धनी’ बनतील.
निसर्ग-पर्यावरणासंबंधीची रतन टाटांची कमी पडलेली जागरुकता म्हणा वा काहीशी अनास्था म्हणा (केवळ, ‘वृक्षलागवड-वनीकरण’ केलं की, निसर्ग-पर्यावरणाप्रति असलेली आपली “इतिकर्तव्यता’ संपली, असं मानणं…हीच अज्ञानमूलकता व ‘किंकर्तव्यमूढता’ होय)…पण, त्यामुळे, त्यांना अवघ्या सजीवसृष्टीच्या हितासाठी ‘भांडवली-व्यवस्थे’विरुद्ध बंडाचं निशाण फडकवण्याची पायी चालत आलेली संधि साधता आली नाही, हे अवघ्या सजीवसृष्टीच्या दृष्टीने चिंताजनकच! बरं, ते तसे कौटुंबिक पाशातही अडकले नसल्यानेच, त्यांना अशी काही काळाला मोठं वळण देणारी व प्रचलित व्यवस्थेला आव्हान देणारी भूमिका घेता येणं, तुलनेनं अधिक सोपं व सहजसाध्य होतं…पण, ते होणं नव्हतं!

…लक्षात घ्या की, औद्योगिक-क्रांति झालीच नसती; तर, मनुष्यजात तशीच पुढे हजारो-लाखो-करोडो पिढ्या जगली असती (मोठा उल्कापात होण्यासारखा वा मोठा अशनी कोसळण्यासारखा अस्मानी-संकटांचा धोका वगळता)…पूर्वीसारखी तशीच, ‘मानवी व पशू ऊर्जे’वर, शारिरीक काबाडकष्ट सोसत जगली असती (पृथ्वी, ही फक्त, जीवन जगवण्यासाठी-फुलवण्यासाठी आहे…नोकरी-धंदा-उद्योगासाठी नाहीच नाही); पण, विनाशाला स्वतःच्याच कर्माने ‘आवतण’ देणारी, पर्यावरणीय-महासंकटांना आपल्याच ‘पादुका’ बहाल करणारी, अवसानघातकी जमात खचितच बनली नसती!
आता, केवळ उद्योगपतीच्या-उद्योजकांच्या अंतःस्फुर्तिवर अवलंबून रहाण्याचे दिवस संपलेत…तंत्रज्ञान, आपल्याला मागे टाकून एवढं पुढे निघून गेलंय की, आता उद्योगसमूहाची दिशा ठरवणं, तुलनेनं खूपच सोपं झालंय. तेव्हा, खाजगी-क्षेत्रातील उद्योगांची मालकी काढून घेऊन सार्वजनिक करणं (Nationalisation of Industries), ही काळाची फार मोठी व तातडीची गरज आहे…पण, उद्योगपतींचे देव्हारे असेच माजवले जात राहीले (जी भांडवली-व्यवस्थेची गरज आहे)…तर, हे आजचं अवघड असलेलं काम, नजिकच्या भविष्यात अशक्यप्राय बनेल व मनुष्यजात, या पृथ्वीतलावरुन पुढील काही दशकातच नष्टप्राय होईल! सरकारने ताब्यात घेतले गेलेले खाजगी-उद्योग, उत्तम जाणकारांकडून (नुसतेच, पाट्या टाकणारे अहंमन्य पुस्तक-पंडीत IAS अधिकारी नकोत) योग्यतेनुसार व योग्य प्रमाणात स्वातंत्र्य बहाल करुन, चालवले गेले पाहिजेत…ज्यामधून, माणूस आणि निसर्ग यांच्या शोषणावर मोठे निर्बंध घालता येतील (‘आरोग्य व संरक्षण’, ही दोन क्षेत्रे वगळता बाकी ठिकाणी निसर्ग-पर्यावरणावरील आघातांचाच प्राधान्याने विचार करुन) व त्यातून, मनुष्यजातीचं पुढील भवितव्य सुरक्षित राखता येईल, हा आज रतन टाटांना श्रद्धांजली वाहताना विचार बळकट व्हायला हवा…धन्यवाद!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष…भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही ‘हरित-पक्ष’…The First ‘Green-Political Party’ Of India)