सूड कितीही भीषण असला तरी, तो जेव्हा गाझापट्टीतून येतो, तेव्हा तो निश्चितच ‘जंगली-न्याया’चं स्वरुप लेवूनच येतो… म्हणूनच, या जगाला आज, एखादा तरी ‘गांधी’, एखादा तरी ‘बुद्ध’ हवा..!!!
आजचं आधुनिक जग, प्रचंड समृद्ध व संसाधनसंपन्न असूनही प्रचंड अस्वस्थ असणं… चंद्रसूर्य, मंगळापर्यंत मानवी-अंतराळयाने पोहोचूनदेखील माणूस माणसापर्यंत पोहोचू न शकणं… हा सगळा एकूणच, म. गांधी, आजच्या जगात नसल्याचा अतिशय गंभीर व विध्वंसक परिणाम आहे!
आताच्या जगात पुतिन आहेत, ट्रंप-बायडेन आहेत, नेत्यान्याहू, शि जिनपिंग आहेत आणि हो नरेंद्र मोदी देखील आहेत… पण, गांधी नाहीत, नेहरु नाहीत आणि मोदींना ‘राजधर्म’ पाळायला सांगणारे, बाजपेयी देखील नाहीत!
इस्रायलवरचा हमासचा नृशंस हल्ला आणि आता इस्रायलने गाझापट्टीत चालू केलेला भीषण नरसंहार… याने जगभरातल्या प्रत्येक संवेदनशील माणसाचं हृदय कंप पावत असताना, अंतःकरण विदीर्ण झालेलं असतानाच…मणिपूरविषयी तोंडाला कुलूप लावून बसलेले काही भाजपाई डोमकावळे, इस्रायलच्या बाजुने कर्णकर्कश्श काव काव करायला लागलेत… तर कर्नाटक निवडणुकीनंतर पाचावर धारण बसून वाचा गमावलेले काही भाजपावाले पोपटासारखे बोलायला लागलेत!
याचाच अर्थ, मणिपुरच्या आदिवासी कूकी जनतेचा धर्मबदल-रक्तबदल करुन ते, पेगॅसस-साॅफ्टवेअर पुरवणारे (येत्या लोकसभा-निवडणुकीतील इस्रायली-तंत्रज्ञानाधारित संभाव्य EVM-टॅम्परिंगचा मुद्दाही इथे ध्यानात असू द्या) इस्रायली-यहुदी बनल्यावरच भाजपाई सरकारला जाग येणार होती काय?
दोन्ही बाजुंकडील अमानुष नरसंहार आणि भयंकर क्रौर्याच्या पार्श्वभूमीवर ‘भाजपा’वाल्यांनी तत्परतेनं राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करणं, ही भाजपाई-संघीय विकृत-नृशंस विचारसरणीचं निदर्शक होय.
…गोष्टी एवढ्या थराला गेल्यात की, कोण कुठले किडूकमिडूक वेदान्ती उठलेत आणि समाजमाध्यमातून सांगत सुटलेत… ‘यहुदी’ म्हणजे, यहुदी शब्दाचा अपभ्रंश झालेले सौराष्ट्राचे ‘यादव’च; म्हणजेच, आपले बंधूच!
त्यांना यादवी-भाषेतच (अर्थातच, हिंदी) सांगायला हवं, “जब इंडिया में आपके मुताबिक, गौमाता को पालनेवाले (हिंदू) और गाय को खानेवाले (मुस्लिम) भाई भाई नहीं हो सकते तो इज्राइलवाले, जो सबकुछ खाते हैं… वो ‘यहुदी’ लोग, कब और कैसे ‘यदुवंशीयों’ के भाई बन गये…???”
हो, यहुदी धर्मातल्या एका महान गुणधर्माला सलाम, जो एतद्देशीय हिंदू धर्मात आढळतो.. तो म्हणजे, धर्मप्रसारासाठी अनैतिक मार्गांचा, ना त्यांनी कधि अवलंब केला ना कधि स्विकार. कुणाचंही आमिष दाखवून, फसवणूक करुन अथवा तलवार-बंदुकीच्या धाकावर जबरदस्तीने यहुदी धर्मांतर करीत नाहीत. पण, ती हिंदू धर्मासारखी (अर्थातच, शिवबा-संतांचा हिंदू धर्माविषयी बोलतोय आपण, भाजपाई किंवा संघीय विकृत हिंदुत्वाविषयी नव्हे) सोज्वळ भूमिका नाही; तर, अतार्किक अशा, धार्मिक-कर्मठतेतून आलेली आहे, हे विसरुन चालणार नाही… त्यामुळेच, ज्या भाजपाई बेगडी-बनावट हिंदुत्ववादी लोकांना बिनकामाचे ‘साधर्म्य’ शोधायचंय, त्यांना हे आयतं खाद्य मिळायला नको!
जगभरातील, विशेषतः भारतीय, भांडवली-मिडीयातून हमासने केलेल्या अत्याचार व नरसंहाराचे बरेच ‘बनावट व्हिडीओ’ देखील समाजमाध्यमातून प्रसारित करणं चालू असल्याच्या बातम्या थडकत असतानाच, हमासचे प्रवक्ते गाझी हम्माद, “आम्ही लहान मुलं आणि स्त्रिया, यांच्यावर कुठलेही आम्ही अत्याचार केले असल्याचे सिद्ध करुन दाखवाच”, असं उघडं व ठामपणे आव्हान देतायत... ते गांभीर्याने घ्यायला, कुणाची हरकत नसावी.
यासंदर्भात, भारतीय लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत, खासमखास ८ पत्रकारांना ९० तासात इस्त्राईलला जाण्यासाठी व्हिसा मिळाल्याचा संदेश, समाजमाध्यमातून सर्वत्र फिरतोय (प्रत्येकी व्हिसा खर्च २ लाख रु…. मात्र, १४० दिवस उलटूनही आपले ‘गोदी-मिडीया’वाले पत्रकार मणिपूरला अद्याप पोहोचलेले नाहीत, मणिपूर तिकीट तर फक्त १५०० रु. आहे).
अमेरिका-इस्रायल यांचं ‘भांडवली-व्यवस्थे’तलं क्रौर्य-आतंकवाद, त्यांचा जाळूनपोळून काढणारा ‘भांडवली-अहंकार’ एका बाजुला आणि दुसर्या बाजुला ‘हमास-आयसिस’सारख्या संघटनांचा धर्मांध-दहशतवाद… या दोन्हींचा धि:क्कार करत असताना, अशा प्रवृत्तींचा अंत होणं किंवा केला जाणं, या जगाच्या कल्याणासाठी अत्यावश्यक आहेच. पण, एकवेळ, ही हमास-हिजबुल्ला-आयसिस-तालिबानसारखी धर्मांधता किंवा भाजपाई-संघीय धर्मविद्वेष… कधिकाळी आवरता येईल, संपवता येईल. पण, ‘भांडवली-व्यवस्था’ संपवणं, ही अखिल मानवी-कल्याणासाठी कितीही अत्यावश्यक बाब असली; तरीही, ते कर्मकठीण आहे, हे नीट ध्यानात घेतलं पाहीजे. भांडवलशाही किंवा ‘भांडवली-व्यवस्था’, माणसातल्या पशूतुल्य वासनांना व संवेदनशून्यतेला बेफाम मोकाट सोडणारी आणि त्यावर कुणाचंही धड पूर्णपणे नियंत्रण नसणारी; तसेच, जगभरातल्या, वरपासून खालपर्यंत, सगळ्याच जनतेला आपलं आत्मघातकी अनिवार ‘व्यसन’ जडवणारी अशी… एक सर्वव्यापक ‘स्वयंचलित’ यंत्रणा-मंत्रणा असल्याने, ती मानवासह एकूणच सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी कितीतरी अधिक धोकादायक होय!
…म्हणूनच, जगत-कल्याणासाठी, या समस्येवर मुळातून कायमस्वरुपी उपाय म्हणून ‘मालक/व्यवस्थापक आणि कामगार’ असे जे शोषक व शोषित ‘वर्गसंघर्ष’ व निर्मम-शोषक ‘वर्गसंबंध’ (जसे पूर्वी मालक-गुलाम व सरंजामदार-भूदास वर्गसंबंध होते) आहेत, ते संपवण्यासाठी… साम्यवादी-विचारसरणीचा प्रयोग फार काळजीपूर्वक (त्याकामी, रक्तरंजित-क्रांति अजिबात नव्हे; तर, रक्तविहीन; पण, मोठ्या त्यागातून निर्धारपूर्वक केलेल्या राजकीय-जागृतीद्वारेच व्हायला हवी); पण, तातडीने केले जाणं अत्यावश्यक आहे. जगात अमन-शांति प्रस्थापित होण्यासाठी ‘साम्यवाद आणि गांधीवाद’, हातात हात घालून चालला पाहीजे!
जागतिक-तापमानवाढीच्या महासंकटातसुद्धा अजूनही लोकांना आपापल्या धर्मश्रद्धांना प्राणापलिकडे कवटाळून बसावसं वाटणं, हे माणसांमधली संवेदनाचं नव्हे; तर, ‘शहाणपण’ही संपुष्टात येत चालल्याचं, दुर्दैवी लक्षण नाही, तर दुसरं काय आहे?
या एकूण घटनाक्रमाबाबत, सर्वात घातकी भूमिका तथाकथित मुस्लिम-राष्ट्रांची आहे… गाझापट्टीची एवढी दशके मुस्कटदाबी चालू असूनदेखील त्यांना इस्त्रायलशी दोस्ती कराविशी वाटणं; ही त्यांची, एकाबाजुला राजकीय ‘अपरिहार्यता’ (आधुनिक इस्रायली-शेतीतंत्र मिळवण्यासाठीच ते आतूर झालेले; कारण, आता जागतिक-तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर त्यांना आपल्या अर्थव्यवस्थेचं खनिज-इंधनावरचं असलेलं मोठं अवलंबन कमी करायचंय) आणि दुसर्याबाजुला स्वतःच्या राजकीय-संरक्षणासाठी इस्रायलकडून ‘पेगॅसस’सारख्या, विरोधकांवर अचूक व करडी नजर ठेवणार्या ‘हेरगिरी-यंत्रणा’ त्यांना हव्यात (आपल्या सर्वोच्च न्यायालयानं ‘सर्वोच्च-हतबलता’ दाखवलेलं, भारतातलं ‘मेड इन इस्त्रायल’ पेगॅसस-प्रकरण आठवा!).
साधं मसाल्याच्या पदार्थातलं आले (Ginger), बटाट्याच्या चिप्सदेखील… गाझापट्टीमध्ये नेण्यावर पॅलेस्टाईनींना इस्रायलींकडून बंदी कशासाठी? ते काही बाॅम्ब बनवण्याचं साहित्य आहे की काय??
…कशासाठी, तर चोवीस तास, वर्षाचे बारा महिने पॅलेस्टाईनींना सतत अपमानित करत, आपलं क्रूर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि त्यांचा उठताबसता अपमान करण्यासाठीच केवळ… ते इस्रायली लष्करी व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून केलं जातं होतं. एवढंच काय ऑस्लो-करारानंतर शांतता-प्रस्थापनेसाठी शस्त्रं खाली ठेवणाऱ्या पॅलेस्टाईन नेते यासर अराफत यांचीही इस्त्रायलकडून सातत्याने मानखंडना होत गेल्याचं बोललं जातं व त्यांचा बंदीवावासात झालेला संशयास्पद मृत्यू, हे आजवरचं एक न उकललेलं मोठं गूढच. यासंदर्भात, २००२ ते २००६ इस्रायलचे पंतप्रधान असलेले एरियल शेराॅन, यासर अराफत यांच्याबाबत अवाजवी व अन्यायकारक कठोर निर्णय घेताना, यासर अराफत यांचे सल्लागार मोहम्मद रशिद यांना म्हणाले होते, “You guys know my policy, anybody who is perceived to be threat to Israeli people, I will handle him, I will remove him!”
…मग, भारतात गाजलेल्या इस्त्रायली ‘पेगॅसस-साॅफ्टवेअर प्रकरणा’नंतर, आमचाही सवाल आहे की, “What if, Israel is threat to our nation’s democracy…???
अनेक प्रसंगी, इस्रायली सैनिकांकडून नेमबाजीचा सराव निःशस्त्र पॅलेस्टाईनींवर गोळ्या झाडून केला जात असताना, कोणाचंही अंतःकरण कधि द्रवलं नाही…त्यांना शस्त्रं खाली टाकून गाझापट्टीत अतिशय दाटीवाटीने खुल्या तुरुंगातल्या नरकयातना पत्करायला लावल्यानंतरही नाही (खोटे आरोप लावून किंवा किरकोळ अपराधासाठी, प्रदीर्घकाळ इस्रायलच्या तुरुंगातल्या मरणयातना सोसणार्यांची तर, गणतीच नाही). दिवसाची फक्त चार तास वीज उपलब्ध आणि कॅलरी मोजून अन्नधान्याचं ‘रेशनिंग’, कामाच्या ठिकाणी अतोनात शोषण व नोकरीतील असुरक्षितता, इस्त्रायलींकडून रहात्या घरातून कधि जोरजबरदस्तीने हुसकावून लावलं जाईल, याचा कुठला धरबंध नाही व नेमही नाही… ही माणुसकीची की, विकृत हिंस्रतेची लक्षणं? त्यामुळेच, ‘करा किंवा मरा’, या निर्वाणीच्या स्थितीत पॅलेस्टाईनी जाऊन पोहोचले आणि ‘हमास’ला आश्रय देऊन तिला मोठे करते झाले (प्रत्यक्षात, ‘हमास’ला मोठं करण्यात नेत्यान्याहूंचं कुटील राजकारणच कारणीभूत होतं, ही वस्तुस्थिती आहे)
आता तर, अरण्यात हाकारे देऊन श्वापदांना कोंडून मारतात… त्यापेक्षाही, अधिकच्या क्रौर्याने लाखो पॅलेस्टाईनी तहानभुकेने व्याकूळ करुन, औषध-उपचारावाचून अनन्वित हाल हाल करुन मारणार किंवा हवाई-मैदानी जंग करुन मारणार.. वा रे इस्रायल, वा रे व्वा (यहुद्यांचा याहोवा, हा देव देखील फार रागीट प्रवृत्तीचाच… तो कायमच किंचितही माफी न देता, कडक शिक्षा देण्याच्याच भूमिकेत असावा?)! यहुद्यांचा-ज्यूंच्या परमपवित्र जुन्या कराराच्या (Old Testament) हिब्रू-बायबलमध्येच ‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’, ही जंगली-खुनशी सूडात्मक भूमिका असेल; तर मग सगळंच, आजवरचं इस्रायली निर्दय, प्रतिशोधाचं रक्तरंजित-राजकारण सहजी उलगडू लागतं. इथेच म. गांधीच्या “डोळ्याच्या बदल्यात डोळा, या भूमिकेतून सगळं जगचं ‘आंधळं’ होऊन जाईल”, हे महान प्रतिपादन, प्रकर्षानं हृदयाच्या अंतर्हृदयाला जाऊन भिडतं… जेव्हा, परमात्म्याच्या संजीवक आविष्काराचाच, असा ‘क्रूर संकोच’ होऊ पहातो; तेव्हा, हमासची गाझापट्टी असो वा हिटलरची जर्मनी… जगात कुठेही, ‘मोहनदास करमचंद गांधी’ नावाच्या ‘महात्म्याच्या महानतेची महती’, आपल्याला तळमळून ओळख पटवत रहाते.
२०१४ साली गाझामध्ये २२०० लोकं मारली गेली… त्यात ७०% नागरिक होते; तर, इस्रायलचे ६०० लोक मारले गेले, त्यापैकी फक्त १५% नागरिक होते. २०१८-१९ मध्ये इस्रायलचा एक माणूस मारला गेला, दहा जखमी झाले; तर, बदल्यात गाझापट्टीतली २२० लोकं मारली गेली आणि त्यादरम्यान, ९२०० लोकं जखमी झाली होती, हे विचारात घ्यायला नको?
जगभरातल्या सगळ्याच मानवी वेदना-संवेदनांसाठी आपला जीव कळवळला पाहीजे, अंतःकरण पिळवटलं पाहीजे…अगदी, मणिपूरपासून ते थेट गाझापट्टी-वेस्टबँकपर्यंत… मग यातना-वेदना कुणाच्याही असोत, जीव कुणाचाही जात असो!
गाझापट्टी-वेस्टबँकमधलं शापित-अपमानित जगणं, रोजच्या मरणयातना भोगणं…आपल्याच मरणांचा उत्सव, इस्त्रायलींकडून साजरा केला जाताना उघड्या डोळ्यांनी पापण्या उचकटून असहाय्यतेनं पहात रहाणं… यातून गाझापट्टीत, खालून ज्वालामुखी नाही उसळणार तर, काय वरुन थंडगार गारा बरसत रहाणार? त्यातून, दुर्दैवाने जर अशा विस्फोटक परिस्थितीला ‘धर्मविद्वेषा’ची फोडणी असेल… तर, दोन्ही बाजुंकडील क्रौर्य, कुठल्या परिसीमा ओलांडू शकेल, याची कल्पनाही अंगावर सरसरुन काटे-शहारे आणणारीच!
डावी-क्रांती हवीच; मात्र ती, डावी साम्यवादी क्रांति, बंदुकीच्या नळीतून अजिबात व्हायला नको…जोवर, भांडवली-व्यवस्था तुम्हाला नेस्तनाबूत करण्यासाठी क्रूरपणे बंदुका चालवत नाही (जसं, युरोप-अमेरिकेत ‘सोशॅलिझम-कम्युनिझम’ दडपण्यासाठी घडलं होतं); तोवर तर, तुम्ही तसा विचार मनात आणणं देखील गैर आहे!
तुम्ही राजकीयदृष्ट्या जागे व्हा, त्यागाला तयार व्हा… ‘भांडवली-व्यवस्थे’त मोजक्या उच्चमध्यमवर्गीय लोकांना जो मिळतो, त्या तसल्या ऐषोआराम-चंगळवादाची कास सोडून ‘गांधीवादा’कडे वळा, ‘कार्ल मार्क्स’प्रणित साम्यवादी (कम्युनिस्ट) डाव्या विचारसरणीचा अवलंब करुन ‘भांडवलदारवर्ग व वर्गसंघर्ष’ निर्माण करणारी ‘भांडवली-व्यवस्था’च एकदाची जागतिक व्यवहारातून संपुष्टात आणा… त्यासाठी, तुम्ही एका विचाराने एकत्र या, डाव्या विचारसरणीला एकत्र मतदान करायला लागा आणि मग, बघा ‘कंपनी-दहशतवाद’ (Corporate-Terrorism) पोसणारा, हा सगळा भयंकर आक्रमक वाटणारा अमेरिकी, इस्त्रायली, युरोपीय आणि भारतीय भांडवलदारवर्ग देखील, कसा नांगी टाकतो ते! जसे, गाझापट्टीतले फिदायीन इस्रायलमध्ये घुसल्यावर इस्रायलचे तथाकथित शूर सैनिक (खरंतरं, एकदम डरपोक… गाझापट्टीतल्या निशःस्त्र लोकांवर दादागिरी गाजवणारे एकप्रकारचे सरकारी गुंडच ते!) सगळी लाजलज्जा सोडून, हातात अत्याधुनिक शस्त्रं असताना देखील, जीव घेऊन पळत सुटले होते… तसे, भांडवली-व्यवस्थेचे ठेकेदार, कम्युनिस्ट रेट्यापुढे सपशेल शरण येतील आणि अजेय-अभेद्य वाटणार्या ‘भांडवली-साम्राज्या’चे बुरुज सहजी ढासळून पडायला लागतील!
…दुर्दैवाने, या सगळ्यातून हिटलरचे देखील सहानुभूतीदार जगात तयार होऊ शकण्याचा मोठा धोका आहे. ज्या हिटलरने जर्मन ज्यूंवर माणुसकीला काळिमा फासणारे नृशंस अत्याचार केले… तोच हिटलर, आता पुनरुज्जिवीत (‘Resurrection’) होत, जवळपास आठ दशकांनंतर ‘जर्मन-आर्यन’ पोषाख बदलून व आता नव्याने इस्त्रायली गणवेष घालून परत येऊ पहातोय…तो, युगांडाच्या ऐंटेबे विमानतळावरील कमांडो-कारवाईत दगावलेल्या जोनाथन नेत्यान्याहू, या एकमेव कमांडोचा धाकटा भाऊ असलेल्या बेंजामिन नेत्यान्याहूच्या रुपात की, अन्य कुणाच्या…एवढाच प्रश्न शिल्लक रहावा, इतकी वंशविच्छेद करु पहाणारी भीषण-संहारक परिस्थिती गाझापट्टीत सध्या मौजूद आहे!
नेत्यान्याहूंची ‘लिकूड’ पार्टी, म्हणजे आपल्याकडची ‘बीजेपी’च एकप्रकारे. नेत्यान्याहू हा इसम, भ्रष्टाचाराच्या आरोपातून स्वतःची मान, इस्त्रायली सर्वोच्च न्यायालयाच्या जोखडातून सोडवून घेण्यासाठी, न्यायालयावरच नियंत्रण प्रस्थापित करण्याचा कायदा जबरदस्तीने करताना, त्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आपल्याच देशातल्या आंदोलक-नागरिकांना, कित्येक महिने रस्त्यावर उन्हातान्हात उतरायला भाग पाडतो (आपल्याकडे भाजपाई राजवटीत वेगळं काय घडलं किंवा घडतंय?)… तो असला कथित भ्रष्टाचारी, गुन्हेगार इस्त्रायली-पंतप्रधान, आपल्याच नागरिकांप्रति एवढा संवेदनशून्य असेल; तर, मुस्लिम-पॅलेस्टाईनींविषयी किती क्रूर असू शकेल? आता तर, हमासच्या हल्ल्याचं आयतंच निमित्त हाती लागल्यावर, त्यांच्यातला सैतान अजून खवळून उठून प्रलयंकारी तांडव माजवता झाला नाही, तरच नवल!
अवघ्या गाझापट्टीतल्या लाखो लोकांना अन्नपाणी, औषध-उपचारावाचून तडफडत मरायला लावण्याच्या इस्रायली क्रूर निर्धारानंतर, “If, Palestinians are ‘human animals’, then Israelis will prove themselves to be ‘inhuman predators” हे, माणुसकी अंतरी जपणाऱ्या जगातल्या प्रत्येकाने, इस्रायली सरकारला ठणकावून सांगण्याची, हीच ती वेळ आहे.
कुणाला त्यांचा देव जणू एखादा इस्टेट-एजंट असल्यासारखा ‘वचनबद्ध जमीन’ (‘Promised Land’) स्वप्नात देऊन जातो… तर, कुणाचे प्रेषित, कुणाचे देवदूत कुठे दफन केले जातात किंवा वावरतात वा अखेरचं रात्रीचं भोजन कुठे घेतात… अथवा, कुणाचे देव कुठे जन्माला येतात; म्हणून, त्या त्या विवक्षित भूमि, त्या त्या धर्मियांसाठी एवढ्या टोकाच्या अतिरेकी ‘परमपवित्र’ बनून जातात की, ज्या माणसांच्यासाठी त्या ‘पवित्र’ बनलेल्या असतात, त्यांच्याच रक्ताचा अभिषेक पवित्र-भूमिवरचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी पिढ्यानपिढ्या चढवत जात रहावा? धर्म, माणसांसाठी की, माणसं, धर्मासाठी??
…हे असंच चालणार असेल, तर आता या यच्चयावत धर्मांना, त्यांच्या देवादिकांसह एकतर रजा देऊन, ॲमेझाॅनवाल्या जेफ बेझोसच्या अंतराळयानातून कायमचं दूर भटकंतीला पाठवायला हवं किंवा त्यांना घरात-प्रार्थनास्थळातच मर्यादित केलं गेलं जायला हवं… निदान, सजीवसृष्टीसह मानवी-अस्तित्व धोक्यात आणलेल्या जागतिक-तापमानवाढीच्या महासंकटाच्या भीषण पार्श्वभूमीवर तरी, “निसर्ग ही ‘जात’ आणि पर्यावरण हाच, अखिल मानवजातीचा ‘धर्म’ बनला पाहीजे!”
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)