दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’

भांडवली-व्यवस्थेच्या दमनकारी दबावाविरुद्ध; तसेच, कंपनी-दहशतवादाविरोधात (Corporate-Terrorism) छाती पुढे काढून तडफेनं व एकजुटीने संघर्षरत रहात… तप्त मुशीतून बाहेर पडलेल्या सोन्यासारखं तावूनसुलाखून निघण्याऐवजी, मराठी कामगार… आपापसात फाटाफूट करत व ‘‘कामगारच कामगाराचा शत्रू बनत’’… गद्दारी व पळपुटेपणा करताना दिसतोय… दारुची बाटली आणि धर्मसंप्रदायांची ‘अफूची नशा’ सेवन करत, ‘‘नरेचि केला हीन किती नर’’, याचा अवघ्या कामगार-विश्वाला कंपन्या-कंपन्यांमधून परिचय देतोय, या दुर्दैवाला काय म्हणावं…???

——————————————————————————–

‘‘एक दारुची ‘बाटली’ अन् आमची अवघी मराठी-संस्कृती ‘बाटली’… आणि त्यातूनच, अवघ्या ‘कामगार-चळवळी’ची संपूर्ण वाट लागली!’’

 

‘‘दारुमाजी जो बुडाला त्याचिया घरी,

बनूनिया पातकी मित्र, बाटलीतूनी पेयपात्री…

सैतान अपुल्या पाऊली, चालुनिया रे आला,

 

मगे नेमेचि जवळीक मद्यरुपी सैतानाची,

कामगार-मराठी तोचि, पाप्या-नितीशून्य जाहला…

 

मर्‍हाठी-संसाराचा ‘विस्कोट’ पुरता अन्

चळवळीचा श्रमिकांच्या कार्यभाग तो बुडाला!

 

त्यातूनिया, जीणे नशिबी ‘गुलामी’चे हो आले…

नरदेह दुर्लभ सद्गभाग्ये होता जो लाभला,

‘संघर्षा’विना वाया जन्माचा हो गेला

 

‘नरदेह’ दुर्लभ तो, कवण सद्गभाग्ये लाभला…

मद्याच्या डोहामाजी, मद्याच्या मोहापायी…

जिवंत हाडामांसी, बुडवूनी पाताळी त्यासी

 

मरणाच्या दारी, कर्मदरिद्री तो असला

कामगार-मराठी, शांत-प्रशांत हो जाहला…!!!’’

——————————————————————————-

…आजच्या मराठी-कामगाराला, विशेषतः गुलामगिरीत राब राब राबणार्‍या, पराकोटीच्या वैफल्यग्रस्त मराठी ‘कंत्राटी-कामगारा’ला… कुणी देवदूत, ‘अमृतकुंभ’ घेऊन ‘अमृत’ पाजायला जरी खाली उतरला; तरी तो विमनस्क कामगार, ‘अमृतप्राशन’ करायला नकार देऊन, उलट देवदूताकडे दारुची मागणी करेल, एवढी वाईट अवस्था कामगार-जगताची सध्या आहे!

…कारण, ढुंगणाला पाय लावून कामगाराला संघर्षापासून दूर दूर पळत रहायचं असतं… आपल्या ‘नामर्दपणाची नाचक्की’, ‘एका दारुच्या प्याल्या’त बुडवायची असते!

…जागोजागी, कंपन्या-कंपन्यांमधून असुरक्षित-दिशाहीन मराठी-कामगारांची, प्रामुख्याने कंत्राटी-कामगारांची, सध्या नशिली ‘दारुने’, केवढी ‘दारुण’ अवस्था करुन टाकलीय…???

यात भरीसभर म्हणून, अजून एक जास्त खतरनाक धर्मसंप्रदायी नशा… सध्या, मराठी-कामगार राजरोस प्राशन करत असतो. बाबा-बुवा- तथाकथित सद्गगुरु यांच्या पंथांकडे, तो दबक्या पावलांनी चालत जातो. एक नवीन संप्रदायी धार्मिक-नशा, त्याला तिथे आकृष्ट करत रहाते… आपल्या हीनदीनतेला, ही भांडवली-व्यवस्था’ जबाबदार नसून त्याच्या कुंडलीतले प्रतिकूल ग्रहतारे, त्याचं कमनशीब, धार्मिक प्रार्थनांचा व जपजाप्याचा अभाव… हेच त्याच्या दुरवस्थेला कारणीभूत आहे. आणि, त्यामुळेच, संघटनात्मक पातळीवर संघर्ष न करता, कोर्टबाजी वगैरे अजिबात न करता किंवा राजकीय-संघर्ष तर बिलकूल न करता… सद्गुरु-बाबा-बुवांना शरण जाऊन निव्वळ प्रार्थना करत रहाणं, रामनामाचा जप पानोपानी लिहीणं, पोथ्यापुराणं वाचत रहाणं… हेच, आपली ही दु:स्सह परिस्थिती सुधारण्यासाठी करत रहाण्याचं, त्याच्या मनावर ठासून तिथे बिंबवलं जातं. ‘दारुच्या प्याल्या’च्या नशेपेक्षाही काकणभर सरस, अशी या विपरीत धार्मिकतेच्या अफूची घातकी नशा, कामगारांच्या रक्तात-हाडामांसात खोलवर भिनून जाते आणि कामगार-कर्मचारीवर्ग ‘प्रयत्नवाद’ सोडून किंकर्तव्यमूढ होत, दैववादी बनत… या रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेचा (Vampire-State System) पुरता निरुपद्रवी ‘गुलाम’ बनून प्रतिकारशून्य निपचित जगत रहातो, जे या प्रस्थापित ‘भांडवली-व्यवस्थे’ला नेमकं हवं असतं!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)