जागतिकीकरण की सांस्कृतिक अगतिकीकरण….!!!

आजच्या संगणकीय व माहितीतंत्रज्ञानाच्या महायुगात अवतरलेलं जागतिकीकरण (globalization)ही भांडवल, वस्तू, तंत्रज्ञान व सेवा यांना (प्रत्यक्ष मनुष्यबळ वगळता) सर्वसाधारणपणे निर्बंधमुक्त वातावरणात एका देशातून जगातल्या दुसऱ्या कुठल्याही देशामधे ये-जा करू देणारी, प्रामुख्याने ‘आर्थिक-प्रक्रिया’ असली तरी जीवनातील इतर क्षेत्रेही प्रभावित करण्याएवढी तिची व्याप्ति व शक्ति मोठी आहे. त्यामुळे जागतिकीकरण म्हणजे केवळ देशाची सीमा खुली करीत आपली अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडून घेणं नव्हे, तर पाश्चात्य प्रभावाखाली दीर्घकाळ राहीलेल्या विद्यमान जागतिक-संस्कृतिशी, आपल्या पौर्वात्य संस्कृतिची नाळ जुळवू पहाणं आहे. इतिहासाच्या एका विशिष्ट टप्प्यावर अपरिहार्यपणे स्वीकारावी लागलेली, ही जग्डव्याळ प्रक्रिया असल्यानं, निदान पिढीजात असलेल्या आपल्या संपन्न सांस्कृतिकवारशाची फारशी हानी होऊ नये, म्हणून आपण त्याला कसा ‘प्रतिसाद’ देत आहोत किंवा देणार आहोत, त्याची शवचिकित्सा व्हायलाच हवी!

ज्ञात इतिहास सांगतो की, राजकीय वा सांस्कृतिक वर्चस्व प्रस्थापिण्यासाठी या भरतभूमिनं कधिही कुणावरही लष्करी आक्रमण केलेलं नाही. पण इसवीसनापूर्वीपासूनच या सुवर्णभूमिला लुटण्याच्या नापाक इराद्यानं शक, कुशाण, हूण, बर्बर, मोगल,पठाण येथे खुष्कीच्या मार्गाने आले. नंतर प्रथम पोर्तुगीज, मग पुढे डच, फ्रेंच व अखेरीस इंग्रज जलमार्गाने आले. त्यांच्या शेकडो वर्षांच्या रानटी-जुलमी-लुटारू हल्ल्यांच्या व राजवटींच्या पाशवी यातना, या पावनभूमीनं सोसल्या. तरीही अशा विनाशकारी आघातांच्या महापूरात ‘हिंदवी-संस्कृतिची’ लव्हाळी वाचलीच असं नव्हे, तर नवरसानं तरारली! लष्करी आक्रमणांचा प्रतिकार करताना इतिहासाच्या पानोपानी कुठे आम्ही कमी पडलो असू, पण त्याच्या सोबतीनं होणाऱ्या सांस्कृतिक-आक्रमणाचा आम्ही ‘प्रतिकार’ नव्हे, तर त्याला आमच्या पध्दतीनं ‘प्रतिसाद’ दिला. विदेशी सांस्कृतिक प्रभावांना असा प्रतिसाद देण्याची आपली पारंपारिक पध्दतही अत्यंत शास्त्रीय व निकोप, म्हणूनच अवघ्या जनांना उध्दरणारी होती. आम्ही आमच्या सांस्कृतिक पर्यावरणावर आदळणाऱ्या या नित्यनूतन लाटांना (काही अपवाद वगळता) आंधळा-कर्मठ विरोध ‘न’ करता किंवा त्यांच्यापुढे अभिमानशून्य लोटांगणही ‘न’ घालता, त्यातील ‘टाकाऊ’ गोष्टींना मुरड घालून ‘टिकाऊ’ तेवढचं घेतलं. घेतानाही स्थलकालानुरूप अनुकुल करून घेतलं आणि टाकतानाही त्यातील पोषक द्राव शोषून घेत, केवळ चोथ्याचचं उत्सर्जन केलं! असं शेकडो नव्हे, सहस्त्र वर्षे सातत्यानं घडल्यानं वेगवेगळया आक्रमक टोळया आल्या अन् गेल्या, विविध राज्ये-साम्राज्ये घडली अन् झडली, तरी इथल्या संस्कृतिची पणती नवनवीन संकल्पनांच्या वादळामधेही अक्षय तेजानं तेवत राह्यली. अशातऱहेनं भाषा, चित्रकला, संगीत, शिल्पकला, वास्तुकला, ज्ञान-विज्ञान, खेळ-मनोरंजनाची साधने, साहित्य, दृक्श्राव्य माध्यम, राहणीमान, जीवनमूल्ये इ. विभिन्न पदर असलेल्या आक्रमकांच्या नूतन सांस्कृतिक बदलांना सामोरं जाताना, आपण आपलं सांस्कृतिक सत्त्व व स्वत्त्व नुसतं काळजाआड जपलचं असं नव्हे, तर त्याला जाणिवपूर्वक अधिक सशक्त व समृध्द होऊ दिलं!

मग या सबळ ऐतिहासिक पार्श्वभूमिवर सध्याच्या जागतिकीकरणाच्या माध्यमातून येऊ घातलेल्या सांस्कृतिक बदलांचा, एवढा गहजब करण्याचे कारण काय? तर प्रामुख्याने कारण हे की, पूर्वीच्या आणि सध्याच्या स्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. “आपणासारिखे करिती तत्काळ” या नात्याने सांस्कृतिक एकवाक्यता (Cultural Standardisation) घडवू पहाणारे “जागतिकीकरण” हे आर्थिक-संक्रमण आहे, आजवर घडत आल्याप्रमाणे झालेले ‘लष्करी-आक्रमण’ नव्हे! आधुनिक जगातील आक्रमकता आता ढाल, तलवार, बंदूकीची भाषा बोलत नाही, ती एतद्देशीयांना ‘षंढ’ गुलाम करणारे, नव्या आर्थिक नितीचे ‘थंड’ तोफगोळे (की, अफूचे गोळे?)उडवते! बरं हे तोफगोळे आग ओकणारे नसल्याने व आक्रमण लष्करी नसल्याने, एकूण समाजमानस गाफील राहतं. मग अशा सांस्कृतिक बदलांना पूर्वीप्रमाणे ‘सजग-प्रतिसाद’ देणं, ही समाजाच्या दृष्टीनं फारच अवघड बाब बनते व त्यातून तो समाज आपला काळाच्या कसोटीवर टिकून राहीलेला मूळ चेहरामोहराच हरवून बसण्याची शक्यता निर्माण होते. बेबंद अत्याधुनिकीकरण, अमर्याद औद्योगिकीकरण, बकाल शहरीकरण, अधिकार व संपत्तिचे बेमुर्वत केंद्रिकरण, अनिर्बंध खाजगीकरण, बेगडी बुध्दीप्रामाण्यवाद, संवेदनशून्य स्पर्धात्मकता व अविवेकी चंगळवाद अशी पृथ्वीपर्यावरणाला मारक प्रश्नांची मांदियाळी सोबत घेऊन येणाऱ्या जागतिकीकरणाच्या नव्या आर्थिक-क्रंातीने येणारी अनर्थकारक सांस्कृतिक-प्रतिक्रांति, ही समाजपुरूषाला कायमस्वरूपी ‘भ्रांति’ आणू शकते, हा जागतिकीकरणाचा मोठा धोका आहे.

आर्थिक संपन्नता, लष्करी सामर्थ्य आणि तंत्रज्ञानातील झेप, हा एखाद्या वसाहतवादी साम्राज्यशाहीचा भक्कम पाया होऊ शकतो, पण तो तेथील संस्कृतिच्या निकोप, निरोगी व संतुलित पैलूंचा निदर्शक असतो असं नव्हे. उलटपक्षी इतिहास हे गर्जून सांगेल की, पाश्चात्य व इतर देशाबाहेरील संस्कृति, या सदैव आत्यंतिक टोकाच्या भूमिका घेत आलेल्या आहेत. त्पहीज जव तनसम व त्पहीज जव नदतमेंवद हे जणू जन्मसिध्द हक्क प्राप्त करून घेतल्यागत ‘जगा आणि जगू द्या’ किंवा दया, क्षमा, शांति सारख्या शाश्वत जीवनमूल्यांना इतिहासाच्या पानोपानी त्यांनी कःपदार्थ ठरवलयं. देशाबाहेरून आलेल्या संस्कृतिंमधून घेण्यासारखं खूप काही होतं व आहे. कुणाची प्रचंड ज्ञानलालसा, निरंतर कलेची आराधना, संशोधकवृत्ती तर कुठे अविश्रांत मेहनत व चिकाटीने अंगिकारलेल्या कार्यात पूर्णपणे झोकून देण्याची विजिगीषु मनोवृत्ती! कदाचित या वैशिष्टयांचाच परिपाक म्हणून जगभर त्यांचच वर्चस्व ठायीठायी प्रत्ययास येतं. यावरून कुणी म्हणेल की, जर या विदेशी संस्कृतिमध्ये एवढं अंगभूत सामर्थ्य व प्रभाव आहे, तर आपली तथाकथित गुलामीची मानसिकता असलेली नेभळट संस्कृति नाकारून विदेशी संस्कृति, आहे त्या स्वरूपात जशीच्या तशी, का स्वीकारू नये? त्याचं सरळ उत्तर हे की, सांस्कृतिक वारशाचा दर्जा व श्रेष्ठत्व, हे हजारो वर्षांच्या ऐरणीवर घासून पहावं लागतं, दोनेक शतकांच्या नव्हे! राजकीय, लष्करी वा तांत्रिक वर्चस्वाखालील दमनशक्तींच्या पांगुळगाडयानं उभा राहीलेला सांस्कृतिक प्रभाव, हा अशाश्वत व तात्कालिक कार्यकारणभाव असू शकतो, नव्हे तो तसा असतोच. सोन्याच्या धुराच्या ऊबेत वाढलेल्या आपल्या निसर्गसमृध्द भारतीय संस्कृतित, ‘प्रवृत्ति’ व ‘निवृत्ती’ मधील अचूक संतुलन साधताना, काळाच्या ओघात काही दोष जरूर निर्माण झाले असतील व ते अहर्निश प्रयत्न करून निपटून काढायलाचं हवेत. पण म्हणून तिला गुलामी मनोवृत्तीची वा नेभळट म्हणणं, हा आपल्या संस्कृतिचा घोर अपमान ठरेल. मित्रांनो, आभाळाएवढया महान आपली संस्कृति, हेच या विश्वातील अंतिम सत्य आहे! इतिहासाची वास्तवाशी सांगड घातली तर दिसेल की, सतरावेळा सोरटी सोमनाथाच्या मंदिराची लूट व विध्वंस करणाऱ्या आक्रमक गझनीच्या मेहमूदाचे वंशज, आज अफगाणिस्तानात कुठल्या अवस्थेत आहेत? याउलट काळाच्या छाताडावर पाय रोवून सोरटीच्या सोमनाथाचं मंदीर, आज पूर्वीपेक्षाही अधिक तेजानं तळपत डौलानं उभं आहे! ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधिही मावळत नव्हता व ज्यांनी दिडेकशे वर्षे आमच्यावर सरंजामशाही राज्य केलं, त्यांना दुसऱ्या महायुध्दाच्या मरणयातना तर सोसाव्या लागल्याच, पण आजही केवळ आपल्या मूळ भूभागातच सिमीत होत रोज नवनव्या राजकीय (उदा. इराक सैन्य माघार प्रकरण, अतिरेकी बाँम्बहल्ले), आर्थिक (उदा. EU मध्ये सामिल व्हावे न् व्हावे, ही संभ्रमावस्था), सांस्कृतिक (उदा. वांशिक समस्या, युवापिढीचा बेबंदपणा) पेचप्रसंगांना, अनारोग्य व जीवनमूल्यांचा कमालीचा ऱहास या सारख्या सामाजिक प्रश्नांना तोंड देताना, त्यांना तारेवरची कसरत करावी लागतेय. मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन् डे असे माणसांवर प्रेम करण्याचे दिवस पाश्चात्यांना ठरवून साजरे करावे लागतात. पण माणुसकीचा सदैव गहिवरं असणाऱ्या भारतीय संस्कृतिला, तशी वेगळी चूल मांडण्याची गरज भासत नाही. किंबहुना “जे जे जगी जगते तया, माझे म्हणा – करूणा करा”, म्हणणारे आम्ही, असे दिवस माणसांसाठी नव्हे, तर प्राणी-वनस्पतींसाठी ठरवून साजरे करतो. उदा. बैलपोळा, नागपंचमी, तुळशीचं लग्न, वटपौर्णिमा. केवळ माणुसकीचं नव्हे, तर पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात आदर्श ठरेल, अशी ‘भूतदया’ व ‘वृक्षवल्लींना सोयरे’ मानणारी आपली संस्कृति, अशा सणांचे निमित्त साधून जेव्हा अन्य जीवसृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करते, तेव्हा ती जैविक-संवेदनेची सर्वोच्च पातळी गाठते! अर्वाचीन काळापासून ध्यानधारणा, यम-नियम, आसन-प्राणायाम या त्रिसूत्रीनं व इतर यौगिक क्रियांनी आम्हाला निर्विवादपणे रोगमुक्त ठेवलं. याशिवाय आमचं आध्यात्मिक उन्नयन देखील त्या करत्या झाल्या. जेव्हा कधिकाळी शरीर रोगग्रस्त झालं, तेव्हा “मूले कुठारः” ‘या न्यायानं रोगनिवारणाच्या क्षेत्रात हजारो वर्षापासून आजतागायत आयुर्वेदानं आपली साथसंगत ईमानेइतबारे केली व काळाच्या अंतापर्यंत करीत राहील. पाश्चात्य संस्कृतिचा प्रभाव जगभर ज्याच्या आधारावर रूजला व मग वाढला, ती ‘ऍलोपथी’ (Allopathy) ही आधुनिक रोगचिकित्सा पध्दती अंगभूत घातक आनुषंगिक परिणामांमुळे तसेच रोजच्या तिच्या उघडया पडत चालेल्या मर्यादांमुळे, उण्यापुऱ्या दोन-तीन शतकातच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे, हे कशाचं लक्षण? आपल्या ऋषिमुनींनी कुठलीही ‘प्रयोगशाळा’ बाहेर उभी न करता, स्वतःचा देह हीच प्रयोगशाळा बनवून आयुर्वेद निर्मिला, तर ऍलोपथीच्या जन्मासाठी ‘प्रयोगशाळा’ नावाची प्राण्यांची अनंत यमयातनाघरें उभी करावी लागली व आजही तीच क्रूर परंपरा शास्त्राधारावर बिनदिक्कत जगभर सुरूच आहे, ही बाब देखील विसरून चालणार नाही (यामुळेच ऍलोपथीचा आश्रय घेणारी जगातील कुठलीही व्यक्ति स्वतःला ‘अहिंसक’च काय, पण ‘शुध्द-शाकाहारी’ देखील म्हणू शकत नाही, असं माझं ठाम प्रतिपादन आहे, मग ती व्यक्ती भले कुठल्याही धर्माची वा जातीची असो). ज्या ‘पाश्चात्य जीवनपध्दतीचं’ आम्ही सार्वत्रिक अंधानुकरण करीत आहोत ती व ‘ऍलोपथी’ ही पाश्चात्य रोग चिकित्सापध्दती, मूलगामी व सर्वेत्कृष्ट मानायची तर रोज नव्यानं उघडणारी इस्पितळे व दवाखाने यांची सर्वत्र रेलचेल होऊनही, त्या साऱयांची ‘दुकाने’ सुखेनैव चाललीयतं, याचा नेमका अर्थ कसा लावायचा? कुठतरी-काहीतरी भयंकर चुकलयं-चुकतयं एवढं नक्की! पण थबकून विचार करायचा कुणी? कारण जागतिकीकरणाच्या वावटळीत प्रत्येक जण ‘फोक्स्ड्’ (focused) राहून फक्त आपला ‘प्रोफेशन’ (व्यवसाय) सांभाळणारं आणि  ‘प्रोफेशन्’ (Profession) म्हणजे तरी काय, तर नेट् ऑफ् ‘इमोशन्’ (Net of emotion) म्हणजेच भावना वगळून जे काय उरतं, ते व्यावसायिक कौशल्य!

म. गांधी म्हणायचे, “Mother earth can take care of everyone’s need, but not one man’s greed!” सूर्याच्या स्थिरांकाच्या (Solar Constant) संकल्पनेनुसार पृथ्वीवरील मनुष्य जातीसह बहुजैविक जाती-प्रजातिंच्या किमान व कमाल संख्येची एक नैसर्गिक लक्ष्मण-रेषा असते. आपण जमीन, पाणी, वने-अरण्ये, कुरणे या नैसर्गिक संसाधनांच्या उपभोगाची कमाल मर्यादा ओलांडत, त्या लक्ष्मण-रेषेला पुसून टाकीत आहोत. जागतिकीकरणाचे काही लक्षणीय फायदे जरूर असू शकतात. अशा प्रकारची कुठलीही सामाजिक-आर्थिक प्रक्रिया इष्ट-अनिष्ट परिणामांच्या उभ्या-आडव्या धाग्यांचे वस्त्र लेवूनच येते. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत अंतर्भाव असलेल्या ‘अनिष्ट’ प्रभावांचे फलित म्हणून पर्यावरणीय जाणीव व जैविक-संवेदना, या परमपवित्र भरतभूमितून देखील हळूहळू का होईना, पण निश्चितपणे काढता पाय घेऊ लागल्यात. प्रत्येक मनुष्यजीव जन्माला येण्याच्या ‘क्रिये’पासून ते त्याच्या ‘अंत्यक्रिये’पर्यंत, आपला जीवनक्रम निभावताना पर्यावरणीय हानी करीतच असतो. पण जसजसा तो वैज्ञानिकदृष्टया प्रगत बनत जातो आणि उच्च राहणीमान व चंगळवाद याच्या उत्तरोत्तर पूर्ण आहारी जातो, तसतसा पर्यावरणाच्या हानीला पारावार रहात नाही. एरव्ही ही हानी भरून काढण्याची पृथ्वीची असलेली अंगभूत क्षमता कमी पडायला लागते. मग अवघ्या जैविकसृष्टीच्या अस्तित्वाच्या प्रक्रिया ‘निसर्ग-नियमन’ करू पहाणाऱ्या माणसाच्या हातून अलगद निसटून झपाटयानं निसर्गाच्याच अधीन होऊ लागतात. परिणामस्वरूप सहनशक्तीची परिसीमा ओलांडली गेल्यानं, खवळलेला निसर्ग हळूहळू आपलं रौद्ररूप दाखवू लागतो. उदा. मधुमेह, कॅन्सर, एड्स्, हृदयरोग इ. चे थैमान तसेच जागतिक तपमानातील वाढ (Global Warming) व ओझोन थरातील छिदे व त्यांचे संभाव्य भीषण परिणाम.

पाश्चात्यांच्या एकसुरी सजीव सृष्टीचे (उदा. तेथील धान्ये, फळे, फुले, प्राणी-वनस्पती, माती, हवा ठराविक प्रकारच्याच असतात) कदाचित त्यांच्या जीवनदृष्टीत व संस्कृतित प्रतिबिंब पडलं असावं. त्यामुळे त्यांचे अन्न, वस्त्र, सण-उत्सव, भाषा, चालीरिती, घरे, मनोरंजनाची-दळणवळणाची साधने ही बऱ्यापैकी एकसुरी असतात व ते तसे असणे, हेच त्यांच जीवन आहे. याउलट ‘चौऱयांऐशी लक्ष योनिंची’ अतिप्रचंड जैविक बहुविधता ल्यालेला आपल्या भरतभूमीचा सूर्यप्रदेश, हा आपला निसर्गदत्त संपन्न वारसा आहे. पौर्वात्य संस्कृतितील बहुविधता ही या जैविक-शृंखलेला अभंग ठेवण्यास ‘कारक’ व ‘पूरक’ ठरू शकेल, तर एकसुरी पाश्चात्य संस्कृति खचितचं ‘मारक’ ठरेल. मित्रहो, या जैविक-शृंखलेच्या अभंग-अतूट राहाण्यातचं पृथ्वीवरील अवघ्या सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचं रहस्य दडलेलं आहे. इंग्लिशमध्ये एक म्हणं आहे, “Any chain is as strong as it’s weakest link!” म्हणून या घडीपर्यंत ब्रम्हांडात एकमेवाव्दितीय असणाऱ्या पृथ्वी नावाच्या ‘सजीव’ग्रहावरील जीवसृष्टी टिकवून धरण्यासाठी, आपल्या जैविक बहुविधतेला डोळयात तेल घालून जपलं पाहिजे. या कार्यात याअगोदरच खूप उशीर झालेला आहे व आता अधिक वेळ वाया गमावला तर काळ माफ करणार नाही! जागतिकीकरणाच्या वावटळीत ही जपणूक तेव्हाच होऊ शकेल, जेव्हा शाश्वतमूल्याधारित जीवन-संस्कृतिचं ‘जागतिकीकरण’ होईल!  “अर्थातच त्यासाठी भारतभरातील प्रादेशिक भाषांच्या भक्कम पायाभूत ‘इंटरनेटचा’ वापर करून पौर्वात्य संस्कृतिच्या ‘सॅटेलाईटव्दारा’ संस्कृतिचं ‘प्रक्षेपण’ व्हायला हवं अन् पश्चिमेच्या ‘डिश् ऍन्टेना’ किंवा ‘सर्व्हर’ (Server) ने त्याचं ‘ग्रहण’ करायला हवं! एवढचं नव्हे तर चंगळवाद, स्वार्थी-शोषक वृत्ती, पर्यावरणाप्रति संवेदनशून्यता, जैविक असंतुलन इ. सांस्कृतिक ‘प्रदूषण’ करणारे ‘व्हायरस्’ रोखणारे ‘ऍन्टीव्हायरस्’ आम्हाला आमच्याच हाताने-आमच्याच प्रादेशिक भाषांमधून लिहावे लागतील, कारण भाषा आणि संस्कृति या शेवटी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

झाडांची मूळे ज्याप्रमाणे मातीला घट्ट धरून तिचं उन, पाऊस, वाऱ्यापासून संरक्षण करतात, त्याचप्रमाणे विभिन्न प्रादेशिक भाषा, त्या त्या संस्कृतिचं बाह्य मानवी व नैसर्गिक संक्रमणापासून संरक्षण करत आलेल्या आहेत. आजमितीस जगभरातील ज्ञात जवळजवळ सात हजार व भारतातील दोन हजार प्रचलित बोली भाषांपैकी कित्येक बोलीभाषा या विदेशी वसाहतवादी संस्कृतिमुळे या अगोदरच नष्ट झालेल्या आहेत व उरलेल्यांपैकी 90:हूनही अधिक मृत्युपंथाला लागल्यात, ही वस्तुस्थिती विषण्ण करणारी आहे. ज्या वेगानं आपण प्रादेशिक भाषांचा अमूल्य खजिना गमावतोय, त्याच वेगानं आपण पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातील अकल्पित नैसर्गिक बदलांना व संकटांना तोंड देत मानवी अस्तित्व टिकवून धरणारं, विभिन्न मानवी समूहांचं पिढीजात ज्ञान व अंगभूत सामर्थ्य, याला आपण कायमचे पारखे होणार आहोत. मायकेल क्रॉस् सारख्या कित्येक भाषातज्ज्ञांच्या मते, ही बाब जैविक बहुविधतेच्या मोठयाप्रमाणावरील विध्वंसाप्रमाणेच मानवी अस्तित्वासाठी प्रचंड धोकादायक आहे!

त्यामुळे जागतिकीकरणाच्या माध्यमातून येऊ घातलेल्या सांस्कृतिक व पर्यायानं पर्यावरणीय धोक्यांना यथोचित ‘प्रतिसाद’ देण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकानं सर्वप्रथम आपापल्या प्रादेशिक भाषांची ‘ढाल’ हाती घेऊन त्यांना सामोरं गेलं पाहिजे. अशा कठीण समयी माथ्यावर संतांची छाया, काळजात सानेगुरूजी-भीमरावांची माया व छातीवर छत्रपतीशिवराया मिरविणाऱ्या मराठी भाषिकांवर मोठी जबाबदारी येऊन पडते! मराठी संस्कृति ही भारतीय संस्कृतिचा मुख्य आधार आहे, दुष्प्रवृत्तीवर प्रहार आहे आणि सत्प्रवृत्तीची तारणहार आहे!” 1962 साली ‘हिमालयातून’ परचक्र आल्यानंतर ‘हिमालयाच्या’ मदतीला ‘सह्याद्री’ धावला होता…. आज तोच ‘हिमालय’ जागतिक तापमान वाढू लागल्यानं वितळू लागलायं, तेव्हा ‘सह्याद्री’ स्वस्थ कसा बसू शकेल?

काळाच्या रेटयातं आधुनिक जगातील व्यवहाराची, प्रसंगी ज्ञानाची म्हणून, ‘इंग्रजी’ नाईलाजास्तव का होईना ‘न’ स्वीकारण्याएवढी आमची मनोवृत्ती नक्कीच ‘कप्पाळकरंटी’ नाही. इंग्रजीला आम्ही जगाची भाषा म्हणून केव्हाच स्वीकारलीयं. मात्र आपुलकीच्या माणसांमधील संवाद मायबोलीला विसरता झाला – साहित्यवाचनानं मायबोलीचा घरोबा मोडला, तर जीवनाचं चित्र आपल्या मूळ विभिन्नरंगछटा हरवून ‘एकसुरी’ होईल. नाही म्हटलंतरी त्यातील काही रंगछटा उठून दिसतील, पण त्यांच्या भडक रंगसंगतीत, ‘स्नेहाची’ कोमल छटा कुठल्या कोपऱ्यात बावरून दडून बसलीयं, हे संवेदनशील मनालादेखील शोधून सापडणार नाही! “मेंदूची भाषा” इंग्रजीच काय खुशाल फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश कुठलीही असू द्या, पण “हृदयाची भाषा” ही मायबोलीच हवी!

म्हणूनच दिवसभराच्या पोटार्थी रहाटगाडग्यातून निभावण्यासाठी, इंग्रजी भाषेचं ‘वाघिणीचं दूध’ जरूर प्राशन करा, पण रात्री निजताना आपल्या मायबोलीचं “गाईचं दूध” प्यायला विसरू नका…. कारण, कारण दगडी शिळेवरसुध्दा खात्रीची शांत झोप बहाल करण्याचं, अद्भूत सामर्थ्य फक्त त्यांतच आहे! अन्यथा मित्रांनो, ‘काळझोप’ आपली वाट पहात आहे……..!!!

-राजन राजे