घराणेशाही वाईट, हे एका मर्यादेपर्यंत ठीकच…

(‘राजकीय घराणेशाही’च्या संदर्भात ७ जुलै-२०२२ रोजी म्हणजेच, मिंधेगटाच्या ‘सूरत ते गोवा व्हाया गुवहाटी’, या गद्दार-पलायनाच्या काळ्या पार्श्वभूमीवर, ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे प्रसारित करण्यात आलेल्या, एका अत्यंत महत्त्वपूर्ण तार्किक मुद्द्याचा…थोड्याफार फरकाने, काल शिवतीर्थावरील ‘दसरा-मेळाव्या’तील आपल्या झंझावाती भाषणात, मा. उद्धवजींकडूनही प्रकर्षाने उल्लेख केला गेला, तो संपूर्ण संदेशच वाचकांसाठी पुन्हा एकदा प्रसारित करीत आहोत…)

——————————————————————————————————

घराणेशाही वाईट, हे एका मर्यादेपर्यंत ठीकच… आम्हीही अनेकप्रसंगी त्यावर टीका केलेली आहे. पण, या बाबीची योग्यायोग्यता काही एका ‘निर्वात पोकळी’त ठरवता येऊ शकत नाही. एकूण परिस्थितीचं सर्वपदरी भान बाळगूनच त्यावर, वेळोवेळी निर्णय केला गेला पाहीजे.

यास्तव, सध्या, वर्षानुवर्षे सोबत राहून, संघटनेचे सगळे फायदे ओरपून, ओरबाडून घेणारे आणि यथावकाश संधि मिळताच ठरवून दगाफटका, गद्दारी करणारे ‘एकेक आणि एकूणएक’ राजकारणी सरदार-बरकदार ‘नग’ पाहीले की, मग घराणेशाही तितकीशी घातक वाटेनाशी होते (कारण, विश्वास ठेवायचा तरी कोणावर, गवतात बेमालूम दडलेले ‘विषारी साप’ नजरेनं टिपायचे तरी कसे… हा ‘यक्षप्रश्न’ सध्याच्या सकळ विश्वासघातकी राजकारणात, प्रत्येक पक्ष-नेतृत्त्वासमोर उभा आहेच)… फक्त, यासंदर्भात, राजकीय वारस म्हणून पुढे सरसावणार्‍या व्यक्तिचा वकूब आणि जनमानसातली जातिवंत लोकप्रियता, वेळोवेळी अजमावली जात राह्यला हवी, हे मात्र, शंभर टक्के सत्यच! सरतेशेवटी, निव्वळ ठोकळ, ढोबळ तात्त्विक चर्चेतून नव्हे; तर, समाजहिताच्या परिप्रेक्ष्यातूनच या गोष्टींचं परीक्षण व निरीक्षण केलं गेलं पाहीजे आणि अंतिम निष्कर्षाला पोहोचलं पाहीजे

शिवछत्रपतींचे महाकर्तबगार, व्यासंगी, विद्वान, जनकल्याणकारी सुपुत्र संभाजी महाराजांसारखं, ‘व्यक्तित्व’… वारस म्हणून राजकारणात पुढे आलं, तर समाजाचं भलं होईल की, बुरं? किती सोप्प उत्तर आहे त्याचं… असं घराणेशाहीतून आलेलं सुयोग्य-सुजाण नेतृत्त्व, स्वागतार्ह असायला हवंच!

याउलट, लाखो लोकांना अत्यंत क्रौर्यपूर्ण व्यवहाराने यमसदनी धाडणारे नृशंस जर्मन ‘हुकूमशहा’ हिटलर (आपल्याकडच्या कुणा शासकाची याबाबत आसपासची तुलना होऊ शकते किंवा नाही, याचा निर्णय मात्र वाचकांचाच) इटलीचा बेनेटो मुसोलिनी, रशियाचा स्टॅलिन (सध्याचा, युक्रेनियन जनतेवर, माणुसकीला लाजवणारं भयंकर युद्ध लादणारा रशियाचा ब्लादिमीर पुतिन देखील)… हे कुठल्याही घराण्याच्या वारशाने राजकीय सर्वोच्चपदी पोहोचलेले नव्हते वा नाहीत, ही देखील एक लक्षणीय बाब सद्यस्थितीत विचारात घेतली पाहीजे! ## (हाच तो, मा. उद्धवजींच्या भाषणातील महत्त्वपूर्ण मुद्दा….)##

ज्यांच्यात काही ‘न्यूनगंड’ असतो किंवा ज्यांचं कौटुंबिक-स्वास्थ्य बिघडलेलं असतं… अशी माणसं ‘मानसिक विकृती’कडे झुकत, अफाट मेहनतीने सर्वोच्चपदी पोहोचतात आणि जेवढ्या कठोरतेनं (खरंतरं, क्रौर्याने) त्यांनी राजकीय ध्येय गाठण्यासाठी स्वतःचं तारुण्य जाळलेलं असतं, त्यापेक्षा कैकपट कठोरतेनं, सत्तेवर येताच, ते आपल्या हेकट, हुकूमत गाजवण्याच्या विकृतीने हाताखालचा समाज अक्षरशः जाळत सुटतात… हे वैश्विक सत्य होय! काॅर्पोरेटीय उच्चपदस्थ व्यवस्थापकीय मंडळी देखील, अशाच परिस्थितीतून व याच मनोवृत्तीची घडलेली असतात आणि ते ही कुठल्या वारसाहक्काने (भागधारक मालकवर्ग वगळता) त्या पदावर पोहोचलेले नसतात. उच्चपदस्थ होईपर्यंत घेतलेल्या अहोरात्र मेहनतीने व स्वतःवरच केलेल्या अन्याय-अत्याचाराने त्यांच्यात संवेदनशीलता, नीतिमत्ता फारशी शिल्लक उरलेली नसते… काॅर्पोरेटीय परिभाषेत त्या ‘भावनाशून्यते’ला व आपल्या सोयीनुसार नीतिमत्तेलाच (flexible-ethos) ‘व्यावसायिकता’ (professionalism) म्हटलं जातं.

तेव्हा, सध्या संघीय आणि भाजपाई मंडळींकडून आपल्या देशात जो सातत्याने ‘घराणेशाही’वर हल्लाबोल केला जातोय… त्याचं, नीट ‘शवविच्छेदन’ करुन पहा. ‘घराणेशाही’, ही तशी वस्तुतः, लोकशाही-व्यवस्थेवर फार गंभीर परिणाम वगैरे करणारी बाब नसूनही (कारण, शेवटी लोकशाही-व्यवस्थेत गुप्त मतदानाचा हुकमी एक्का जनतेकडे असतोच) जाणिवपूर्वक त्यावरच, या हितसंबंधी मंडळींकडून जनसामान्यांचं लक्ष ‘घराणेशाही’वरच (अर्थातच, विशेषतः काँग्रेसमधल्या) बळेच केंद्रित केलं जातंय; जेणेकरुन, त्यापेक्षा यांच्या शेकडो नव्हे हजारो पटीने मोठ्या असलेल्या अपयशांकडे, घोडचुकांकडे आणि अन्याय-अत्याचार-शोषण करणार्‍या धोरणांकडे जनतेचं लक्षचं जाऊ नये. उदा. १) डाॅलरशी विनिमय दरासंदर्भात, पं. नरेंद्र मोदींच्या वाढत्या वयाला ओलांडून थेट लालकृष्ण अडवाणींच्या वयाला गाठू पहाणारा ‘घसरता रुपया’ (ज्यासंदर्भात, घसरता रुपया’ म्हणजे, देशाची ‘घसरती पत’, असं २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदीजी म्हणायचे… तेव्हा, एका डाॅलरला ५८ रुपये मोजावे लागत होते आणि मोदींनी निवडून आल्यावर रुपया बळकट करुन ४० रुपयाला एक डाॅलर मिळवून देण्याचं अभिवचन देशाला दिलं होतं)…

२) सामान्य जनतेची कंबर मोडणारी आणि कबर खोदणारी, देशांतर्गत भडकलेली महागाई…

३) देशातली ‘राफेल विमाना’पेक्षाही (त्या विमान खरेदीतल्या, दाबल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत, इथे काही बोलणं सध्या नकोच) वायुवेगाने वाढणारी ‘बेरोजगारी’ आणि देशातल्या तरुणाईला नाईलाजापोटी जबरदस्तीने करावी लागणारी तुटपुंज्या पगारातली ‘अर्धरोजगारी’ तसेच, ‘कंत्राटी-कामगार पद्धती’तली भोगावी लागणारी “गुलामगिरी व नव-अस्पृश्यता”…

४) काॅर्पोरेटीय क्षेत्रातील कंत्राटीकरणाच्या धर्तीवरच… लष्करातही ‘अग्निपथा’वरुन वाटचाल करायला लावत गुलामगिरीच्या अंधःकाराकडे नेली जाणारी ‘अग्निवीरां’ची फौज तयार करण्याचं भाजपाई ‘भांडवली-षडयंत्र’…

५) “बुलडोझर-रिपब्लिक ते बनाना-रिपब्लिक”, असा होऊ घातलेला देशाचा अधोगत राजकीय प्रवास… जातीजमातीत धार्मिक तेढ निर्माण करणारं आणि भारतीय जनतेतलं आपापसातलं सौहार्द्रपूर्ण वातावरण जाणिवपूर्वक नष्ट करणारं घृणास्पद व संतापजनक राजकीय-ध्रुवीकरण… त्यातूनच उद्भवलेलं ज्ञानव्यापी मस्जिद, संतापजनक नुपूर शर्मा प्रकरण, अवघ्या माणुसकीला काळीमा फासणारी उदयपुरची क्रूर हत्या, बंगालची काली-माता प्रकरण वगैरे वगैरे…

६) देशाची सगळी साधनसंपत्ती विकून देशभरातील बँका, सरकारी उपक्रम यांच्या ‘खाजगीकरणा’चा बकासुर-नरकासुर निर्माण करत जनतेला “दे माय, धरणी ठाय” करुन सोडणं…

७) आपल्या घृणास्पद राजकीय हेतूपूर्तिसाठी सगळ्या दमनकारी सरकारी-यंत्रणा (ईडी, आयटी, सीबीआय, केंद्रिय सुरक्षादले व इतर पोलिस-निमलष्करीदले इ.) यांचा बेमुर्वतखोर व बेगुमानपणे वापरुन केवळ, ‘विरोधी पक्षा’तीलच लोकप्रतिनिधींनाच “जाणिवपूर्वक जाहीररित्या भयंकर अवमानित करत” (उदा. आपल्याच पक्षातल्या बोबडकांद्यांना किंवा ‘राणा’भीमदेवी थाटात बकवासबाजी करणार्‍यांना याबाबत चॅनेल्सवरुन पेश करुन आणि ‘विरोधी पक्षा’तील लोकप्रतिनिधींना दिवसेंदिवस, तासनतास या दमनकारी सरकारी-यंत्रणांच्या दहशतवादी दरबारात तिष्ठत ठेऊन) लोकशाहीचा मुडदा पाडणं…

८) चीनचं, लडाखमधल्या आपल्या मोठ्या भूभागावर कब्जा करुन बसणं…

वरील संदर्भात, सध्याचे ‘घराणेशाही’चे मुद्दाम सतत पुढे आणले जात असणारे मुद्दे, काळजीपूर्वक नीट तपासून पहाता… राहुल गांधी यांचं काँग्रेसचं नेतृत्त्व आणि आदित्य ठाकरे यांचं शिवसेनेचं नेतृत्त्व (मा. उद्धवजींनी स्वतःला या पूर्वीच शिवसेना-नेतृत्त्वाबाबत निर्विवादरित्या ‘सिद्ध’ केलेलं असल्यानं, त्यांच्या नेतृत्त्वाची चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही), हे जनमान्य व अतिशय योग्यच ठरतं आणि दोघांकडेही त्यांच्या पूर्वसुरींसारखा मोठा ‘करिष्मा’ नाही… हे एका अर्थी बरंच आहे; कारण, कदाचित त्यामुळेच, त्यांचे पाय जमिनीवर व्यवस्थित टिकून-टिच्चून आहेत, हे अनेक प्रसंगी दिसून आलंय.

मला स्वतःला जर कुणी विचारेल तर, “एकवेळ मी ‘राहुल गांधींचं नेतृत्त्व स्विकारु शकतो; पण, अरविंद केजरीवाल यांचं मात्र नाही”… ते यासाठी की, मी राहुल गांधींवर विश्वास ठेऊ शकतो; पण, पूर्वानुभवावरुन अरविंदजींवर नव्हे (अरविंदजींनी त्यांच्या दिल्लीतील कारकीर्दीत मोहल्ला-क्लिनिक्स किंवा दर्जेदार सार्वजनिक क्षेत्रातील शिक्षण-व्यवस्था, भ्रष्टाचार-निर्मूलन याबाबत केलेलं स्पृहणीय कार्य विचारात घेऊन देखील). नेतृत्त्वाकडे बाकी कुठल्या गुणांची वानवा एकवेळ असली तरी चालेल; पण, ‘विश्वासा’ची कमतरता असून बिलकूल चालणार नाही!

तेव्हा, “उत्तिष्ठत जाग्रत।”, Arise & Awake, जागो और उठो, जागे व्हा आणि उठा… देशात नेमकं काय राजकारण रटरटा शिजतंय त्याचा नीट कानोसा घ्या, “आपण नेमक्या कुठल्या ‘हिंदुत्वा’च्या बाता मारतोय”… मानवजातीसह अवघ्या सजीवसृष्टीचं, म्हणजेच, निसर्ग-पर्यावरणाचं सर्वोच्च भान बाळगणार्‍या शिवबा-संतांच्या उच्चकोटीच्या ‘हिंदुत्वा’च्या की, भाजपाई संधिसाधू व अन्यायी-शोषक काॅर्पोरेटीय ‘हिंदुत्वा’च्या… याचा धांडोळा घ्या व डोळस राजकीय वाटचाल करा… अन्यथा, काळ मोठा कठीण आलाय !

लक्षात ठेवा,

‘मराठीत्वा’सोबत शिवबा-संतांचं ‘हिंदुत्व’, एखादं पृथ्वीमोलाचं लेणं लेवून आल्यासारखं दमदार पण, महन्मंगलपावलांनी आपसूकच येतं; पण, भाजपाई अमंगळ ‘हिंदुत्वा’त मात्र, ‘मराठीत्वा’चा लवलेशही नसतो आणि त्यांच्या ढोंगी, शोषक, बनावट ‘हिंदुत्वा’ने (ज्याची, दुर्दैवाने शिवसेनेला दीर्घकाळ भुरळ पडली होती) गेल्या तीसएक वर्षात महाराष्ट्रात सामान्य मायमराठी-माणसांना उध्वस्त केलंय, बरबाद केलंय… तेव्हा, पुनश्च ‘हरिओम्’ करुया… यापुढे जाज्वल्य, ज्वलंत प्रवास करायचा, राजकीय प्रवाह जागृत करायचा… तो ‘मराठीत्वा’चाच !!!

“संयुक्त महाराष्ट्रानंतर…आता, ‘स्वायत्त-महाराष्ट्र’…. राष्ट्रांतर्गत राष्ट्र ‘स्वायत्त-महाराष्ट्र’… ‘शिवछत्रपती राष्ट्र’ !!!”

|| जय महाराष्ट्र, जय हिंद ||

… राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)