अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##12

“जब तक ‘बसंती’ नाचेगी…”च्या धर्तीवर, इस्रायलची युद्धे चालू रहातील; तोपर्यंतच, नेतन्याहू नावाचा ‘सैतान’ मोकाट राहू शकेल….
…जसे, आपल्याकडचे ‘ढोंगी हिंदुत्ववादी’ भाजपाई-संघीय लोकं, मुस्लिम लोकसंख्या-विस्फोटाचा वादग्रस्त प्रचार करत (विशेष बाब ही की, इराणच्या मुस्लिम-लोकसंख्यावाढीचा केवळ १.०८ ते १.२ टक्क्याच्या आसपास घुटमळणारा दर, आपल्याकडच्या हिंदू-लोकसंख्यावाढीच्या दरापेक्षा खूपच कमी भरेल)…भोळसट हिंदुंच्या नजरेत, ‘मुसलमानां’ना अवास्तव ‘शत्रू’ बनवत आलेत आणि हिंदुराष्ट्राच्या फसव्या संकल्पनेतून बेगडी मतं व राजकीय-सत्ता मिळवत आलेत; तसाचं, हा इस्रायलचा ‘नेतन्याहू’ नावाचा सैतान, “इस्त्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याची” (‘Existential Threat’) आवई उठवून गेली २० वर्षे सत्ता भोगतोय…प्रचंड आर्थिक-घोटाळे करत, भ्रष्टाचाराच्या वाममार्गाने अफाट माया गोळा करतोय…आणि, त्याबद्दल झालेल्या न्यायालयीन शिक्षेपासून सुटका मिळवण्यासाठी, ‘युद्ध’ नावाचा अमानुष खेळ सतत खेळतोय…गाझापट्टीत वंशविच्छेद करु पहाणारा नरसंहार (Genocide) घडवतोय! “जब तक ‘बसंती’ नाचेगी; वीरु की साँसे चलेगी” या ‘शोले’मधील ‘सलीम-जावेद’ संवादाच्या धर्तीवर, जोपर्यंत इस्रायलची युद्धे चालू रहातील; तोपर्यंतच, नेतन्याहू मोकाट राहू शकेल… युद्धे संपली की, हा नराधम युद्ध-गुन्हेगार गजाआड झालेला दिसेल!
“सुरुवातीची ‘झिओनिस्ट-चळवळ’, ही समाजवादी विचारसरणीची व आर्थिक-समानतेचा आग्रह धरणारी होती”…असा दावा, याकोव्ह रॅबकिन (Yakov Rabkin) आपल्या ‘Zeonism Decoded’, या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात करताना म्हणतात, “नेतन्याहूसारख्या इस्रायलमधील काही नृशंस-नितीशून्य लोकांनी तिला अचानक उजवं व हिंसक वळणं दिलं; ज्यामुळे, उत्तर अमेरिकेतील असंख्य लोकं इस्रायलवर अगोदरच प्रचंड नाराज आहेत.”
‘जोएल मार्टिन रुबिन’सारखे मध्यपूर्वेच्या घडामोडींवरील अमेरिकन भाष्यकार जरी, “हे अमेरिकेचे युद्ध नसून, इस्रायलने अमेरिकेवर लादलेलं युद्ध आहे…असा अपप्रचार म्हणजे, निव्वळ ज्यू-विद्वेषी (Anti-semitism) जनभावना आहे”, असं म्हणत असले; तरी, “नेतन्याहू नसते तर, अमेरिकेने हे युद्ध पुकारलं असतं का; या प्रश्नातच, सगळ्याचं उत्तर साररुपाने दडलेलं आहे…ओबामा अध्यक्ष असण्यापासूनच अनेक दशके, नेतन्याहूंना, हा ‘इराण-युद्धज्वर’ जडलेला होता” असं, बराक ओबामा यांचे राष्ट्रीय-सल्लागार ‘बेन ऱ्होड्स’ (Ben Rhodes) यांच्यासारख्या अनेक जाणकारांचं ठाम प्रतिपादन आहे. त्यांचं प्रतिपादन इथेच थांबत नाही; तर, “ट्रंप दावा करतात तसा, इराणकडे कुठलाही आण्विक-शस्त्रसज्जतेचा कार्यक्रम कधिच नव्हता किंवा त्यांची क्षेपणास्त्रे, ही अमेरिकेसाठी कधिच धोकादायक नव्हती; इराणच्या क्षेपणास्त्रांचा धोका फक्त, इस्रायललाच होता…म्हणूनच, ते अमेरिकेचे नव्हे, तर अमेरिकेवर नेतन्याहूंनी लादलेलं इस्रायलचं युद्ध आहे, ज्याला ‘लिंडसे ग्रॅहॅम’सारख्या युद्धखोर (War Hawk) अमेरिकन सिनेट-सदस्यांचा पाठींबा आहे”, असं ते परखडपणे बजावतात.
कालपरवापर्यंत नेहरु-गांधींच्या काँग्रेसी आर्थिक-धोरणावर ‘परमिट राज’ म्हणून जहरी टीका करणाऱ्या भाजप-संघियांनी, आज भारतीय परराष्ट्र-धोरणाला ‘अमेरिकन परमिट राज’ बनवून टाकलंय… आणि, अमेरिकन संरक्षण-धोरण, हे अमेरिकेचं नव्हे; तर, इस्रायलचं संरक्षणात्मक धोरण बनलंय! थोडक्यात, अमेरिकेचे अध्यक्ष ‘बेंजामिन नेतन्याहू’ आणि भारताचे पंतप्रधान (खरंतरं, भारताचे गव्हर्नर जनरल) ‘डोनाल्ड ट्रंप’…अशी आज ‘एपस्टिन-फाईल्स’मुळे नवी ‘आंतरराष्ट्रीय श्रम-विभागणी’ झालीय!
…बाय द् वे, दोन लंगोटीयार दोस्तांपैकी एक (अमेरिकेतला) उठसूठ पत्रकार परिषदा घेण्यात सध्या दंग आहे; तर, दुसरा (भारतातला) पत्रकार-परिषदचं नव्हे; तर, थेट पत्रकारांपासूनच दूर पळ काढण्यात दंग…बात ये है कि, “एक ‘विश्वगुरु’ नव्हे; तर, नेसूचं सोडून डोक्याला गुंडाळलेला, एक निलाजरा ‘मौनीबाबा’ भारतात अवतरलाय आणि ते दुःसह चित्र, उभं जग पहातंय”!

…राजन राजे, अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष (क्रमशः)