‘नॉएडा’ चा धडा!

२२ सप्टेंबरला विषुववृत्तावर मध्यान्ही सूर्य अगदी अचूक डोक्यावर आलेला असतानाच, सर्लिकॉन्-ग्रॅझियानो ट्रान्स्मिशन् प्रा. लि. या गिअर बॉक्सेस् व बेअरिंग्ज् तयार करणाऱ्या ‘ग्रेटर नॉएडा’ स्थित इटालियन (तुरीन येथील) बहुराष्ट्रीय कंपनीत, आंदोलक कामगारांकरवी कंपनी MD/CEO ललितकिशोर चौधरी यांच्या झालेल्या क्रूर हत्येनं, भारतातीलच नव्हे तर जगभरातील औद्योगिकविश्व अक्षरशः हादरून गेलयं!

वरील वाहनांच्या सुटया भागाचं उत्पादन करणाऱ्या व ३६० कोटी वार्षिक उलाढाल असणाऱ्या इंजिनियरींग कंपनीत, गेले वर्षभर औद्योगिक अशांतता खदखदत होती आणि परवा त्या कोंडलेल्या असंतोषाच्या वाफेचा विस्फोट झाला. सर्वसाधारण भारतीय जनतेची नजर ही नेहमीच वरवर घडणाऱ्या उद्रेकावर रोखलेली रहाते आणि दुर्दैवानं त्या कडेलोटापर्यंत ढकलत आणणाऱ्या व जाणिवपूर्वक निर्माण केल्या गेलेल्या परिस्थितीकडे, आपण सोयिस्कररित्या डोळेझाक करण्यात धन्यता मानतो. मग घडतं एवढचं की, जी उपाययोजना आपण हाती घेतो ती वरवरची मलमपट्टी ठरते व मूळरोग ‘कॅन्सर’ सारखा समाजपुरूषाच्या देहात हातपाय पसरत रहातो आणि ‘ग्रेटर नॉएडा’शी साधर्म्य सांगणाऱ्या घटना, वेगवेगळया पातळयांवर व वेगवेगळया स्वरूपात, देशांतर्गत घडत रहातात. धार्मिक असहिष्णुतेतून निर्माण झालेला ‘दहशतवाद’, टोकाच्या पिळवणूकीतून निर्माण झालेला नक्षलवाद, ही अशातऱहेच्या घटनांची ‘रासायनिक संयुगे’ होत. समाजशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ अशी नेहमीच मांडणी करतात की, जेव्हा एक आत्महत्या घडते, तेव्हा शंभरजण आत्महत्येच्या काठापर्यंत जाऊन पुन्हा परतलेले असतात! तव्दतच ‘ग्रेटर नॉएडा’तील ही घटना अपवादात्मक वा एकमेव नसून, हा उदारीकरण (Liberalisation), खाजगीकरण (Privatisation), व जागतिकीकरण (Globalisation), या L.P.G. सारख्या स्फोटक ‘खाऊजा’ या औद्योगिक-नवनितीच्या विरूध्द, गेली दोन दशके, देशभर खदखदणाऱ्या ज्वालामुखीचा एक किरकोळ ‘स्फोट’ आहे! वेतनमानवाढीच्या दीर्घकाळ ‘प्रलंबित’ मागण्या आणि व्यवस्थापकीय दहशत निर्माण करण्यासाठी अन्याय्य पध्दतीने ‘निलंबित’ केलेले कामगार, या दोन घटनांच्या एकत्रित संतापानं MD/CEO कै. ललितकिशोर चौधरी यांच्या गळयाचा घेतलेला ‘घोट’ आहे.

एक ‘धरणीकंप’ होतो आणि त्याच्या पश्चात भूकंप लहरी दीर्घकाळ जाणवत रहातात. म्हणूनच या शिमग्याचं ‘कवित्व’ दीर्घकाळ शिल्लक रहाणार आहे. तसेच क्वचित पुन्हा एखादा लागोपाठ मोठा भूकंप घडून उत्पातही माजू शकतो. यासाठी इथून पुढे अशा तऱहेच्या धक्कादायक व दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल, तर धातूच्या शोधात खोलवर खणत जाणाऱ्या एखाद्या खाणकामगारप्रमाणं, या औद्योगिक अशांततेचीं पाळंमुळं शोधून काढली पाहिजेत. हे करत असताना सर्वप्रथम आपल्या ध्यानात येईल की, या नवऔद्योगिक नितीच्या ‘गोंडस’ आवरणाखाली हल्लीच्या काळात कामगार-कर्मचारी हा सुध्दा व्यवस्थापकीय दृष्टीकोनातून एक प्रकारचा ‘कच्चा-माल’ म्हणून गणला जातोय. ज्याला हवा तसा वापरायचा, पिळून काढायचा आणि वापर झाला की कुठल्याही सबबीखाली फेकून द्यायचा! ‘टाटा’ समूहासारखे काही सन्माननीय अपवाद सोडले, तर भारतीय उद्योगपती किंवा ‘उद्योगसमूह’, हे कधिही कामगार-कर्मचाऱर्यांचे तारणहार आहेत, असं आशादायक चित्र भारतीय औद्योगिक नकाशावर कधिच मौजूद नव्हतं. पण निदान दोन दशकांपूर्वीच्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्या, या कर्मचाऱर्याना उत्तम जीवनस्तर बहाल करणाऱ्या म्हणून गणल्या जात. मात्र १९९० नंतरच्या जागतिकीकरणाच्या काळात त्यांचीही बुध्दी फिरली आणि अतिप्रचंड आर्थिक ताकद असणाऱ्या या मस्तवाल बहुराष्ट्रीय कंपन्यांनी, या ‘खाऊजा’ धोरणाच्या वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला सुरूवात केली. नुसती राजकीय मित्र जोडायला व भारतीय न्यायव्यवस्थेला ‘बटिक’ बनविण्यासाठी १०० कोटीहूनही अधिक ‘ऑफ द् रेकॉर्ड’ खर्च करणाऱ्या, या बहुराष्ट्रीय उद्योगसमूहांनी भ्रष्ट राजकारणी व सरकारी अधिकारी (विशेषतः कामगार खात्यातील), स्वार्थांध उद्योजक व व्यवस्थापकीय मंडळी, तसेच तथाकथित लेबर-कन्स्ल्टंट्स् व न्यायव्यवस्थेतील दलाल यांना हाताशी धरून, ‘मजूर कंत्राटदारी’ नावाचा पिळवणूकीचा ‘महारोग’ या भारतात सर्वत्र पसरवला.

त्यामुळे व्यवस्थापकीय मुजोर मंडळींच्या मूळच्या सरंजामशाही वृत्तीला कमालीचं उधाण आलं आणि ‘कंत्राटदारीतील कामगार’ या औद्योगिक दृष्टया अस्पृश्य समुदायाचा उदय झाला. ना त्याला नोकरीचं संरक्षण, ना जगायला पुरेसा पगार, ना त्याला कुठल्याही सोयीसवलती! बेरोजगारीनं त्रस्त झालेला आणि ‘राजकीय’ व्यवस्थेनं वाळीत टाकलेला, हा तरूणवर्ग केव्हाचाच आतून खदखदतोय. या असंतोषाला वेडीवाकडी वाचा फुटली, ती सर्वप्रथम ‘ग्रेटर नॉएडा’त! हे या सार्वत्रिक असंतोषाच्या ‘हिमनगाचं टोक’ सुध्दा नव्हे, हे जेवढया लवकर आमच्या संवेदनशून्य व आरपार भ्रष्ट राजकीय व न्यायव्यवस्थेच्या ध्यानात येईल, तेवढे बरं! ‘महासत्ता’ होण्यासाठी निघालेल्या या ‘भारत’ नावाच्या राष्ट्राच्या तथाकथित शासकांनी या तरूणाईची जी ‘क्रूर थट्टा’ चालवलीय ती तत्काळ थांबवा, हा या घटनेमागचा ‘गर्भित इशारा’ आहे!

…राजन राजे

(अध्यक्ष-सुल्झर पंप्स् इंडिया एम्प्लॉईज् युनियन)

(अध्यक्ष-आयशर डेम् एम्प्लॉईज् युनियन)

(अध्यक्ष-घारडा केमिकल्स् एम्प्लॉईज् युनियन)

(अध्यक्ष-स्वतंत्र कामगार संघटना पेपर प्रॉडक्ट्स् लि.)

(सल्लागार-विविध कंपन्यांतील कामगार संघटना)