।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।

‘भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ‘मूळांचा दळभार’ आणि ‘पर्ण संभारासारखं’ – “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न! मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ‘उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ‘आधार’ आहे अन् दुर्जनांवर ‘प्रहार’ आहे! या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रास्त जाणीव मनात बाळगूनही मराठी संस्कृति-विकृति, मराठी अस्मिता-दुहीता, मराठी शौर्य-क्रौर्य, मराठी ज्ञान-अज्ञान, मराठी धीर-तर कुठे मागं फिर, अशा गुणा-दुर्गुणांनी भरलेला आणि भारलेला मराठमोळा माणूस आणि त्याची मायबोली मराठी – हे माझं पहिलं प्रेम! छोटया स्तरावर सामाजिक कार्य करताना का होईना, पण आपल्या क्षमतेची प्रत्यंचा पूर्ण ताणत, त्या मराठमोळया माणसासाठी आणि ‘अमृतातेही पैजा जिंके’ अशा मराठी भाषेसाठी, त्यातल्या ‘जवापाडे’ असणा-या दुर्गुणांना दाबून ‘पर्वताएवढे’ असणा-या सद्गुणांना उठाव देत काहीतरी करीत राहणं, हा माझा ध्यास!! आणि म्हणूनच हा पत्र प्रपंच अन् हे तुमच्यासाठी प्रेमानं ‘पेन’रूपी भेटवस्तू वाटप.

इयत्ता दहावीतल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, (माझी मुलं तुमच्या वयाची आहेत आणि आपल्या संस्कृतित षोडशवर्षीय मुलं ही आईबाबाची मित्रमैत्रिणी होतात) ‘काल’ मी तुमच्या वयाचा होतो आणि ‘उद्या’ तुम्ही माझ्या वयाचे असाल – पण या दरम्यानचा हा जो ३०-३५ वर्षांचा प्रवास असतो ना, तो मित्रांनो फार फार खडतर असतो आणि सद्यस्थितीत तर तो दिवसागणिक निश्चितपणे अधिकाधिक खडतर होत जाणारायं. त्याला तोंड देण्यासाठी आपण स्वतःला सक्षम बनवायला हवं.

कोण कुठला आपल्याला सहानुभूति दाखवेल – कुठेतरी वशिल्यानं चिकटवेल, या खोटया आशेवर जगू नका. कारण पदरात ‘सहानुभूति’ ऐवजी पोळून काढणा-या वास्तवाची ‘अनुभूति’ निखा-याच्या स्वरूपात पडण्याची शक्यता अधिक. ‘मराठी माध्यमाचे’ म्हणून कोणी आपल्याला ‘सवलतीची’ आरक्षित पंगत वाढणार नाहीय, तर या स्पर्धेच्या जगात कर्तृत्व थिटं पडलं तर तोंडाला पानं पुसली जातील किंवा कुठल्याही बेसावध क्षणी भरल्या ताटावरून उठवलं जाईल. माझ्या अल्पस्वल्प सार्वजनिक जीवनातील हे विदारक अनुभव आहेत मित्रांनो, म्हणून उठा! जागे व्हा!! आसन, प्राणायाम-व्यायामानं मन-शरीर बळकट करा आणि भरपूर अभ्यास करा!!! व्हर्नॅक्युलर मिडियमची (देशी भाषेचे माध्यम) मुले म्हणजे ‘गाळ’ आहे, या उच्चभ्रू लोकांत सार्वत्रिक पसरलेल्या गैरसमजाला मूठमाती देण्यासाठी स्वतःला परिश्रमानं सिध्द् करा – सक्षम व्हा आणि आम्ही ‘गाळ’ नसून ‘गाळाची सुपीक माती’ आहोत, हे जगाला दाखवून द्या!

मित्रांनो, दिवसेंदिवस जगणं किती कठीण होत चाललयं, हे आपण थोडं समजून घेऊया. पूर्वीच्या काळी ‘उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी’ म्हटली जायची. पूर्वापार ‘धंदा’ म्हटलं म्हंजे मराठी माणसाचा मोठा ‘वांधा’!  कारण एकतर धंघ्यासाठी लागणा-या कठोर परिश्रमांची पुरेशी तयारी नाही (अलिकडे हे चित्र सुदैवानं हळूहळू का हाईना, पण निश्चितपणे बदलू लागलयं) आणि दुसरीकडे ‘धदा’ म्हटलं म्हंजे चलाखी-मखलाशी आणि थोडी बहुत बदमाशी आलीच, पण त्याचाच सचोटीनं जगणा-या मराठी माणसाकडे ‘वांधा’, त्यामुळे ढोबळमानानं कुठल्याही धंद्याच्या क्षेत्रात ‘मराठी पाऊल’ दुर्दैवानं चार हात मागेच.

 

मग उरली सुरली ती ‘शेती’ (त्यातही आता ‘कान्ट्रक्ट-फार्मिंग’ येतयं) आणि शिल्लक राहील्या त्या ‘नोक-या’! प्रामुख्यानं मराठी माणूस जिथे वळतो, त्या नोकरीच्या संधिंना एकीकडे अतिरेकी यांत्रिकता व सर्वव्यापी संगणकीकरणामुळे ‘क्षयाची बाधा’ झालेली, तर दुसरीकडे आर्थिक शोषणाच्या चरकातून पिळून काढणा-या ‘कंत्राटी मजुरी’ (Contract Labour) या ऑक्टोपसी-संकल्पनेमुळे परप्रांतियांच्या आक्रमणाची त्यात भर पडलेली! त्याची व्यापकता एवढी भीषण की, तुमच्या गुरूजनांच्या शिक्षकी पेशातदेखील ही ‘अवदसा’ दशदिशांनी घुसलीयं. त्यामुळे काळाच्या ओघात आचार्यांचे (जसे द्रोणाचार्य) गुरूजी झाले (जसे सानेगुरूजी), गुरूजींचे ‘सर’ झाले (जसे मेहंदळेसर) आणि आता तर कंत्राटी पध्दतीने सरांच ‘सरपण’च होतयं की काय, अशी उव्दिग्न अवस्था झालीय. हातात बंदुका-तलवारी न घेता का होईना पण, मराठी लोकांवर झालेले हे ‘परप्रांतीय-आक्रमण’च नव्हे तर काय? मित्रांनो, हे काळाचं मोठं कठीण ‘संक्रमण’ आहे – रात्र वै-याची आहे, म्हणून जागे राहून ‘सक्षम’ बना!

‘सक्षम’ व्हायचं म्हंजे नेमकं काय करायचं? सर्वप्रथम जीवनातल्या प्रत्येक बाबतीत (सुरूवात दिनचर्येपासून) स्वावलंबी व्हा! वानगीदाखल एक गोष्ट सांगतो. गाजलेले अमेरिकेचे दिवंगत अध्यक्ष अब्राहम लिंकन यांना त्यांच्या स्वतःचा बूटाला पॉलिश करताना पाहून आश्चर्यचकित झालेला त्यांचा सहकारी म्हणाला, “तुमच्या बूटांना तुम्हीच पॉलीश करता, पेसिडेट महाशय?” लिंकन उत्तरले, “मग तुम्ही कोणाच्या बूटांना पॉलीश करता?” ‘स्वावलंबित्व’ ही व्यक्तिविकासाची पहिली पायरी – पुढे कळसाला हात घालण्यासाठी ब-याच पाय-या ओलांडायच्यायत.

मित्रांनो, जे काही करायचं त्यात स्वतःला झोकून देऊन त्यात जास्तीत जास्त प्राविण्य संपादन करा, प्रसंगी कुठलही काम करण्यात बिलकुल लाज बाळगू नका, यशापयशाची पर्वा न करता विचापूर्वक प्रयत्नांची कास धरा, मनात सदैव कुणालाही सहकार्य करण्याची भावना बाळगा – व्यक्तिगत किंवा सार्वजनिक जीवनात कुणालाही नडणा-या – छळणा-या नकारात्मक भावनेला यःकिंचितही थारा देऊ नका – कुणाला मदत करणं जमलं नाही तरी एकवेळ चालेल, पण नाहक कुणालाही अडचणीत आणू नका! ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!’ या बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीनुसार विपरीत व अन्यायी परिस्थितीशी जरूर प्रबळ ‘संघर्ष’ करायचा, पण हदयातला ‘प्रेमाचा स्पर्श’ मात्र नाही हरवू द्यायचा!

टी.व्ही., जाहिराती आणि सिनेमे यातून दिसणारा भुलभुलैय्या, हा वरून कितीही गोंडस दिसला तरी तो अंति निखालस फसवा आणि विनाशाप्रत नेणारा आहे. अशा त-हेचं चंगीभंगी आयुष्य आपल्या वाटयाला येईल, या दिवास्वप्नात रहाल तर भयानक तोंडघशी पडाल आणि कुणी आधाराचा हात द्यायलाही नसेल – वेळ तर आपल्याला केव्हाच मागे टाकून पुढे निघून गेलेली असेल!

माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की, कृपाकरून याला माझी ‘सिनेस्टाईल लेक्चरबाजी’ समजण्याची घोडचूक करू नका! माझं मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर निरतिशय प्रेम आहे, कारण भविष्यात आपली सोन्यासारखी मराठी भाषा आणि संस्कृति तेच जिवंत ठेवणार आहेत! तुमच्यावाचून म-हाटमोळया संस्कृतिच्या निरांजनातलं ‘तेल’ संपायला वेळ लागणार नाही. ‘पार्कर पेनाच्या भेटवस्तू वाटपाच्या निमित्तानं अक्षरशः जीव तोडून तुमच्या हदयाला मी साद घालतोय, ती तुम्हाला निद्रेतून गदगदा हलवून जागं करण्यासाठी! एवढी एक गोष्ट जरी तुम्ही समजून घेतलीत, तरी मी स्वतःला धन्य समजेंन.

एस्. एस्. सी. परीक्षा हे मित्रांनो, घराच्या उंबरठयाबाहेर टाकलेलं पहिलंवहिलं पाऊल असतं. पुढे अनेक पाऊलांची ‘पायवाट’ लांबवर पसरलीय. म्हणून हे तुमचं ‘शुभारंभाचं पाऊल’ यशाच्या दिशेकडे वळावं, हीच माझ्या बालमित्रमैत्रिणींसाठी माझी ईशचरणी प्रार्थना!

।। धन्यवाद ।।

…राजन राजे