————————————————————————————————-
मार्च १९७४ च्या एस्.एस्.सी. परीक्षेत बोर्डात १६ वा क्रमांक पटकविणाऱ्या आमच्या राजनने शाळेला वाहिलेली आदरांजली त्याच्याच शब्दात वाचा …
————————————————————————————————
दोनच दिवसापूर्वी श्रीयुत मेहंदळे सरांनी मला शाळेत बोलावून घेऊन आपली संस्था व शाळा याबद्दल तुला जे कांही वाटतं ते तू चार शब्दांत लिही, असे सांगितले. सरांच्या म्हणण्याला तत्काळ होकार देऊन मी आनंदाने घरी परतलो.
भावनांच्या संमिश्र कल्लोळातच मी लेखणी उचलली. शाळेतल्या पहिल्या दिवसापासून ते थेट एस.एस.सी.च्या निरोप समारंभापर्यंतच्या साऱ्या घटना चित्रपटासारख्या मनःचक्षूंसमोरून सरकू लागल्या. यशापयशांनी आशा निराशांनी आकांक्षानी भरलेल्या आणि भारलेल्या घटना! शालेय जीवनातील मधुर स्मृती एकाच वेळी मनात गर्दी करू लागल्या. त्यांचा एकमेकांशी मेळ घालणं देखील मला अशक्य झालं. “राजन, मॅट्रीकला तू बोर्डात चमकला पाहिजेस” असं माझी पाठ थोपटून सांगणारे मेहेंदळे सर माझ्या नजरेसमोर आले, तर कधी ” राजन, अभ्यासाचा जास्त ताण पडू देऊ नकोस; नाहीतर ऐन परीक्षेच्या वेळी आजारी पडशील.” असं निर्व्याज प्रेमानं सांगणाऱ्या आमच्या करंदीकर बाईची प्रेमळ मूर्ति माझ्या नजरेसमोर उभी राहिली; तर मध्येच माझ्या सत्कार समारंभाचा हृद्य सोहळा नजरेसमोर येऊ लागला!
माझ्या जीवनातील आनंदाचा एक उत्कट क्षण नव्हे, माझ्या शालेय जीवनाचा सुवर्णकळस म्हणजे माझे एस्.एस्.सी.मधील धवळ यश. शालांत परीक्षेतील भव्य-दिव्य यशाने माझी प्रतिमा एकदम उजळून निघाली. या सुयशाबद्दल माझ्यावर सर्वीकडून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा अक्षरशः वर्षाव झाला. इतका की, त्या अभिनंदनाच्या वर्षावाखाली माझी छाती पार दडपून गेली होती. पण, या नेत्रदीपक यशाचे श्रेय खरोखरच सर्वस्वी माझे आहे का? हा प्रश्न मला अस्वस्थ करू लागला. मंदिराचा तेजाने, अस्मितेने तळपणारा घुमट सर्वांच्या चटकन् नजरेत भरतो पण त्याच्या पायाखालच्या दगडाकडे जो त्या मंदिराच्या पर्यायानं घुमटाचा खरा आधारस्तंभ आहे, त्याच्याकडे सोयिस्कर डोळेझाक केली जाते. तसच काहीसं माझ्या बाबतीत घडलं. माझे यश आणि मी सर्वांना दिसलो पण त्या यशासाठी मला घढविणारे; माझी मनोभूमि तयार करणारे मात्र सर्वांच्या नजरेपासून दूर दूरच राहिले.
लहानपणीच माझं मन संस्कारक्षम बनविण्यासाठी आईने घेतलेली आटोकाट मेहनत माझ्या भावी जीवनाचा पाया ठरला. माझ्या संस्कारक्षम मनाची निकोप वाढ झाली ती तिच्यामुळे! पुढे शाळेमुळे ज्ञानाची दालने जशी खुली झाली तद्वतच माझ्या ज्ञानाची क्षितिजेही दूरवर रुंदावत गेली. अशा वेळी तर माझ्यावर आईवडिलांनी, शिक्षकांनी केलेले संस्कार हाच माझा प्रमुख आधार होता. सात-आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत माझ्या शाळेतच त्या छोट्याश वास्तूतच माझं व्यक्तिमत्व घडविले गेले. मी माझ्या शाळेवर मनापासून खूप खूप प्रेम केलं. शाळेचे माश्मीवर अनंत कुणा आहे. पण त्या ऋणातून मुक्त व्हावं असं मला मुळीच वाटत नाही. त्यात कायम गुरफटूनच रहावसं वाटतं. कारण त्या ऋणांतदेखील एक अनुपम आनंद असतो. मी माझ्या शाळेचं काहीतरी देणं लागतो. ही जाणीवच केवढी सुखद आहे! माझ्या शाळेच्या उत्तुंग वैभवाला माझा थोडातरी हातभार लागला यापरतं माझं दुसरं भाग्य कोणतं?
समुद्रपक्षी जसा आपलं घरकुलं सोडून दूरवर दिसणाऱ्या पण अंत न लागणाऱ्या क्षितिजाचा अज्ञाताचा वेध घेत झेपावतो, तसेच आम्ही विद्यार्थी शालेय जीवनाचा जड अंतःकरणाने हात हालवून निरोप घेऊन महाविद्यालयीन जीवनाच्या ‘शून्यात’ शिरलो ! महाविद्यालयीन जीवनात आणि शालेय जीवनांत अनेकांना अनेक फरक आढळतात. पण मला मात्र तसं आढळत नाही. कारण, मी माझी शाळा आणि कॉलेज यांची तुलनाच करण्यास धजावत नाही त्यांची तुलना होऊच शकत नाही. शाळेमधील आत्मियता, जिव्हाळा का कॉलेजमध्ये आढळणार? शाळेच्या आवारांत पाऊल टाकलं की कसं मने हलके हलकं होतं पण कॉलेजच्या गेटमध्ये शिरायचं तेच मुळी औपचारिकतेच एक नवं ओझं अंगाला चिकटवून. माझ्या शालेय जीवनात मला माझ्या मित्रांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ध्येयसिद्धीसाठी धडपडणाऱ्या व्यक्तीच्या मागे सदैव एक प्रेरक प्रेरणा उभी असावी लागते. ती प्रेरणा निर्माण करण्यात माझे आई-वडिल व शिक्षकांबरोबर माझ्या मित्रांचाही मोठा हातभार आहे. किंबहुना माझ्या यशाबद्दल माझ्यापेक्षा त्यांनाच अधिक खात्री होती म्हणून त्यांनी वर्षभर मला निरपेक्ष सहाय्य केलं.
माझी ध्येयासक्ति आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच मी यशाचा भव्य सोपान चढू शकलो. “Plan the work & Work the plan” हे अभ्यासाचं तत्व त्यांनीच माझ्या अंगी बाणवलं. माझं व्यक्तिमत्व त्यांनी घडविलं, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी यशाकडे वाटचाल केली; या सर्व गोष्टींची कृतज्ञतापूर्वक जाणीव ठेऊन निरोप समारंभाच्या वेळी मी शिक्षकांबद्दल बोलताना एकच वाक्य उद्गारले.
“Ask me not what my teachers did for me; ask me what they did not !”
…राजन रघुनाथ राजे
—————————————————————————————————————–
आज पराक्रम झाला
[ राजन राजे बोर्डात सोळावा आला । इच्छा अपेक्षा बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाली. मन आनंदाने तुडुंब भरून गेले तेव्हा.. ]
उचंबळे आज दरिया उसळत्या भावनांचा शब्द कसा वर्णू सांगा आनंद जो मना झाला ।। १ ।।
सारुनिया राख दूरी प्रज्वलित होई ठिणगी पुंजाळुनी नभ जाई लपलेली अशी शक्ती ॥ २ ॥
वाटे कोणा मुंगी इवली उचलेल मेरू कशी ? परी पराक्रम झाला मेरू ढळला ढळला ॥ ३ ॥
इवली ती मुंगी अमुची शक्तिमान होवो पुरती घाळी गगना गवसणी इच्छा हीच आज मनी ! ॥ ४॥
…सौ. शालिनी करंदीकर