“विसाव्या शतकाच्या मध्यातील ‘वसाहतवादी-दमनशक्ति’च्या अमेरिकी-ब्रिटीश दुष्प्रयोगाचेच, पुढे जाऊन दशकानुदशके उमटलेले पडसादच आज आपण पहात आहोत”….
“विन्स्टन चर्चिल यांचं इराणी-राजकारण मला पूर्णतया ज्ञात आहे”…ट्रंप यांच्या वरील जाहीर वक्तव्यावर ‘जाॅर्ज माॅनबायाॅट’, हा ख्यातनाम राजनीतिज्ञ म्हणतो, “ही गोष्ट चांगली यासाठी आहे; कारण, त्यामुळे ट्रंप यांना कळावं की, आजची इराणची समस्या, ही विन्स्टन चर्चिल यांनी वर्ष-१९५३मध्ये इराणमध्ये अमेरिकेच्या ‘CIA’सोबत केलेल्या ‘ऑपरेशन-ॲजॅक्स’मुळे झालेली आहे…ज्यात, इराणच्या संपूर्ण तेल-उद्योगाचं (ब्रिटीश ‘अँग्लो-इरानियन’ कंपनीसह) देशहितासाठी ‘राष्ट्रीयीकरण’ करणाऱ्या तत्कालीन इराणी पंतप्रधान मोहम्मद मोसादेघ (Mohammad Mosaddegh) यांच्या अत्यंत लोकप्रिय राजवटीचा, जबरदस्तीने कटकारस्थान रचून ‘सत्तापालट’ घडवून आणला होता आणि शाह रझा पेहेलवी यांच्या अत्यंत क्रूर, खुनशी हुकूमशाही-राजवटीची अमेरिका व ब्रिटनकरवी प्रस्थापना केली गेली होती. जुलमी शाह-राजवटीला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर (Imperial Blowback) म्हणूनच, वर्ष-१९७९ला इराणमध्ये अयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्त्वाखाली, तशीच रक्तरंजित दडपशाही करणारी ‘इस्लामिक-क्रांति’ झाली!”
…याचसंदर्भात, बीजिंगमधील प्रोफेसर जियांग यांनी केलेल्या तीन मोठ्या राजनैतिक भाकितांपैकी पहिली दोन भाकीते आजवर खरी ठरलेली आहेत…त्यातलं पहिलं म्हणजे “ट्रंप, हे अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक जिंकतील”. दुसरं म्हणजे, “ते इराणशी युद्ध पुकारतील” आणि तिसरं, “अमेरिका, ते युद्ध हारेल!”
त्यांच्या म्हणण्यानुसार “इराण, गेली २० वर्षे त्या संभाव्य संघर्षाच्या व त्याद्वारे, अमेरिकन आर्थिक-साम्राज्याला हादरे देण्याच्या तयारीला लागलं होतं. त्याचाच भाग म्हणून जागतिक-अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याच्या रणनितीचा भाग म्हणून, त्यांनी ‘GCC’मध्ये (Gulf Co-operation Council for the Arab States of the Gulf) मोडणाऱ्या देशांवर हल्ला चढवला व ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद करुन जागतिक-ऊर्जासंकट निर्माण केलंय…यानंतर पुढच्या टप्प्यात इराण, युद्धस्थिती अगदीच विकोपाला गेल्यास, आखाती अरब राष्ट्रांच्या ‘समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य बनवण्या’च्या ‘निर्क्षारीकरण-प्रकल्पां’वर (Desalination Plants) हल्ले चढवून, त्यांच्या तोंडचं पाणी पळवेल. तसेच, तेलविक्री धोक्यात आल्याने आखाती अरब राष्ट्रांची अमेरिकन ‘AI’ उद्योगात असलेली सर्वात मोठी गुंतवणूक कोलमडेल व आखाती पेट्रो-डाॅलर्स पुन्हा अमेरिकन अर्थव्यवस्थेत येणं रोडावल्याने, २००८च्या डाॅट.काॅम फुगवट्यापेक्षा मोठा असलेला ‘AI’चा फुगा फुटेल. परिणामतः, गुंतवणूकदारांची अंति फसवणूक करणाऱ्या एखाद्या ‘Ponzy Scheme’ सारखी असलेली अमेरिकन-अर्थव्यवस्था कोसळून पडण्याच्या स्थितीत येऊ शकते. शिवाय, अमेरिकन लष्करी-सज्जता, ही दुसर्या महायुद्धापश्चातच्या ‘शीतयुद्धा’साठी (Cold War) अनुरुप अशीच आजही आहे…२१व्या शतकातील युद्ध खेळण्यासाठीची ती अमेरिकन-सिद्धता नव्हेच! त्यातूनच, चंद्र-मंगळावर जाण्यासारख्या अत्युच्च-तंत्रज्ञानाधारित व अतिप्रचंड खर्चिक असलेल्या योजना आखण्याचीच लष्करी-मानसिकता अमेरिकेत आजही दिसते…त्यामुळेच, या युद्धात ५० हजार डाॅलर्सच्या इराणी-ड्रोनचा, १० लाख डाॅलर्सचं अमेरिकन क्षेपणास्त्र मुकाबला करताना आपल्याला दिसतं व त्याचीच परिणती गेली २० वर्षे प्रकर्षाने दिसणार्या जागतिक अमेरिकन-वर्चस्वाच्या फुग्याला, ‘इराणी-टाचणी’ टोचली जाऊन तो फुटेल!”
…राजन राजे, अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष (क्रमशः)

